कलगीतुरा


abstract male face in clouds vibrant painting
लहानपणी बापाच्या मागून आई गेल्यावर भोळ्या ढोम्यानं जगण्याचं काहीच कारण नव्हतं पर गावानं त्याला जगवलं


प्रत्येक बापाने आयुष्यात कधी ना कधी अगतिकतेची ती किनार पाहिलेली असते, अगतिकता अनुभवलेली असते. पण मुळातच अगतिक असणारा कधी ‘बाप’ असण्याची किनार पाहू शकतो का? ‘बाप’पण अनुभवू शकतो का? कलगीतुरा रंगतो तो मैफिलीत, आमनेसामने. पण जर त्या कलगीतुऱ्यात एकटाच दोन्ही बाजू सांभाळत असेल तर? तर त्याला ढोम्या म्हणावं किंवा म्हणावं बाप . . .


ढुंगणाला चिकटलेला काळ्या मातीचा चिखल झटकून ढोम्यानं, गुडघ्यापर्यंतच असणाऱ्या अर्ध्या, धोतराचा सोगा पुना कमरंला खवला. मग चवड्या यवढ्या चिखलात उतरून नवा पाट फोडला, खोऱ्यानं आजूबाजूची माती खरडून जुन्या पांदीवर छोटा बांध उभा केला. नव्या पाटातून खळाळत पाणी धावायला लागलं तसं त्यानं परत आधीची जागा गाठली. समोरच बकाबक पाणी ओकणाऱ्या टी वर त्याचं पोरगं खेळत होतं. उन वाढत होतं. फिरून सगळ्या रानातली पाखरं टी वर पाणी प्यायला जमत होती. त्याचं पोरगं मात्र खेळण्याच्या नादात पाखरांना हुसकावून लावत होतं. बराच वेळ त्याची ही दंगामस्ती पहिली आन शेवटी – पोरगं पाखरांना पाण्याजवळ फिरकू देत नाही हे – असह्य होऊन त्यानं चिखलाचा ढेकूळ नेम धरून पोरावर फेकला. शेजारी बद्कन ढेकूळ आदळल्यावर दचकलेल्या पोरानं मागं वळून याच्याकडं पाहिलं.

“का रं रान्डच्या? पाखरं उनाचं पाणी प्यायला आलेली बघवं ना का तुला?”

त्यानं दम भरून दुसरा ढेकूळ हातात घेतला तसं पोरगं टीच्या आळ्यातून बाहेर निघून त्याच्या बाजूला येऊन उभं राहीलं. थोडा वेळ सरला नाही तोवरच पोरानं त्याचा तगादा पुन्हा सुरू केला.

“बा . . . मोटार . . . ”

ढोम्यानं शांतपणे डोक्यावरून निखळून डोळ्यांवर आलेला पंचा मागं सारला, भिवयांवरचा घाम पुसला.

“काय खाऊन-बिऊन निगाला व्हतास का घरातनं?” पोरानं नकारार्थी मान हलवली. “आरं शिंदळीच्या मरतूस का काय उपाशी राहून? यक भाकर होती टोपल्यात ती तर खायचीस की?”

पोट खपाटीला गेलेल्या, काळ्याकुट्ट, केसांच घरटं झालेल्या आन् सहा वर्षांच्या मानानं अगदीच किरपान असणाऱ्या, फकस्त चड्डीवर उभ्या, आपल्या पोराकडं ढोम्या पाहत होता.

आज तिसरा दिवस – पोरगं दररोज सकाळी उठून डोळ्यांची चिपडं देखील न काढता त्याच्या आईला ढोम्या कोणत्या रानावर आहे हे विचारायचं आन् तिथं येऊन त्याच्या पाठीमागे भुणभुण सुरु करायचं. तीन दिवसांपूर्वी गावात भरलेल्या यात्रंत ते दोस्ताच्या संगतीत फिरून आलेलं. तिथंच कुठल्यातरी तंबूत त्यानं म्हण ‘मोटारगाडी’ पाहिली होती. मग काय तेच खूळ त्याच्या डोक्यात घुसलेलं. लाकडाच्या दोन चाकांना मधोमध भोक पाडून त्यातून आडवी-उभी लोखंडाची कांब जोडून तयार केलेल्या, वरनं सोनेरी रंगात बुडवलेल्या बाबागाडीला पाहिल्यापासूनच त्याला ढोम्यानं फुटक्या टायरात लाकूड आडवं घालून तयार करून दिलेली पळवायची भिंगरी रुचंना झालती.

पाळीपाळीनं सगळ्या गावच्या पिकांना पाणी पाजून आपल्या कुटुंबाच्या पोटातलं पाणी शाबूत राखणाऱ्या ढोम्याला पोराच्या बाबागाडीसाठी बंदा रुपया घालवणं, कितीही इच्छा असली तरी, शक्य नव्हतं हे त्या पोराला कोण सांगणार? मुळात पिकांना पाणी दिल्यावरच दर दिवशीच्या वेगळ्या मालकाकडून धान्य, माळवं, कापडं असलं काहीबाही मिळत रहायचं. गावात त्याला पैशाचं नावं कोणी काढत नव्हतं. कारण, ढोम्या म्हणजे गावाचा हक्काचा बैल!


लहानपणी बापाच्या मागून आई गेल्यावर भोळ्या ढोम्यानं जगण्याचं काहीयक कारण नव्हतं पर गावानं त्याला जगवलं. मिळंल ते खाणं, त्याआधी महत्वाचं म्हणजे सांगल त्याचं काम करणं आन् रात्री जागा मिळंल तिथं झोपणं हेच त्याचं जीवन बनलं. शिडशिडीत काळ्या देहावर, मूळच्या रंगाची ओळख कवाच सोडलेला यक जुनाट पंचा, विचित्र वाढलेली दाढी आन् खाली मळलेलं, दहा ठिकाणी फाटलेलं आर्ध धोतार म्हणजे – ढोम्या. गावानं पंचवीस वर्षं ढोम्याला वाढवलं खरं मात्र बदल्यात भोळ्या ढोम्याचा खूळा ढोम्या बनवला!

यकदा अचानकच ढोम्याचा मामा का काका का कोणीतरी असल्याचा दावा करणारा कोणी इसम गावात उगवला. लगोलग त्यानं सोबत आणलेली, नाकीडोळं सुंदर असणारी, सतरा वर्षांची पोर ढोम्याच्या गळ्यात बांधली. त्यानंतर तो इसम गावाला पुना कधीही दिसला नाही.

शेजारच्या गावातल्या त्या पोरीनं उसात कोणासोबत तरी तोंड काळं केलं असल्याची बातमी गावात पसरली तेव्हा तिच्या लाबच्या चुलत्यानं येऊन तिला ढोम्याच्या स्वाधीन केलं होतं. बहुधा तिनं चुलत्यासंगतीच तोंड काळं केलं असावं आणि नंतर झाला प्रकार गावाला सांगून त्याची इभ्रत घालवली असावी म्हणून त्यानं रागातंच तिला ढोम्याच्या हवाली केलं, असं गाव मानत होतं.

इच्छा, परिस्थिती नसतानाही ढोम्याचं लग्न झालेलं पाहून मग पाटलानं वेशीबाहेरच्या रानात त्याला खोपट मारायला परवानगी दिली. पाटलानं हे त्याच्यावर दया दाखवून केलं का मग त्याच्या बायकोचा भरलेला ऊर पाहून, यावर गावात अजूनही मतभेद आहेत. मात्र तिला झालेलं पोर हे खुळ्या ढोम्याचं नाही यावर कोणाचंच दुमत नाहीये. का असावं? असावं का? दिवस सरत होतं. नाही म्हणायला गावाच्या उदारतेनं ढोम्याच्या घरात जगण्यापुरती भांडीकुंडी जमली. इतरांसाठी जे भंगार होतं ते त्याच्या घरात सोनं म्हणून उभं राहिलं.

गावाला ढोम्याबद्दल बऱ्याच तक्रारी होत्या. कधीतरी रानात त्यानं वेळेवर पाणी पाजलं नसल्यानं कुणाचं तर पिक जळालं होतं, तर कुणाच्या गुरांचा चारा त्यानं वेळंवर न पोहचवल्यानं ती दुधाला कमी आली होती, कुणाला तर कापणी करू लागीतली नाही, तर पावसाआधी कुणाच्यातर घराची डागडूजी करायला तो विसरला होता, कुणाचा पाड उतरवायचा राहिला होता, तर कुणाची शहाळी ढोम्यानं वेळीच न उतरवल्यानं नारळ बनून खाली पडली होती तर कुणाचं केंबाळ वेळीच सुट्ट न केल्यानं त्याला भुरा लागला होता. कधीच एकाजागी बसून दिवस घालवला नसला तरी गावाकडं ढोम्याच्या लाख तक्रारी होत्या. खुद्द ढोम्याला मात्र गावाकडून कोणतीबी तक्रार नव्हती!

त्याच्या नशिबानं – किंवा तिच्या दुर्दैवानं – बायकोनं त्याला सर्वस्व मानलं होतं. त्याच्या सगळ्या कमीपणावर तिच्याकडे यकच उत्तर होतं ‘माणसाचं मन निर्मळ हाय’. यामुळंच तिनं तिचा पदर, अजून तरी, शाबूत ठेवला होता जो फक्त त्याच्यासाठी ढळायचा.


“बा . . . मोटार . . . ”

पोरानं डोळ्यांच्या खोबण्या चोळून त्यातलं पाणी रिकामं केलं. शेवटी त्याचा लकडा सहनशक्तीच्या भाहीर चालल्यानं ढोम्यानं उठून त्याच्या दंडाला धरून त्याला पिटाळलं.

“जा, पलीकडच्या पांदीला पाणी पोचलं का ते बग आन् सांग मला. मजी हीतं बांध घालायला बरं, जा पळ.”

पोरगं रानाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन बांधा-बांधात पाणी बघू लागलं. बापावरच्या रागानं त्यानं पांदी निम्मीचं झाली असली तरीबी ढोम्याला नवा बांध फोडायला जुना घालायला लावला. मग तितूनच गावचा रस्ता सुधरला.

ढोम्या खुळा असला तरी, पांदीभर पाणी पोचायला किती वेळ लागतो हे त्याला चांगलंच माहिती होतं. बांध न फोडताच त्यानं आपली जागा गाठली मग निवांत डोक्यावर हात टाकून टी वर जमलेली पाखरं पाहत बसला.

दुपारी तो घरी पोहचला तेव्हा घरी फक्त बायकोच. पोराचा पत्ता न्हवता. बायकोनं जेवताना मधेच उठून पाण्याचा तांब्या त्याच्या हातात टेकवला आन् जेवणाचं ताट बनवून पुढं सरकावलं. ढोम्याचं पाणी पिऊन होत नाही तोवर त्याचा वास लागल्यासारखं पोरगं घरात घुसलं. जेवायचं सोडून त्यानं पुन्हा ढोम्याचा माग धरला.

“बा . . . मोटार . . . ”त्याच्याकडे दुर्लक्ष करून ताटातली सुकी भाजीभाकर हातावर घेऊन ढोम्यानं घास मोडला.

“आयं तुच सांग की आता?”

बायकोचा गोंधळ उडाला. ढोम्या घरी नसताना तिनं पोराचं तोंड शिवण्यासाठी त्याला ‘म्या सांगते तुझ्या बा ला’ हे आश्वासन देऊ केलं होतं. आता मात्र समोर बसलेल्या ढोम्याला पाहून ती बोलू शकली नाही. तसंही घरातील पैशांची स्थिती तिच्यापासून लपल्येली नव्हती.

“ती काय सांगणार हाय मला? पर तिनं सांगून बी काय उपेग? माझ्याकडं पैसं नगूत?”

“आईका की म्या काय म्हणते . . . ”

“कायबी म्हणू नगस. कशाला नसती थेरं पाईजेत? म्या घरी बनवता आली तर बनवतू गाडी, नायतर काय बाकीची खिळणी कमी हायेत का?”

“पर समद्यांनी घेतलीया मोटार.” पोरानं दोघांच संभाषण तोडलं.

“समद्या गावाचा जीव वर आला आसलं, माझा यायचा न्हाई! उगाच कुणाच्याबी नादाला लागून बिथरल्यागत करू नगस.”

“मला पायजे, मोटार पायजे, पायजे. नायतर . . . ”

“नायतर काय?” ढोम्यानं पोराला आणखी पेचात पकडलं.

”उचलून आणीन.” पोरानं डोळे पुसत सांगितलं.

“चुरुन आणचील?”

“आणीन चोरून . . . ”

पोराचं वाक्य पूर्ण होण्याआधीच उरलेली भाकरी ताटात ठेवून ढोम्या उठला आणि पोराच्या कानशिलात पेटवून मोकळा झाला. अंग उघडं दिसेल तिथं आणखी चार तडाखे देऊन त्यानं पोराला बदडून काढलं. त्याच्या तावडीतून सुटून पोरगं वेगानं गावाकडं पळत सुटलं.

“चोरी करतूय म्हण . . . यासाठी वाढवलाय का भडव्याला? यीवू दे माघारी मंग बघतो . . . ” ढोम्यानं ताटातली भाकरी पुन्हा उचलली.

कोणत्यातरी रानातलं काम उरकून ढोम्यानं रात्री घर गाठलं तेव्हा पोरगं झोपलेलं होतं.

“रडून रडून झोपलंय.”

ढोम्याच्या बायकोनं भाकरी अलगद तव्यावर सोडली आणि पिठाच्या हातानंच पाण्याचा तांब्या त्याच्याकडं सरकवला.

“काई खाल्लं नाई यानं?”

“नाय.” बायकोनं डोळ्याला पदर लावला.

कदाचित चुलीतला धुर कारणीभूत असावा. गेले तीन दिवस पोरगं एक-दोन वेळेला तरी भूक अनावर होऊन भाकरी खायचं. आज मात्र त्यानं पूर्ण उपवास धरला होता.

“जाऊ दे खाल्लं आसल कुणाच्या तरी रानात पोरांसंगं काईतरी.”

बायकोनं भाजीभाकरीचं ताट त्याच्या पुढ्यात केलं, आपल्यालाही घेतलं. ढोम्यानं ताटातली भाकर उचलून हातात घेतली, घास मोडला. तो शांतपणे जेवत होता. तिला शांतता राखणं जड गेलं.

“लयच नाद धरला ओ त्यानं मोटरीचा.”

“हं.”

“यवढं कधी कशापायी रडत नाई ते. आदीच प्वाट खपाटीला गेलेया, त्यात आज जेवलं बी नाई.”

“हं.”

“पर मी काय म्हणते . . . ”

“त्ये राहू दी. उद्याचाला आपल्या पोत्यात जमलेली जवारी दी मला बांधून. आजचीबी जाऊन आणतू जेवण झाल्यावर . . . रुपया यील का ग तेवढ्याचा?”

“तेवढ्या जवारीचा व्हय? यील की.” बायकोच्या बोलण्यात थोडासा उत्साह जाणवला.

“जातो उंद्या तालुक्याला आन येताना . . . आज बी पुना वाटंत मास्तर भेटलं व्हतं . . . काम कुठपर्यंत आलंय म्हणालं . . . चालू हाय म्हणलं . . . काम झालं नाही तर तसंच पाठव म्हणलं मंग यात्रा संपल्यावर . . . पर तसं कसं पाठवायचं मी जातो उद्या तालुक्याला . . . उद्या शेवटचा दिस यात्रेचा . . . आज चौथा दिवस पडला . . .”

स्वतःशीच बरळणाऱ्या ढोम्याच्या एकाही शब्दाचा अर्थ तिला लागला नाही. तिनं विचारण्याची तसदी घेतली न्हाई. त्यानं उठून हात धुतलं, पाणी पिलं मग कोणच्यातरी मालकाच्या घराकडं वळला. ढोम्या भाकर संपवून उठला, निघूनही गेला; पण बायकोला राहवंना.

“आरं उठ की . . . खा वैशी भाकरी. तुझा बा उंद्या तालुक्याला चाललाय. मंग आणलं की तुला मोटर!”

पोरानं ‘उद्या मोटर’ एवढंच ऐकून, आधी कुठल्यातरी बँजोम्होरं पाहिलेला वेडावाकडा नाच केला, आनंदाच्या भरातच भाकरी नरड्याखाली उतरवली आणि परत अंथरुण जवळ केलं. बराच वेळानं हातात जवारीची पिशवी घीवून ढोम्यानं घर गाठलं आन् त्योबी दोघांशेजारी आडवा झाला.

पोरगं सकाळी उठलं तव्हा टोपल्यात एकच भाकर होती. गेलं काही दिवस आई सकाळी एकच भाकर का बनवती, हा विचार भाकर संपपर्यंत देखील त्याला सतावत न्हवता. गिळून त्यानं रान खुरपायला गेलेल्या आईला शोधून बापाचा तळ विचारला.

“काल सांगितलं न्हाई का तुला – तालुक्याला जाणार हायेत म्हणून? चालंतच गेल्यात माघारी यायला वेळ लागंल, उनात तळू नगस, जा घरला.”

तालुका म्हणजे गावापेक्षा पुढची दुसरी कुठलीतर जागा असते एवढंच पोराला माहीती होतं. त्याच्या संयमाची सीमा धूसर होत निघालती. पहाटंच्या अंधारात कधीतरी घर सोडलेल्या ढोम्यानं दुपारी घराचा उंबरा झिजवला. तो आला तव्हा त्याच्या हातातल्या पोत्यात बाबागाडी अजिबात दिसत नव्हती. कारण, लोखंडाच्या कांबीच्या गाडीचा आकार पोरानं लगेच ओळखला असता. दारात धावत आलेल्या पोरासमोरचं ढोम्यानं पोतं उघडलं आणि त्याच्या हातात . . . पाटी ठेवली.

त्यानं बायकोनं दिलेला पाण्याचा तांब्या धरण्याआधीच भ्रमनिरासाच्या पुढं पोहोचलेल्या पोरानं विचारलं.

“ही काय हाय?”

“पाटी हाय सुकळीच्या . . . साळंत जायला तुला. मास्तर म्हणलं पाटी आणून दी पोराला आन बसव साळंत, म्हणून आणली. जा आता उद्यापासंन साळंत – मी सांगतो मास्तरला.”

“बा मोटर रं?” पोराचा आवाज रडवेला झाला.

ज्या मोटरीच्या मागं लागून चार दिवस पोरगं जेवण सोडून बसलं ती मोटार पहायला कौतिकानं दारात आलेल्या बायकोला ढोम्या रात्री जे बरळला त्याचा अर्थ आता लागू लागला.

“पाटी आणली की तुला नवी? मंग आता कसली मोटर? आता मोटर तुला पुढच्या जत्रेला. नाईतर मीच दिन बनवून!”

उंबऱ्यातून जागा काढली आणि नवीकोरी पाटी काखेत मारून रागातच पोरानं धुम ठोकली – कुठं माहिती नाही.

बायकोने दिलेली भाजीभाकर खाताना ढोम्याला वाटलं पोरगं आनंदात पळालं. तसंच काहीसं तिलाही वाटलं.

“चार दिस नीट जेवलं न्हाई, मोटार आणणार हाय बा म्हणल्यावर रात्री आन् सकाळी जेवलं!” ढोम्याला वाटलं तिनं हासत सांगितलं.

“साळंतला मास्तर चांगला भला माणूस हाय. पोराच्या आयूष्याची नवी सुरवात करून दिल.”

शिक्षणाच्या दृष्टीनं ढोम्या कधी बोलू लागला याचं तिला आश्चर्य वाटू लागलं. निश्चितच गाव समजतं तितका तो मुर्ख नाही हे तिला म्हाईती होतं पर हे शाळेचं, शिक्षणाचं प्रकरण तिलाही नवंच होतं.

जेवण झाल्यावर खुरपं उचलून तिनं कुणाचंतरी रान गाठलं, मागाहून दरवाज्याची झापड उभी करून ढोम्या माळाकडं निघाला. वाटेतच त्याला घराकडे माघारी निघालेलं पोरगं दिसलं. त्यानं जवळ येताच मधोमध भगदाड पडलेली पाटी, काखेतून काढून, बापाला दाखवली.

“खाली पडून फुटली.” पोरानं साळसूदपणे सांगितलं.

त्याच्या चेहऱ्यावरचा साव न कळण्याइतपत ढोम्या बावळट न्हवता.

“त्वा फोल्लीस ना पाटी? तुझ्या मायचा भोसडा तुझ्या . . . ” त्यानं पोरावर हात ढिला सोडला. पोरगं खाली पडलं तर त्याच्या पेकाटात लाथ घातली. “त्वा तोड्लीस का न्हाई पाटी? सांग नायतर जीव जास्तोर मारीन!”

माराच्या भितीनं, आपण रागात पाटीत दगड घातल्याची, पोरानं कबूली देण्याचाच उशीर का मंग ढोम्याचा पारा चढला. शेजारी पडलेली छकाटी उचलून त्यानं पोराची एकुलती एक चड्डी हिसकावून घेतली आणि त्याच्या ढुंगणावर रट्टे द्यायला सुरुवात केली.

“फोदरीच्या तुझ्या आईबानं पाच दिस पोटाची भाकरी सोडून रुपया जमवलानं, तुला पाटी आणलीन . . . आन त्वा रं ती फोल्लीस . . . का त मोटार पाईजे म्हणून! आता पाईजे का मोटार?”

आजूबाजूला घोळका जमला; पण खूळ्या ढोम्याचा रागीट अवतार बघून कोणाचीच पोराला वाचवायची हिम्मत होईना. कोणत्यातरी बाईनं धावत जाऊन त्याच्या बायकोला सगळा झाला प्रकार सांगितला तेव्हा रानातून धावत माळावरच्या वाटेवर येऊन ती दोगांच्या मधे उभी राहिली. यका हातानं ढोम्याच्या हातातली छकाटी धरून तिनं खाली फुफाट्यात लोळणाऱ्या पोराला उचललं.

“आवो मारता का काय आता त्येला?”

“त्येच्या आईला त्येच्या . . . पाटी फोल्ली नं आयघाल्यानं.”

“फुडू द्या! मोटर मागत व्हतं त्ये, तुमची, पाटी न्हाय!”

इतकंच बोलून तिनं पोराला काखेत मारलं, ढोम्याच्या हातातली त्याची चड्डी हिसकावली मग रडतच रानाकडं निघाली. ढोम्याच्या हातातली छकाटी केव्हाच गळून पडलेली, दुसऱ्या हातात फुटकी पाटीन् यक हात डोक्याला लावून तो फुफाट्यात बसला. गर्दी पांगली . . .

रडून जरा शांत झाल्यावर पोरगं चड्डी घालून तसंच आईला सोडून गावाकडं धावत सुटलं. मग मैदानावर उभं राहून तिथला एकेक तंबू उतरताना, दुकान बांधताना आन् जत्रा गाव सोडून जाताना बघत बसलं. गर्दी पांगली . . .

भगदाड पडलेली पाटी कुडावर टाकली. रात्री कधीतरी ढोम्या घरी पोहचला तव्हा बायकोपोरगं दोघंबी झोपले व्हते. पोराला बडवल्याच्या रागातनं बायकोनं आपल्या नावची भाकर बनवलेली नाही हे कळल्यावर त्यानं पाण्यानं तोंड विसळलं, पोटभर पाणी ढोसलं. मग दोघांच्या शेजारी आडवा झाला. किती वेळ गेला माहिती नाही; पण ते दोघे जागेच असल्याचं त्याला कळत होतं.

“म्या काय उगाच मारलंय व्हय?”

“पर इतकं?”

“मग ग . . . पाटी फोल्ली बेण्यानं. पाच दिस पोटाला चिमटा काडून पायली दोन पायली जमवलेली जवारी विकून आणलेली पाटी . . . गावात जवारी विकली तर गाव म्हणनं, खायला दिलेलं जोंधळं इकून पोरांची चंगळ भागवायचं सुचायलंय ढोम्याला, म्हणून मंग तालुक्याला गेलू इकायला. मास्तरला हातापाया पडून साळंत घ्यायला इनवलं. आन् यानं ग त्या मोटरीपाई पाटीला भ्वाक पाल्लं!”

बायको काही म्हणाली नाही; पण पोरानं मात्र शक्य तितकी वाकळ तोंडात कोंबली. दुपारचा मार किंवा गाव सोडून निघून गेलेली जत्रा आठवून त्याला हुंदका अनावर होत होता.

“म्या आज वाईट केलं आसं तुलाबी वाटत आसल की? वाटंना का पर त्ये तुला कळायचं न्हाई.”

“तर तर तुम्हालाच कळायचं त्ये.” बायकोनं त्याला शब्दाचं तडाखं द्यायला सुरुवात केली.

“उद्या उठून पुना गावानं वळून म्हणू नी की हे ढोम्याचं प्वार बी ढोम्याच निघालं! म्हणून तर यवढा आटापिटा . . . ” ढोम्याच्या नरडीत एक मोठा गोळा उठला. त्यानं तो दाबून धरला. “बा मला समदं गाव ढोम्या का म्हण म्हणतंय रं असं इचारलं उद्यांच्याला यानं तर काय सांगू त्येला? का तर तुझा बा ढोम्या हाय म्हणून तू बी ढोम्या झालास!”

“आवं झोपा की आता.” आता तिच्या आवाजात कापरा भरला.

“आज त्येला हाणून म्या वाईट केलेलं न्हाई उलट आज जर मी याला मोटार दिली आस्ती तर म्या वाईट झालो आसतो, हे त्येला कळायला पाईजे. आन् म्हणूनच त्यानं शिकायला पाईजे. आमाला तर साळंच त्वांड काय भिताडबी कसलं आसतंय हे उभ्या जिंदगानीत कळालेलं न्हाय. पर ह्यो शिकला पायजेन. मास्तर . . . मास्तर . . .”

बायकोनं पदर तोंडाला लावला. शब्दागणिक ढोम्याची अगतिकता उलगडत होती.

“त्ये कायबी न्हाय. उद्याबी सकाळी माजी भाकरी थापू नगस – अजून जावूदी पाच दिस – म्या दुसरी पाटी आणीनं. तवर प्वार तसंच बसू द्या म्हणनं उद्या मास्तरला भेटून. मास्तर चांगला माणूस हाये, नाय म्हणायचा न्हाई. नायतर जाईल फुटकी पाटी घीवून साळंला . . . पर पोराला म्या साळंबगर जगू द्यायचू न्हाय. ढोम्या म्हणून वाईट आसनं पर बा म्हणून म्या वाईट न्हाई!”

यावेळी मात्र पोराचा अस्पष्ट हुंदका बाहेर पडला. तसं मग बायकोनं त्याच्याकडं तोंड केलं आणि त्याला कुशीत घेतलं, कुशीची गरज तिलाही होतीच म्हणा. इकडं ढोम्या छताकडे पाहत होता, घराचं छप्पर क्षणागणिक आंधुक होत गेलं आन् रात्र आणखी गडद व्हत गेली . . .

{fullwidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال