उर्मिला मातोंडकरला चाहत्याचं पत्र

[वाचनकाल : १५ मिनिटे] 
उर्मिला मातोंडकर, urmila matondkar

‘रंगीला’ने देशातल्या घरोघरी पोहोचली उर्मिला मातोंडकर. बॉलिवूड गाजवणारी मराठी मुलगी. पुण्याची उर्मिला. उर्मिलाच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत.तिने आजवर बॉलिवूडला बरेच सुपरहिट चित्रपट दिले. ९०च्या दशकामधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये उर्मिलाचं नाव आवर्जून घेतलं जातं. नुकताच तिने ४९वा वाढदिवस साजरी केला. केवळ अभिनेत्री म्हणून नव्हे तर पुरोगामी विचार धीटपणे मांडणाऱ्या, लोकांत येऊन ते स्पष्टपणे मांडण्याचे धाडस असलेली बुद्धिवादी उर्मिलाला वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्याने लिहीलेले पत्र . ‌. .

माझ्या लाडक्या उर्मिलेस,   
                   ‘ऑफिसच्या गडबडीत ४ फेब्रुवारीला तुझा वाढदिवस असतो हे विसरलोच!’ असं ठोकून द्यायला तू म्हणजे बायको नाहीस! पण म्हणून अगदी बायको आसपास नाही हे नीट हेरून हे पत्र खरडायचीही गरज नाही. कारण ती नि मी मुळात भेटलो तेच तुझ्याच निमित्तानं. विद्यापीठाच्या आवाराबाहेर आमचं प्रेम चढत्या भाजणीनं चढत असता ‘हे पाहा, तुमचं जे काही असेल ते पुढं जाऊन कन्टिन्यू करा!’ अशी एका खत्रुड आजोबांची खरडपट्टी पडत्या फळाची आज्ञा मानून तुझ्या रंगीलाच्या कॉर्नर सीटवर जाऊन बसलो! कदाचित धकाधकीच्या आयुष्यात सकाळी काय नाश्ता केला तेही ध्यानातून निसटणाऱ्या मध्यमवर्गातला, तुझा खूप सर्वसामान्य चाहता आहे मी . . . अन् आमची हीसुद्धा बरं, पण तुझ्यावर दोघेही मनापासून भरभरून प्रेम करत आलोय हे अगदी पक्कं समजून अस. फुगू नकोस उगाच. अशा वेळी भयंकर मोहक दिसतेस.
     वाढदिवसाच्या निमित्ताने तुझे जुने इंटर्व्ह्यूज् पाहत बसलो आणि कितीतरी दिवसांनी खूप प्रसन्न वाटलं. सिनेसृष्टी कृष्णधवल असल्यापासून तू काम करत आलीस हे इतके दिवस मला माहीतच नव्हतं बघ. मासूम, कलियुग नि भावना यांसारख्या चित्रपटांत बालकलाकार म्हणून तुझी एक स्वतंत्र छबी निर्माण झाली. श्याम बेनेगल यांच्या ‘कलियुग’मध्ये तुला खोडकर चेहऱ्याचा बॉयकटधारी ‘मुलगा’ बनवलं गेलं होतं, तर शेखर कपूरच्या ‘मासूम’मध्ये नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमीच्या समजूतदार मुलीची व्यक्तिरेखा साकारत तू ‘लकडीकी काठी, काठीपे घोडा, घोडेकी दुमपे जो मारा हाथौडा, दौडा दौडा दौडा, घोडा दुम दबाके दौडा!’ असं गात रसिकांच्या मनात जाऊन बसली होतीस. ‘कथासागर’ आणि ‘जिंदगी’ अशा टीव्ही मालिकांमध्ये काम करून तू यशाच्या एकेक पायऱ्या चढलीस, मुंबईच्या लहानशा चाळीतून मेहनतीनं वर येत अंधेरीत बस्तान बसवलंस हे खूप कमी जणांना माहीत असेल.
     आणि . . . तुझ्या घरी राजश्री प्रॉडक्शन्सकडून फोन खणखणला!
     अंकुश, तेजाब नि प्रतिघात सारखे ब्लॉकबस्टर्स देणाऱ्या एन्. चंद्रासारख्या दिग्दर्शकासमोर तू नवखेपणानं भांबावून जाणं साहजिक होतं. ‘चुपचाप तू क्यों खडी है?’ हे तुझं पहिलंवहिलं गाणं. इंट्रोडक्शनवाल्या सलामीच्याच दृश्यामध्ये ‘बडे बाप की बिगडी हुई बेटी’ बनून तुला हिरोवर गुर्मीत चिडायचं-डाफरायचं होतं आणि ते पडद्यावर कसं दिसेल म्हणून तू कमालीची नर्व्हस झाली होतीस! चंद्रासाहब जणू तुझा चेहरा वाचून सावकाश डुलत पुढं आले नि दाक्षिणात्य हेलात समजावत राहिले, ‘हिरोईन जब घुस्सा करता, तो लोगोंको ओ क्युट लगना मंगता!’
     आणि मग तुझ्या रागरूसवाही पडद्यावर सुंदर भासू लागला.
     ‘इंटेन्सिटी’ हे महत्त्वाचं अभिनयांग तू त्यांच्याकडून शिकलीस. त्याचबरोबर सगळ्या युनिटची मदत मिळाली तरीसुद्धा कॅमेरासमोर उभा राहिल्याक्षणी अभिनय ही पूर्णतः अभिनेत्याची जबाबदारी बनते याचंही व्यवधान तुला आलं.
     नवी भाषा शिकताना जितकं व्याकरण महत्त्वाचं, तितकंच करिअरच्या सुरुवातीला मिळणारे दिग्दर्शक, कथानकं आणि पात्रंही हे तुला इतरांहून खूप लवकर समजलं.
     ‘मैं काफी अच्छी स्टुडन्ट रह चुकी हूं यह मैं दावे के साथ कह सकती हूं . . .’ असं तू लाजतबुजत काहीशा विनयानं चंदेरी पडद्यावर मुलाखत देताना म्हणालीस तेव्हा लास्ट इयर बीए फिलॉसॉफीच्या फर्स्ट इयरला होतीस. कमल हसनसारख्या उत्तुंग अभिनेत्यासोबत ‘चाणक्यन्’ ह्या मल्याळम सिनेमासह, नुकतंच हिंदी सिनेसृष्टीत नरसिंहासारखा बिग बजेट चित्रपट करूनही, तुझे पाय किती जमिनीवर होते याचं मूर्तिमंत उदाहरण होतं ते. हा चित्रपट गाजल्यावर ‘कालची बालकलाकार ते उद्याची सुपरस्टार’ ह्या प्रवासात काय बदललं असं विचारल्यावर तू हसून म्हटलंस, लहानपणी अंकल – आंटी म्हणायचे त्यांना आता नावापुढं ‘जी’ संबोधून बोलावं लागतं इतकंच बदललंय!

त्या जर्द पिवळ्या पोलोनेकमध्ये कशी ऊन पिऊन प्रकाशणाऱ्या बहाव्याच्या फुलांप्रमाणे उमलून येत असल्यासारखी भासत होतीस तू! हातातल्या प्रश्नांची जंत्री भिरकावून तुला फक्त ब-घ-त राहावं असं त्या मुलाखतकाराला वाटत असणार! बोलता बोलता तुला मानसशास्त्राच्या डिग्रीत रस होता असं तू खट्टू होत म्हणालीस, तेव्हा कधी महाविद्यालयाच्या भोज्यालाही न शिवलेल्या नटव्या नट्यांच्या स्पर्धेत तू किती निराळी आहेस हे उमजलं आणि पुढं तुझी हीच निराळी चाल वारंवार अधोरेखित होत राहिली.
     ‘नरसिंहा’च्या ऑडिशनदरम्यान तुला विचारलं गेलं, ‘नाचना आता है? सीखी हो कहीं?’
     तू अवघडून गेलीस. पण धीटपणे उत्तरलीस, ‘सीखी तो नहीं हूं सर, लेकिन अच्छा कर लूंगी!’
     जिथं साडीत अवघडून चालूही शकत नव्हतीस, तिथं तुला सेन्शुअस डान्स करायचा होता. रीतसर नृत्य प्रशिक्षण नाही. दुसऱ्याच क्षणी नजरेचा टप्पा पोहोचू शकेल तिथवर पसरलेल्या ‘नरसिंहा’च्या अवाढव्य सेटवर डझनभर अवजड दागिने लादलेल्या अवस्थेत साक्षात सरोज खान नावाच्या फटकळ जमदग्नीसमोर तू उभी होतीस!
     ही आठवण सांगताना तू पटकन् बोलून गेलीस, ‘ना तो कोई आर्टिस्ट अपना टेन्शन कॅमेरा के सामने कॅरी कर सकता है और न करना चाहिए!’
     हे सगळं तुला का जमलं माहितीये? तुझी अपार जिद्द, अथक मेहनत तर वादातीतच, त्याचबरोबर सर्वसामान्य रसिकाच्या मतांचा आदरही! १९७४ ला एका चाळीत जन्म घेतलेल्या तुझ्या डोक्यात कधीही यशाची हवा गेली नाही. तुला आवडायचं लपूनछपून थिएटरमध्ये बसून स्वतःची गाण्यांवर थिरकणारी अलोट गर्दी बघायला! ‘चमत्कार’ सिनेमामध्ये तुझ्या ‘बिच्छू’ गाण्याच्या एकेक ओळीसरशी लोक ताल धरतात हे पाहून तू सुखावून जायचीस. पण ‘नरसिंहा-श्रीमान आशिक’च्या भरारीनंतरही आजतागायत तू हे व्रतस्थपणे करत आलीस.
     ‘युनिटच्या ५० जणांसमोर जे समजत नाही ते थिएटरमध्ये शिट्या-टोप्या उडवणाऱ्या ५०० जणांच्या मॉबमध्ये बसून समजतं’ असं तू नेहमी म्हणायचीस. लोक कोणत्या अदांवर घायाळ होतात, कुठं हरखून ‘वन्स मोअर!’ ओरडतात आणि कुठल्या स्टेप्सवर पडद्यावर बेधुंद नाचणाऱ्या तुझ्या प्रतिमेवर पैशांची खैरात करतात आणि दरेक गाण्यावर तो नाण्यांचा खच कसा पायांपाशी पडत राहतो ह्या सगळ्याची मूक साक्षीदार राहिलीस तू. खरंच, किती मोहरून जात असशील ना तेव्हा . . .
     ‘द्रोही’च्या ट्रायल शोला दस्तुरखुद्द श्रीदेवी आली होती. ‘हू इझ् धिस् गर्ल? शीझ् सो गुड इन् धिस् साँग!’
     असं म्हणत तुला आग्रहानं बोलवून घेत एरवी कधीही कुणाशी फारसं न बोलणाऱ्या श्रीदेवीसारख्या दिग्गज नृत्यवतीनं तुझं भरभरून कौतुक केलं आणि दोन मिनिटं तू फक्त बघत राहिलीस!
     पुढे अजय देवगणसह ‘कानून’ आणि ‘बेदर्दी’मध्ये तुझी नृत्यं चांगलीच गाजली आणि रंगीलानं तर नवा इतिहासच रचला!
‘रंगीला रे’, ‘मंगता है क्या’, ‘क्या करे क्या न करे’ अशा तुझ्या एकेक गाण्यांत कलेकलेने स्पष्ट होत जाणाऱ्या चंद्रासारखी तुझी हरेक नवी बाजू प्रकाशात येत गेली.
     खरं पाहता आमिर खान आणि जॅकी श्रॉफ अशा दोन अतिरथींमध्ये कोणत्याही नव्या हिरोईनची दोन ओंडक्यांच्या पाचरीत सापडलेल्या माकडाच्या शेपटासारखी अवस्था व्हायची, पण तिकीटबारीवर लोकांना अक्षरशः खेचून आणलं ते तुझ्याच लार्जर दॅन लाईफ व्यक्तिमत्त्वानं.
     एकाच वेळी सेक्स सिम्बॉल आणि गर्ल नेक्स्ट डोअर म्हणून मासेस् आणि क्लासेस् दोन्ही रसिकवर्गात पाण्यातल्या मासळीच्या सहजतेनं वावरलीस नि मनोमनी फिट्ट बसलीस तू.
     सागरकिनारी धावत जायच्या सीनमध्ये ऐन वेळी हिरोईनचा ड्रेस मनासारखा शिवून तयार नाही म्हणून जॅकीनं आपला ‘लार्ज साईझ्ड स्लीव्हलेस शर्ट घालून पळ’ असं सांगितलं त्याबद्दल त्याचे आभार मानावे तितके कमीच. अर्थात्, तू म्हणजे कातीव मांड्या नि कोरीव वक्ष नव्हेत. ‘हाय रामा’ सारखी अप्रतिम प्रणयबंदिश साकारताना जुन्या भग्न वास्तूत तापल्या उन्हात सलग कॅमेऱ्यासमोर कसा काय अभिनय केला असशील तू . . .
     ‘नॅशनल जिओग्राफिक’ मधल्या सावजाचा पाठलाग होतो, तसा प्रणयाचा थरारक उत्सव अपेक्षित होता राम गोपाल वर्माला. ते पडद्यावर सही सही उतरवलंस आणि ‘सेन्शुअल येट् एस्थेटिक’ ही नवी परिभाषा रचलीस तू. ‘छम्मा छम्मा बाजे रे’, ‘कंबख्त इश्क’, ‘शब्बा शब्बा’, ‘आभी जाहिए’ अशा गाण्यांवर कधी आशाच्या तर कधी सुनिधीच्या आवाजात, कधी गावरान तर कधी मॉड अंदाजात रसिकांना मंत्रमुग्ध केलंस.
     ‘श्रीमान आशिक तो मेरे टाईप का चुलबुला रोल है!’ असं म्हणता म्हणता ‘द्रोही’मध्ये विनामेकअप साध्यासुध्या मुलीचा रोलही तितक्याच लीलया निभावताना उत्तर ध्रुवावरून दक्षिण ध्रुवाकडे आणि दिल्लीकडून कन्याकुमारीकडे धावपळ करत असल्याचा फील येतो हे तू खिदळत कबूलही केलंस. भराभर संपणारं शेड्युल, नवोदित मुलींना झरझर चालून येणाऱ्या संधी, पटापट बनणाऱ्या ओळखी, पुढारलेल्या सिनेतंत्रांचा वापर यांमुळे दाक्षिणात्य सिनेजगतात ‘अँथम’, ‘गायम’, ‘छोटा चेतन’, ‘दौड’ असे सिनेमे तू आवर्जून करत राहिलीस आणि त्यातल्या अनेकांचे हिंदी रिमेक्सही गाजवलेस.

अगर एक्सपोज् करनेवालीही फिल्म चलती, तो बहुत ऐसी फिल्में थी जो चलनी चाहिए थी!

हा ठोक युक्तिवाद मांडतानाही तू सवंग लोकप्रियतेसाठी अंगप्रदर्शन अनावश्यक असल्याचं मत व्यक्त केलं होतंस. तुला तुझ्या शारीरतेची आणि निसर्गदत्त सौंदर्याची शरम वाटली नाही किंवा तिचा काच कवटाळून तू बुरसटलेल्या मानसिकतेचं पाईकत्व स्वीकारलं नाहीस. इमेजबदलाच्या बाबतीतही ‘कॅरेक्टर्स कम फर्स्ट, इमेजेस फॉलो!’ हे तुझं ठाम वक्तव्य होतं.
     ‘मैं चाहती हूं कि लोग मुझे ज्यादा से ज्यादा पसंद करे! पहिली पिक्चरमें थोडा, फिर और थोडा, फिर और थोडा, फिर पांचवी पिक्चरमें बोलें की अरे . . . यह तो अच्छा काम करने लगी है! कुछ ऐसा हो’ तू डोळे फिरवत मानेला झटके देत किणकिणलीस!
     तुझ्यासारख्या, तुझ्याहून कमनीय शरीरांच्या नट्या आल्या नि विरल्या, पण तू म्हणजे निव्वळ चटका लावून जाणारी फिगर नव्हतीस काही. द्यायचीच झाली तर तुला कलासक्त हातांनी युगानुयुगे घडवलेल्या अजिंठ्याच्या मूर्तीची उपमा देता येईल. तू प्रस्थापित ‘लीडिंग लेडीज’ना आपल्या नृत्याच्या जोरावर नेहमीच ‘अ रन फॉर मनी’ देत राहिलीस.
     ‘आय बिलीव्ह इन् गुड फिल्म्स, व्हेदर कमर्शिअल ऑर नॉनकमर्शिअल!’ म्हणत ‘मैंने गांधीको नहीं मारा’, ‘कौन’, ‘सत्या’ अशी एकाहून एक सरस कामगिरी करत गेलीस.
     ‘क्या सपना था मालूम? सपनेमें मैं गा रही थी, नाच रही थी और मेरे साथ साथ सारी दुनिया झूम रही थी!’ म्हणत दोन वेण्या उडवून डावी तर्जनी गोल घुमवत टपोऱ्या नाचऱ्या डोळ्यांनी जागतेपणी स्वप्न पाहणारी रंगीलातली ‘मिली’ झालीस, तशी फाळणीतलं तुटलेपण झेलत घर, नातलग, धर्म मागं सोडून आपल्या  अपहरणकर्त्याला पती म्हणून स्वीकारणारी निष्पाप ‘पूरो’ म्हणूनही तितकीच सच्ची वाटलीस. अभिनयाचं नाणं सगळीकडेच खणखणीत वाजतं हे सिध्द करून दाखवलंस.
     उर्मिले, इतकं करूनही तुला ‘रंगीला गर्ल’ म्हणूनच ओळखलं जावं याचा तुला कधीकधी विषाद वाटत असणार, नाही? पण मला ‘रंगीला’तली तू आवडतेस ती रंगीला ही खऱ्या अर्थानं तुझ्या प्रवासाची कथा वाटते म्हणून.
     ‘मुन्ना, ये क्या तमाशा लगा रखा है?’ म्हणत भांडणात हार न मानणारी, अपऱ्या पांढऱ्या स्कर्टची पर्वा न करता धावत मुन्नाला गाठून खुशखबर सांगायला धावणारी, स्टुडिओ स्क्रीनटेस्टमध्ये टाळ्यांच्या कडकडाटात न्हाऊन निघणारी मराठमोळी मिली म्हणजे अनेकार्थानं तूच नव्हतीस का? लाल कपड्यांत व्हायोलिनच्या तालावर समुद्रकिनारी बेभान होऊन नाचलीस तेव्हा रक्तवस्त्रांकित वीज वाटलीस पडद्यावर. काळा डगला नि काळा गॉगल घालून तुला थक्क होऊन निरखणाऱ्या जॅकीला फारसा अभिनय करावा लागला नसणार. त्या सीनमध्ये तू नाचता नाचता सावरून निघू लागलीस तसं त्याच्या तोंडून एकच प्रश्न निघाला, ‘कौन हो तुम?’ याला इंग्रजीत एक सुंदर शब्द आहे – ‘थंडरस्ट्रक’!

तुझे नवेजुने पिक्चर्स शोधशोधून बघत राहतो आजही अवचित तुझ्या आठवणीत. ‘प्यार तूने क्या किया’ मध्ये एकतर्फी प्रेमातल्या भ्रमनिरासाची वीज अंगावर बधीर होत जाणाऱ्या रियाची मनोवस्था काय जबरदस्त रेखाटली आहेस तू . . . गाडी चालवत असताना कलेकलेन विदीर्ण होत जाणारा तुझा तो चेहरा मला विसरता येणार नाही. ‘भूत’ सिनेमात कुणीतरी गळा आवळत असतानाच्या भयंकर जाणिवेत शेजारी गाढ झोपेत असलेल्या नवऱ्याला उठवायला आवाजही फुटत नसल्याचा अभिनय करताना जणू स्वातीच्या भूमिकेत खोलवर शिरलीस तू. ‘कौन’ सिनेमात पूर्ण वेळ घाबरलेला ससा बनून वावरणारी नि हातात सुरा घेऊन डोळे गरागरा फिरवत नाचणारी दोन्ही तूच आहेस यावर अनेक महिने माझा विश्वास बसत नव्हता!
     हिरो १०० गुंडांना लाथा हाणणार आणि तोवर हिरोईन पापण्यांची पिटपिट करत अँगल बदलबदलके ‘बचाव, बचाव!’ म्हणणार या तद्दन जुनाट परंपरेला छेद देत पिळदार बाहूंच्या संजय दत्तला ‘तुम नहीं आते तबभी मैं संभाल लेती, खुदको हिरो मत समझो!’ असं बोलून टाईट ब्लू जीन्समध्ये नागमोडी चालीनं आपल्याच नादात चालणारी दयाशंकर ‘दौड’ सिनेमामध्ये तूच उभी करू जाणे!
     ‘जुदाई’मधला अनिल कपूर असो  की ‘जानम समझा करो’मधला शम्मी कपूर, ‘सत्या’मधले मनोज वाजपेयी नि जे. डी. चक्रवर्ती असोत की ‘दौड’मधले नीरज व्होरा, आशिष विद्यार्थी अन् सौरभ शुक्ला, तुझा अभिनय ज्येष्ठ अगर कनिष्ठ पुरूष अभिनेत्यांपुढं कधीही झाकोळला नाही. ‘मस्त’ या सिनेमात छोट्यातला छोटा डान्स सिक्वेन्सही तू तितक्याच बारकाईनं समरसून केल्याचं कुणाच्याही सहज लक्षात येईल. मानवी भावभावनांची गुंतागुंत पडद्यावर एकेक व्यक्तिरेखेला न्याय देत तू अक्षरशः जगलीस.
     प्रसंग कास्टिंग काऊचपासून बचावण्याचे असोत की नेपोटिझमला तोंड देण्याचे, तू कशाचाच बाऊ न करता डेव्हिड धवनपासून चंद्रप्रकाश व्दिवेदींपर्यंत कष्टत राहिलीस. तुला अनुल्लेखानं मारण्याचे प्रयत्न काही कमी नव्हते. स्वयंघोषित माध्यमसम्राटांनी तुझ्या ठळक, विस्तृत मुलाखती कधी घेतल्याच नाहीत. ‘हिरोला’ गोंजारणाऱ्या सिनेमात ६ गाणी आणि इमोशनल सीन वाट्याला येणारी हिरोईन नव्हतीस तू. मग बॉलिवूड बिगीजकडून तुला मोठमोठ्या संधी लाभल्याच नाहीत.
     ‘भूत’ सिनेमाकरता तुला फिल्मफेअर पुरस्कार लाभला, तेव्हा स्टेजवर आत्मविश्वासाने चढून तू मिष्किल आवाजात म्हटलंस, ‘हिंदी सिनेसृष्टीत जे जे मुळीच करायचं नसतं, ते ते सगळं या सिनेमात केल्याबद्दल मला हा अवॉर्ड मिळतोय बरं!’ भारतीय सिनेप्रेक्षकाचं सरासरी वय ७-८ वर्षांच्या मुलाइतकं असतं असं मानून चालणाऱ्या सिनेजगताला हादरे देणं सुरूच ठेवलंस आणि ‘थिंकिंग ॲक्ट्रेस’ म्हणून आपला लौकिक कमावलास.
     मला तुझ्याबाबत आवडणारी खास गोष्ट म्हणजे तुझ्या चित्रपटांचे शेवट तुझ्या अभिनयानं निराळ्याच उंचीवर नेऊन ठेवायचीस तू. एकाहून एक खास शेवट असायचे ते, मनात घर करून जाणारे. ‘प्यार तुने क्या किया’च्या शेवटी जयनं तुला वाढदिवशी भेट दिलेलं स्पंज भरलेल्या वाघिणीचं खेळणं घेऊन तू असायलममध्ये विमनस्क अवस्थेत खेळतानाचा सीनच बघ. वडिलांनी तुझ्या वाढदिवसानिमित्त विनवून जयला समोर आणताच तू जो अभिनय केलास तो पाहून फत्तराचं काळीज चिरून निघेल!
     ‘एक हसीना थी’ सिनेमा पाहिला तेव्हा घरी एकटाच जेवत होतो. सिनेमाखाली टीआरपी वाढवण्यासाठी चॅनेलवाल्यांचा एका ओळीचा प्रश्न सतत फ्लॅश होत होता, ‘आपको क्या लगता है, आखिरकार कर लेगी उर्मिला सैफके किरदारसे शादी?’ प्रश्न वाचता वाचता डोक्याला मुंग्या आल्या. आपल्याला विनाकारण शब्दशः बेचिराख करणाऱ्या तरूणाला केवळ तो ‘विसर आता सगळं, लग्न करूत चल!’ म्हणाला म्हणून एखाद्या सालस, शालीन, उमद्या मनाच्या तरूणीनं माफ करणं योग्य आहे की अयोग्य? याचं उत्तर मिनिटामिनिटाला खिळवून ठेवणारा हा चित्रपट देतो आणि मग ‘याद है तुम्हें . . . मुझे चुहोंसे डर लगता था . . .?’ हा प्रश्न विचारणारे थंड निळे डोळे पाहून अजिबात कापरं भरत नाही.
     ‘कौन’ मध्ये टेरेसच्या कट्ट्यावर पाय हलवत स्वतःशीच गात राहणारी तू निगुतीनं एकेक रक्ताचे डाग पुसून घर लख्ख करतेस, दरवाजावरची बेल वाजते तशी दचकतेस आणि ‘मल्होत्रा साहब घरपे है?’ या प्रश्नावर पडद्याकडं वळून जे काही हसतेस ते पाहून ब्रह्मांड आठवलं होतं मला. हसू नकोस, पण तुझ्या पुढच्या कित्येक सिनेमांमध्ये तू झाडांमागून नाचता नाचता अचानक हिंस्त्रपणे हिरोच्या पाठीत खंजीर खुपसशील या भीतीनं माझा जीव गोळा व्हायचा ग!
     ‘सत्या’ सिनेमामधली एकमेव श्वेत व्यक्तिरेखा म्हणजे तू. ‘तू मेरे साथभी है’, ‘गिला गिला पानी’ आणि ‘बादलोंसे काटकाटके’ अशा आशयघन गाण्यांत प्राण ओतलास ते तुझ्या लाजऱ्याबुजऱ्या अदेनं. ‘सपनेमें मिलती है’ या गाण्याच्या शेवटी क्षणाक्षणाला ज्या मीलनोत्सुक पण घाबरल्या बावरल्या नजरेनं तू कॅमेऱ्याकडं पाहतेस ते पाहायला मी दर वर्षी ते गाणं पाहतो! भाजीबाजारात जाताना वापरायच्या साध्या स्वस्त कॉटन साड्या, कसलाही मेकअप नाही, मोजके अलंकार . . . अंधारात हातात धरलेल्या मेणबत्तीच्या उजेडात ‘वो मैं सामनेवाली खोलीमें रहती हूं . . .’ म्हणत बावरून जाणारी तू सालस रंगात न्हाऊन सौंदर्यानं अक्षरशः हिऱ्यासारखी लकाकत होतीस त्या सिनेमात. त्यातल्या अखेरच्या सीनमध्ये कॅमेऱ्यानं टिपलाय तो भेदरून विस्फारणाऱ्या डोळ्यांनी दुःखानं उरी फुटणारा, भयातिरेकानं मुसमुसणारा तुझा अश्राप चेहरा. त्या सिनेमातला ती सर्वात मोठी हिंसा आहे, एका कोवळ्या निरागस मनाची हत्या.
     उर्मिला, माझ्या नजरेत तुझ्या व्यक्तिमत्त्वाचा रंग हिरवाकंच आहे . . . लकाकत्या पाचूसारखा. क्षणार्धात कात टाकून नवं रूप धारण करणारी, तेजस्वी पाणीदार डोळ्यांची नि ताठ स्वाभिमानी फण्याची एक नागीण आहेस तू. सौंदर्याच्या उभ्या-आडव्या-तिरक्या-कोणत्याही व्याख्येनुसार तू सुंदरच. पण मला तुझी खरीखुरी प्रभा केव्हा जाणवली सांगू?
     ‘कंगनाकी मैं फॅन रही हूंl वह बेहतरीन अदाकारा है,
इसमें कोई दो राय नहीं है।’ कंगनाच्या ऑफिसची मोडतोड, टायमिंग आणि पद्धत यांच्यावर टीकेची झोड उठवतानाच ‘आप सेलेब्रिटी होl लोग आपको इन्स्पिरेशन मानते हैंl अगर आपकी कोई टिप्पणी या विरोध है, तो उसे एक सलीकेसे सामाने रखेl’ या शब्दांत संयमित स्वरात बोललीस तेव्हा! ‘क्वीन’च्या रिलीजनंतर एका फॅशन शोमध्ये भेटून जिचं मनभरून कौतुक केलंस, त्या कंगनानं सवंग पातळीवर उतरून तुझ्याबद्दल उच्चारलेल्या निंदेचं दुखावलेपण त्यात अजिबात नव्हतं.
     मीडियाला घटता जीडीपी, बेरोजगारी, स्थानिक कामगारप्रश्न, कोव्हिडची साथ अशा प्रश्नांवर चर्चेचं आवाहन करतानाच तू कंगनावर तुटून पडणाऱ्या टीकाकारांनाही भाषेचं व्यवधान सुटल्याबद्दल कठोर ताशेरे ओढलेस. संपूर्ण सिनेक्षेत्र व्यसनाधीन असल्याचा सरसकट आरोप करून जया बच्चनसारख्या अनुभवी अभिनेत्रीच्या ‘जिस थालीमें खाते हैं उसीमें छेद?’ या वक्तव्यावर ‘कौनसी थालीकी बात कर रही है? यहापे डायरेक्टरके साथ सोनेपर रोल मिलता है!’ या कंगनाच्या प्रत्युत्तरावर तू तिच्या डोळ्यांत अंजन घातलंस. ‘कंगनानं हिंदी सिनेसृष्टीच्या ड्रगमाफियांची नावं जाहीर केल्यास तिला थम्स अप देणारी मीच पहिली असेन!’ हे थेट विधान करताना तळमळीने मध्ये पडत पुढं तू जे म्हटलंस, ते अजून आठवतं.

बॉलीवूड ऐसा प्लॅटफॉर्म है, जहा पर हर मजहब, जाति, प्रदेश और भाषाके लोग इकट्ठा आकर अपने टॅलेंट के बेस पर आ जाते हैंl ये बहुत दुःखी बात है की जया बच्चन के बारेमें ऐसे लिहाजेमें उन्हे बात की हैl आपका जन्मभी नहीं हुआ था, तब जयाजीने मिली, गुड्डी और अभिमानजैसी वूमनसेंट्रिक फिल्में की थीl आपके बहुत कडे विचारविरोध हो सकते है, टीकाटिप्पणियां मेरेउपरभी हुई है, लेकिन मैंने कभी अपना आपा खोकर किसीके उपर व्यक्तिगत रूपसे लांच्छन लगानेवाली बात नहीं कही . . .

वयाच्या पस्तिशीत ‘उर्मिला गोझ् अंडरवॉटर फॉर हर बर्थडे’ अशा अर्थाचा मथळा वाचून तुझ्या चाहत्यांना अप्रूप वाटत राहिलं. हिंदीसह मल्याळम, तमिळ, तेलगू सिनेमे करत असतानाच ‘आजोबा’सारख्या मराठी चित्रपटात तू हॉट पँट घालून अभिनयाचा मनसोक्त आनंद लुटतीयेस हे पाहूनही. पण मग तू नेहमीच मनस्वी जगत आलीस. त्यामुळे कुठल्याशा पेज थ्री लग्नात तुला चुकून धडकलेल्या, तुझ्याहून ९ वर्षांनी लहान, काश्मिरी मॉडेल- उद्योजक-अभिनेता मोहसीन अख्तर मीरसह प्रेमात अडकत तू लग्नगाठ बांधलीस, तेव्हा मला तसूभर आश्चर्य वाटलं नाही. वयजातधर्माच्या भिंती ओलांडून प्रेम तुझा शोध घेत अखेर तुझ्यापर्यंत पोहोचलं हेच माझ्यासाठी महत्त्वाचं.
     तुझं विकिपीडिया पेज गहाळ करणाऱ्यांना ‘माझ्या वडिलांचं नाव श्रीकांत! आईचं नाव सुनीता! आणि त्यांच्यावर झालेली विटंबना मला खपणार नाही! माझा पती केवळ मुस्लिम नाही तर ‘काश्मिरी मुस्लिम’ आहे म्हणून त्याला पाकिस्तानी-दहशतवादी म्हणून डिवचणं ताबडतोब थांबवा!’ असं चिडून बोलताना तुझा सात्त्विक संताप निळसर प्रकाशानं तळपणाऱ्या रूद्राक्षमाळेसारखा दाहक होता. खरं तर ते आम्ल तू कसं पचवलंस? आणि आजही ते तुला का पचवावं लागतं? या आणि अशा प्रश्नांची उत्तरं तुझ्या चाहत्यांनी कधी प्रयत्न तरी केला असेल?
     मीडियासमोर तू कायमच आपल्या कामाची चर्चा करताना दिसायचीस. ‘मासूम’मध्ये तुझा सावत्र भाऊ झालेल्या जुगल हंसराजसह ‘आ गले लग जा’मध्ये हिरोईन म्हणून काम करताना विचित्र वाटत नाही का, असं विचारणाऱ्या पत्रकाराला ‘नायकासह कधीकाळी हिरोईन म्हणून काम करणारी अभिनेत्री पुढे त्याच्या आईचं पात्र साकारू शकते तर मग यात काय गैर ते काय? मला नाही वाटत रोल उत्तम निभावला तर लोक असल्या गोष्टींचा बाऊ करत असतील!’ असं सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतंस तू.
     राम गोपाल वर्मांसह कामाचा पहिलाच अनुभव सांगताना तू खुद्कन हसत म्हणालीस, ‘मी त्यांचा पिक्चर ‘शिवा’ पाहिला तशी भारावून गेले होते. बात बहुतही काम करते है और बहुतही धीरेसे बोलते है! आप कंटिन्यूअसली सोचते रहते हो, मैंने ठीक शॉट दिया?’ रामूकडून तू कॅमेराचं तंत्र शिकत गेलीस आणि अभिनयाचे नवनवे प्रयोग करत एकेक उच्चांक गाठत गेलीस. मैत्र आणि करिअर एकत्रच फुलत गेलं.
     असं असलं तरीही, ‘बी टाऊन के गलियारोंमे’ ओंगळ गॉसिप्सना मरण नाही. राम गोपाल वर्मा यांच्यासह तुझी वाढती जवळीक, त्याच्या ऑफिसमध्ये खास उभारली गेलेली तुझी खोली, तिथल्या एका भिंतीवर संपूर्णत: तुझीच पोस्टर्स, तिच्या बायकोनं तुझ्यावर सेटवर येऊन हात उचलल्याच्या बातम्या मग जिवंत दंतकथा बनून चावून चोथा होईतोवर चघळल्या गेल्या. त्या वाचून मला वीट येई. तुझ्यासारख्या चतुरस्त्र अभिनेत्रीला विचारण्याजोगे प्रश्न नि चर्चा करण्याजोगे मुद्दे आटलेच जणू! मग तुझ्या आईवडिलांना काय वाटत असेल?
     ममता, पूजा नि केदार ही तुझी भावंडं या काळात तुझा आधार बनली का? तुझ्या अभिनयापेक्षा जास्त असल्याच वावड्यांनी भुतासारखा पिच्छा पुरवला म्हणूनच सिनेजगतापासून तुझा सांधा तुटत गेला का ग?

‘कमबॅक’ हा शब्द तुला आवडत नाही. पण मग तुझ्यासाठी नव्या दमाच्या कसदार भूमिका का बरं लिहिल्या जात नव्हत्या? अप्रतिम नृत्यांगना तू; पण नुसतं ‘राम गोपाल वर्माके शोले’तल्या आयटम साँगवर थिरकावंस हे वेदनादायी नव्हतं? हिमेश रेशमियाच्या ‘कर्ज’चा रिमेक तर केवळ तुझ्या अस्तित्वानं तरला. मात्र हळूहळू लक्षात येत गेलं ते वेगळंच आणि मग माझी धडधड वाढली! जाडसर खोट्या पापण्या, भडक लिपस्टिक आणि चेहऱ्यावर थापलेला मेकअपचा पांढरट थर यांची तुला खरंच गरज नाही रे . . . ‘गर्दी’चा भाग होण्याच्या नादात आपण कोण आहोत हे विसरू नयेस ह्या काळजीनं मला ग्रासलंच एकदम.
     तुझ्याही ते लक्षात आलं असावं. कारण साच्यात गुदमरण्याच्या आत चटकन् तू साचा मोडून टाकलास. ‘चक धूम धूम’, ‘झलक दिखला जा’ अशा रिॲलिटी शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीवर बसून धुमशान घालणं सुरू केलंस. डान्स इंडिया डान्सच्या ‘सुपरमॉम शो’मध्ये स्पर्धक स्त्रीच्या आयुष्यातले प्रवास उलगडताना तुझ्यात अथक वाहणाऱ्या माणुसकीचा झरा सगळ्यांनाच दिसला. त्या झऱ्याला ‘डेली सोप’च्या विटलेपणाचा स्पर्श होऊ शकला नाही तेही एक बरं झालं!
     ‘नो नॉनसेन्स’ ह्या तुझ्या बाण्याला तू नेहमीच जागलीस आणि म्हणूनच टेलिव्हिजनच्या दुनियेतही तितकीच लोभस राहिलीस. ‘डु यू थिंक सच सॉफ्ट स्टोरीज् टेक प्रेसेडेन्स ओव्हर टॅलेन्ट?’ या प्रश्नावर तू धारदार उत्तर दिलंस – ‘आय फोर हन्ड्रेड पर्सेंट ॲग्री, बेकॉज यू आर लुकिंग ॲट समवन व्हू हॅज नेव्हर बिलिव्ह्ड इन गिव्हिंग सॉफ्ट स्टोरीज टू द वर्ल्ड!’
     ‘येस्, आय गेव्ह अप् अ लॉट ऑफ वर्क अँड प्रॉबब्ली अ लॉट ऑफ मनी दॅट आय कुड हॅव्ह मेड, हॅड आय कंटिन्युड १० मोअर रंगीलाज्! बट् आय थिंक आय चोझ् अ डिफरन्ट पाथ.’ असं अभिमानाने सांगत आजच्या काळात किती अभिनेते लोकानुनयाला संपूर्ण फाटा देऊ शकतील? म्हणूनच संपदा शर्मा, सौरव भानोत, अविनाश लुहाना अशा पत्रकारांनी तुला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं. आम जनतेनं डोक्यावर घेतलं. ‘उर्मिला नॉट टू रेस्ट ऑन हर लॉरल्स’ या शब्दांत ‘द हिंदू’ वर्तमानपत्रानं तुझ्या घोडदौडीला सलाम केला.

चालू मिनिटाला हे पत्र वाचताना, उजव्या बाजूचा भांग सावरत समुद्राच्या लाटा सूर्यकिरण पडून चमकू लागतात तशा सोनेरी बटा अलगद गोबऱ्या गालांमागं नेत असशील तू. २७ वर्षांनंतर, अगदी पन्नाशीच्या घरातही ‘बेवफा ब्युटी’सारख्या आयटम साँगवर तुझी मोरपिशी कंबर लचकताना मी तितकाच फ्लॅट होतो; पण आजकाल ना, तुझा निमुळता लंबगोलाकार चेहरा पाहून त्याहीपेक्षा जास्त काहीतरी वाटतं . . . जरासं आश्चर्य वाटेल तुला, पण मायेनं-अभिमानानं ऊर भरून येतो रे! हसलीस ना, अशीच झगझगीत हसत रहा.
     शपथेवर सांगतो, तुझ्या खोडकर चर्येपुढं नि थिरकत्या पदन्यासांपुढं तुझे ओघळते ओठ आणि कपाळावरच्या सुरकुत्या यांचं अस्तित्व खरोखरच माझ्या खिजगणतीतही नसतं आणि यापुढेही नसणार आहे. माझ्या आकाशाची सम्राज्ञी आहेस तू आणि कायम राहशील!

– हजारोंच्या गर्दीतून वाट काढत,
तुझ्या हरेक सिनेमाचं तिकीट काढणारा नि
ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुझ्या नव्या इनिंगची
वाट बघणारा,
तुझा अनाम चाहता.


• संदर्भ :

• वाचत रहा :


 

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال