न तुटणारा तारा

[वाचनकाल : ११ मिनिटे] 
आभाळातून कोसळणारे तारे पिशवीत कैद करणारी मुलगी ,Girl collecting stars in her bag

विज्ञानाला एकतर कोडे सुटते किंवा सुटत नाही. याच्या अधेमधे असे काही नसते. ही अधलीमधली प्रक्रिया म्हणजे ध्यासाने झपाटून जाण्याचा काळ असतो. कल्पना नक्की कोठून जन्म घेतात? मेंदूतून? मनातून? हे तर आजपर्यंत विज्ञानालाही न सुटलेले कोडे आहे. का मग या कल्पना जन्म घेतात अंतराळ्यातल्या कुठल्याशा अज्ञात प्रदेशातून? माहिती नाही. पण, या उगम पावलेल्या कल्पनांचा ध्यासाने आयुष्यभर पाठलाग करणाऱ्या स्वप्नवेड्या ‘कल्पना’ची कहाणी जगाला माहिती आहे. तुम्हाला ती माहित आहे का? 


“कोलंबिया ह्युस्टन युएचएफ् कॉम चेक?

.
.
.

  कोलंबिया ह्युस्टन युएचएफ् कॉम चेक?”

केनेडी स्पेस सेंटरच्या संपर्क कक्षातून ठोक लकबीत प्रश्न विचारले जात होते. कलेकलेनं स्पष्ट होत जाणारा पृथ्वीचा निळसर गोळा आता यानातल्या थकल्या-भागल्या चमूला शांतवू लागला. यान पॅसिफिक महासागराच्या दिशेने झेपावत अमेरिकेकडं धावू लागताच तब्बल १६ दिवस, सलग २४ तास, दोन-दोन शिफ्ट्समध्ये कष्टणारे अंतराळवीर आतून सुखावले. यानातल्या क्रू मेंबर्सनी रूटीन लँडिंगची तयारी करत स्पेससूटस् घालायला सुरूवात केली. पण २२ मिनिटं आधी शटलच्या असंख्य सेन्सर्सपैकी एकावर एक विचित्र रीडिंग आलं. काटे उलट दिशेला सरकू लागले होते. एकाएकी यानातून पुकारा झाला . . .

“वुई हॅव्ह जस्ट लॉस्ट फोर हायड्रॉलिक टेंपरेचर ट्रान्सड्युसर्स! देअर इज अल्सो अ . . .”

आणि यानाशी संपर्क तुटला! नियंत्रण कक्षातून विलक्षण त्वरेनं आवाज उमटला,

“जीसी फ्लाईट? लॉक द डोअर्स, लॉक द डोअर्स! कॉपी?”

१ फेब्रुवारी २००३. कोलंबिया अवकाशयानाची ती २८वी मोहीम होती. त्या शनिवारी कल्पना चावला पृथ्वीवर परतणार म्हणून भारतभर नुसता जल्लोष सुरू होता. समस्त दिल्लीकरांच्या गळ्यातला ताईत बनली होती ती. देशभरातल्या झाडून सर्व वर्तमानपत्रांमध्ये तिच्या कर्तृत्वाच्या बातम्या भरभरून वाहत होत्या. भारतातून टेक्सासमध्ये विमानवारी करून तिचे आई-वडील सी ब्रुक मधल्या तिच्या घरात तिची आतुरतेनं वाट बघत होते. सकाळी ८:४०ला कॅमेऱ्यात तिची अखेरची हसरी छबी कैद झाली.
     मोजून १६व्या मिनिटाला ते सातजण पृथ्वीवर टेकणार होते. पुढच्या चार मिनिटात कोलंबियानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला, तेव्हा सगळं कसं आलबेल होतं. ८:४४ ला कल्पनानं स्क्रीनसमोर हसून हात हलवला, तेव्हा मागच्याच पंधरवड्यापूर्वी जे काही घडलं त्याची मात्र तिच्यासकट उरलेल्या ६ जणांनाही सुतराम कल्पना नव्हती. 
     १६ जानेवारी २००३. कोलंबिया अवकाशात भरारी घेत असताना ८१ व्या मिनिटाला सुटकेसएवढया मोठ्या आकाराचा फोमचा बायपॉड रॅम्प तुटून यानाच्या डाव्या बाजूला वेड्यावाकड्या गतीनं जाऊन आपटला आणि ऑर्बायटरचा संरक्षक थर भेदून पार झाला. तिथं तब्बल १० इंचाचं भोक पडलं, तेव्हा यान पृथ्वीपासून ६५ हजार फुटांवर होतं. १६ दिवसांचं मिशन. ८० प्रयोग. थांबण्याचा अर्थ कठोर आणि स्वयंस्पष्ट होता. पृथ्वीचं वातावरण, अवकाशविज्ञानाची प्रगत तंत्रं, अंतराळवीरांची सुरक्षितता कितीतरी विषयांवरचं मूलभूत संशोधन मागं पडणार होतं आणि पुढं परवानग्यांच्या लाल फितीत अनिश्चित काळाकरता अडकून बसणार होतं. बघता बघता ताशी १६५० मैलांचा प्रवास करत कोलंबिया अवकाशात झेपावलं. १६ दिवस तरी त्याला काही धाड भरली नव्हती.
      १००° सेल्सिअसला पाणी उकळतं. यानाबाहेरच्या त्या ३०००° सेल्सिअस तापमानातले तप्त लाव्हासदृश वायू निर्दयपणे आत शिरत राहिले. अवकाशयात्रींना स्पेससूट घालायचा अवधी न देता यानाच्या अंतर्गत भागानं भक्कन् पेट घेतला. निमिषार्धात शटल निव्वळ आगीचा गोळा बनलं. ब्रम्हांडाला गवसणी घालून परतलेलं यान टेक्सासवर ३८ मैलांच्या उंचीवर ठिकऱ्या ठिकऱ्या होत खाली कोसळलं. १० सेकंदांचा क्रूर खेळ! अग्निज्वाळांनी वेढलेले सातही जण बेशुध्दीच्या लाटेवरून घरंगळत मृत्यूच्या हिरवट जबड्यात सापडले आणि जिवंतपणी जळून-वितळून खाक झाले.

टागोर बालनिकेतनच्या मुख्याध्यापकांनी जाड चष्मा सावरत वर पाहिलं. ‘१७ मार्चऐवजी १ जुलै अशी जन्मतारीख ठोकून द्यायची!’ हे घरून पढवून पाठवलेल्या मोठ्या बहिणीनं ॲडमिशनसाठी बारक्या बहिणीच्या चुळबुळीवर त्रासिक डोळा ठेवून धीटपणे उत्तरं द्यायला सुरूवात केली.
     “वडिलांचं नाव?”
     “बनवारीलाल चावला.”
     “आईचं नाव?”
     “संज्योती चावला.”
     “विद्यार्थिनीचं नाव?”
     “अं, काही ठरवलं नाही! चार भावंडांत सगळ्यात छोटी आहे ना, तर घरात लाडानं माँटू म्हणतो . . .” कागदाचं विमान बनवून वरांडाभर नाचणाऱ्या लहानग्या मुलीला दटावण्याच्या प्रयत्नात ती ओशाळून हसली.
     “३ नावं सुचवतो. निवडा चटाचट. सुनयना, ज्योत्स्ना की कल्पना?” जाड चष्मा वैतागून म्हणाला.
     “कल्पना!” नाचणाऱ्या लहानगीनं उड्या मारत ओरडून सांगितलं. स्वतःचा प्रवास स्वतः घडवणाऱ्या कल्पनाची सुरूवात ही अशी झाली.
     फाळणीनंतर मुलतानहून निर्वासितांच्या लोंढ्यासह बनारसीलाल चावलांनी भारत गाठला, तेव्हा हरयाणात हातगाडी चालवण्यावाचून त्यांच्याकडं गत्यंतर नव्हतं. फेरीवाला, किराणा दुकानदार, कापडविक्रेता अशी मजल मारत इंजिनिअरिंगची तत्त्वं आत्मसात करत त्यांनी कर्नालमध्ये टायर बनवण्याचा उद्योग सुरू केला. मुलींना शिकवण्याचा तो जमाना नव्हता. पण संज्योती ही निर्भीड, उदार मनाची गृहिणी. संजय या मोठ्या मुलाप्रमाणेच दीपा, सुनिता आणि कल्पना या आपल्या तिन्ही मुली शाळेत कशा जातील याची तिनं डोळ्यांत तेल घालून काळजी वाहिली.
     कल्पना पहिल्या पाचात असायची. पण ‘पहिलं’ येण्याचा ताण न घेता अभ्यास मनसोक्त जगून घ्यायची तिची धडपड असायची. वर्गभर भूगोलाचे सुंदर नकाशे रेखाटायची. जिथं पाच-सहा वर्षांची मुलं वहीत चित्रं काढताना नदी-डोंगर-झाड-झोपडी काढू पाहायची, तिथं ती प्रत्येक चित्रात एरोप्लेन घुसवायची. हस्तकलेच्या तासांना चिमुकल्या विमानांच्या सुरेख प्रतिकृती बनवायची.
     “बाबा, हे बघा काय आहे . . .”
     एरवी तासंतास अवकाशातले लुकलुकते तारे निरखून ओळखण्यात गुंगून जाणाऱ्या आपल्या मुलीनं अचानक चकचकीत मॅगझिन् उचलून धावत आल्याचं पाहून बनवारीलाल जागेवर उठून बसले. त्या मासिकात मंगळ ग्रहाचा पहिलावहिला फोटो छापून आला होता.
     “मला इथं जायचंय!”
     असा एकच धोशा लावणारी कल्पना आता एका वेगळ्याच हट्टाला पेटली होती . . .
     १० वीचा निकाल लागल्याच्या आदल्याच वर्षी १९७५ साली व्हायकिंग - १ उपग्रह अंतराळात झेपावल्याच्या बातम्या वाचून १५ वर्षांची ती मंत्रमुग्ध झाली होती. पण एअरोस्पेस क्षेत्रामध्ये करिअर ही तेव्हाही खायची गोष्ट नव्हतीच. नील आर्मस्ट्राँगनं चंद्रावर पाऊल टाकून पुरी ६ वर्षही लोटली नव्हती. त्या काळी 'मुलीनं डॉक्टर व्हायचं आणि मुलानं इंजिनियर!' हे भारतीय पालकांच्या मनात घट्ट बसलेलं समीकरण. वडिलांच्या विरोधापुढं आईचा अढळ पाठिंबा इथंही धावून आला आणि तिचा कल ओळखून भुवया उंचावणाऱ्या सर्वांनी पुढं मान तुकवली. 
     डीएव्ही महाविद्यालयात बीजगणिताच्या तासाला शिक्षिका ‘नल सेट’ ही गणिती संकल्पना समजावून सांगत होत्या. बोलता बोलता त्यांनी फळ्यावर एक गोल काढला आणि 'अशक्यता' म्हणजे काय ते उलगडत म्हटलं,
     “लूक हिअर, विमेन ॲस्ट्रोनॉटस् ऑफ इंडिया आर अ नल सेट!”
     आणि अचानक बेंचवरून हात वर करून उठत त्या बॉबकटमधल्या मुलीनं प्रश्नवजा उत्तर दिलं होतं,
     “व्हू नोज मॅम्, वन डे द सेट मे नॉट बी एम्प्टी . . .?”
     तिच्या कल्पनेचं त्यांनी हसून होकार भरत कौतुकच केलं. पण तिच्यासाठी त्या निव्वळ कल्पनेच्या भराऱ्या नव्हत्या. ‘कल्पना सत्यात उतरतात’ हे सिध्द करण्याचा ध्येयवाद कल्पनाच्या डोळ्यांतून ओसंडून वाहत होता, हे सांगताना आज नॅशनल जिओग्राफिकच्या माहितीपटात त्याच शिक्षिकांच्या पांढरट भुवया थरथरतात.
     चंदिगडच्या पंजाब कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून तिनं पुरुषसत्ताक क्षेत्रात उतरत आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्नं पाहिली ते साल होतं १९७८. संपूर्ण बॅचमधली एकमेव मुलगी तीच. साहजिकच वसतिगृह नावाचा प्रकार नाही. मग स्वस्त गॅरेजवजा जागेत भाड्यानं खोली घेऊन राहिली. जिद्दीनं सायकलनं महाविद्यालयापर्यंत पायपीट करायची. स्वसंरक्षणाचे धडे गिरवत कराटे शिकून ब्लॅक बेल्ट मिळवला. एव्हिएशनच्या विश्वातली एकूण एक मासिकं तिनं अधाशासारखी पालथी घातली. एअरो क्लब आणि ॲस्ट्रो सोसायटीच्या कार्यक्रमांंत हिरीरीनं भाग घेणारी ती समकालीन पुरूष सहकाऱ्यांहून सरस होती. बुध्दिमत्तेचं तेज तिच्या उमद्या, हसऱ्या मुद्रेवर नेहमीच विलसत असे. एअरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. १९८२ला ती इरेला पेटून अमेरिकेत जायचं म्हणाली, तेव्हा तिच्या मध्यमवर्गीय घरात गहजब उडाला. पण या वेळी वडिलांनीही तिच्या इच्छाशक्तीला थोपटलं. हातगाडीवाल्याची लेक देशातली पहिली एअरोनॉटिकल इंजिनियर झाली होती!
     कल्पना मागं वळून पाहण्याकरता जन्मलीच नव्हती. तिनं टेक्सास विद्यापीठात एअरोस्पेस इंजीनियरिंगमध्ये मास्टर्स आणि पुढं कोलोरॅडो विद्यापीठात त्याच विषयात पीएचडी केलं. १९८८ मध्ये ती नासात रूजू झाली. तत्पूर्वी एम्स रिसर्च सेंटरमध्ये ‘कॉम्प्युटेशनल डायनामिक्स’वर तिनं पायाभूत संकल्पना शोधल्या. ओव्हरसेट मेथड इनकॉर्पोरेटेड संघटनेमध्ये संगणकातल्या 'फ्लो सॉल्व्हर्स'वर आपल्या मूलभूत संशोधनामुळं अल्पावधीतच ती उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचली होती. स्पार्टन उपग्रहाच्या सॉफ्टवेअरमध्ये झालेल्या चुकांमुळे खचून न जाता ‘एरोडायनॅमिक ऑप्टिमायझेशन’मधल्या प्रगत तंत्रांवर तिनं संशोधन सुरूच ठेवलं. 
     देखण्या व्यक्तिमत्त्वाचा जॉन पिअर हॅरिसन तिला टेक्सासमध्ये पाऊल पडलं त्या पहिल्याच दिवशी भेटला होता. त्याच्या ‘प्रिन्सिपल्स् ऑफ हेलिकॉप्टर फ्लाईट्’ या पुस्तकाची तिनं पारायणं केली होती. या फ्रेंच अमेरिकन उड्डाणतज्ञाच्या सहवासात तिनं एअरप्लेन्स, सीप्लेन्स, ग्लायडर्स चालवण्यात निष्णात होत ‘सर्टिफाईड पायलट’ म्हणून लौकिक कमावला. तारा जुळल्या. दोघांनी लग्नगाठ बांधली. एकमेकांच्या बाहूंत विसावत एकाच ध्येयानं झपाटून मिळून स्वप्नं पाहिली. १९९१पर्यंत तिला अमेरिकन नागरिकत्वही मिळालं, पण लठ्ठ पगाराचा एनआरआय पती गटवण्याची खटपट हे तिचं जीवितध्येय कधीही नव्हतंच. ‘नासा ॲस्ट्रॉनॉट कॉर्प्स्’ साठी तिनं अर्ज भरला. वर्षभर खडतर प्रशिक्षण घेतलं. १९९६ मध्ये अवकाशात पहिली भरारी घेण्याकरता तिची निवड झाली, तेव्हा केनेडी स्पेस सेंटरमध्ये ती एका पत्रकाराला विनयानं म्हणाली होती,

“आय हॅव्ह लिव्ह्ड माय लाईफ फॉर दॅट, इन् सम् सेन्स्!”

२ मे १९९७. ‘एसटीएस् ८७.५’ या ८८ व्या अंतराळ मोहिमेतल्या त्या पहिल्याच अंतराळझेपेत तिनं १० दशलक्षांहून जास्त मैल स्पेसवॉक करत, पृथ्वीला २७२ प्रदक्षिणा घालून, तब्बल ३७६ तास म्हणजे साडेपंधरा दिवस अवकाशात राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला! 
     पण अलोट प्रसिद्धीच्या शिखरावरही कल्पना ही आजन्म खगोलशास्त्राची धडपडी विद्यार्थिनीच राहिली. स्पार्टन उपग्रहाच्या हॅबिटॅबिलिटी सेक्शनमध्ये अचूक स्पेस शटल सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेल्या अपयशाचं तिनं परखड आत्मपरीक्षण केलं होतं. वजनरहित अवस्थेचा मानवी चयापचय क्रियेवर दीर्घकालीन परिणाम, अवकाशयंत्रांच्या रोबॉटिक बुद्धिमत्तेचं मोजमाप, नवनवीन अवकाशउड्डाण तंत्रज्ञानपध्दती, सूर्याचे बाह्य वातावरणीय थर या साऱ्याचा कल्पनानं जवळून अभ्यास केला. 
     ‘सिम्युलेशन ऑफ मूव्हिंग मल्टिपल बॉडी प्रॉब्लेम्स’ ह्या विषयावर तिचा सखोल व्यासंग होता. पण चेहऱ्यावर कधीही समाजापासून फटकून राहणाऱ्या रूक्ष तज्ञतेचा जख्खड मेकअप तिनं चढवला नाही. टेक्सासमधली तिची शेजारीण आणि जिवलग मैत्रीण मेरी इन्कोफर सांगते,
     “अगदी साधीसरळ होती कल्पना, अहंकाराचा लवलेशही नाही. लांबलचक संशोधनविषयांची आणि पदव्यासन्मानांची यादी पाहून दबकूनच गेले होते मी, पण पराकोटीचं दैन्य भोगलेल्या कल्पनाचे पाय कायम जमिनीवर असायचे. ती मित्र, नातेवाईक आणि सहकारीवर्तुळात 'केसी' या नावानंच ओळखली जायची.”
     हॉलिवूड अवकाशपटांचे सोनेरी दिवस ते. पिंडानं संशोधक नसणारा सर्वसामान्य अमेरिकनही विज्ञानाच्या विराट संकल्पनांनी थक्क होत होता. अशातच अमेरिका, जपान, युरोपियन युनियन, चीन आणि रशिया या ५ देशांनी एकत्र येत नासा, जॅक्सा, ईएसए, सीएसए आणि रोस्कॉस्मोस या संस्थांच्या एकत्र मोट बांधली. कृत्रिम आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक उभारून तिथं शून्य गुरूत्वाकर्षणात वस्तू-घटनांवर पडणाऱ्या प्रभावाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात रेल्वेगाड्या थांबतात तसं हेच स्टेशन ‘अवकाशवाहतुकीचा थांबा’ म्हणून गजबजून जाणार होतं!
     कोलंबिया अवकाशयानातल्या यंत्रमानवाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेशालिस्ट १ म्हणून कल्पनाची नेमणूक करण्यात आली. पण एप्रिल १९८१ पासून २००३ पर्यंत सत्तावीस वेळा उड्डाणं करून टिकलेल्या या कोलंबिया अवकाशयानाची अवस्था जर्जर झाली होती. १९८६ साली चॅलेंजर शटल स्फोटात सातजण दगावले होते. परंतु ‘अवकाशमोहीम’ हा त्या काळात आजच्याइतका रूळलेला शब्द नव्हता. खुद्द नासासारखी जगन्मान्य अवकाशसंशोधनसंस्थाही अशा उड्डाणप्रकल्पांबद्दल नवखेपणानं रांगत होती. आजच्या घडीला एलन मस्क पुनर्वापरक्षम रॉकेट बनवण्यात मग्न आहे, तर स्पेसएक्ससारखी कंपनी भविष्यकाळातल्या अवकाशसहलींच्या जाहिराती आतापासूनच प्रसिद्ध करत आहे. पण तेव्हा ह्या बारकाव्यांबद्दल बोलणं म्हणजे पेजरच्या काळात फाईव्ह जीच्या गप्पा झाडण्यासारखी अगम्य, अंधारी आणि युटोपियन बाब होती.
     पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसं वर सरकावं तसतसा वातावरणाच्या पाच थरांमध्ये तापमानप्रवाहांचा प्रचंड फरक आढळतो. ‘आयनोस्फिअर’ नावाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खालून तिसऱ्या स्तरात भारलेले विद्युतकण आणि तप्त वायू वावरतात. अशा परिस्थितीत कोणत्याही अवकाशयानात लहानसं छिद्रही प्रलयकारी ठरू शकतं. इतकं असूनही त्याच कोलंबिया अंतराळयानाची वारंवार दुरुस्ती करण्यात आली. विशेष म्हणजे, ही गंभीर त्रुटी लक्षात येऊनही त्याबाबत कोलंबियाच्या क्रू मेंबर्सना साधं विश्वासातही घेण्यात आलं नव्हतं.
     मुळात उडणारी कोणतीही कृत्रिम गोष्ट प्रचंड स्थिर आणि कणखर असावी लागते. अवकाशयानाची ‘थर्मल प्रोटेक्शन सिस्टीम’ ही सात घटकांनी बनलेली असते. त्याचा मुख्य भाग असतो ‘आर्. सी. सी.’ म्हणजेच ‘रिइन्फोर्स्ड कार्बन कार्बन’, जो अक्षरशः ३०००° सेल्सियसपर्यंतची झळ सहज सहन करू शकतो. म्हणून त्याचं कोटिंग अवकाशयानाच्या नाकावर आणि पंखावर लावलं जातं. त्याखेरीज फोमचे काळजीपूर्वक थरही द्यावे लागतात.
     हे असं का करायचं? तर अवकाशयानात प्रचंड दाबाखाली ठासून भरलेल्या द्रव हायड्रोजनचं इंधन सतत अत्यल्प तापमानात राखण्यासाठी. कारण तसं नाही झालं, तर हाच हायड्रोजन अस्थिर होतो आणि यानाला ऊर्जा पुरवूच शकत नाही.
     आधीच कोलंबिया एसटीएस् – १०७ चं उड्डाण शेड्युलिंग विवादांमुळं १८ वेळा पुढं ढकललं जाऊन भिजत पडलेल्या घोंगड्याप्रमाणे अक्षरशः ३ वर्ष रखडलं होतं. २००२ मध्ये तर शटल इंजिनच्या फ्लो लायनर्समध्ये भेगा आढळून आल्यानं नासात प्रचंड चिंतेचं वातावरण पसरलं. त्याच अस्थिरतेत सहा जणांसह कल्पनानं अजोड धैर्य – विश्वास दाखवत कोलंबियाच्या पायऱ्यांवर पावलं टाकली आणि . . .

. . . सात मोती निखळले!

उलटसुलट चर्चा-आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. अवकाशविज्ञानाची भरून न येणारी हानी झाली. नासाच्या प्रतिमेला चॅलेंजर मोहिमेतही बसला नसेल इतका अजस्त्र धक्का बसला. पुढची दोन वर्ष नासानं एकही प्रकल्प हाती घेतला नाही इतकी भयावह पोकळी निर्माण झाली. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या बांधकामातूनही पुढचे २९ महिने अंग काढून घेत ते काम रशियावर सोडण्याची नामुष्की ओढवली. झालेल्या घोडचुकांतून शहाणं होत पुन्हा गमभन गिरवत नासा कठोर आत्मचिकित्सा करत राहिली. तब्बल ४१ महिन्यांनंतरच मानवी अवकाशउड्डाणं पूर्ववत सुरू झाली. पण सात मोती हरपलेच.
     अवघ्या चाळिशीत पाऊल ठेवत अंतराळ गाजवणारी ‘भारतकी बेटी’ तडकाफडकी ब्रह्मांडात हरपली होती. अमेरिकेच्या उटा राष्ट्रीय उद्यानामध्ये ‘इन् अकॉर्डन्स टू हर विल्’ म्हणत तिची राख विखुरण्यात आली हे दुःख गिळून ‘ब्रेन ड्रेन’वर भारतभर गंभीर मंथन सुरू झालं. भारतीय वंशाच्या महिलेचा अभिमान वाहणारा भारत देश तिची ‘कर्मभूमी’ बनू शकला नाही हा सल देशवासीयांना बोचत राहिला. अवकाशातल्या धुलिकणांमुळं पृथ्वीवर होणाऱ्या वातावरणबदलांचा कल्पनानं खोलवर अभ्यास केला होता. म्हणून तिच्या सन्मानार्थ अटलबिहारी वाजपेयींनी ‘मेटसॅट - १’ हा पहिला वातावरणीय उपग्रह ‘कल्पना - १’ या नावानं लोकार्पित केला. हरयाणा सरकारनं ६५० कोटी खर्चून तिच्या नावाने कर्नालमध्ये केसीजीएमसी वैद्यकीय महाविद्यालय आणि दवाखाना सुरू केला. कुरूक्षेत्र भूमीवर ज्योतीसरला ‘कल्पना चावला तारांगण’ उभारण्यात आलं. ज्या पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयात तिला होस्टेल मिळालं नाही, तिथं तिच्या नावाचं होस्टेल तयार झालं. त्यापाठोपाठ अगणित अगणित भारतीय विद्यापीठांनीही आपल्या वसतिगृहांना तिचं नाव दिलं. 
     अमेरिकेनं कल्पना चावलाला मरणोत्तर असंख्य मानसन्मानांसह ‘स्पेस मेडल् ऑफ ऑनर’ बहाल केलं. तिच्या पतीनं लिहिलेलं ‘एज् ऑफ टाईम’ हे चरित्र अमाप लोकप्रिय झालं. न्यूयॉर्कच्या जॅक्सन हाईट्सवरचा ७४वा रस्ता आता ‘कल्पना चावला स्ट्रीट’ म्हणून ओळखला जातो. तिनं जिथं अवकाश मुठीत घेण्याचा ध्यास घेतला त्या टेक्सास विद्यापीठातलं ‘कल्पना चावला सभागृह’ तर जगप्रसिद्ध आहे. जागतिक स्तरावर प्रियांका चोप्रासारख्या विख्यात महत्त्वाकांक्षी अभिनेत्रींनीही कल्पना चावलाच्या चरित्रपटात काम करण्याची उत्सुकता दाखवली आहे.
     नासानं सौरग्रहमालेतल्या लघुग्रह पट्ट्यात आढळलेल्या अवकाशखडकाला ‘कल्पना चावला ॲस्ट्रॉइड्’ हे नाव देत तिला आदरांजली वाहिली. ज्या मंगळावर स्वारी करण्याची तिनं स्वप्नं पाहिली, त्या मंगळ ग्रहावरच्या सप्तशिखरी डोंगररांगेचं ‘कोलंबिया चेन’ असं नामकरण झालं आणि त्यातल्या एका शिखराला ‘कल्पना हिल्’ असं नाव मिळून यथोचित सन्मान राखला गेला. त्याआधी तिचा वावर असणाऱ्या एम्स संशोधन संस्थेनंही अवकाशात इस्रायली डस्ट एक्स्पेरिमेंटबद्दल तिच्या मूलभूत कार्याची दखल घेतली. पृथ्वीच्या वातावरणीय प्रणालीची सिम्युलेशन मॉडेल्स बनवून वातावरणीय अंदाज वर्तवणाऱ्या महासंगणक ‘अल्ट्रिक्स ३०००’ ला ‘सुपरकम्प्युटर कल्पना’ हे नाव दिलं गेलं. जेट विमानांच्या यशस्वी लॅंडिंगकरता लागणाऱ्या किचकट संगणकीय प्रणालींचा अभ्यास तिनं तिथंच तर केला होता.
     ‘कल्पना चावला’ या नावाला जगभरातून भरभरून प्रेम लाभलं. दुनियेच्या नजरेत ‘भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर’ असली, तरी तिच्या शब्दांत ती होती देशवंशवर्णापलीकडच्या अमर्याद अवकाशातली ‘सिटिझन ऑफ द सोलर सिस्टीम’! हा विचारसरणीतला फरकच तिला सदैव महत्ता प्रदान करत राहील. शाकाहारी कल्पना ह्युस्टनच्या मीनाक्षी मंदिराला आवर्जून भेट द्यायची. अंतराळातून दिसणाऱ्या पृथ्वीच्या सौंदर्यावर भाष्य करताना पर्यावरणसंवर्धनाचं आवाहन न चुकता करायची. ‘डीप पर्पल’ या सांगीतिक ग्रुपच्या मैफलींना हजर असायची. भारावून जात अबिदा परवीन, यहुदी मेनुहिन आणि पंडित रवी शंकर यांच्या संगीताला ‘आध्यात्मिक अनुभव’ म्हणायची. आपल्याला मोठं करणाऱ्या भारतीय आणि जगभरातल्या सगळ्याच शिक्षकांच्या सन्मानार्थ तिनं पहिल्या अवकाश मोहिमेत चंदेरी रेशमी कापडाचा बॅनर परिधान केला होता.
    बीबीसीनं निर्मिलेल्या कल्पना चावलावरच्या माहितीपटात तिचे वडील गतकाळाला उजाळा देत सांगत राहिले, “जब कल्पना नहीं आई, तब फिर मैंने नासा को कहा, कि जी मुझे उसका दफ्तर तो दिखा दो . . . कह बैठती थी वह?”
     त्यांना तिच्या छोटेखानी केबिनमध्ये दिसला तो अर्धवट उघडा राहिलेला तिचा लॅपटॉप आणि आईवडिलांचा एन्लार्ज्ड फोटो. तिथं रेंगाळत, तिच्या वस्तूंवर हात फिरवत एका ठिकाणी ते एकदम थबकले. डबडबलेली नजर सावकाश धूसर होत चाललीय हे फाळणीचं दुःख झेलून कोऱ्या-कठीण झालेल्या त्यांच्या हृदयालाही मान्य करावं लागलं.
     त्या कोपऱ्यात पुष्कळशी छोटी विमानं होती. ती वहीत रंगवून पळत दाखवायला यायची, गळ्यात चिमुकले हात टाकत हट्ट धरून मागायची तशी, खेळण्यातली रंगीबेरंगी विमानं . . .
     “कल्पना आमच्यात सगळ्यात हुशार! उत्सुक, खोडकर आत्मविश्वासानं भरलेली. घरातली यंत्रं कशी चालतात ते उकलून बघायला हवं असायचं तिला. घराजवळच्या क्लबहाऊसवरून उडणारी विमानं बघण्यासाठी छतावर धावत धावत जायची! लोक म्हणतात तशी वारलेली नाही बहीण माझी. शी इज् इम्मॉर्टल. इजन्ट् दॅट व्हॉट अ स्टार इज्? शी विल अल्वेज बी अप देअर व्हेअर शी बिलाँग्ज . . .”
     बॉबकटमधला तिचा फोटो कुरवाळत बोलताना संजयचा आवाज गदगदून आला.

‘कल्पने’च्या पंखात फुंकर घालणारे आई, वडील, भाऊबहिणी, शिक्षक तिला लाभले हे तिचं अहोभाग्य. गार्गी मैत्रेयींच्या उज्ज्वल परंपरेचा विसर पडलेल्या भारतभूमीमध्ये स्त्रीजन्मावर ‘गडी माणसात बायकांनी बोलू नये’, ‘बाईने बघावी चूल आणि खेळवावं मूल’, ‘बाय राखणाऱ्याच्या अन् गाय हाकणाऱ्याच्या हातात लाकूड हवंच’, ‘डोलीमें आएगी अर्थीपे जाएगी’ असे आसूड अविरत ओढले गेले. स्वातंत्र्योत्तर बदलत्या परिस्थितीतही संघर्ष सोपा नाही. मोठी स्वप्नं पाहणाऱ्या हरेक मुलीवर ‘पास हो नाही तर भाकऱ्या बडवायला तयार राहा’, ‘बाईच्या जातीनं कसं खालमानेनं राहावं’, ‘इश्श....आमच्यात नाही बाई असलं चालत!’, ‘सगळं काही कसं वेळच्या वेळी झालेलं बरं गं बयो!’ इथपर्यंत ताशेरे ओढण्याची मजल आम्ही भारतीयांनी गाठली व राखली आहे. 
     प्रज्ञावंत भारतीय मुलींकरता भारतभूमीतच संधींचं प्रांगण निर्माण करण्यात आजही आपण अयशस्वी ठरत आहोत. भारतीय मुलींमध्ये मुळीच उणी नसलेली प्रतिभा नख लावून मारणाऱ्या कर्मठ सनातनी मेंदूंची भारतात तरी आजही वानवा नाही. पण मग वानवा तर बॉबकटमधल्या तिच्या फोटोकडं पाहून स्वतःच स्वतःच्या शिक्षणाची कवाडं खुली करत समाजाशी झगडणाऱ्या स्वप्नाळू मुलींचीही नाही. हा वारसा आहे कल्पनाचा. अशा असंख्य भावी ‘कल्पनां’साठी तिनं आपली एक पायवाट घडवली आहे.

अकस्मात निखळतात त्या दुर्बल तारका. दीपस्तंभासारखा अढळ प्रकाशतो तो ध्रुवतारा. कल्पना जाज्वल्य इच्छाशक्तीनं अखंड तेवणारा एक दीपस्तंभ होती. ‘कल्पना’ विरत किंवा संपत नसतात. 'कल्पना' जन्मत, फुलत आणि चमकत असतात. स्वतःचा चिरंतन, स्वाभिमानी आणि प्रदीप्तीमान वसा निर्माण करत . . .


● संदर्भ :

● वाचत रहा :


2 टिप्पण्या

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

  1. बापरे काय लिहलंय अंगावर काटा आणि डोक्याला मुंग्या आल्यात.वाचताना वाटतच नाही की मी वाचतोय सगळ कस नजरे समोर साकार झाल्यासारखं वाटतंय... कमाल आहे तुमची लेखणी

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. वाचल्या वाचल्या दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद नेहमीच मनापासून निघतो असं म्हणतात. आपलं कौतुक हीच माझी उमेद. खूप खूप थँक्स. हेच हवं होतं, ते मिळालं. आणखी अशाच भरपूर कहाण्या घेऊन येत राहीन तुमच्यासाठी. लेखक आणि वाचक यांच्यात जेव्हा एक न दिसणारा नाजूक धागा जोडला जातो त्या आनंदाची सर कशालाच नाही. माझ्या लेखणीप्रमाणेच माझा आवाजही वेबसाईटवर 'श्रवणीय' या सेक्शनमध्ये उपलब्ध आहे सर, आपण जरूर ऐकावा. आपली तिथली प्रतिक्रियाही मौल्यवान असेल.

      हटवा
थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال