हल्ली जवळपास सर्वच महापुरुषांची पद्धतशीर जातीनिहाय फाळणी करण्यात आलेली आहे! काळाचा बदल म्हणून हेही ठीकच आहे असे मानले तरी मुळ प्रश्न जशास तसा राहतो. तो प्रश्न म्हणजे त्या महापुरुषांच्या विचारांचे करायचे तरी काय? त्यांनी जे रूजवण्यासाठी उभी हयात झिजवली त्या विचारधारेचे करायचे तरी काय? असले ‘पूर्वकालीन’ विचार त्यागून सध्या एकच विचार होतो – ‘आपल्या’ महापुरुषाची जयंती इतरांपेक्षा वरचढ होईल काय?”
सगळी तयारी झाली का रे? झाली म्हणतोस — किती रे खोटं बोलशील तोंडावर माझ्या . . . काय खोटे बोललास? हा मंडप तरी बघ की रे, नुसते वारे नाही हत्ती घुसेल या भगदाडातून आत! . . . देवाला तरी घाबरा की रे तुम्ही लोक — आज तरी सगळी कामे नीट करा जरा. आज जयंती आपल्या महात्म्याची ना? मग रे? बघ पुन्हा उणीव काय म्हणून विचारतोस! — तुझा मंडप हा असा, आणि तुझ्या ओळखीने बोलावलेला तो साऊंडवाला अजून कुठेय? आहे! अजून कर्णेच लावतोय! भले शाब्बास म्हणावं . . . उद्यापर्यंत तरी होतील का लावून? आणि गावातला डीजे येतोय की नाही — फोन लाव त्याला . . . वेळ लागतोय म्हणाला? पटकन गाठ म्हणावं मैदान, तो आल्याशिवाय जयंती तशी निघायचीच नाही. बँजोवाले, पुढचे ढोलपथकवाले सगळे येणार ना — येतीलच काय येतीलच? आलेच पाहिजेत! उगाच का लाखात खर्च केलाय . . . चल तू निघ आता जरा मंडप नीट कर, मी संध्याकाळी येणारं तमाशा मंडळ कुठपर्यंत आले ते पाहतो . . . काय, फटाकड्यांच्या माळा आल्या, चल पाहू. जरा दोन-पाच जास्तीच्या आल्यात का मोज पाहू — एखादी-दुसरी वाजली नाही तर? . . . आली म्हणतोस. मग ठीक आहे. फटाक्यांचा आवाज कसा दुमदुमला पाहिजे! जेवणाची व्यवस्था कुठेपर्यंत? अजून गुलाबजाम कसे मुरले नाहीत? मुरतील कधी मग लोकांच्या पोटात गेल्यावर! . . . ठीक आहे, पुऱ्यांना तेल जास्त रहायला नको . . . घ्या. मीच दमलो रे बाबा. काय म्हणतोस? विश्रांती घ्या? . . . अरे ही धावपळ मी आनंदाने सहन करणार. मी अजिबात थकत नाही, मागे सरत नाही — फक्त महात्म्याची जयंती कशी जोमात व्हायला हवी की नको . . . तर तर! डोळ्यांचे पारणे फिटले पाहिजे पाहणाऱ्यांच्या! . . . सर्वकाही आवरले? काढूयात मिरवणूक मग? काय म्हणतोस — पुस्तके राहिली! अरे तू हे सांगणार कधी . . . ही तर खरी आपल्या माणसाच्या विचारांची जयंती आहे की! आपल्या महात्म्याने समाजासाठी खूप केलंय बाबा ते समाजाला कळायला नको? . . . चल, चल पटकन. नवीन नसेनात का — तू विसरलास ना — असूदेत, मीही विसरलोच होतो! . . . आता लक्षात आलंय तर निदान त्या कोपऱ्यातील टेबलावर आपल्याकडे आहेत तेवढी जुनी तरी पुस्तके मांडूयात! बाकी नियोजन कसे फक्कड जमून आले आहे, मैदान गच्च भरले आहे, सगळे अजूनही अगदी आपल्या दोघांवरच आहे रे बाबा . . . चल, चल. पुस्तके मांडूयात तेवढी . . .
{fullwidth}