कादंबरीच्या साहित्यिक उलाढालीत काही कादंबऱ्या नवलेखनशैली मुळे गाजल्या, काही नवीन साहित्यिक प्रकारांच्या जनक म्हणून गाजल्या तर काही कालजयी ठरल्या म्हणून गाजल्या. ‘जाॅर्ज ऑर्वेल’ नामक लेखकाची राजकीय लेखन हा साहित्यप्रकार जन्माला घालणारी ‘ॲनिमल फार्म’ या तिन्ही बाबतीत थोडीफार ग्राह्य धरता येईल. सुरूवातीला छापण्यासाठी सुद्धा दोन ठिकाणांहून धडधडीत नकार कमावलेली ही ‘ॲनिमल फार्म’ मराठीत सुद्धा खूप गाजत आहे याचं कारण ती कालजयी नाही तर काय आहे?
माणसाला कधी काय आठवेल याचा नेम नाही. तसंच आज सकाळी पोहून येताना मला ‘ती’ ऐतिहासिक नोटबंदी आठवली. सोबतच मी त्या(काळी) नोटबंदीचा केलेला कट्टर पुरस्कार आठवला. त्यावरून मग एक जबरदस्त (स्वतःला सुचला म्हणून जबरदस्तच वाटणार!) असा विनोदी लेख सुचला. लेखाच्या विचारात भरपूर हसून झाल्यानंतर मला अचानकच नोटबंदी विसरलेली सर्व माणसं आठवली. मग ओघानेच सर्व राजवटी पाहिलेला व काहीच न विसरलेला ‘बेंजामिन’ आठवला . . . त्याचा कायमच आदर्शवादाच्या शोधात राहिलेला व नवराष्ट्र उभारणीसाठी स्वतःचं बलिदान देऊन बसलेला ‘बॉक्सर’ आठवला. त्यानंतर ‘फोर लेग्स गुड टू लेग्स बॅड’ असं अविरत बरळणारी प्रचारी मेंढरं आठवली . . . स्वप्नाळू ‘ओल्ड मेजर’, द्रष्टा ‘स्नोबल’, सत्तापिपासू ‘नेपोलियन’ आणि प्रचारपोपट ‘स्क्विलर’, कनवाळू ‘क्लाॅव्हर’ आणि सुशिक्षित ‘म्युरीअल’ आठवले, त्यांचा मालक ‘मिस्टर जोन्स’ आठवला, धूर्त ‘विंपर’ आठवला . . . हळूहळू सगळं आठवत गेलं आणि शेवटी हे सर्व लिहिणाऱ्या लेखकाचा ‘एरिक ब्लेअर ते जाॅर्ज ऑर्वेल’ हा प्रवास आठवला. थोडक्यात मला ‘ॲनिमल फार्म’ आठवली आणि त्याचा निर्माता ‘जॉर्ज आर्वेल’ आठवला. मग म्हणलं आज ‘ॲनिमल फार्म’वरच लिहूयात – झालं नमनाला घडाभर झालं. आता मुळ मुद्द्यावर येऊयात!
तसं पाहता कोणत्याही पुस्तकावर लिहायला मला आवडत नाही. पुस्तकांचं समीक्षण ही काही लिहायची आणि वाचायची चीज नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. पुस्तकांची समीक्षणं उगाचच एखाद्या पुस्तकाबद्दल पूर्वग्रह दूषित करून ठेवतात. जे पुस्तक आपल्याला वाचायचंय ते फक्कडपणे वाचून टाकावं अशा मताचा मी. त्यामुळे ‘ॲनिमल फार्म’वरचा लेख जवळपास दीडेक वर्षे लांबलाय. (कित्येकच पुस्तकांवरचे लेख असेच रखडलेले आहेत, असोत बापडीचे!) या लेखाच्या निमित्ताने का होईना ‘ॲनिमल फार्म’वर आणखी एक हात बसेल म्हणून हा लेख लिहिण्याचं ठरवलं आहे.
अशाच कोणत्यातरी वसंतात जेव्हा सृष्टी बहरली होती तेव्हा ‘मॅनर फार्म’ ओसाड पडलं होतं. याचं कारण – दारूच्या बाटलीत बुडालेला, मॅनर फार्मचा मालक म्हणजेच, ‘मिस्टर जोन्स’. पूर्वी मॅनर फार्मची भरभराट आणि नूर काही औरच होता. साऱ्या पंचक्रोशीत मॅनरचं नाव होतं; पण हळूहळू संपत्ती आणि सत्तेच्या नशेत मिस्टर जोन्स अशा काही विचित्र माणसांच्या संगतीत फसला की ‘रेड लायन’ दारूगुत्ता त्याचं घर बनलं आणि मॅनर फार्मची पडझड सुरू झाली.
रात्री नशेत झिंगत आलेल्या जोन्सला पाहून सर्व प्राण्यांच्या अंगावर काटा उमटला. सर्वांना वाटलं तो आता चाबकाने आपल्याला फोडून काढणार मात्र जोन्स झोपी गेला. मध्यरात्री हळूच सर्वजण गुप्त सभेसाठी निघाले. ओल्ड मेजरने आज रात्री मॅनरवरील ‘सर्वप्राणीय’ बैठक बोलावली होती. ओल्ड मेजर हा सर्व प्राण्यातील वयस्कर, म्हणूनच वंदनीय, असणारा असा वराह . . . त्याने बोलावलेली बैठक . . . सर्वजण जमलेले . . . मग मेजरने स्वतःच्या बालपणीपासूनचे सर्व राग आळवायला सुरुवात केली. पूर्वीचे सुंदर दिवस, आताचे कष्टी दिवस व त्यावरून भविष्यात येणाऱ्या हलाखीच्या दिवसांचं भाकीत त्याने सर्वांना ऐकवलं.
कोंबड्यांची अंडी, गाईंच दूध, रेड्यांच बळ, डुकरांच मांस, मेंढ्यांची लोकर आणि घोड्या-गाढवाची काम करण्याची क्षमता माणसं कशी वापरून घेतात हे मेजरने सांगितलं, म्हातारपणात कसाया-खाटकाकडून आपली विल्हेवाट लावली जाते हेही सांगितलं. आणि त्या बदल्यात मिळतं काय तर अर्धपोट अन्न आणि अंगभर मार. थंडीच्या दिवसात तर निवाऱ्याचेही वांदे! माणसांचा आपल्यावर वाढत चाललेला हा जुलूम आपल्याला नष्ट करायचा आहे. त्यासाठी नवं राज्य यायला हवं. मेजरने सर्वांच्या मनात भीती पेरून एक सुरेख योजना तयार केली. ज्यात सर्वांना समान अधिकार होते, बंधुता होती, पोटभर अन्न आणि म्हातारपणी मान होता, निवारा होता सर्वकाही होतं. त्यानंतर तीन दिवसांत ओल्ड मेजर मॅनर फार्म आणि धरती सोडून ढगात निघून गेले!
हे भाषण ऐकायला आलेल्यात सर्व वराहातून स्नोबल (मराठी इंग्रजीत सांगायचं तर ‘स्नोबाॅल’) व नेपोलियन हे दोघेही अहंगंडी, अहंमन्य, सत्तापिपासू, क्रूर आणि वर्चस्ववादी असणारे. त्यातल्या त्यात स्नोबल बरा. मेजरने सांगितलेली योजना सर्व प्राण्यांना कळून चुकली होती; पण ही क्रांती घडणार कधी काही माहिती नव्हतं. शेवटी एकदा जोन्स गुत्त्यात गेला तो दोन दिवसांनी आला, कामगारांनी प्राण्यांना उपाशी राखलं होतं याचा परिणाम स्नोबलने बाॅक्सरला हाताशी धरून क्रांती राबवली. प्राण्यांनी संघर्ष घडवला व मिस्टर जोन्स, मिसेस जोन्स व कामगार मॅनर फॉर्मच्या बाहेर झाले. सोबत मोझेस नावाचा काक सुद्धा गेला. मोझेस नेहमी ढगांच्या पलीकडे असणाऱ्या चंदेरी दुनियेवर बोलायचा.
जोन्स गेल्यावर अन्यायाविरुद्ध पेटलेल्या होळीत ज्याच्याने प्राण्यांवर जुलूम ओढावेल असं सर्व साहित्य जाळून राख करण्यात आलं.
स्नोबल तिथला नवा राजा. आणि ॲनीमल फार्म हे मॅनर फार्मचं नवं नाव. आणि ‘बीस्टस् ऑफ इंग्लंड’ हे नवं राष्ट्रगान! मध्यंतरीच्या काळात सापडलेल्या पुस्तकांतून सर्व डुकरं वाचायला आणि लिहायला शिकली होती. या नव्या राज्यात सर्वांना पोटभर अन्न, राहण्यासाठी निवारा आणि मुबलक आराम सोबतच वयस्कर झाल्यानंतर सुट्टी इत्यादी सर्व विधायकं मंजूर केली गेली. नव राज्य आलं म्हणून सगळीकडे चैतन्य सळसळलं. स्नोबल या सर्वोत्तम लिहीता-वाचता येणाऱ्या राजातर्फे काही नवे नियम लिहिले गेले.
- दोन पायांवर चालणारं सर्वकाही शत्रू आहे
- चार पायांवर चालणारं सर्वकाही व ज्याला पंख आहेत असंही सर्वकाही मित्र आहे
- कोणत्याच प्राण्याने कपडे घालता कामा नये
- कोणत्याच प्राण्याने गादीवर झोपता कामा नये
- कोणत्याच प्राण्याने दारू पिता कामा नये
- कोणत्याच प्राण्याने इतर प्राण्यांना मारता
- सर्व प्राणी समान आहेत
अशी काहीशी ती नियमावली होती. इतर प्राण्यांत फक्त बेंजामिन गाडव व एक म्युरीअल शेळीच वाचू शके. बाकी सर्व तोडकेमोडके सुशिक्षित. बाॅक्सरला तर ‘डी’ आद्याक्षराहून पुढची मजल गाठता आली नाही.
जोन्स गेल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस सर्वांनाच त्रास सहन करावा लागला. गाईंचं दूध वेळेवर निघत नव्हतं, कोंबड्यांची अंडी उचलली जात नव्हती, मेंढ्यांची लोकर निघत नव्हती की कोणाला पोटभर खायला मिळत नव्हतं. नंतर मात्र स्नोबलने सर्व कारभार हातात घेतला. वेळोवेळी दूध निघालं, कोंबड्यांची अंडी उचलली न जाता उबवली गेली, मेंढ्यांची लोकर त्यांनाच राहील असं आश्वासन मिळालं. सुरूवातीला निघालेलं दुध वाटलं जाईल असं ठरलं नंतर मात्र ते डुकरांच्याच परिवारासाठी राखीव झालं! कारण डुकरांची नवी राज्यकर्ती पिढी बुद्धीवान व्हायला हवी! या एकाच मतावर स्नोबल आणि नेपोलियनचं एकमत झालं. दुसऱ्यांदा त्यांच एकमत झालं ते ‘सर्व फळफळावळ ही डुकरांसाठी राखीव असेल’ या मुद्यावर!
प्राण्यांमध्ये सर्वात महत्त्वाकांक्षी होतात बॉक्सर नावाचा घोडा. त्यारात्री ओल्ड मेजरने सांगितलेला शब्द न शब्द त्याला रोमांचित करून गेला होता. नवं राज्य, जिथे समानता होती, सुबत्ता होती व शांतता होती त्याला खुणवत होतं. ते राज्य आणण्यासाठी तो दिवस-रात्र रात्रं-दिवस खपण्यासाठी तयार होता. व आतातर पवनचक्की सुद्धा उभी होणार होती. कोणतीही अडचण आली, माघार बसली की तो नेहमी म्हणे, ‘मी जास्त काम करेन!’ हा एकच उपाय त्याला ठाऊक होता. इतर प्राण्यांच्या शक्तीची बेरीज करूनही बाॅक्सरची शक्ती त्याहून अधिक ठरायची. डुकरांनी याचा फायदा घेतला. त्यांनी ठराविक प्राण्यांना वाचायला शिकवलं; पण बॉक्सरला कधीच वाचायला शिकवलं नाही आणि तो स्वतः ‘मला कळत नाही’ म्हणत डुकरांवर विश्वास टाकून कधी शिकला नाही. तो अर्धा तास लवकर उठून राबायचा. बाॅक्सरचा जिगरी दोस्त बेंजामिन सर्व पाहत होता. भूतकाळातल्या अनुभवांतून त्याला भविष्याची कुणकुण लागत होती.
नेपोलियनने कुत्र्यांची सर्व पिल्ले शिक्षणासाठी एका माळ्यावर स्वतःच्या हाताखाली तयार करायला सुरुवात केली. तिथे इतर प्राण्यांना प्रवेश नव्हता.
त्यातच कधीतरी सर्व डुकरं शेतीचं उपज निघालेल्या गोदामाला राजवाडा बनवून राहू लागली, त्यांनी नियोजनाच्या नावाखाली शेतीच्या कामातून हात बाजूला काढून घेतला व हळूहळू भविष्याची रंगीत स्वप्ने दाखवून व इतर सर्व प्राण्यांच्या मेंदूला विविध सप्तरंगी सुविधांचं आमिष चिकटवून त्यांना कामांत गुंतवलं.
जोन्स एकदा मित्रांना घेऊन ॲनिमल फार्म बळकवण्यासाठी माघारी आला मात्र स्नोबलच्या नेतृत्वाखाली त्याला हुसकावून लावण्यात सर्व प्राण्यांना यश आलं. हळूहळू त्यांच्या या स्वातंत्र्याची गाथा इतर फार्मवर पसरायला सुरुवात झाली होती. बरेचसे प्राणी त्यांना येऊन मिळत होते, बंड पुकारत होते.
सर्वकाही ठीकठाक चालू असताना अचानक महत्वाकांक्षी असणाऱ्या स्नोबलने. सर्वांना वीज मिळावी म्हणून पवनचक्की बनवण्याचा नवा पर्याय समोर आणला. त्यास सुरवातीपासून नेपोलियन व त्याचा प्रचारपोपट स्क्विलर विरोध करत राहिले. शेवटी तीन दिवसांचा आठवडा, शेतीची अवजारे, गरम पाणी, रात्रीचा प्रकाश अशी आश्वासने प्राण्यांना भावली स्नोबलची कल्पना मान्य झाली.
मात्र तेवढ्यात नऊ राक्षसी कुत्र्यांनी स्नोबलवर प्राणघातक हल्ला केला, त्याला पळवून लावलं. नेपोलियनने ज्या पिल्लांना शिकवण्यासाठी म्हणून नेलं होतं त्यांच्या मेंदूत त्याने लहानपणापासून शेण भरलेलं होतं! या कुत्र्यांचा धाक इतरांना दाखवून स्नोबलची हाकलपट्टी केली गेली. इथून हुकुमशाहीला सुरूवात झाली. काही काळानंतर पवनचक्कीचा मुळ विचार नेपोलियनचाच होता असं सांगून तो राबवण्यात आला!
नेपोलियनची सत्तेची तलफ वाढतच होती. मध्येच कधीतरी आपल्या राजकीय कारकिर्दीचा महामेरू व पैशांची गरज म्हणून शेतीतील उत्पन्न विकण्याचं नेपोलियनच्या डोक्यात आलं! विंकर नावाच्या एका धूर्त माणसाच्या मध्यस्थीने ॲनिमल फार्मवरील अंडी, दूध, लोकर, शेतीचं उत्पन्न, धान्य, लाकूड व प्राण्यांचा चारा सुद्धा बाहेर विक्रीस जाऊ लागला. त्या बदल्यात, कपडेलत्ते व खाण्यापिण्याच्या, चैनीच्या वस्तू येऊ लागल्या. नियम मोडले जात होते. प्राणी हे सर्व मूग गिळून पाहत होते. शेती मागे पडली. मग खायला अन्न पुरेना, सर्व नियम मोडले जात आहेत, स्वातंत्र्य-समता-बंधुता तोंडी लावायला सुद्धा मिळेनात हे ओळखून काही प्राणी फितूर झाले. त्यांनी पळून वगैरे जाण्याचा व जोन्सला परत आणण्याचा आराखडा ठरवला होता. नेपोलियनने मग त्यांची सरेआम कत्तल केली! विरोध मावळला!
जोन्सच्या फार्मवर याहून हलाखीचे दिवस होते हे नेपोलियनच्या मेंढरांकडून व स्क्वीलरतर्फे पसरवलं जातं होतं. असं ऐकलं की प्राणी जरा सुखावत. निदान दोन पायांपेक्षा चार पायाचे शासक बरे असं म्हणतं. बाॅक्सरने ‘मी जास्त राबेन’ सोबत ‘नेपोलियन कायम बरोबर असतो’ हे पालुपद गिरवायला घेतलं होतं. बेंजामिन मात्र एकटा सर्व पाहत होता. सर्व जानत होता.
नेपोलियनच्या चैनीसाठी सर्व प्राण्यांना जुंपलं गेलं. हळूहळू सर्व डुकरं जोन्सच्या घराला राजवाडा बनवून राहू लागली. ओल्ड मेजरची पुरलेली कवटी प्रार्थनास्थळी ठेवण्यात आली. अन्न कमी करण्यात आलं. शेतीच्या उत्पादनांची विक्री वाढली. आणि अशाच पावसात कधीतरी पवनचक्की कोसळली.
ती कोसळण्यामागे स्नोबलचा हात आहे हे नेपोलियनतर्फे पसरवलं गेलं! हळूहळू ॲनिमल फार्मवर काहीही अगदी काहीही झालं तरी पुर्वीचा शासक स्नोबलवर ढकलण्यात येऊ लागलं! याउलट अगदी तळ्यातील पाणी गोड लागतंय तर तेही सद्यशासक सर्वेसर्वा महान पराक्रमी नेपोलियनमुळेच! असे गोडवे प्राणी गाऊ लागले! माॅली नावाची एक घोडी मात्र चंगळवाद प्रिय असल्याने सर्व प्राण्यांना ॲनिमल फार्मवर टाकून शहरात पळून गेली होती.
नेपोलियनचा अत्याचार वाढत होता. कत्तली वाढत होत्या. रविवारी सर्वजण ‘बीस्टस् ऑफ इंग्लंड’ गायला जमत ते रद्द करण्यात आलं. प्राण्यांची आशा जागवणारं हे गीत कोणी गायलं तर थेट मृत्यूदंड! नेपोलियनने लोकशाही पद्धत आणली. पण एकटा तोच उमेदवार, थोडक्यात ही हुकूमशाही. तुम्ही हुकूमशाहीला अडवू शकता, लोकशाहीला मज्जाव घालू शकता; पण जी हुकूमशाही लोकशाहीच्या मार्गाने येते तिला तुम्ही किंवा कोणीही काहीही करू शकत नाही! यातंच डुकरांना दारूचं व्यसन लागलं. नियम बदलत होते त्यांचं स्पष्टीकरण प्रचारपोपट स्क्विलर देत होता. समान नागरी कायदा लागू असल्याचं नुसत्या अनाकलनीय आकडेवारीतून भासवत होता. दारूच्या व्यसनामुळे इतरांचं अन्न आणखी कमी करण्यात आलं. स्नोबल या पूर्वसुरीची ‘तो जोन्सशी हातमिळवणी करायचा, तो जोन्सचाच गुप्तहेर होता’ असली कागदपत्रे उघड करण्यात आली! एकदा तर स्क्विलर सात नियमांमध्येच बदल करताना सापडला!
जगाला हे कळू नये म्हणून नेपोलियनने मोकळ्या डब्यात वाळू भरून धान्याची कोठारे भरली. गरीबी लपवण्यासाठी भिंती बांधल्या! व शेजारच्या फार्मसह लाकडाचा व्यापार केला. त्यात फार मोठी फसवणूक झाली. तेव्हा या फार्मवर हल्ला करण्याचं निश्चित झालं.
ॲनिमल फार्मची ही योजना जाणून पुन्हा एकदा शेजारील फार्मच्या मालकांनी ॲनिमल फार्म बळकावण्यासाठी प्राण्यांवर हल्ला केला. त्यात बरेच प्राणी शहीद झाले, सक्विलर लपून बसला, नेपोलियनच्या शेपटीवर आफत आली, बाॅक्सरला गोळी लागली व निम्म्या उभा राहिलेल्या पवनचक्कीला बाँब जोडला गेला. एकीकडे बाँबने पवनचक्की जमीनदोस्त झाली तर दुसरीकडे तो स्फोट शेजारील फार्मच्या मालकांनी केला असला तरी तो योजना स्नोबेलने घडवला असं नेपोलियन म्हणाला. आणि या युद्धात ‘विजय’ जाहीर करून बंदुकीच्या फैरी झाडल्या गेल्या. नेपोलियनने स्वतःलाच ‘पराक्रम पदके’ बहाल केली! व पवनचक्की पुन्हा बांधण्याची घोषणा झाली.
स्नोबलला दुश्मन समजून पावसात, थंडीत, अतिशय दमलेल्या अवस्थेत असताना पुन्हा पवनचक्कीचा दगड ओढत असताना खाली कोसळून बॉक्सर जायबंदी झाला. आणि इतकी वर्ष इमाने इतबारे आदर्शवादाच्या पुढे पाहू न शकणारा बॉक्सर रातोरात टाकाऊ झाला. त्याला नेपोलियनने कसायाच्या हवाली केलं!
बाॅक्सर जाताच सर्व प्राणी खवळून उठले, बंडखोर झाले मात्र स्क्वीलरने त्यांना बाॅक्सर दवाखान्यात वीराचं मरण मेला असं खोटे अश्रू गाळून सांगितलं व त्यांचा विरोध शून्यात नेला. ‘लढत रहा काॅम्रेडस् आणि नेपोलियन महान आहे’ ही बाॅक्सरची शेवटची वाक्ये होती असं स्क्विलर बोलला.
निवृत्तीच्या दिवसांकडे आशेने पाहणारा आदर्शवादी बाॅक्सर हकनाक गेला होता.
म्हातारा बेंजामिन पाहत होता. त्याला सगळं कळत होतं; पण तो बोलत नव्हता. मिस्टर जोन्सच्या चढत्याउतरत्या काळापासून ते आत्ताच्या दोन पायांवर चालणार्या व सुटबुट घालणाऱ्या डुकरांपर्यंत त्यांने सर्वकाही पाहिलेलं होतं, जाणलेलं होतं. हो डुकरं आता दोन पायांवर चालत होती. नेपोलियन तर चाबुक बाळगून होता, आणि ते सर्वजण कपडेही घालत असत!
जोन्स वारला होता, म्युरीअल वारली होती, क्लाॅव्हर मरण्याच्या बेतात होती. अजून एकाही प्राण्याने ‘निवृती’ अनुभवलेली नव्हती. ओल्ड मेजरच्या गुलाबी दुनियेच्या कल्पनेत व प्राण्यांनी स्वतःसाठी बनवलेल्या नियमात होत असलेले बदल बेंजामिन शांतपणे पाहत गेला. नव्या मुर्ख, अशिक्षित पिढीने क्रांतीच्या फक्त गप्पा ऐकल्या होत्या. डुकरं सोडली तर स्पष्ट वाचता येतं असा तो एकटाच उरला होता. मात्र घडणार्या गोष्टी आपल्या शक्तीच्या बाहेर आहेत हे जाणून तो सहन करत राहिला. मोझेस कावळा माघारी आला होता. तो रंजलेल्या प्राण्यांना ढगापलीकडे असणाऱ्या सुखांच्या गोष्टी ऐकवायचा व या बदल्यात त्याला डुकरांकडून दारू मिळत असे! जोन्स गेला तेव्हापासून इतर प्राणी जेव्हा बगावत करू पाहत तेव्हा दरवेळी ‘फोर लेग्स गुड टू लेग्स बॅड’ बरळणाऱ्या मेंढ्या आता मात्र स्क्विलरने शिकवलं तसं ‘फोर लेग्स गुड, टू लेग्स बेटर’ गात होत्या! बेंजामिन पाहत होता.
पवनचक्की तयार झाली होती. पण तिचा उपयोग वीजनिर्मिती सोडून मक्यावर प्रक्रिया करण्यासाठी होत होता. दुसरी पवनचक्की बांधण्याचं काम सुरू होतं. उद्योग वाढले होते. फार्मवरच दारू बनत होती. आणि आतातर बाहेरची माणसं बेधडक ॲनिमल फार्मवर जात-येत होती. प्राण्यांची अवस्था बिकट झाली होती मात्र अजूनही स्क्विलर त्यांना जोन्सच्या काळात याहून वाईट होतं हे भरवे, स्नोबलच्या फितुरीचे आणि नेपोलियनच्या पराक्रमाचे किस्से ऐकवे व शेवटी विचारे आता सांगा तुम्हाला जोन्स परत हवा आहे का?
चालणारी डुकरं पाहून हताश झालेली क्लाॅव्हर लिहिलेले सात नियम वाचायला जाते. तिला तर वाचता येत नसतं तेव्हा बेंजामिन सांगतो की त्या सात नियमांची जागा आता फक्त एकाच नियमाने घेतली आहे.
सर्व प्राणी समान असतात मात्र काही प्राणी हे इतरांपेक्षा जास्त समान असतात!
चारी बाजूंनी हतबल झालेल्या म्हातार्या बेंजामिनला जेव्हा बॉक्सरला खाटकाच्या गाडीतून नेलं जात होतं तेव्हाचा तो प्रसंग आठवत होता . . .
पुस्तकाचं समीक्षण कसं लिहू नये याचं आदर्श उदाहरण ठरावं असंच काहीसं आज मी लिहून बसलो आहे. हे कबूल करून पुढे चाललं तर बरं राहील. पुस्तकाचं समीक्षण वाचणाऱ्याला ते पुस्तक वाचू वाटलं पाहिजे. त्यासाठी मुळ कथानक उघडं न पाडता वाचकाची उत्सुकता निर्माण होईल असं लिहायला हवं, जे मला जमलेलं नाही. वास्तविक पाहता ॲनिमल फार्मवर लिहिण्यासारखं फारसं काही नाहीये ती जाणून घेण्याची गोष्ट आहे!
‘एरिक ब्लेअर’ नावाचा स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या बिहारमध्येच जन्मलेला हा माणूस. आपल्याच मातीत जन्माला हे वाचून किंवा ऐकून आपली छाती छप्पन होतेच; पण मी हे अभिमानासाठी सांगितलेलं नाही. यासाठी सांगितलं की भारतात तो जन्मला म्हणजे घाणेरड्या राजकारणाची दिक्षाच घेऊन जन्मला!
त्याचं नंतरचं शिक्षण इंग्लडमधलं. इंग्लंडमधील ईटन या उच्चभ्रू संस्थेतून पुन्हा पुढं पोलीस भरतीत जाणारा तो पहिला व कदाचित शेवटचाच विद्यार्थी. कारण ईटनमधून शिकलेले सर्व विद्यार्थी पुढे ऑक्सफर्ड किंवा केंब्रिज विद्यापीठात जात असतं. एरिकने हा विचित्र निर्णय घेण्यामागे बरीचशी कारणे सांगितली जातात. हा काही त्याचा एकमेव विचित्र निर्णय नाही, असे बरेचसे आहेत. त्याने पोलिसात जाण्यामागे त्याचा शिक्षणासाठी कमी असणारा बौद्धिक स्तर कारणीभूत होता असं कोणी म्हणतं तर याउलट जनतेवर वर्चस्व गाजवण्याची मनिषा धरून तो पोलिसात गेला असं कोणी सांगतं.
त्यावेळी त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती डळमळीत झालेली होती. ती व्यवस्थित करण्यासाठी तातडीने पैसै मिळावेत म्हणून किंवा मग लष्करी कुटुंबातून आल्यामुळे – व दुसर्या महायुद्धात लढू न शकल्याची खंत असल्याने – त्याने हा निर्णय घेतला असं कोणी लिहीतं. याहून वेगळी कितीतरी कारणे सांगितली जातात. कारणे काहीही असली तरी त्याचा परिणाम मात्र एकच – या पाच वर्षांच्या काळात एरिकने सत्तासंघर्ष जवळून पाहिला. सत्तेकडून होणारं शोषण व दिशाभूल पाहिली. मग यातूनच कुठेतरी संवेदनशील मनाचा एरिक ब्लेअर ‘जाॅर्ज ऑर्वेल’ झाला.
पोलिसाची नोकरी सोडल्यानंतर लंडनमध्ये होमगार्डची नोकरी व त्यानंतर बीबीसीत काम करत असताना त्याने प्रसार व प्रचारमाध्यमांतील खाचखळगे पाहिले. हा सुद्धा त्याच्या जडणघडणीतील एक महत्त्वाचा टप्पा.
त्याला विज्ञान, तंत्रज्ञान, जीवशास्त्र आवडत असून तो विज्ञान शिकला नाही. की फ्रेंच, इंग्रजी, जर्मन भाषा विषयांत प्राविण्य असून भाषेत उच्च शिक्षण घेतलं नाही. त्याला सर्वकाही थोडं-थोडं खुणवत राहीलं म्हणून तो भांबावून सर्वाच्याच मागे थोडा-थोडा धावत राहिला! नंतर त्याने पोलीस भरती दिली व त्याच्या वडिलांप्रमाणेच भारतात नोकरी करण्याचा उपलब्ध पर्याय नाकारून बर्मात (आताचा म्यानमार) पाच वर्षे नोकरी केली. त्यानंतर तो पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या शारीरिक चाचणीत अपात्र ठरला म्हणून तो लेखनाकडे वळाला असाही एक प्रवाद आहे.
सोवियत युनियन आणि दोस्तराष्ट्रांच शीतयुद्ध पेटण्यास अजून काही काळ बाकी होता; पण त्या शीतयुद्धाची पूर्वतयारी झालेली होती. १९४०-४५ सालांत हिटलरने कम्युनिझमचा, नाझीवादाचा सर्वोत्तम बिंदू गाठलेला. अशातच ॲनिमल फार्मचा उदय झाला. ‘ऑल ॲनिमल्स आर इक्वल बट सम ॲनिमल्स आर मोर इक्वल दॅन आदर्स!’ (सर्व प्राणी समान आहेत पण काही प्राणी हे त्यांच्याहून समान आहेत.) असलं मती गुंगवणारं ब्रीदवाक्य मिरवणारी ही राजकीय-सामाजिक-प्रतिकात्मक कादंबरी ॲनिमल फार्म.
गेल्या काही वर्षापूर्वी मला या जगातील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट गाजलेली कादंबरी वाचण्याची चाड होती! तेव्हा मला दहातील आठ ठिकाणी ॲनिमल फार्मचं नाव सापडलं म्हणून मी ती वाचली इतकंच. त्यानंतर जेव्हा मी ती सद्यस्थितीत पडताळून पाहिली, खोटं सांगत नाही, माझा मेंदू गरगरला. अजूनही गरगरतो. माझ्यासाठी ॲनिमल फार्म सर्वोत्तम असण्यासाठी ही पावती पुरेशी आहे. काहींच्या मते सोवियत युनियनच्या कम्युनिझमवर ताशेरे उडते म्हणून ॲनिमल फार्म उगाचच डोक्यावर घेतली गेली आहे. मात्र कम्युनिझमचा विरोध हे ॲनिमल फार्म गाजण्याचं एकमेव कारण नाही किंवा ती वास्तवी आहे म्हणूनही गाजत नाही. ती गाजते कारण ती कालजयी आहे. आजही तिचे संदर्भ जगभरात किंबहुना आपल्या भारतातही सापडतात. बेंजामिन, बॉक्सर, क्लाॅव्हर, म्युरीअल, मेंढ्या, कावळा, माॅली, नेपोलियन व त्याची कुत्री, स्क्वीलर, स्नोबल, ओल्ड मेजर, विंकर, जाॅन्स ही फक्त पात्रे नाहीत तर प्रवृत्ती आहेत. आपल्या राजकीय व सामाजिक व्यवस्थेचे ते घटक आहेत. तर इतरांच्या मते ती वास्तव मांडते म्हणून ती भारी ठरते. ॲनिमल फॉर्मने बाकी काही करो न करो; पण ‘राजकीय लेखन’ हा नवीन साहित्यप्रकार मात्र रुजू केला. किंबहुना जॉर्ज ऑर्वेलची संपूर्ण कारकीर्दच राजकीय लेखन हा साहित्यप्रकार रुजवण्यात गेली, हे सर्वात चांगलं झालं! आजही बऱ्याच विद्वान(?) म्हणवणाऱ्या जनतेस राजकीय लेखन हा साहित्य प्रकार आहे हेच मान्य नसतं. आपण त्यांच्या हाती जाॅर्ज ऑर्वेल ठेवायला हवा!
ॲनिमल फार्मचा खरा नायक बाॅक्सर आहे का? निदान मलातरी असं वाटतं नाही. मला बेंजामिन नायक वाटतो. ‘पाश’च्या ‘सबसे खतरनाक’ मधल्या सारखा तो निद्रिस्त आहे किंवा ‘गाढव सगळ्यांत जास्त जगतं, तुम्ही कोणीही गाढवाला मरताना पाहिलेलं नाही’ असा उपरोधिक, हताश आहे मात्र तरीही तो नायक आहे. कारण, आदर्शवादी बाॅक्सरला तो दोस्त मानतो, त्याला स्वतःला जपायला सांगतो हे एक. आणि भविष्यात जर कधी क्रांती झालीच तर तो त्या क्रांतीचं नेतृत्व करण्याचा अनुभव राखतो हे दोन. याउलट आदर्शवादाची परिसिमा गाठलेला बाॅक्सर. प्रगतीसाठी आदर्शवादाला वास्तववादाने बदलावं लागतं म्हणून कदाचित बाॅक्सर नायक नाही. ॲनिमल फार्ममधील अंधानुकरण करणाऱ्या मेंढ्या, जाहिरातजीवी नेपोलियन, चाणाक्ष स्क्विलर, पळून जाणारी माॅली, आळशी मांजर ही पात्रेही विशेष लक्षात राहतात.
जाॅर्ज ऑर्वेल १९४४ साली फक्त ॲनिमल फार्मवर थांबला नाही. त्याने पुढे १९४७ साली ‘१९८४’ नावाची कादंबरी लिहीली. मला अजून ती वाचायची आहे. या दोन त्याच्या सर्वाधिक लोकप्रिय रचना वगळता भरमसाठ राजकीय वृत्तपत्रीय लेख आणि रिपोर्ताज लेखन वगैरे जाॅर्ज ऑर्वेलने केलं. ते सर्वच उल्लेखनीय नसलं तरी वाचनीय जरूर आहे. उगाचच आजही ऑर्वेल अमेरिकन सरकारचा हस्तक किंवा गुप्तचर विभागासाठी काम करत असल्याच्या किंवा आतून तो कट्टर कम्युनिस्ट असल्याच्या वावड्या उठत नाहीत!
ॲनिमल फार्म ही गोष्ट, छोट्या छोट्या धड्यात विभागली गेलेली, जणूकाही बाल साहित्य लिहिलं गेलंय! इंग्रजीची तुलना करावी तर मी म्हणेन मध्यम इंग्रजी. जास्त बोजड नाही जास्त हलकी नाही. मात्र १९४५च्या समकालीन लेखकांच्या भाषेचा विचार करता बाळबोध ठरेल अशी इंग्रजी. असं असूनही या दीड-दोनशे पाणी कादंबरीतून कित्येक मतितार्थ काढले जातात. प्रतीकात्मक पद्धतीने वास्तवाची चुणूक दाखवणारी ही कादंबरी सध्याच्या काळात अधीकच बोचरी ठरते, हे तिचं यश म्हणावं की जनता म्हणून आपलं अपयश समजत नाही. आजही तिसऱ्या वाचनात तिनं अक्षरशः नवी अक्कलदाढ म्हणावं इतपत मला देऊ केलेलं आहे.
राजकीय सत्ता लालसेतून सामान्यजणांचं भरडलं जाणं जर शाब्दिक स्वरूपात जाणून घ्यायचं असेल तर ॲनिमल फार्मला अजूनही पर्याय नाही. कदाचित नवा पर्याय कधी निर्माण देखील होणार नाही.
१९४७ नंतर जाॅर्ज काही काळ पत्रकारितेत विसावला. जसा आयुष्याच्या पूर्वार्धात शैक्षणिक शाखेसाठी कोणत्याच एका ठोस निर्णयावर तो येऊ शकला नव्हता अगदी तसाच उत्तरार्धात ठोस कार्याला वाहता झाला नाही, अपवाद – राजकीय समीक्षात्मक लेखन.
समाजात दोन प्रकारचे लोक आढळतात. पहिले जे ‘सत्ताधाऱ्यांच्या नजरेतून ज्यांच्यावर सत्ता गाजवली जात आहे त्यांच्याकडे पाहतात‘ व दुसरे ते जे ‘ज्यांच्यावर सत्ता गाजवली जाते त्यांच्या नजरेतून सत्ताधाऱ्यांकडे पाहतात’ (कधीकधी ज्यांच्यावर सत्ता गाजवली जात आहे ते सुद्धा सत्ताधाऱ्याच्या नजरेतून पाहू शकतात. किंवा काही सत्ताधारी ज्यांच्यावर सत्ता गाजवली जाते त्यांच्या नजरेतून पाहू शकतात, याचं प्रमाण मात्र कमी. सांगण्याचा मूळ उद्देश असा की) सुरुवातीला ‘सत्ताधाऱ्यांच्या नजरेतून’ पाहत असणारा एरिक ब्लेअर जेव्हा ‘ज्यांच्यावर सत्ता गाजवली जाते त्यांच्या नजरेतून’ पाहू लागला तेव्हा तो जॉर्ज ऑर्वेल झाला! नंतर आयुष्यभर तो या दृष्टिकोनातून जगला. कोणी म्हणतं या दृष्टिकोनामुळेच तो यशापासून दूर पळत राहिला.
तुम्हालाही जर जाॅर्ज ऑर्वेलचा हा दृष्टिकोन व्हायचं असेल तर ॲनिमल फार्म वाचणे निश्चित.
बेंजामिन रात्री सर्व प्राण्यांना उठवतो, नव्या रस्त्यावर घेऊन निघतो. जेव्हा ते सर्व जोन्सच्या घराच्या खिडकीतून पाहतात तेव्हा त्यांना दिसतं की शेजारील सर्व फार्मचे मालक डुकरांसोबत बसून दारू पीत आहेत, जेवण करत आहेत व डुकरं त्या सर्वांचा पाहुणचार व नेतृत्व दोन्ही करत आहेत. इतर प्राण्यांना कमी अन्नात जास्तीत जास्त राबवून घेण्यासाठी माणसं नेपोलियनचं कौतुक करत आहेत. पिलकिंग्टन बोलतो देखील की ‘आमच्या माणसात नीच जात असते तसा तुम्हीही नीच प्राणीवर्ग निर्माण केला आहे!’ यावर सर्वांचा हशा.
एकूणच एरवी कायम शत्रू असणारे मित्र झाले आहेत. त्यात आता इथून पुढे ॲनिमल फार्मवर रविवारी प्रार्थना होणार नाही, कोण्या म्हाताऱ्या डुकराच्या कवटीला पुजलं जाणार नाही, सोबतच ध्वज केवळ एकाच रंगाचा केला जाईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथून पुढे ॲनिमल फार्मला पुन्हा एकदा ‘मॅनर फार्म’ म्हणून ओळखलं जाईल हे नेपोलियन जाहीर करतो!
त्याच वेळी बेंजामिनला कळतं की डुकरातील व माणसातील कोण काय आहे हेच मुळात ओळखू येईनासं झालंय . . .
{fullwidth}