रस्त्यावर दिसेल ती गाडी चोरणं, दिसेल त्यास बडवणं, पोलिसांना मारणं, ठार करणं, भांडण करणं, इस्पितळातून सुटलेल्या वेड्याप्रमाणं दिसेल त्याची कत्तल करणं, गाड्यांखाली चिरडणं, गाड्या फोडणं, आग लावणं, दंगल घडवणं व आवडेल ती मुलगी-बाई-स्त्री भोगणं . . . ही अस्वस्थता ‘गेमिंग’च्या पूर्वव्यसनी व्यक्तीची. ‘गेमिंग’चा विळखा तरुणपिढीभोवती आणखी घट्ट होत आहे. या गेमिंगच्या व्यसनातून वास्तवी जीवनात भरत निघालेल्या हिंसेचा स्वानुभवातून शोध घेऊ पाहणारा हा लेख.
‘आमचा तर काळच वेगळा होता’ असं शक्यतो मी कोणाला सांगत नाही – फुकटचे जोडे कोणी खा? जोडे सोडले तरी किमानपक्षी शिव्या तर समोरचा देईलच! आता तो या शिव्या मनातल्या मनात देईल का मग माझ्या तोंडावर हे त्याच्या तब्येतीवर अवलंबून आहे. बाकी माझी तब्येत (त्याने मला) शिव्या देण्यास अनुकूल आहे, असो. पाल्हाळ पुरे.
‘आमचा काळच वेगळा होता’ हे विशीतील तरुणानं म्हणणं जरी अनपेक्षित आहे तरीही आता मी जो प्रसंग नमूद करतो आहे त्यासाठी हे विधान लागू होईल. मी दहा वर्षांचा असताना मला ‘सायबर कॅफे’ नामक स्थळाचा शोध लागला. तेथे पाच ते वीस-पंचवीस संगणक ओळीने मांडलेले असतात. काही कॅफेत तर पन्नास-शंभर संगणक देखील असू शकतात (माझ्या पाहण्यात तरी नाहीत)! शक्यतो शहरात तरी अशी कोणी व्यक्ती या घडीला सापडणार नाही जिने कधीही सायबर कॅफे पाहिलेलं अथवा अनुभवलेलं नाही. या सायबर कॅफेचा मूळ उद्देश काहीही असला तरी याचा सर्वाधिक वापर व्हायचा – व अजूनही होतो – तो ‘गेमिंग’साठी. आणि म्हणूनच सायबर कॅफेस ‘गेमिंग झोन’ असंही म्हणतात (छानच झाली व्याख्या!).
वयाच्या दहाव्या वर्षी, चौथीत असताना, आमच्या शाळेजवळील एका गल्लीत शेख नामक दोस्ताच्या कृपेनं मला सायबर गवसलं. त्याकाळी पाच रुपयात एक तास संगणक खेळायला मिळणार ही कल्पनाच अंगात जोम, उत्साह व शिरशीरी आणणारी होती. आत्ताचं गेमिंग क्षेत्र जितकं फोफावलेलं आहे त्याच्या चतकोर सुद्धा त्यावेळी नव्हतं. गेमिंग कन्सोल अथवा मोबाईल तर तेव्हा दुरापास्त होते. व्हिडिओ गेम होत्या मात्र त्या एटबिट(8-bit)वाल्या होत्या.
थोडक्यात ‘एट-बीट’ स्पष्ट करायचं तर – जगाला एटबीटचा परिचय झाला ऐंशीच्या दशकात आणि भारतात एटबीट आलं २००६ सालच्या आसपास! थोडक्यात आपण वीस-पंचवीस वर्षे मागं आहोत. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर ‘पीएस-थ्री’चं (पी-एस – प्ले स्टेशन) देऊयात. सध्या ‘पीएस-फाईव्ह’ जगात चालू आहे तिथे २००८च्या आसपास आलेले पीएस-थ्री भेटत सुद्धा नाही. भारतात मात्र आजही नवेकोरे पीएस-थ्री भेटतात.
ही जी वीस-पंचवीस वर्षांची तफावत होती त्यात जागतिक गेमिंग क्षेत्र कितीतरी मोठी झेप घेऊन बसलेलं होतं. त्यात संगणकावरच्या गेम तेव्हा ‘सिक्सटीफोर-बीट’ (64-bit) मध्ये चालत असत – तेही तीन मितीत! त्यांची भुरळ पडली नसती तरंच नवल होतं. परिणामी ‘व्हाईस सिटी’ नामक गेमने माझ्या जीवनात घुसखोरी केली या व्हायसिटीच्या तीन गेम तेव्हा होत्या. त्या बनवणाऱ्यांवर (Rockstar North) भरपूर खटले, आरोप होते.
फार पूर्वी मी व्हाईससिटीला ‘सीएस’ म्हणायचो; पण सीएस ही ‘काउंटर स्ट्राइक’ नावाची वेगळीच आणखी भन्नाट गेम आहे हा साक्षात्कार नंतरचा. त्यानंतर मी हळूहळू गेमिंगच्या व्यसनात गुरफटलो. माझ्या अंगात भिनलेलं हे व्यसन काढण्यासाठी आमच्या तीर्थरूपांनी (माझे!) कपडे काढून (माझ्याच!) अंगावर ‘यष्टी’चे प्रयोगही केले! त्याच मध्यंतरी माझ्या फुटकळ जीवनात ‘व्हिडिओ गेम’चा शिरकाव झाला व त्याच्याच कृपेने विशीत ‘चाळीशी’ लागली. या स्थित्यंतरावर मी एखाद्या स्वतंत्र लेखात बोलेन सध्या थोडसं ‘नटरटूल्स’बद्दल.
समजा नटरटूल्स हे नाव तुम्ही आभाळाकडं पाहून किंचाळलात आणि झटक्यात दोन-पाच बंदुका – त्यात पिस्तूल, घोडा, बंदूक, मशीन, एके-४७, स्नाईपर, एसएमजी सर्वकाही – सोबतीला हातगोळे, आग लावण्याच्या रासायनिक बाटल्या व पुन्हा एक कटर मशीन तुमच्या शेजारी येऊन पडलं तर? तर काय त्याचा योग्य तो ‘विनियोग’ करायचा म्हणून तुम्ही समोर दिसेल त्याची कत्तल करत फिराल का?
व्हाईस-सिटी या गेमबद्दल आपण बोलत होतो. ‘टाॅमी’ नामक एका कफल्लक गावगुंडाची तो अट्टल माफिया बनण्यापर्यंतची ही कहाणी. तसं पाहू गेल्यास हे टॉमी नामक पात्र संगणकाच्या समोर बसलेल्याच्या मेंदूत आहे! त्याला जसं वाटेल तसं तो पडद्यावरच्या टाॅमीस फिरवू शकतो. या गेमच्या कथानकाप्रत आपण पुन्हा बोलूयात. त्याआधी सांगतो की या गेममध्ये ‘रडीचा डाव’ खेळून लवकर जिंकण्यासाठी व एकेक ‘मिशन’ झटपट पूर्ण करण्यासाठी काही सांकेतिक शब्द म्हणजे चीटकोड्स असतात. ते दाबले की टॉमीला वेगवेगळ्या प्रकारे मदत होत असते. पोलीस मागे लागले असता त्यांना ‘कटवणं’, कपडे बदलणं, गाड्या पाडणं/फोडणं, ताकद वाढवणं, वेग वाढवणं, हवेत उडणं, समुद्रात पोहणं, अमर होणं इत्यादी. हे सर्व चीटकोड पाठ करावे लागत – जे मी देखील केले होते. यातील ‘नटरटूल्स’ नावाचा चीटकोड टाकताच टॉमीस अमर्याद शस्त्रास्त्रांचा पुरवठा होत असे. यावरच आपल्याला बोलायचं आहे.
एकेका मिशनची पूर्ती होताच थोडसं कथानक उलगडून गेम पुढच्या पर्वात घुसायची. म्हणजे जितक्या लवकर मिशन होतील तितकं चांगलं. आणि हे मिशन म्हणजे मारधाड, खून, चोर्यामाऱ्या, दरोडे, अत्याचार, वसुली, गुन्हेगारी व्यतिरिक्त काहीच नाही. अशात मग नटरटूल्स टाकली की रस्त्यावरील दिसेल त्याची कत्तल करायला संगणकाच्या पडद्यासमोरील मेंदूत असणारा टॉमी मोकळा! गेमच्या कथनाकात जरी थोडाफार दम असला तरी त्यावेळी मला – व दहा ते पंधरा वयोगटातील सर्वच मुलांना – कथानकाशी काहीच घेणं देणं नव्हतं. फक्त रस्त्यावर दिसेल ती गाडी चोरणं, दिसेल त्यास बडवणं, पोलिसांना मारणं, ठार करणं, भांडण करणं, इस्पितळातून सुटलेल्या वेड्याप्रमाणं दिसेल त्याची कत्तल करणं, गाड्यांखाली चिरडणं, गाड्या फोडणं, आग लावणं, दंगल घडवणं व आवडेल ती मुलगी-बाई-स्त्री भोगणं इतकंच काय ते शिल्लक राहायचं.
‘ती गेम आमच्या मेंदूत विकृती भरत होती? की असणाऱ्या विकृतीस व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ पुरवत होती?’ हा विचार करण्यासाठी माझा मेंदू शाबूत आहे तो मी या गेमिंग व्यसनातून बाहेर निघालो यामुळे! मात्र टॉमीची विकृती कैक वर्ष अनुभवलेले ‘टॉमी’ कमी नाहीत, असोत बापडीचे. वास्तवात मी त्या वयात माणसात ताकतीची किंवा सत्तेची, कोणावर तरी राज्य करण्याची जी नैसर्गिक खुमखुमी असते तीस दोषी मानलंही असतं; पण यानं मग हिंसक विचारसरणीची बोळवण होईल – तेच मला नको आहे!
मी त्या वयात स्वतःला टॉमी समजून कत्तली अथवा हिंसक अत्याचार कसे घडवले असतील याचं मला आता आश्चर्य वाटतं. कॅफेतून बाहेर निघाल्यानंतर तो कैफ माझ्या नसानसात भिनलेला असायचा. सगळं जग अतिक्षुल्लक आणि अतिवेगवान वाटायचं. या गेमचा परिणाम माझ्या मेंदूवर झाला परिणामी वैयक्तिक नातेसंबंधांवर झाला हे सत्य आहे. त्यानंतर मी किंचित गुंडगिरीकडे झुकलो होतो. तिथेही तीर्थरूपांनी अंगातली गुंडगिरी (माझ्याच!) अंगावरील कपडे काढून ‘यष्टी’चा प्रयोग केल्यावर उतरली हा भाग (महत्त्वाचा असला तरीही) अलाहिदा! पण कित्येक हिंसक टाॅमी पुढं गुंड झालेच की! कदाचित त्यावेळी माझ्याकडे बंदूक असती तर मीही कोणाचा तरी खून केला असता का? उत्तर ठरवणं कठीण.
ही गोष्ट आहे फार-फार पूर्वीची. सध्याच्या गेमिंग क्षेत्रातील ‘ग्राफिक्स’ आणि संगीत-दिग्दर्शन-अभिनय वगैरे तंत्रातून निर्माण झालेल्या गेम या वास्तवाहून अधिक वास्तवी भासतात! तेव्हा आजचे हे आणखी हिंस्त्र टॉमी नक्की कुठं व काय करत असतील सांगणं कठीण आहे. आता व्हाईससिटीचा पाचवा भाग येऊन दहाहून अधिक वर्ष उलटली असली तरी सध्या व्हाईससिटीला मागे पाडतील अशा महाभयंकर हिंसक गेम अस्तित्वात आलेल्या आहेत. व्हाईससिटीवर बऱ्याच देशात बंदी आणली गेली होती. व्हाईससिटी लेकरांना हिंसक गुन्हेगार बनवत आहे यावर बराच खलही झाला होता.
हे सर्व चर्वितचर्वण करण्यामागचं कारण म्हणजे नुकताच गावाकडून आलेला बारा वर्षांचा मावस भाऊ. मी त्याच्या हट्टापायी त्याला व्हाईस-सिटी टीव्हीत भरून दिली (होय आताच्या तंत्रज्ञानाने ती गेम टीव्हीत चालते) व माझा भूतकाळ पाहिला. कोणीही न सांगता तो कथानक किंवा मिशन बाजूला ठेवून रस्त्यावर पिसळलेल्या गुंडासारखा कत्तली करत सुटला – अगदी माझ्यासारखा – अगदी टॉमीसारखा. त्याला मी पोलिसांचे खून पाडण्याचं किंवा रस्त्यावरील लोकांना चिरडण्याचं कारण विचारलं असता ‘असंच मजा वाटते’ हे भयाण उत्तर मिळालं. मात्र हे अनपेक्षित होतं का? अजिबात नाही.
आत्ताच्या काळाच्या गेमिंग क्षेत्राने केलेली प्रगती, मेंदू-मेंदूतील जागलेले हिंसक टॉमी, समाज(आणि)माध्यमांवर त्यांचं होत असणारं उदात्तीकरण व सहजच गंभीर हत्यारं उपलब्ध करून देणारी ठिकाणं यांचा परिपाक म्हणून आपली सामाजिक स्थिती एकंदरीत हिंसक, अन्यायी, अत्याचारी व गुंडावलेली होणं स्वाभाविकच.
टॉमी तर तेव्हाही होताच; पण आता फक्त भीतीचं कारण इतकंच की ‘नटरटूल्स’ सुद्धा आता वास्तवात येत आहे.
{fullwidth}