या जीवनाची भग्नता जाणलेला माणूस, मनाला भग्न करणारे स्वर छेडून जातो, ती भग्नता ऐकणाऱ्याच्या मेंदूत भिंगवत ठेवतो, वारंवार या जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो मात्र हे करणाऱ्या त्याच्या आवाजात किंचितही भग्नता नाही! जणू काही घडलेच नाही अशा नावीन्याने तो सर्वकाही बिघडून गेल्याचं ऐकवतो . . . तो – येसुदास . . .
२००५ साली ‘फॉर मी, म्युझिक इज् गॉड!’ असं ट्रिब्युनला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणून गेलेल्या येसुदासच्या आवाजाला ‘भगवानकी आवाज’ म्हटलं जातं याचं कारण काय असावं?
कर्नाटकला कोल्लूरच्या ‘मूकाम्बिका’ मंदिरात दर वाढदिवशी न चुकता येसुदास देवी सरस्वतीची कीर्तनं करतो. तिथं दर जानेवारीला त्याच्या नावे भरणाऱ्या नऊ दिवसीय संगीत महोत्सवात तो कवी ‘त्यागराज’ यांच्या कविता गातो. गेला ३५ वर्षांहूनही अधिक काळ दक्षिणेतल्या सुप्रसिद्ध सूर्य संगीत महोत्सवाची सुरूवात तर त्याच्या हजेरीविना होतच नाही. ईश्वरभक्ती ओठांवर नाही, तर पोटातही असावी लागते. कलावंताच्या सचोटीची धार कशी मोजली जाते? त्याला महत्ता कोण बहाल करतं? तर त्याची जीवननिष्ठा, सत्याची चाड, कर्मव्रती स्वभाव आणि जनमानसाशी जुळलेली नाळ!
२००१ साली ‘अहिंसा’ ह्या अल्बममध्ये संस्कृत, इंग्रजी आणि लॅटिनमध्ये गाताना येसुदास फक्त विश्वशांतीचं ‘न्यू एज्’ संगीत आणून थांबला नाही; तर दक्षिण भारतात मारद हत्याकांडाच्या अस्थिर समयी कवयित्री सुगाथाकुमारी यांच्यासह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यानं लोकांना अहिंसेचे धडे दिले. २००९ मध्ये २६/११ हल्ल्याच्या बातम्यांनी व्यथित होऊन त्यानं जाहीर कार्यक्रमात शहीद हेमंत करकरे यांच्या वीरपत्नी कविता करकरे यांच्या हातात टॉर्च देत दहशतवादविरोधात ‘म्युझिक फॉर पीस’ या देशव्यापी संगीतचळवळीची मुहूर्तमेढ रोवली. ‘हरिवारसनम’ या सुप्रसिद्ध भक्तिगीताच्या हजारो गायकांच्या आवृत्ती उपलब्ध असल्या, तरी येसुदासचीच व्हर्जन केरळच्या साबरीमाला मंदिरात आजतागायत वाजत आली आहे.
येसुदास जुन्या पिढीतल्या पुरूषी मानसिकतेचा बळी मात्र ठरलेला नाही. ‘विमेन शुड नॉट ड्रेस लाईक मेन!’ हे त्याचं मध्यंतरीच्या काळातलं वादग्रस्त वक्तव्य त्यानं लागलीच मागं घेतलं यामागचं कारण म्हणजे त्याचं संवेदनशील मन. उमेदीच्या काळात नाकारल्या गेलेल्या समान दर्जाची किंमत तो जाणून आहे. १९५० च्या दशकात गुरू चेंबई वैद्यनाथ भागवतार यांच्यासह गुरूवायुर मंदिरात त्याला केवळ ख्रिश्चन असल्यानं प्रवेश नाकारला गेला. पुढं अनेक वर्ष अनेक ठिकाणी त्याला याबद्दल प्रश्न विचारले गेले तेव्हाही त्यानं ‘मी झुरळ किंवा तत्सम कुठलातरी किडा असतो तर मला त्या मंदिरात प्रवेश मिळाला असता!’ इतकेच विषण्ण उद्गार काढले होते. आजघडीला त्याची कित्येक भक्तिगीतं त्याच गुरूवायुर मंदिरात दुमदुमत असली तरीही अजूनही त्याला त्या मंदिराच्या पायरीनं स्वीकारलेलं नाही हे धगधगीत वास्तव तो जगत आलाय.
अपमानाचे इतके अंगार पेललेल्या माणसाच्या गळ्यात गोडवा कुठून येत असेल?
मुळात त्याच्या असंख्य गीतांमधून प्रेम ही एक ‘उपासना’ आहे हाच भाव वारंवार प्रतीत होतो. तंबोरा, घट, वीणा, सतार, पियानो आणि खासकरून बासरीच्या भाविक पार्श्वभूमीवर हा सुंदर ‘शरणभाव’ दरवळत राहतो.
बोले तो बासुरी कहीं बजती सुनाई दे,
ऐसा बदन की कृष्णका मंदिर दिखाई दे . . .
असं प्रेयसीचं रेखीव रूपडं चितारतानाही किती पावित्र्य भरलं आहे शब्द-सुरांत!
अब चरागोंका कोई काम नहीं,
तेरे नैनोंसे रोशनीसी है,
चंद्रमा निकले अब या ना निकले,
तेरे चेहरेसे चांदनीसी है . . .
हर जनममें रहेगा साथ तेरा,
ए मेरी सीता, मेरे सावित्री!
नाम तेरा मैं मंत्र कर लूंगा-
गायत्री, गायत्रीही गायत्री!
तेरे बाहोंमें जो यह दम निकले,
मौतभी मेरी जिंदगीसी है . . .
प्रेयसीच्या मादक रूपाचं वर्णन करतानाही येसुदासकडून उच्च सौंदर्याभिरूचीशी प्रतारणा घडताना दिसत नाही. हेमलता किंवा रूना किंवा हैमन्ती शुक्ला या त्याच्या नेहमीच्या पार्श्वगायिकाही त्याच्या सुरांना साथ देत राहिल्या हेही तितकंच महत्त्वाचं. कारण आता या उपरोक्त चरणांचं लाजरं प्रत्युत्तर पाहा,
रात सपनेमें कुछ अजब देखा,
शर्म आती है यह बताते हुए . . .
इक सीपीमें छुप गया मोती,
जाने कब ओसमें नहाते हुए . . .
हा ‘समर्पणभाव’ येसुदासच्या सर्व युगुलगीतांच्या केंद्रस्थानी आढळतो. ‘तुम इतनी सुंदर हो, सारी दुनिया दीवानी होगी’ या पंक्तीवर ‘यह शुरू हुई तुमसे, तुम्हीपे खत्म कहानी होगी’ असं उत्तर कितीही औपचारिक किंवा घडीव वाटलं तरी ते आजकालच्या फास्ट जेटयुगात ऐकायला लाभणं किती दुर्मिळ आहे!
‘माता सरस्वती शारदा’ यासारखं देवीस्तवन असो की, ‘नीरभरणका करके बहाना’ यासारखं मधुराभक्तिगीत, इनकी आवाज जैसा सोज-मिठासका संगम किसी औरकी आवाजमें नहीं मिलता . . . म्हणूनच की काय, नाजूक स्त्रैण भावना व्यक्त करणारी काही नितांतसुंदर पार्श्वगीतंही येसुदासच्याच स्वरांत ओवली गेली आहेत
चांद अकेला जाए सखी री,
काहे अकेला जाए सखी री?
वह बैरागी, वह मनभावन, कब आएगा मोरे आंगन,
इतना तो बतलाए री!
अंगअंगमें कोई दहके, मनमें बेला-चमेली महके,
यह ऋत क्या कहलाए री?
शास्त्रीय, फिल्मी नि भक्तिसंगीत या तिन्ही प्रतलांवर पाण्यातल्या मासोळीसारख्या सहजतेनं वावरणाऱ्या येसुदासनं संगीत हाच ईश्वर मानून ‘स्टिरिओ इफेक्ट’मध्ये उत्तमोत्तम दर्जेदार मल्याळम गाणी निर्माण करण्यासाठी १९७०ला तरंगिणी संगीत कंपनीची स्थापना केली. पुढे तिचे हक्क अमेरिकन कंपनीनं हातोहात विकत घेतले. त्याच वर्षी केरळ संगीत नाटक अकादमीचं अध्यक्षपदी सर्वात कमी वयात विराजमान होण्याचा बहुमान प्राप्त झाला, तो त्याच्या या अढळ संगीतनिष्ठेमुळेच.
येसुदासच्या उत्फुल्ल आवाजात एक मनोरम चित्रदर्शीत्व आहे. आपसूक ओघवतेपण आहे. त्याची पार्श्वगीतं पुरेपूर जगलेल्या नायकांनाही याचं श्रेय जात असलं तरी येसुदासच्या आवाजाची विराट ‘रेंज’ यातून लक्षात येते.
बंजारा मैं नहीं मगर,
मुझे हर नई डगर,
बुलाये अपनी ओर . . . और मै . . .
चलताही जाऊं, बस चलताही जाऊं!
हे गाताना रस्त्याच्या मधोमध हातातल्या सामानाची बॅग फिरवत आपल्याच धुंदीत चालणारा हसऱ्या नजरेचा दाट कुरळ्या केसांचा उंचापुरा मिथुन चक्रवर्ती येसुदासच्या डोळ्यांसमोर असेल का?
जब दीप जले आना, जब श्याम ढले आना,
संकेत मीलनका भूल न जाना, मेरा प्यार न बिसराना . . .
मैं पलकन डगर पुहारूंगा, तेरी राह निहारूंगा,
मेरी प्रीतका काजल तुम अपने नैनोंमें मले आना . . .
हे हळवे मंद बोल ऐकता ऐकता झरीना वहाबच्या डोळ्यांत डोळे घालून म्हणताना बुजणारा ‘चितचोर’मधला अमोल पालेकर साक्षात नजरेसमोर अवतरतो. रशियन, अरबी, लॅटिन, इंग्रजी, मराठीसह १२ भाषांमध्ये ८० हजारांहून जास्त गाणी गाणारा येसुदास हा अरेबियन कॉन्सर्टमध्ये अरेबियन भाषेत कर्नाटकी संगीत गातो हे कालपरवा वाचलं, तेव्हा मनातल्या मनात हात आदरानं जोडले गेले. गुगल करून येसुदासचा फोटो शोधला तर दिसला तो एक हसरा संन्यस्त चेहरा. डोळ्यांत काठोकाठ भरलेलं समाधान. एकदम वाटून गेलं की, खऱ्या अर्थानं भारतीय संगीत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा गंधर्व हा, निर्मळ मनाचा मायावी गंधर्व . . .
• संदर्भ :• वाचत रहा :