प्रिय सिमरन

[वाचनकाल : ३ मिनिटे] 
प्रिय सिमरन, डीडीएलजे, beloved simran, ddlj

‘जा जी ले अपनी जिंदगी’ला ‘साठा उत्तरेची कहाणी सुफळ संपूर्ण’चा वास लागलेला असतानाही एक चित्रपट वीस-वीस वर्षे पाहिला जातो! वास्तवाची किनार चंदेरी ढगाच्या किनारीसारखी अदृश्य असूनही चित्रपट आजही चालतो! पण ‘गाजण्यात’ गोड ठरलेला चित्रपट ‘वाजण्यात’ किती गोड आहे?

प्रिय सिमरन,
     १९९७ च्या ‘परदेस’मधील ‘आय लव्ह माय इंडिया’ किंवा १९९८ मधील ‘परदेसी बाबू’ या टुकार गोविंदापटातल्या ‘इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया’ अशा गाण्यांतून देशप्रेमाची विक्री सुरू झाली होती. तुझा आणि राजचा ‘डीडीएलजे’ हा त्याच्याही आधीचा, १९९५ चा. खास ‘देशी एनआरआय’ बाजारपेठ नजरेसमोर ठेवून काढलेला, त्यांच्या मनातील भावनांना जोजविणारा. पुरुषप्रधान अधिकारशाही, ‘मिट्टी की खुशबू’त घोळलेलं, मोहरीच्या पिवळ्या-पिवळ्या फुलांतलं देशप्रेम हा हिंदी चित्रपटांच्या आराखड्यातील महत्त्वाचा भाग, त्याबरहुकूम काढलेला तुझा ‘डीडीएलजे’.
     तुझं, राजचं कुटुंब सारे परदेशात स्थायिक झालेले. तुझे बावूजी एवढी वर्षं लंडनमध्ये राहूनही ‘भारतीय’ परंपरा आणि संस्कृती पाळणारे; पण ही संस्कृती कोणती – तर खास पुरुषप्रधान! पुरुषानं बाहेर जाऊन कमवायचं, बाईनं घरकाम सांभाळत मुलांना वाढवायचं. मुलांनी थोरामोठ्यांच्या आज्ञेत, मानमर्यादेत राहायचं. राजचं कुटुंब मात्र बावूजींच्या नेमकं उलटंय बरं. बाप उदारमतवादी. सुपुत्र जरा आगाऊ, किंचित मवाली, बापाबरोबर मस्ती करणारा; पण अंतिमतः ‘भारतीय’च. मनानं चांगला, थोरामोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय लग्नास तयार नसलेला. 
     एकीकडं तो आणि दुसरीकडं मुलींनी कसं मानमर्यादेच्या पडद्यात राहावं हे मानणारे बावूजी तर तिसरीकडे तू, स्वातंत्र्याची स्वप्नं पाहणारी मात्र बावूजींची आज्ञा शिरसावंद्य मानून बोहल्यावर उभी राहण्यास तयार असलेली सिमरन . . . यातून निर्माण झालेली कृतक् संघर्षमय प्रेमकथा म्हणजे हा तुमचा चित्रपट.

मनोजकुमारच्या ‘पूरब और पश्चिम’मधलं संस्कृतीद्वंद्व नव्या रूपात रेखाटणारा. यात तो बटबटीतपणा नाही; पण एक खरं, की यात दिसतो तो एकंदरच भारतीयांच्या मनातील सांस्कृतिक गोंधळ. सुटाबुटातल्या सोवळ्याचा गोंधळ. सारी भौतिकता उपभोगत सतत अधिभौतिकतेचं गुणगान करण्याची एक खोड भारतीय मनाला लागलेली आहे, त्यात या गोंधळाचं बीज आहे. आणि हे केवळ एनआरआयपुरतंच मर्यादित नाही, आज चाळिशीच्या पुढं असलेल्या पिढीतल्या अनेकांना याची बाधा झालेली आहे. ‘दिलवाले’च्या दिग्दर्शकानं, पटकथाकारानं ती किती नेमकी टिपली आहे ग! या पिढीला तो आपला वाटला, याचं कारण त्यात दडलेलं असावं बहुधा. पण तुमच्या या चित्रपटाच्या यशाची मर्यादा तेवढीच आहे. तो लोकप्रिय भलेही झाला; पण लोकांना तो किती झेपला, याबाबत शंकाच आहे. २५ वर्षं उलटून गेली या चित्रपटाला; पण या अवधीत आपलं सांस्कृतिक अवकाश तिथंच थिजलेलं दिसत आहे. 
     मला या चित्रपटातील सर्वात गरीब पात्र कोणतं वाटतं माहितीय? तुझं, सिमरनचं. तू स्वप्नं पाहू शकतेस; पण ती वास्तवात उतरतील असं समजू नकोस, असं सांगणारी तुझी आई आहे. तू जरासं ‘झूम लूं मै’ वगैरे करू शकतेस; पण ते घराबाहेर. अखेर तुला पिंजऱ्यातच परतायचं आहे. तुला वडिलांनी आधीच वचन देऊन नक्की केलेल्या पुरुषाशी लग्न करावं लागणार आहे. वडिलांच्या दृष्टीनं तू त्यांची ‘इज्जत’ आहेस आणि प्रियकरही तुला तुझ्या वडिलांची ‘अमानत’च समजतो. एका क्षणी तू पळून जाऊन लग्न करण्यास तयार आहेस; पण प्रियकर त्याला विरोध करतो. काय तर म्हणे, त्याला त्याच्या ताकदीवर मोठा विश्वास आहे. हे खरंय की, शेवटी तुम्ही दोघं एकत्र येता पण, तेही तू बावूजींची करुणा भाकतेस तेव्हा; बावूजी ‘जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी’ असं परवानगीपत्र देतात. 
     लंडनमध्ये वाढलेल्या तुला एक व्यक्ती म्हणून कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही आणि तुमची ही कथा तुम्हाला यशस्वी प्रेमकथा वाटते? आणि आजही त्यात फारसा बदल झालेला नाहीये अगं. आजही तुझ्यासारख्या कितीतरी सिमरन अशा आहेत ज्यांना कसलंही स्वातंत्र्य नाही. आजही ‘पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने’ हेच अनेक त्यांचं भागधेय आहे. ‘खानदान की इज्जत’ आणि ‘ऑनर किलिंग’ हे सामाजिक वास्तव आहे.

मग तुमच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटानं आम्हाला काय दिलं? त्यानं वा तत्सम अन्य चित्रपटांनी आज चाळिशीपार गेलेल्या पिढीच्या मानसिकतेत काय बदल केला? तसं करण्यात तो अपयशी ठरला असेल – आणि तसा तो ठरलाच आहे – तर मग त्या चित्रपटाचं इतकी वर्षं एवढं कौतुक कशासाठी? तसं मनोरंजन करणारे सतराशे साठ चित्रपट तर आमच्या अवतीभोवती पडलेलेच आहेत.


• संदर्भ :

• वाचत रहा :


आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال