शेअर बाजार : मराठी माणसांची मानसिकता


comical salesman promoting share market courses
मराठी माणसाने मराठी माणसासारखे वागावे. उगीच (उंट नावाच्या) भलत्या प्राण्याच्या शेपटाचा मुका घेण्यासाठी कधी जाऊ नये!


शेअर बाजारात श्रीमंत झालेल्यांच्या बातम्या छापून येतात; पण घरदार विकले गेलेल्यांचे पुण्यस्मरणही छापून येत नाही, हे वाक्य हृदयी कायम कोरून ठेवावे. जे काही महात्मे शेअर बाजारात तळपले, त्यांची आडनावे भाटिया, मेहता, झुनझुनवाला असलीच असतात!शेअर बाजाराची भूल

शेअर बाजारातील प्रसिद्ध ‘ऑप्शन ट्रेडर पीआर सुंदर’ यांचा ‘दहावीत असताना तो चप्पल घालायचा, सायकल घेण्यासाठीही पैसे नव्हते! पाच वर्षात मालमता ४० पट वाढली!’ अशा आशयाचा मथळा अनेक तरुणांनी वृत्तपत्रात वाचला आणि झाडून सगळे तरुण जोखीम घेण्याच्या तयारीला लागले.

गेल्या काही वर्षांत त्याच्या यशोगाथेवर अनेकांनी विश्वास ठेवला आहे. विशेषत: गुंतवणूक आणि व्यापाराच्या जगात जे नवीन आहेत त्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. पीआर सुंदरबद्दलच्या अनेक गोष्टी समाजमाध्यमांतून आणि इतर माध्यमांतून अशा नवीन गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचत आहेत, ज्यामुळे या नवीन गुंतवणूकदारांना शेअर बाजाराच्या माध्यमातून ‘अल्पावधीत यशस्वी होण्यासाठी’ प्रेरणा मिळते!

अनेक ‘मिम्स’ बनले, लेख लिहिले गेले. ‘जोखीम घेणे का आवश्यक आहे?’ हा प्रश्न शेअर बाजारातील तज्ज्ञांनी ‘रिटेल ट्रेडर’ आणि नवीन गुंतवणूकदारांना विचारायला सुरुवात केली. मात्र ह्याची दुसरी बाजू समजून घ्यायला कोणीही तयार नाही. ‘जोखीम घेणे का आवश्यक आहे?’ असा प्रश्न विचारून लोकांना नको ते धाडस करायला लावून दरीत ढकलण्याचं पाप करू नका. ‘रिस्क है तो इष्क है?’, ‘डर के आज जित है’ हे असले चित्रपट संवाद ऐकूनच लाखो लोक बरबाद झालेले आहेत!


• • •

‘का’ पासून सुरुवात करा (स्टार्ट विथ ‘व्हाय’)

आयुष्यात कोणतीही गोष्ट नियोजनपूर्वक केली तरंच यश मिळतं.

‘स्टार्ट विथ व्हाय’ ही संकल्पना आयुष्यात रुजवली तर आयुष्यात बऱ्याच गोष्टी जोखीम न घेता पूर्णत्वास नेता येतील. ‘आपल्याला एखादी गोष्ट का करायची आहे हे एकदा समजलं की त्यात आपण पटकन यशस्वी होऊ शकतो’ त्यामुळं प्रत्येकाला त्याचा ‘व्हाय’ सापडला तर यश दूर नसेल.

उदाहरणार्थ, जगाच्या भविष्यावर आपलं राज्य असलं पाहिजे, ते आपण घडवलं पाहिजे, ह्या पद्धतीने आपला ‘व्हाय’ असायला हवा. हे विचार स्पष्ट असतील तरंच आपण जोखीम घ्यावी.


• • •

स्कॅम १९९२

मागे ‘स्कॅम १९९२’ ही वेबमालिका बरीच प्रसिद्धीस आली. सर्वसामान्यांनी ही वेबमालिका डोक्यावर घेतली आणि त्यातल्या ‘रिस्क है तो इष्क है’ ह्या संवादानुसार ही लोकं जगायला लागली. कोणताही अभ्यास न करता तरुण पोरे शेअर बाजारात उतरली. ‘स्टार्ट विथ व्हाय’ मधील ‘व्हाय’चे उत्तर न शोधताच तरुण मुलांनी शेअर बाजारात जुगारी (गँम्बलिंग) सुरू केली आणि त्याची फल निष्पत्ती, म्हणजे परिणिती, आत्महत्येत झाली!

याचा अर्थ जोखीम घेऊच नका असाही नाही. घ्या, नक्की घ्या, पण जेव्हा वरील ‘व्हाय’चे उत्तर स्वतःला मिळेल तेव्हाच.


• • •

मराठी लोकांची मानसिकता

बालका, जग ही एक माया आहे. या मायेच्या जंजाळात गुरफटू नकोस, प्रपंचतापात रमू नकोस, पैशामागे धावू नकोस, पैसा काय . . . आज आहे, उद्या जाईल. (किंवा आज नाही, उद्याही नसेल!) जगात येताना तू काय आणले होतेस . . . काहीही नाही. जगातून जाताना तू काय नेणार आहेस . . . काहीही नाही. मग एवढी धडपड कशासाठी? ठेविले अनंते, तैसेचि राहावे! प्रत्येक श्वास लिहिल्याबरहुकूमच घ्यायचा नि सोडायचा. कारण, विधिलिखिताप्रमाणेच सर्व घडणार असते. मग (लेका) तू कशाला जीव जाळतोस? तेव्हा या मोहमायेचा त्याग कर आणि बिनघोर झोप! निद्राधन हेचि खरे धन होय. त्यातच तुझे भले आहे!

मराठी माणसाने मराठी माणसासारखे वागावे. उगीच (उंट नावाच्या) भलत्या प्राण्याच्या शेपटाचा मुका घेण्यासाठी कधी जाऊ नये. काही काही कामे आपली नसतात. ती करायला जाऊ नयेत. ‘जेणो काम तेणो करो, बीजा करे सो गोता खाय’ अशी एक गुजराती भाषेतली म्हण आहे, ती मराठी माणसासाठीच उद्देशून लिहिलेली असावी, असा आमचा दाट वहीम आहे.

शेअर बाजार हा असाच एक ‘उंटाच्या शेपटाचा मुका’ आहे, हे आम्ही ठामपणाने सांगू शकतो. आपणही शेअर बाजारात जावे, काही ‘माल’ विकत घ्यावा, विकावा, घरबसल्या अफाट पैसा कमवावा, असे स्वप्न पडू लागले, की मराठी माणसाने लागलीच सावध व्हावे. ही अवदसा आहे, हे आम्ही प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. शेअर बाजारात श्रीमंत झालेल्यांच्या बातम्या छापून येतात; पण घरदार विकले गेलेल्यांचे पुण्यस्मरणही छापून येत नाही, हे वाक्य हृदयी कायम कोरून ठेवावे. मुदलात शेअर बाजारात मराठी माणूस मालामाल झाल्याचे तुमच्या ऐकिवात आले आहे काय? जे काही महात्मे शेअर बाजारात तळपले, त्यांची आडनावे भाटिया, मेहता, झुनझुनवाला असलीच असतात. तेथे कुलकर्णी, शिंदे, लोमटे असे कुणी असते काय? औषधापुरतेही नाही. यातून काय सिद्ध होते?

आता मला सांगा ‘अशी विचारसरणी असलेले रिस्क घेतील का?’


• • •

‘रिस्क है तो इष्क है’ वाल्यांची अवस्था

आयती शिकार चोरणाऱ्या कोल्ह्यास
कोणी वाघ म्हणत नाही
आणि आंबट द्राक्षांना
कोणी बोरे म्हणत नाही!


उपरोक्त दोहा ही आमचीच रचना आहे! आणि हल्ली आम्ही अध्यात्माकडे फार्फार झुकू लागलो आहो, याचेच ते लक्षण आहे. एकेकाळी आम्ही समृद्धीची स्वप्ने खूप पाहिली होती. परंतु, आमच्या त्या स्वप्नांची अवस्था गुलजारसाहेबांच्या शायरीप्रमाणे झाली. त्यांच्या शायरीतील स्वप्ने (ख्वाब) कधी धड पुरी होत नाहीत. ऐनवेळी काहीतरी गोची होती आणि शेवटी ‘ख्वाब था . . . ख्वाबही होगा शायद’ असा ‘दि एण्ड’ होतो. अतएव हल्ली आम्ही समृद्ध होण्याचा मार्ग सोडून दिला आहे. एकेकाळी आम्ही ‘स्टॉक एक्सचेंज’ इमारतीच्या त्या सुप्रसिद्ध बोळात ज्यूस, ढोकळा, भेळ, वडापाव, दाबेली, आदी सुग्रास अन्नाचा आस्वाद घेताना दिसत असू. हल्ली गावी कोरड्या विहिरीच्या पडक्या कठड्यावर दोहे रचीत बसलेले असतो . . .


आयती शिकार चोरणाऱ्या कोल्ह्यास
कोणी वाघ म्हणत नाही
आणि आंबट द्राक्षांना
कोणी बोरे म्हणत नाही!

{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال