‘स्तनांचा कर्करोग’ ही उक्ती आता साधारण शहरी भागात तरी सर्व स्त्रियांच्या व पुरुषांच्या ऐकण्यात किंवा वाचण्यात आलेली असते. यामुळे सजगता वाढत असली तरीही याविषयी नेमकी माहिती फारशी कोणाला ठाऊक असण्याचे कारण नाही; पण स्तनांच्या कर्करोगात मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता समाजात आणखी जागृतीची आवश्यकता आहे हे स्पष्टच आहे. अशासाठीच ‘स्तनांच्या कर्करोगावर’ हे तीन भागांत चालणारे विश्लेषण . . .
स्तनांचा कर्करोग (Breast Cancer) भाग १
स्तनांचा कर्करोग
सुरवातीच्या काळात मुल नसलेल्या स्त्रिया, मासिक पाळी लवकर सुरू होऊन उशीरा संपणाऱ्या स्त्रिया, सतत ‘हाॅर्मोन सप्लीमेंट्स’ घेणार्या स्त्रिया, बाळाला अंगावरचे दुध पाजण्यास असक्षम ठरलेल्या किंवा ज्यांच्या आईस व आईकडील नातेवाईकांना हा कर्करोग पूर्वी झालेला आहे अशा स्त्रियांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक असते असे समजले जात होते. परंतु वर्षानुवर्षे जीवनशैलीत होणार्या बदलांमुळे हा कर्करोग आता कुठल्याही वयातल्या महिलांना व मुलींना देखील होण्याचे प्रमाण वाढते आहे. सामान्यतः ४० ते ५० या वयात मुख्यत्वे होणारा हा रोग आता २५ वर्षांच्या मुलींमध्ये देखील आढळून आला आहे.
स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणारा, मोठा व धोकादायक असा कर्करोग आहे. हळूहळू याचे वाढत जाणारे प्रमाण हे आता काळजीचे कारण बनू लागले आहे. त्यामुळेच अधिकाधिक महिलांमधे याची जनजागृती व्हावी हे उद्दिष्ट ठेवून ऑक्टोबर महिना हा ‘ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस’ (स्तन कर्करोग जनजागृती) महिना म्हणून पाळला जातो.
भारतीय स्त्रियांना प्रामुख्याने होणार्या कर्करोगामध्ये सुद्धा स्तनांचा कर्करोग हा प्रथम क्रमांकावर येतो. एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी भारतात सरासरी एक लाख साठ हजार महिलांना हा रोग होतो, व त्यातील जवळपास ऐंशी हजार स्त्रिया मृत्युमुखी पडतात. स्तनांच्या कर्करोगात सर्वाधिक मृत्युमुखी पडणाऱ्या रूग्णांच्या संख्येतही भारतच पहिल्या क्रमांकावर आहे.
कर्करोग म्हणजे काय?
पेशी (Cell) हा शरीराचा प्राथमिक घटक आहे. शरीरभर पसरलेल्या या पेशींपासूनच शरीराच्या क्रिया घडत असतात. या पेशींचे सतत विभाजन (Cell Division) होऊन त्यांची दुरुस्ती सुरू असते. शरीरात कायम सुरू असलेली उलथापालथ पेशींची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे आपल्या अवयवांची वाढ होते. मात्र, या सर्व पेशींची वाढ ठरलेल्या ठिकाणापुरती मर्यादित असते. उदाहरणार्थ, जठराच्या (Liver) पेशी फुप्फुसात (Lungs) वाढत नाहीत.
कर्करोगात नेमके यावर नियंत्रण सुटते. पेशींची संख्या गरजेपेक्षा, प्रमाणापेक्षा जास्त वाढत राहते आणि या कर्कपेशी (Cancerous Cells) शरीरात कोठेही रूजून वाढू शकतात. पेशीच्या वाढीत बदल झाले की गुणधर्मातही बदल होतात. पेशींची संख्या, आकारमान, स्थान, इत्यादी बंधने सैल करणारे बदल घडले की, कर्करोगाची शक्यता तयार होते. त्यातून तयार होणाऱ्या सर्व पेशी स्वैर (Free) होतात. मग अतिरिक्त वाढलेल्या सर्व पेशी हळूहळू त्याठिकाणी एखादी गाठ तयार करतात.
कर्करोगाचे जे काही प्रकार आहेत त्यापैकी स्तनांच्या कर्करोगाचा आज विचार करूयात.
भारतामध्ये २२ पैकी एका स्त्रीला तिच्या आयुष्यामध्ये केव्हातरी स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. अमेरिकेत हाच दर खूप जास्त आहे. तिथे आठपैकी एका स्त्रीला आयुष्यामध्ये केव्हातरी स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. भारतामध्ये हा कर्करोग ग्रामीण लोकसंख्येपेक्षा शहरी लोकसंख्येमध्ये अधिक आढळतो.
स्तनांचा कर्करोग का होतो?
जेव्हा स्तनांतील सामान्य पेशी बदलतात आणि नियंत्रणाबाहेर वाढतात, तेव्हा स्तनांचा कर्करोग होतो. हा कर्करोग पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कितीतरी अधिक सामान्य आहे. परंतु, पुरुषांनासुद्धा हा आजार होऊ शकतो. विशिष्ट जोखीम घटक असलेल्या स्त्रियांना इतर स्त्रियांपेक्षा स्तन कर्करोग विकसित होण्याची शक्यता अधिक असते. जोखीम घटक म्हणजे असे काहीतरी, ज्यामुळे एखादा रोग होण्याची शक्यता वाढू शकते. स्तनांचा कर्करोग होण्याची ही जोखीम वयानुसार वाढते. बहुसंख्य स्त्रियांचे निदान होते त्यावेळी त्या ६० पेक्षा अधिक वयाच्या असतात.
एका स्तनात कर्करोग असल्यामुळे दुसऱ्या स्तनात कर्करोग होण्याची शक्यता वाढते. स्तनाच्या कर्करोगाची जोखीम अशा स्त्रियांमध्ये अधिक असते, ज्यांच्या रक्ताच्या नातेवाइकांना हा रोग असेल. स्तनांचा कर्करोग हा आई, बहीण वा मुलगी यांच्यात असेल तर स्तनांच्या कर्करोगाची जोखीम दुप्पट होते. दोन प्रथमश्रेणी नातेवाईक (First parent) असण्याने ही जोखीम तिप्पट होते. सुमारे ५ ते १० टक्के स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे अनुवांशिक (Genetic) असल्याचे मानले जाते. थेट पालकांकडून आलेल्या जनुकांतील दोषांचा (Chromosomal Gene Mutation) परिणाम होऊन हा आजार स्त्रियांना घेरतो.
साधारपणे कर्करोगाचे लोकसंख्येशी व इतर आजारांशी असलेले प्रमाण सतत वाढत आहे. हे खरे असले तरी त्याची कारणेदेखील अनेक आहेत. लोकशिक्षणामुळे विशिष्ट लक्षणे आढळल्यास रुग्ण जागरुकपणे डॉक्टरांकडे जातात. त्यामुळे पूर्वीपेक्षा रुग्णांची नोंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय, आधुनिक तंत्रज्ञानाने रोगनिदानाची पद्धतही सोपी केली आहे. सोनोग्राफी व रक्तचाचण्यांमधूनही हा रोग लवकर टिपता येतो.
विविध टप्प्यांवर कर्करोगाला आवर घालणे त्यामुळे शक्य झाले आहे. या आजाराचे योग्यवेळी अचूक निदान झाले तर प्रगत उपचारपद्धतीमुळे मृत्यूच्या भीतीवर मात करता येऊ शकते. इतकेच नाही, तर याची लक्षणे वेळीच अचूक ओळखता आल्यास या आजारातून कायमची मुक्तता होण्यापर्यंतही विज्ञान पोहोचले आहे. इच्छाशक्ती दुर्दम्य असेल तर या आजाराला पराभूत देखील करता येते, हे प्रगत वैद्यकीय तंत्राने सिद्ध केले आहे.
स्तन कर्करोगाची लक्षणे, उपचार व इतर माहिती पुढील लेखात . . .
सजग रहा, स्वस्थ रहा.
{fullwidth}