अन्याय मुळातच वाईट; पण तरीही एका जीवाकडून दुसऱ्या जिवावर तो नियमितपणे केला जातो. अन्याय मुळातच क्रूर; पण तरीही तो भरजरी पद्धतीने सजवून एका जीवाकडून दुसऱ्या जीवाच्या गळी उतरवला जातो.
एक पाखरू असतं गोड गोड गाणारं, खुल्या आभाळात उडणारं, रानातल्या सगळ्या पक्षांचं काळीज हिरावून घेणारं हे लोभसवाणं, लाडिवाळ, लाघवी, सोनेरी पिसांचं - सोनेरी पाखरू. आणि अशा या सोनेरी पाखराला एकदा प्रेम जडतं, ते रानातल्या एका पक्षाच्या प्रेमात कैद होतं! सोनेरी पाखरू आणि रानातला तो पक्षी मिळून मग डेरेदार झाडावर घरटं करतात.
सोनेरी पाखरू प्रेमात आहे हे माहिती असूनही रानातली इतर पाखरं त्याचं, जीवनरसाने ओथंबून वाहणारं, गीत ऐकण्यासाठी धडपडतात, त्याच्याशी जवळीक करू पाहतात मात्र सोनेरी पाखरू आता फक्त एकासाठीच गातं नं! ते ज्याच्यासाठी गातं तो पक्षीही काही वाईट नाही, तोही खट्याळ आहे – सोनेरी पाखरासारखाचं – पण त्याला ना काळजी वाटते. सोनेरी पाखराची, त्याच्या भोळेपणाची, इतर पाखरांनी त्याला भरकटवण्याची, भुलवण्याची आणि . . . सोनेरी पाखराने त्याला सोडून जाण्याची!
मग काहीही झालं तरी सोनेरी पाखराला, व परिणामी आपल्या काळजाला, इजा होता कामा नये म्हणून सोनेरी पाखराच्या भल्यासाठी दुसरा पक्षी त्याला घरट्याजवळ सिमीत आभाळात उडायला सांगतो. सोनेरी पाखरू सुरुवातीला थोडाफार विरोध करतं खरं; पण नंतर पक्ष्यावर असलेल्या प्रेमापोटी उडणं कमी करतं. पुढे-पुढे तर घरट्यातचं राहू लागतं. दुसरा पक्षी आनंदतो.
उडणं पूर्ण विसरल्याने भविष्यात सोनेरी पाखराचं घरात गुणगुणनं वाढतं, अल्लडपणा वाढतो. याच्याने रानातली बाकीची पाखरं कायम घरट्याच्या आसपास थांबलेली पाहून दुसरा पक्षी सोनेरी पाखराला हळू गायला सांगतो. सोनेरी पाखरू हेही करतं! प्रेमात बद्ध ना ते! त्याचं प्रेमचं तेवढं गहिरं, बाकी काय?
नंतर ते सोनेरी पाखरू गायचंही बंद होतं. रानातली इतर पाखरं तेव्हा त्याला भूतकाळातील त्याच्या छबीची आठवण काढून देतात. सोनेरी पाखरू त्यास बळी पडू नये म्हणून दुसरा पक्षी सोनेरी पाखरासाठी एक सोनेरी पिंजरा आणतो आणि पाखराला मोठ्या प्रेमाने पिंजर्यात बसवतो.
पण हे तो कोणासाठी करतो? सोनेरी पाखरासाठीच ना? त्याने निर्मळ रहावे म्हणूनच ना? त्याचंही सोनेरी पाखरावर तितकंच प्रेम आहे ना? नक्कीच आहे, किंबहुना सोनेरी पाखराहून त्याचं प्रेम जास्त आहे. म्हणूनच दुसरा पक्षी प्रेमात जे करतो आहे त्यात गैर काहीच नाही . . .
तो तिला सांगत होता आणि बंधनं लादण्याचं इतकं सुरेख स्पष्टीकरण मी पहिल्यांदाच ऐकत होतो.
{fullwidth}