स्त्रीस्वास्थ्य भाग - ३ (पाॅलिसिस्टीक ओव्हरीयन डिसीज’)


femine hands curing uterus pcod symbolic
‘पीसीओडी’ने त्रस्त महिला सहसा जननक्षम असतात, तेव्हा त्यांना गर्भधारणा होण्यात नेहमीच अडचण येईल असे नाही


पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी, अनियमितपणा इत्यादींकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय तपासणी करून घेतली तर पुढच्या अडचणींचा सामना करावा लागत नाही. सहाजिकच अशामुळे मासिक पाळीच्या समस्या जसे अनियमितपणा, जास्त रक्तस्त्राव, पाळीच्या वेळी असह्य वेदना होणे इत्यादी तक्रारी रोखल्या जाऊ शकतात.महिलांमधील संप्रेरक बदल (Hormonal changes) भाग – १


दर महिन्याला स्त्रियांच्या अंडाशयातून (Ovary) एक परिपक्व झालेले स्त्रीबीज बाहेर पडते. ते बीज ‘फेलोपियन’ नळीमधून गर्भाशयापर्यंत (Uterus) येऊन पोहचेपर्यंत फलित (Fertilize) झाले तर गर्भधारणा होते, नाहीतर ते गर्भाशयाच्या आवरणासकट गळून पडते. त्यास ऋतूचक्र किंवा मासिक पाळी (Menstrual cycle) असे म्हणतात.

पीसीओडी या आजारात, एकतर स्त्रीबीज तयार होण्यास अडथळा तयार होतो किंवा हे बीज त्याच्या कोषातून व्यवस्थित बाहेर पडत नाही किंवा बाहेर पडून फलित झाले नाही तर फुटतही नाही. परिणामी त्यात पाणी साठत जाऊन त्याची गाठ (Cyst) तयार होते.

दर महिन्याला अशा गाठी वाढत जाऊन अंडाशयावर साठत जातात म्हणून त्यास ‘पाॅलिसिस्टीक ओव्हरी’ असे म्हणतात. या गाठी जास्त मोठ्या झाल्या तर तिथेच ‘कोलॅप्स’ होऊन अंडाशयाला जखम होऊ शकते व ते काढूनही टाकावे लागू शकते.

सहाजिकच अशामुळे मासिक पाळीच्या समस्या जसे अनियमितपणा, जास्त रक्तस्त्राव, पाळीच्या वेळी असह्य वेदना होणे इत्यादी तक्रारी होऊ शकतात. या समस्त क्रिया व्यवस्थित सुरू राहण्यासाठी संप्रेरकांचे संतुलित (Hormonal Balance) असणे फार आवश्यक आहे, अन्यथा शरीरावर मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतात.


‘पाॅलिसिस्टिक ओव्हरीयन डिसीज’ (PCOD)


पीसीओडी हा मुख्यत्वे जननक्षम (फर्टाईल) वयात संप्रेकांच्या असंतुलनामुळे होणारा अंडाशयाचा रोग आहे. या रोगात ‘अँड्रोजेन’ (Androgen) हे पुरूष संप्रेरक अधिक प्रमाणात स्त्रवत असते त्यामुळे हे असंतुलन निर्माण होते. ‘पीसीओडी’ आणि ‘पीसीओएस’ (Polycystic Ovarian Syndrome) यांमधे किंचित फरक आहे.

पीसीओडी ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यात अंडाशय वेळेआधीच स्त्रीबीज असणारे कोश (Follicles) सोडते, त्यामुळे कालांतराने त्यांचे गाठीत रूपांतर होते. जेव्हा असे होते तेव्हा महिलांना अनियमित मासिक पाळी, पुरूषांप्रमाणे केस गळती, वजन वाढणे, पोट वाढणे, पोटदुखी यांचा सामना करावा लागतो. सोबत अंडाशयाचा आकारही वाढत जातो.

पीसीओएस (PCOS) हा अंतःस्त्रावी प्रणालीचा (Endocrine System) चयापचय विकार (Metabolic Disorder) आहे. ‘पीसीओएस’मध्ये स्त्रीबीज बाहेर पडण्याची क्रिया अनियमित होते किंवा होतच नाही, परिणामी अंडाशयावर खूप जास्त गाठी तयार होतात. ही स्थिती पीसीओडीपेक्षा अधिक धोकादायक आणि गंभीर असते.

‘पीसीओडी’ने त्रस्त महिला सहसा जननक्षम असतात, तेव्हा त्यांना गर्भधारणा होण्यात नेहमीच अडचण येईल असे नाही. तर याउलट पीसीओएस महिलांच्या गर्भधारणेस प्रथम पातळीवरच एक मोठे आव्हान बनवते.


‘पीसीओडी’च्या लक्षणांमध्ये;

 • अनियमित मासिक पाळी किंवा पाळीच न येणे
 • जास्त प्रमाणात व वेदनादायी मासिक धर्म, ओटीपोट, कंबर इत्यादी (पेल्वीक भागात) दुखणे
 • गर्भधारणेस वेळ लागणे किंवा त्रास होणे
 • चेहर्‍यावर अतिरिक्त तारूण्यपिटीका येणे

वरील लक्षणे आढळतात.


‘पीसीओडी’ संबंधीत आजारांमधे;

 • टाईप-२ मधुमेह
 • झोपेच्या समस्या (ऑब्सट्रक्टिव स्लीप ॲप्निया)
 • हृदय रोग
 • गर्भाशयाचा कर्करोग (एंडोमेट्रीयल कॅन्सर)

सामील असतात. पीसीओडीचा त्रास आनुवंशिकतेने देखील होऊ शकतो.


१) त्याचबरोबर पुरूष संप्रेरक ‘एंड्रोजेन’च्या (मॅस्कूलिनींग हाॅर्मोन) उच्च स्तरामुळे ‘हायपर एँड्रोजनीजम’चा त्रास उद्भवतो. ज्यात चेहर्‍यावर अतिरिक्त केस वाढणे, मोठे पुरळ येणे हे घडू शकते.

२) याशिवाय ‘हायपरमेनोरीया’ ज्यात गंभीर व जास्त रक्तस्त्राव आणि ‘एंड्रोजेनिक हेअर थिनींग’ ही काही लक्षणे दिसतात.

३) यामुळे होणार्‍या चयापचय विकारांत महिलांमध्ये ‘इन्सुलिन रेजिस्टन्स’ होणे, ‘सिरम इन्सुलिन’ व ‘होमोसिस्टिन’ या सार्‍यांच्या स्तरात मोठी वाढ होणे हे प्रकार आढळतात.

४) महिलांची जननक्षमता ठरवणाऱ्या ‘एँटी मुलेरीयन हाॅर्मोन’ (AMH) या संप्रेरकाचा स्तर वाजवीपेक्षा अधिक जास्त वाढल्याने पीसीओडी गंभीर रूप घेऊ शकतो.


औषधोपचारासमवेत जीवनशैलीतले काही बदल

पीसीओडी किती प्रमाणात वाढलाय हे ‘पेल्वीक अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी’च्या मदतीने वैद्यकीय तपासणीद्वारे जाणून घेता येते. याच्या प्राथमिक उपचारात औषधोपचारासमवेत जीवनशैलीतले काही बदल महत्त्वाचे आहेत.


१) उपचारात ‘इन्सुलीन रेजीस्टन्स’ कमी करणे, प्रजनन क्षमता वाढवणे, मासिक पाळी पुन्हा नियमित करणे, अतिरिक्त वजन कमी करणे यांवर भर दिला जातो.

२) औषधांमधे तोंडावाटे घेतले जाणारे (ओरल) गर्भनिरोधक व ‘मेटफाॅर्मिन’ या गोळ्या दिल्या जातात. मुखावाटे घेतलेल्या गर्भनिरोधकांमुळे ‘ग्लोब्युलिन’ तयार करणाऱ्या लैंगिक संप्रेरकांवर प्रभाव पडतो. परिणामी ‘टेस्टेस्टीरोन’ संप्रेरक संतुलित होऊन चेहर्‍यावरील येणारेे पुरळ व अनावश्यक केस (ह्याला हिर्सुटीझम म्हणतात) कमी होण्यास मदत मिळते. तसेच मेटफाॅर्मिन हे इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्यास मदत करते. त्यामुळे अंडाशयाची कार्यक्षमता वाढून योग्य प्रकारे ओव्ह्यूलेशन होते व मासिक पाळीही नियमित होते.


‘पीसीओडी’ नियंत्रणात ठेवताना

पीसीओडी हा विकार आपल्या जीवनशैलीत व खाण्यापिण्यात काही बदल करून, ताणतणावापासून दूर राहून व खालीलपैकी काही घरगुती उपायांनीही नियंत्रणात ठेवला जाऊ शकतो.


 • आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे इत्यादींसोबत ‘झिंक (Zinc) काँप्लेक्स’, ‘व्हिटॅमिन डी’, ‘कॅल्शियम’, ‘काॅड लिव्हर ऑईल’ यांचे ‘सप्लीमेंट्स’ अंतर्भूत करून,
 • नैसर्गिकरीत्या दूध, दही, आंबवलेले पदार्थ, केळी, तृणधान्य इ. पासुन मिळतात ते ‘प्रोबायोटिक्स’ (जे शरीरासाठी आवश्यक असणारे गुड बॅक्टेरिया) घेऊन,
 • तुळस, अश्वगंधा यांचा समावेश करून,
 • योग्य व हलक्या व्यायामाने वजन नियंत्रणात ठेऊन व ताणतणावापासून प्रकर्षाने दूर राहून.

याशिवाय पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी, अनियमितपणा इत्यादींकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय तपासणी करून घेतली तर पुढच्या अडचणींचा सामना करावा लागत नाही.


सजग रहा, स्वस्थ रहा!

{fullwidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال