आवर्त : एक प्रेमकथा अशीही (चार)


ouroboros dragon eating his own tail
हे सगळं मनात आणि पुस्तकाच्या पानात भरून घेताना आपण हळूहळू प्राचीच्या जवळ चाललो आहोत असं म्हणायला हरकत नाही


बेरोजगारीचा असह्य काळ सुरू चालू होता तरीही चंदूच्या आयुष्यात दोन गोष्टी चांगल्या घडत होत्या. एक म्हणजे ‘दादाचा सल्ला’ सदर हातखर्च पुरवत होते आणि दुसरे म्हणजे त्याचे पोट भरत होते. आर्थिक आणि पोटाची भूक भागली की माणसाला इतर भूका भेडसावतात – नेमके हेच चंदूच्या बाबतीत घडत होते. हिरूचा हेतू भले मूल मिळवण्याचा का असेना; पण तिच्यासह लगट चंदूने टाळली होती; पण मुंबईच्या चंदेरी दुनियेतील प्राचीचा संग त्याला, पैशांसाठी का होईना, टाळता येणार नव्हता. हिरूला दिला तसा नैतिक नकार चंदू तरुणांच्या संगतीत काॅलेजकुमारी होणाऱ्या प्राचीला देऊ शकेल? आणि या सर्व धबडग्यात मानस कुठे आहे? काय करतो आहे? त्याला आलेले आजारपण शारिरीक होते की मानसिक?


नदीवर येणाऱ्या हिरुला आपण टाळत होतो, तिची लगट आपल्याला आवडली नसती. मग या प्राची मॅडच्या बाबतीत आपण इतके गोड का वागतोय? नोकरीची आशा? सध्या दहा हजारांची असलेली गरज? की, प्राचीचं अप्रतिम लावण्य? नक्की काय अन् किती? चंद्रहास स्वत:लाच विचारत होता, पण अचूक उत्तर मिळेना.

पुस्तकाचं काम सुरू झालं.

प्राची त्याला म्हणाली, “आपल्याला काहीही लपवायचं नाहीये. मी कुणाला घाबरतही नाही. माझा नवरा मला का सोडून गेला तेही मी सांगून टाकणार आहे. मरताना मला कसलंही ओझं नकोय.”

“मॅडम, तुम्हाला काहीही होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी आहे ना!”

चंद्रहास बोलून गेला आणि नंतर त्याचं त्यालाच वाटलं, हे आपण काय बोलतोय! ही कोण लागते आपली? केवळ पैशासाठी हे काम आपण करतोय. प्राची काही क्षण शांत होती. मग बोलू लागली.

“तुझ्या पद्धतीने तू लिहीत जा. जे खरं आहे तेच मी सांगणार आहे. मला माझ्यापेक्षा वयाने लहान असलेले तरुण आवडतात, हे अगदी खरंय. माझा नवरा मला सोडून गेला त्याचं कारण हेच असेल, नव्हे आहेच की, मी कॉलेजवयीन पोरांशी मैत्री करते. माझ्या घरात अशा मुलांचा अड्डाच असायचा.” हे असं बोलणं चंद्रहासला अपेक्षित नव्हतं. “ही विकृती नाहीय, चंदू! वेगळी आवडनिवड म्हण हवं तर. पण माझी ही इच्छा मी कधी आवरू शकले नाही.”

“पण मॅडम, लग्नाआधी तुमच्या हे लक्षात आलं होतं?”

“आलं होतं, पण मला वाटलं होतं, लग्नामुळे मी बदलेन, सुधारेन स्वत:ला. पण तसं झालं नाही. शिवाय अशी रिलेशन्स, अशी कनेक्शन्स असूनही मला कधी तृप्ती मिळाली नाही. एखाद्या तृतीयपंथी पुरुषासारखी मी अशांत, असमाधानीचं राहिले.”

“तुम्ही स्वत:ला दोषी मानता?”

“नाही मानत! का मानावं? माझ्याकडे पैसा आहे. प्रसिद्धी तर होतीच. माझी हौस मी पुरवत गेले. तरुण मित्र मिळत गेले. मला नवरा दूर गेल्याचा पश्चात्ताप नाही. अगदी खरं सांगू, मला तो आवडत नव्हता. मला केसाळ पुरुष नाही आवडत! ओंगळ अस्वलं वाटतात ती!”

“हे पण लिहायचं पुस्तकात!”

“ते तू ठरव. तुझा हक्क आहे तो. मी सक्ती करणार नाही, पण जे खरं आहे ते लिहावं!”


चंद्रहासला जाणवलं, हे सगळं मनात आणि पुस्तकाच्या पानात भरून घेताना आपण हळूहळू प्राचीच्या जवळ चाललो आहोत असं म्हणायला हरकत नाही. आकर्षणाचे सुगंधी कण असतात का? मॅडम अगदी जवळ बसलेल्या असतात, तेव्हा एका अंगभूत सुगंधाने दरवळत असतात. स्त्रीच्या देहाचा हा नैसर्गिक मादागंध पुरुषाला भुरळ घालतो. मॅडम मलाही थेट न बोलता भूल घालू लागल्या आहेत. यातून पुढे काय घडेल? मॅडम कोणत्याही तरुणात गुंतून पडत नाहीत. केवळ त्याला वापरतात. एखादा बॉडी स्प्रे असावा तेवढंच मूल्य त्या नराला असतं. पण मी तर माझा असा वापर कुणी करू नये म्हणून म्हणायचो. मग आता उपभोगासाठी उत्सुक का झालो? आमचं दोघांचंही चुकतंय का? खरं तर मॅडम अजून प्रत्यक्ष मला काहीच बोललेल्या नाहीत आणि तरी मला ठामपणे वाटतंय की, त्या माझ्यावर झेपावणार आहेत. हा माझा भ्रम तर नाही ना? मानसला विचारण्यात अर्थ नाही. मी बाईमाणसाशी रिलेशन ठेवणं हेच त्याला पसंत नाहीये. अर्थात त्याच्या जागी दुसरा कुणी बायल्या असता, तरी असंच वागला असता. मानसचं मन मुलीचं आहे. मानस मरू दे, पण मॅडम ही एक लालबुंद ज्वाला आहे. तिच्या मिठीत तीव्र कळा येतील? दाह होईल? मॅम अनुभवी असल्यामुळे वरचढ बनतील? हळूहळू मला पूर्णपणे झाकोळून टाकतील? रात्री उशिरापर्यंत चंद्रहास जागत आणि विचार करत राहिला. मॅडमने अजून त्याला स्पर्शही केला नव्हता. सगळं आपलं स्वप्नरंजन नाही ना? पण मुळात वयाने लहान असलेले पुरुष आवडतात हे मला सांगण्याचं कारण काय? म्हणजे नक्कीच त्यांना मी आवडलोय.

चंद्रहासच्या विचारांत अजूनही कोवळेपण आणि बालिशपणाची झाक होतीच. तरीही इतर अल्लड पोरांच्या तुलनेत विचार करण्यात तो अधिक रसरशीत आणि उजवा होता. शेवटी लेखक होता.

दोन-तीन दिवस तो मुद्दामच प्राचीकडे गेला नाही. कारण कळवलं नाही, तर प्राची त्याच्या घरीच येऊन थडकली. त्याला किंचित संकोच वाटला. कणभर रागही आला. तरीही आनंदाची एक लाट कळत-नकळत अंत:करणात फुटलीच!

“मॅडम, तुम्ही कशाला आलात? फोन करायचा . . .”

“लागत नव्हता. मला वाटलं तुला बरं नाही की काय! माझा लेखक आजारी पडून कसं चालेल?” असं म्हणत प्राची गोड हसली.

“माफ करा मॅडम, मी कळवायला हवं होतं.” त्याने दिलगिरी व्यक्त केली.

खरंतर चंदूला बघायचं होतं की, मॅडम आपल्याला कितपत महत्त्व देतात! त्या स्वत: आपल्याकडे आल्या, म्हणजे त्यांच्याही मनात आपल्याबद्दल ओढ आहे असं जाणवून चंद्रहासच्या मनातला जवान पुरुष सुखावला!

दुसऱ्याच दिवशी त्याने अधिक जोरात लेखनाचं काम सुरू केलं. एकदा तर रात्रीचे दहा वाजले.

प्राची म्हणाली, “तू आता कशाला घरी जातोस? फोन करून कळव ना उद्या येतो म्हणून! घरी कोण तुझी एवढ्या आतुरतेने वाट बघतंय! बायको अजून यायचीय!”

ती हसत हसत बोलत होती. तिचा पदर ढळला होता आणि त्याने रात्री राहावं हाच उद्देश या नखऱ्यामागे आहे असं त्याला खात्रीने वाटलं; पण त्याने मोह आवरला. खरंतर तो घाबरला. घरचे लोक भडकतील, त्या एकट्या बाईकडे तू राहिलास कसा असं म्हणतील. मानसला कळलं तर तो घरी जाऊन आगीत तेल ओतेल.

अशा विचारांमुळे तो इतकंच म्हणाला, “मॅडम, आज नको. सायकल आहेच माझ्याकडे! जाईन मी घरी. पण कधीतरी मुद्दाम येईन राहायला. आय मीन वस्तीला.” हे चंद्रहास बोलला आणि त्याने प्राचीची प्रतिक्रिया काय येतेय त्याचा कानोसा घेतला.

प्राची हसत म्हणाली, “काफी समझदार हो!”


— क्रमशः
{fullwidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال