आता पुतिन, बायडन यांच्यासारखे ताकदवान नेते व सोबतच क्षी जिनपिंग, किंम जोंग उन हे नेतेही मोदीजींना विचारून सर्व काही करतात! पाकिस्तान सुद्धा ‘घर में घुसके मारेंगे’ ऐकल्यामुळे थोडासा धास्तावलेला आहे! चीन तर ॲप बॅन केल्यावर ढसाढसा रडला! हे काय कमी झालं म्हणून परवा मोदीजींच्या विमानास इस्राईलने हवेत सुरक्षा पुरवली . . .
अगदी बूड भाजेस्तोवर बसलेली जागा सोडून दुसऱ्या जागेवर न बसणाऱ्यातील आपण एक – आधीच मान्य केलेलं बरं. कारण, नंतर आळशीपणाचे नसते आरोप होत राहतील आणि मला ते खपणार नाहीत!
वेळ सकाळची. दररोजच्या धांदलीत आजही एसटी थांब्यापर्यंत पोहचायला उशीर झालेला. एव्हाना मिनिट काट्यावर चाललेली घाई शेवटी सेकंद काट्यांवर आली त्यामुळे पळतच आपण एसटी थांबा गाठला. मग जेव्हा एसटीत बसलो तेव्हा डोळ्यांवर चष्मा नसल्याची अनुभूती झाली. चष्मा असताना देखील फळ्यावरचं काही कळत नाही हा भाग थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि चष्मा नसताना मला फळ्यावरचं काहीच दिसणार नाही याकडे लक्ष देऊयात. या विचारानेच मग मी एसटीचा त्याग केला आणि घराकडे निघालो. तसंही महाविद्यालयापेक्षा आजकाल, असलेला ‘चष्मा’ काढून ठेवला की मगच, समाजात जास्त शिकायला मिळतं!
“आरं अर्धी प्यायची का नाही तुला? हं! प्यायची ना, मग चल की माझ्यासोबत! किती वेळ वाट बघायची तुझी?”
असं एक मित्र त्याच्या दुसऱ्या मित्राला ओरडत, समजावत व विचारत असताना माझ्या नजरेस पडला. आता कोणत्याही दोन मित्रांस सोम्या-गोम्या अथवा काळू-बाळू ही नावे देण्यास मी स्वतःला बंदी करून घेतो आहे. कारण, आजच्या काळात कधी कोणाच्या भावना कशा रितीने दुखावल्या जातील हे समजणे कठीण आहे. आणि राहिला दुसरा भाग तर ही नावे सौम्य व सोज्वळ (म्हणजे कंडम) माणसांची वाटत असली तरी या नावाचे लोक गुंड असतात असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे या दोघांना आपण ‘अ’ व ‘ब’ म्हणूयात.
‘अ’ आणि ‘ब’ अर्थातच मदिरालयात निघालेले होते. सकाळी चहाच्या कपात त्यांना सोमरस हवा होता. यातील ‘अ’ हा उदारमतवादी वाटत असेल, कारण, ‘ब’ ला तो फुकट पाजणार आहे असं भासतयं. तर प्रत्यक्षात असं काहीही नसून सोमरसाचे निम्मे पैसे ‘ब’ भरणार आहे! म्हणजे निम्मी मेहनत ‘ब’ची आणि पूर्ण जाहिरात ‘अ’ची – सध्या हेच तर चालू आहे की!
“चल कुठे जायचं?” ब.
“आधी सांग पैसे आणलेत का तू निम्मे?” अ.
“बास का लगा? आणलेत की!”
“मग चल मस्त ठीकाणी नेतो तुला.”
असं म्हणून ‘अ’ ने दुचाकी काढली व दोघा मित्रांनी आनंदातच ‘ध्येया’कडे कूच केली.
या प्रसंगात सर्वात आश्चर्य कोणतं असेल तर या दोघांकडे गाडी होती खरं आश्चर्य पुढे ते असं की त्या गाडीत पेट्रोल सुद्धा होतं! भारताचे चांगले दिवस सुरू झालेत म्हणायचं.
नुकताच एका जागतिक संस्थेतर्फे एक अहवाल जारी झालेला आहे. जोपर्यंत जागतिक संस्था ‘कोणता नेता सर्वात लोकप्रिय?’ किंवा ‘कोणी थांबवलं रशिया-युक्रेन युद्ध?’ किंवा ‘ब्रह्मांडात सापडला ओम?’ असले चांगले अहवाल प्रसिद्ध करणार नाही तोपर्यंत आम्ही त्याकडे ढुंकूनही पाहणार नाही. कधीकधी नुसतंच ढुंकून पाहू मात्र त्यांस मनावर घेणार नाही. यावेळीचा जो अहवाल आहे त्याच्यासाठी जगातील सर्व देशांतील ‘पत्रकारितेची कागदपत्रे’ तपासली जाऊन जगातील सर्वात सजग देश ठरवला गेलाय. एकंदरीत हा जगातील ‘सजग’ देशांचा अहवाल.
यात नाॅर्वे नावाचा कोणतासा देश प्रथम क्रमांकावर आहे हे वाचून माझी घोर निराशा झाली. जर हे अहवालवाले भारतात येऊन इथल्या लोकांशी बोलले असते तर त्यांना खरा सर्वात ‘सजग’ व ‘निर्भय पत्रकारितेचा’ देश सापडला असता. नाहीतर मग कोणत्यातरी देशद्रोही षडयंत्रामुळे आपल्या देशातून चुकीची माहिती या अहवाल मंडळाकडे गेली असणार! आता त्यात असंही लिहिलं होतं ‘देशाच्या पत्रकारितेचा व लोकशाहीचा ‘आतून’ संबंध असतो’ जे की निदान मलातरी धादांत खोटं भासलं. अरे देशाला बातम्या पुरवताना जनतेच्या हिताची गोष्ट केली जाणारचं. मग सरकार तिथे घुसून हिताची गोष्टच बदलण्याचा प्रयत्न करणारंच. एकूणच ‘चांगले सरकार चांगली पत्रकारिता!’ यामुळे भारत प्रथम का आला नाही हे कळाल्यावर मी अहवाल पूर्ण वाचला.
या अहवालात नेपाळ, श्रीलंका हे देश चक्क आपल्याहून अधिक सजग आहेत असं लिहिलेलं होतं! मग मी वर्तमानपत्राची सुरुळी केली आणि . . . पुन्हा उघडली. या इतरांच्या आकडेवारीशी माझं काही घेणंदेणं नाही, नसावंच! आपला भारत बरा आणि आपण बरे. या अहवालात भारत आहे १५०व्या क्रमांकावर. जो गेल्या वर्षी १४२व्या क्रमांकावर होता. या अहवालात काहीतरी तथ्य आहे म्हणायचं! भारत वरचेवर ‘सजग’ होत आहे हे सत्य त्या अहवालात वाचलं आणि मी दोन मिनिटे अनुलोम-विलोम करून पुढचा अहवाल वाचू लागलो. पुढे ‘भारत २०१५ साली १३६व्या क्रमांकावर होता’ हे वाचलं तेव्हा मी वर्तमानपत्राची सुरुळी केली आणि . . . पुन्हा उघडली. तिथे दिसला पाकिस्तानचा क्रमांक १५७! मग आनंदी होऊन आम्ही आमच्या पत्रकारितेच्या बाजूने पत्रकारिता करायला सिद्ध.
मान्य आहे की भारत सध्या १५० व्या क्रमांकावर आहे आणि भारतात महागाई, बेरोजगारी, भूकबळी, अर्थकारण सर्वकाही गडबड असून विकास ढिंगचाक स्थितीत लटकलेला आहे मात्र तरीही ७० वर्षात पहिल्यांदा देशविघातक चित्रपटांविरोधात आवाज बुलंद केला गेलाय. एकूणच सगळे कसे सुखी व समाधानी अवस्थेत आहेत. आता चित्रपटांच्या आगाऊपणावर गेली सत्तर वर्षे कोणीच काही केलेलं नाही असं म्हणू नका कारण, २०१४ पासून किती चित्रपटांवर टाळेबंदी लागलीये ते पहा! यातून ‘टाळेबंदी केली त्यांना काय मिळालं?’ हे तूर्तास बाजूला ठेवलं तरी त्यातील काहीजण टिव्हीच्या पडद्यावर झळकले हेही नसावे थोडके. बाकी जे देशविघातक चित्रपटांच्या विरोधात बोलत आहे तेच खरे हिंदू आहेत याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.
थोडं विषयांतर झालं, आपण पत्रकारितेवर बोलत होतो. जिथे आता पुतिन, बायडन यांच्यासारखे ताकदवान नेते व सोबतच क्षी जिनपिंग, किंम जोंग उन हे नेतेही मोदीजींना विचारून सर्व काही करतात! पाकिस्तान सुद्धा ‘घर में घूस के मारेंगे’ ऐकल्यामुळे थोडासा धास्तावलेला आहे! चीन तर ॲप बॅन केल्यावर ढसाढसा रडला! हे काय कमी झालं म्हणून परवा मोदीजींच्या विमानास इस्राईलने हवेत सुरक्षा पुरवली – अशी सुरक्षा पुरवली की मोदींचे विमान हवेत मध्यभागी त्याच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, वरच्या बाजूला, खालच्या बाजूला अशी इस्राईलची विमाने – आणि त्यांनी मोदींना योग्य स्थळी नेऊन सोडलं! हे काय मी मनाचं सांगत नाही. हे पुराव्यासह येतं व्हाट्सॲपवर . . .
थोडं विषयांतर झालं, आपण पत्रकारितेवर बोलत होतो. नेहरू आणि इंदिरा गांधींनी भारतास कसे दु:खी ठेवले होते त्याहून आजचा भारत तर बराच आहे, मला ठाऊक आहे. जर काही दु:खी लोक असतील तर त्यांना २०१४ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय हेच आतापर्यंत कळालं नसणार. नाहीतर ते माझ्यासारखे आनंदी असते. कळून देखील दु:खी असतील तर त्यांनी पाकिस्तान गाठावा!
आता तर शाळेत भगवद्गीताही शिकवणार आहेत. मग का होणार नाही ‘इंडिया’ सजग? विज्ञान, गणित थोतांड आहेत. भगवद्गीता, अध्यात्म व एकमेवाद्वितीय हिंदू संस्कृती हेच जगायला शिकण्यासाठी आवश्यक आहेत. आता जगातील पहिल्या शंभरात भारताचं एकही विद्यापीठ नसलं तरी भगवद्गीता शिकवताच आपण विश्वगुरू बनणार! डाॅक्टर, शास्त्रज्ञ, अभियांत्रिकी यांपेक्षा बुवा-बाबा-भट शाळेतून बाहेर पडतील तेव्हा भारत सजग होईल!
परदेशातून माघारी आलेल्या विद्यार्थ्यांना मुळात देशाबाहेर जायलाच कोणी सांगितलं होतं? ‘त्यांच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न आ वासून उभा आहे’ असं म्हणतात त्यांच्याकडून व या विद्यार्थ्यांकडून भगवद्गीता मुखोद्गत करून घ्यायला हवी असं मला वाटतं.
पेट्रोल-डिझेल वाढतंय, गॅस वाढतोय, तूर-शेंगदाणे वाढताहेत, अन्नधान्य वाढतंय आणि परिणामी एकेक वस्तू हळूहळू महाग होत चालली आहे; पण याला ‘बिचारे’ सरकार तरी काय करणार? तिकडे युद्ध चाललेलं आहे आणि इकडे लोकांना साधी महागाई सहन होत नाही – घोर कलियुग! तसं पाहता सहा तास युद्ध रोखून मोदींनी इतिहास घडवला आहे. महागाई थांबवण्यासाठी सुद्धा त्यांनी लवकरच इतिहास घडवावा आणि ते घडवतील याची मला खात्री आहे.
विषयांतरासाठी माफी असावी. थोडक्यात हा पत्रकारिता अहवाल खोटा असं आम्ही छातीठोकपणे कोणत्याही चौकात कधीही सांगू शकतो. या अहवालात अजिबात मजा नाही. हा अहवाल विरोधी पक्षांचा छुपा डाव आहे. मोदी जर पत्रकारिता घडवत असते तर जनतेने योगींना आणून दिलं असतं की नाही? तसंही भारत असतानाच सजग, आणि विश्वगुरू, आहे. आपली प्राचीन संस्कृती जपली व योग केला किंवा नासाने जरी ‘ब्रह्मांडात ओम आवाज फिरतोय’ हे अधिकृतरीत्या जाहीर केलं तर भारत या विश्वातील प्रथम पत्रकारिता देश होऊन जाईल. इतके सगळे पत्रकार याची जाहिरात करून दाखवतील, याची आम्हाला खात्री आहे.
हे सगळं काहीच न करता ‘२०१४ नंतर सोयीसुविधा आल्याने महागाई आली. गेल्या सत्तर वर्षात महागाई नव्हती परिणामी कोणतीच सुविधा मिळाली नाही. भारतात वीज, पाणी, शाळा, दवाखाने, रेल्वे, एसट्या, इंटरनेट, कपडे हे आणि सर्वकाही २०१४ नंतर आलं’ असं जरी कोणत्या अहवालाने जाहिर केलं किंवा साधा दुसरा ‘पठाण’ जरी आला तर यंदा (ॲप बॅन केल्यावर) जसा चीन ढसाढसा रडला तसाच पुढच्या वेळी नाॅर्वे रडणार हे नक्की!
{fullwidth}