[वाचनकाल : ५ मिनिटे]
म्हातारा, थकलेला, रापलेला, दाढीचे खुंट पांढरे झालेला, किडकिडीत शरीराचा आणि फाटलेल्या डोळ्यांचा अनुभवी अश्वत्थामा कोवळ्या-कोवळ्या शत्रूंनी घेरलेला होता. |
माणसाची गंमत आहे. माणसाला जे हवं आहे ते माणूस वाटत फिरतो – म्हणजे ज्याला आपुलकीची मिठी हवी असते तो इतरांना कवटाळत फिरतो! माणसाची आणखी एक गंमत आहे. त्याला जे नको आहे तेही तो इतरांना वाटत फिरतो – म्हणजे द्वेष. दुसऱ्यांचं नकोसं पचवूनही त्यांना हवंसं देत राहणं ही माणसाची गंमत नाही, परिस्थितीचं देणं आहे . . .
माझ्या आयुष्यातील तसा बराच
कालखंड ‘मजेत’ म्हणता येईल अशा
अनुकूल परिस्थितीत खर्ची पडलेला आहे. काळ खर्ची पडलेला असूनही त्यातून फारसा फायदा
निघालाय अशातलाही भाग नाही. त्याच कालखंडातील कोण्या एका दिवसाची ही कथा आहे. कथा
तर आता मी लिहितो आहे; प्रत्यक्षात मात्र तेव्हा ही ‘त्याची’ व्यथा होती. त्याची म्हणजे कोणाची? तीच गोष्ट सांगतोय .
. .
महाविद्यालयाच्या चिंचोळ्या
गेटातून एकाच वेळी आमच्या मित्रांचा जथ्था निघणं निव्वळ अशक्य होतं. त्यात पुन्हा
महाविद्यालय सुटायचं तेव्हा एकदम तिथं शे-पाचशे टाळकी निर्माण व्हायची. आधीची पोरं
बाहेर निघत नाहीत तोवर पुढच्या प्राथमिकच्या पोरांना आत घुसायचं असायचं.
महाविद्यालयाला मोठं प्रवेशद्वार नव्हतं असं नाही; पण त्या जागेवर अतिक्रमणाचा
खटला चालू होता. परिणामी ते प्रवेशद्वार कायम बंद असायचं.
सकाळचे साडे दहा-अकरा होत आलेले. मित्रांबरोबर वर्गातून मी बाहेर निघालो.
जिन्यात ते पाठीमागे गर्दीत अडकले. मी धक्काबुक्की करत कसातरी बाहेर निघालो. आणि
आमच्या नियोजित स्थळी पोहोचलो. प्रवेशद्वारासमोर एक मोठं उंबराचं झाड होतं.
त्यामागे एकावेळी चार-पाच जण बसू शकतील असा कट्टा होता. तिथंच आम्ही सगळे जमायचो.
जो आधी यायचा त्याला बसायला जागा मिळायची – बाकी पंधरा-वीस जण उभेच.
आणखी एक फायदा म्हणजे त्या उंबराचा भलामोठा बुंधा! त्या बुंध्यामुळे शिक्षकांना
कट्ट्यावर कोण बसलंय हे लक्षात येत नव्हतं. म्हणून जो आदल्या दिवशी बसलेला असेल
त्याची पुढच्या दिवशी वर्गात खरडपट्टी निघणे नाही!
मी कट्ट्यावरची जागा पटकावली. तेव्हा माझ्या शेजारी प्राथमिक शाळेतील
साधारण आठवी-नववी देत असलेले दोन विद्यार्थी येऊन उभे राहिले. त्यातल्या एकाने
खिशातून सिगारेट काढली, पेटवली, पहिला झुरका घेतला.
तो काळ मला आठवतंय ‘कूल’ बनण्याचा किंवा निदान दुसऱ्यांना ‘कूल’ता दिसेल अशी कामे करण्याचा
होता. चित्रपटांतून, मालिकांतून, जाहिरातीतून व्यसनांचं उदत्तीकरण जोर पकडत होतं. आणि दुर्दैवाने नव्या
पिढीवरील सर्व बंधनांचं जोखड हळूहळू उतरत होतं. वास्तविक पाहता मला दुसऱ्यांनी
व्यसने केल्यावर त्रास होतो – शक्यतो ती लहान मुले असतील तर जास्त होतो. त्याने
झुरका घेतला.
त्याचा जोडीदार उंबऱ्याच्या बुंध्यामागून अचानक शिक्षक येणार नाहीत याची
दक्षता घेत होता. आपला मित्र मोठ्या बहादुरीचं काम करतो आहे आणि आपल्यावर त्याची
मदार आहे असा त्याचा एकंदरीत भाव होता. अचानक धूर फुंकताना त्याचं लक्ष माझ्याकडे
गेलं. त्यानं नजरेनेच ‘काय आहे?’ विचारलं.
मला आठवतं तसं तो काळ चित्र-विचित्र केशरचना आणि भडक सौंदर्यप्रसाधनांचा
होता सोबतच तंग कपड्यांचाही! तो या सर्व बाबतीत त्या भरकटलेल्या पिढीचं प्रतिनिधित्व
करत होता,
असो.
“धुराचा त्रास होतोय.” मीही तितक्याच
गुर्मीत त्याला सुनावलं.
“उठून जा ना मग!” तो म्हणाला.
आणि मी उठून उभा राहिलो. मी त्याच्यासमोर थांबलो तेव्हा त्याचं डोकं जेमतेम
माझ्या छातीला टेकत होतं.
“काय म्हणालास?” मी त्याला विचारलं.
महाविद्यालय थोडं गुंडगिरीत रमलेलं असायचं. त्याला वाटत होतं मी कोणत्यातरी
गुंड संघातला आहे आणि मला तो!
“धुराचा त्रास होतोय
तर निघ!”
“नाही. बिडी कोण
पितंय? तू. तर जायचं कोणी? तू. कोणी नसेल तिथं
जाऊन ओढायची बिडी, काय?”
आता त्याने सिगारेट विझवली. तसंही तीत आता फारसं काही शिल्लक नव्हतं. सगळी
घाण त्याच्या फुफ्फुसात उतरली होती. आणि तिथून डोक्यात चढत होती. मला ‘हिंमत असेल तर इथेच थांब’ असं बजावून तो निघून
तिथून निघाला. बहुदा त्याच्या गुंडसंघाला, भिडूंना, जिवलग दोस्तांना
घेऊन तो मला मारायला वगैरे येणार असावा.
मला आठवतंय तो काळ अराजकतापसंद काळ होता. तेव्हा मैत्री फक्त हाणामारीच्या
वेळेला कामी पडत होती. गुंडगिरी तरूणाईचं आभूषण बनलं होतं. मी परत कट्ट्यावर
बसलो.
त्याला मी प्रेमाने का समजावू शकलो नाही? त्याच्या हातून आणि
आयुष्यातून बिडीला कायमचं हद्दपार का करू शकलो नाही? याचाच मी विचार करत होतो.
जरी त्याने मित्र आणले असते तरी खास काही फायदा होणार नव्हता. कारण, तिथलेच काही माझेही
मित्र होते. अशा आपापसात ओळखी निघून भांडणे मिटणार होती. माझ्या मेंदूत मात्र त्याच्याहून
मी जास्त चुकल्याची भावना प्रबळ होत होती. मित्रांनी दिलेल्या आवाजाने मी भानावर
आलो.
आज कट्ट्यावर न येता ते मलाच रस्त्यावर बोलवत होते.
“उशीर झालाय काय ×××? इकडे या, इकडे.” ते आले नाहीत. शेवटी
दप्तर पाठीला अडकवून मी घरी निघालो.
मित्रांना मी झाला प्रसंग सांगत होतो, तेवढ्यात तिथं जमलेल्या
विद्यार्थ्यांच्या घोळक्यातून एक जखमी आवाज आम्हाला ऐकू आला. तिथेच मला तो दिसला
आणि त्याचीच ही कहाणी आहे.
मिसरुड फुटलेला कोवळा
अश्वत्थामा,
युद्धात लढून जर्जर झालेला, असंख्य अनुभवी योद्ध्यांच्या झुंडीत सापडलेला अश्वत्थामा.
अगदी असंच पण काहीसं याउलट समोरचं दृश्य होतं. म्हातारा, थकलेला, रापलेला, दाढीचे खुंट पांढरे
झालेला, किडकिडीत शरीराचा
आणि फाटलेल्या डोळ्यांचा अनुभवी अश्वत्थामा कोवळ्या-कोवळ्या शत्रूंनी घेरलेला
होता. हे शत्रू म्हणजे पुढच्या पिढीचे नवतरूण का काय . . .
त्यातल्या कोणाला त्याची भाषा कळत नव्हती. मात्र समजावण्यास तो थकत नव्हता.
भीष्म असाच हवालदिल झाला असेल कुरुक्षेत्रात? अजिबात नाही. कारण, भीष्म हाडाचा
लढवय्या; याउलट हा साधा भणंग
माणूस. माणसाला व्यसन आतून कसं अमानुष बनवत नेतं याची चित्तरकथा तो मांडत होता. त्याच्या
बोलण्यातली तळमळ या नव्या पोरांच्यात उतरत नव्हती. कारण, उतरत असती तर त्याची अगतिकता
टिपायला मोबाईलचे कॅमेरे सुरू झाले नसते.
तिथल्या झुंडीचं मी निरीक्षण केलं तर एकेकाच्या चेहऱ्यावर हास्य होतं – त्याच्या अडाणीपणावर
उमटलेलं –
अधेमधे कुठेतरी दया सुद्धा! मात्र ही उपहासाची छद्मी वागणूक त्याच्यावर
कोणताच अपाय करत नव्हती. काहीच न जाणवणारा, कवचकुंडलांनी सुरक्षित कर्ण
होता तो का मग युद्धाच्या गरमीत जखमांना हसत झेलणारा कर्ण . . . माहिती नाही.
मी गर्दीतून पुढे निघालो, मला त्याला नीट पाहायचं होतं. मित्रानं माझा हात
धरला.
“चल घरी, पिऊन आलंय ते!”
‘नाही. अजिबात नाही.’ मी नजरेने सांगितलं.
पिऊन भ्रष्ट झालेला आणि परिस्थितीने तुकवलेला दोघांनाही भान नसतं तरी त्यांच्यातला
फरक आपल्याला कळायला हवा. “थांब जरा.” मी म्हणालो आणि पुढे सरकलो.
“काय मिळतं रे बिडी
वढून . . . दारू पिऊन . . . व्यसनं करून . . . बाबांनो आयुष्य वायाला जातं.
आमच्याकडे बघा, आमचं वाटोळं बघा . . . आणि बघा आणि असं करू नका. शिक्षण घ्या . . .
आईबापाच्या प्रेमाची जाणीव ठेवा . . . आईबापाच्या प्रेमाची. त्यांच्यासाठी जगा.
शिक्षक तुमचं वाईट करतात का रे . . . त्या गाड्या पळवण्यात, व्यसनं करण्यात, धूर उडवण्यात, पोरी पटवण्यात काहीच
नाही रे बाबांनो . . . ऐका.”
त्याचा आवाजाचा शब्दागणिक कमकुवत होत होता, जखमी होत होता. आता माझ्या
लक्षात आलं. या तरूणांकडून होणारे दुर्लक्षाचे वार थेट त्याच्या धैर्यावर होत
होते. धैर्य जे त्यानं जुळवलं होतं – या सर्वांसमोर उभं राहण्यासाठी. समोरचा आपलं
ऐकणार नाही हे माहीत असताना ते सांगण्यासाठी, विजयाने बाहेर निघता येणार
नाही हे माहिती असताना चक्रव्यूहात घुसण्यासाठी, लागतं ते धैर्य . . .
त्याने काहीतरी सांगायला निडर आवाज पुन्हा वठवला. विझताना दिवा जास्त पेटतो
तसा त्याचा वाढलेला आवाज ऐकून मला अचानक वाटलं हा मघाच्या त्याच पोराचा बाप तर
नसावा?
“तुलाच कळलं रे
मित्रा, तुलाच कळलं!” असं म्हणून त्याने
अचानक मला मिठी मारली. माझ्या डोळ्यात काहीतरी पाहून. करकचून. “मोठा हो रे बाबा . . . मोठा
हो . . .”
म्हणाला आणि इतका वेळ लढत असणारा तो एकाएकी पाझरला.
प्रश्न फक्त इतकाच होता की
नव्या पिढीच्या माझ्या दगडी काळजातून पाझर आत जाऊन कितपत नंदनवन फुलवू शकणार होता? आणि तो पाझरला.
• संदर्भ :
१) छायाचित्र – टाकबोरू
• वाचत रहा