[वाचनकाल : ७ मिनिटे]
भारतीय जनमानसात सौंदर्याची नवी कल्पना पेरत कायमचं आपल्या अभिनयाने हृदयात स्थान पटकावलेल्या ‘मधुबाला’चा जन्म, बालकलाकार म्हणून पदार्पण आणि पहिल्या चित्रपटाची कहाणी सांगितली ती पूर्वार्धात. बाॅलिवूडला पडलेलं ‘मधुबाला’ नावाचं रुपेरी स्वप्न आज मावळलं. त्यानिमित्त हा उत्तरार्ध . . .
महल जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा मधुबालाचं वय होतं अवघं सोळा वर्षं! याच
वर्षी प्रकाशित झालेल्या ‘सिंगार’ मधील १६ वर्षाच्या मधुबालाचा कोवळा सिंगार आणि
अभिनय प्रेक्षकांना भावला. त्यानंतर १९५० साली मधुबालाचे ‘बेकसूर’, ‘हसते आँसू’, ‘परदेस’, ‘निशाना’, ‘निराला’ व तिच्याच नावाने ‘मधुबाला’ हे चित्रपट प्रकाशित
झाले. ‘मधुबाला’ या चित्रपटात काम
करताना तिला उपकाराच्या ओझ्यातून उतरल्यामुळे कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते.
त्याचे कारणही तसेच होते.
रणजीत फिल्म कंपनीमधे बालकलाकार म्हणून काम करीत असताना
तिचे मानधन वाढत जाऊन पाचशे रूपयापर्यंत येऊन ठेपलेले होते. त्यावेळी तिची आई
भरपूर आजारी होती. तिला लवकरात लवकर चांगल्या दवाखान्यात हलवून उपचार करायला हवेत, असा सल्ला
डॉक्टरांनी दिला; पण त्यासाठी भलीमोठी रक्कम लागणार होती. यावेळी ‘रणजीत’चे मालक चंदूलाल शाह यांचा
पुतण्या रतिलाल यांनी तिला पैशांची मदत केली होती. रतिभाईंनी केलेल्या उपकारांचे
ओझे ती आपल्या डोक्यावर घेऊन निमूटपणे वावरत होती.
काळ बदलला आणि एकेकाळी चित्रपटसृष्टीमधे अगदी दिमाखाने
वावरणारे चंदूलाल शाह कर्जबाजारी झाले. ‘रणजीत’ स्टुडिओची बाजारातली पत एकदम कमी झाली आणि मधुबाला
यशाच्या शिखरावर होती. या काळात रतिभाईंनी मधुबालाकडे चित्रपटाचा प्रस्ताव मांडला.
मधुबालाने अजिबात विचार न करता रतिभाईंचा प्रस्ताव स्वीकारला. एवढेच नव्हे, तर तिच्या नेहमीच्या
रितीरिवाजाप्रमाणे ॲडव्हान्स न घेता ती या चित्रपटात विनाअट काम करायला तयार झाली.
‘मधुबाला’ या चित्रपटाच्या निमित्ताने भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन मोहक आणि देखणे
कलाकार पहिल्या प्रथम एकत्र आले. मधुबाला आणि देव आनंद. या दोघांच्या ‘निराला’ या चित्रपटातील ‘टुटी फूटी गाडी अनाडी
चलैय्या’ ह्या गाण्यातली
मधुबालाची अवखळ अदाकारी कित्येक वेळा बघूनही परत परत बघावीशी वाटते. त्यानंतर या
दोघांनी ‘नादान’, ‘आराम’, ‘जाली नोट’, ‘काला पानी’ यांसारखे अनेक
चित्रपट केले.
१९५१ ला आलेला ‘बादल’ प्रेमनाथ आणि मधुबाला या जोडीचा पहिला चित्रपट. ‘रॉबिन हुड’ची कथा असलेल्या ‘बादल’मध्ये शंकर-जयकिशनची बेहतरीन
गाणी होती. ‘उनसे प्यार हो गया’, ‘दो दिन के लिये
मेहमान यहाँ’
ही मधुबालावर चित्रित झालेली गाणी विशेष उल्लेखनीय होती. याच काळात
दिलीपकुमार आणि मधुबाला यांचा ‘तराना’ फ्लोअरवर आला. माझ्या मते, खऱ्या, निरागस, मनस्वी प्रेमाचं
दर्शन मधुबालाने ‘तराना’ या दिलीप कुमारबरोबरच्या चित्रपटात घडवलं आहे. ‘तराना’मध्ये मधुबालाचं आवडतं कोकरू
‘सैंया’बरोबरचा सीन मूड रिफ्रेश
करून जातो. ‘डॉ. मोती’ झालेला दिलीप कुमार
आपल्या आईचं पत्र वाचत असताना, मधुबालाच्या सौंदर्याचं वर्णन करत म्हणतो,
‘उसके जैसी आँखें, वो खुबसूरत नाक, वैसे गुलाबी होंठ मैनें तो
आज तक दुनियां में नहीं देखे! वो लड़की नहीं मोती, आसमान से चांद का एक तुकड़ा
जमीं पर आ गया है!’
तेव्हा मधुबालाचं आरस्पानी लावण्य आणखीनच खुलून दिसतं.
यातील अनिल विश्वास यांनी दिलेल्या संगीताने या चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेऊन
ठेवले. ‘सीनेमें सुलगते हैं
अरमाँ - आँखोंमे उदासी छाई है’ हे तलत व लताने गायलेलं प्रेम धवनचं गाणं खरा ‘तराना’ बनू लागलं. ‘तराना’ मधल्या त्या
दोघांच्याही वास्तववादी अभिनयामुळे हा सिनेमा प्रचंड गाजला. याच सुमारास म्हणजे
ऑगस्ट १९५२ मध्ये मधुबाला अमेरिकन मासिकात, थिएटर आर्ट्समध्ये, ‘THE BIGGEST STAR IN
THE WORLD - and she's not in Beverly Hills’ या शीर्षकाखाली दिसली आणि
भारतातील तिच्या प्रचंड लोकप्रियतेचे वर्णन केले गेले.
१९५६ मध्ये, मधुबालाने प्रदीप कुमारच्या ‘शिरीन-फरहाद़’ आणि ‘राज हठ’ सारख्या
चित्रपटांमध्ये काम केलं. ह्या चित्रपटांतून मधुबालाची ‘मेरे सपने मे आना रे’, ‘ये वादा करो चांद के
सामने’, ‘गुजरा हुवा जमाना’ ही गाणी म्हणजे कान
व डोळे यांना मेजवानीच होती.
१९५९ मध्ये ‘कल हमारा है’ या सामाजिक चित्रपटात मधुबालाने डबल-रोल साकारला.
भारत भूषणबरोबर ‘कल हमारा है’ सोबतच मधुबालाचे ‘गेटवे ऑफ इंडिया’, ‘फागुन’ व ‘बरसात की रात’ असे चार चित्रपट आले व ह्या चित्रपटांतली अनेक गाणी
अजरामर झाली आहेत! ‘फागुन’मधल्या ‘एक परदेसी मेरा दिल ले गया’ व ‘पिया, पिया ना लागे मोरा जिया’ या गाण्यांनी लोकांचं मन
जिंकलं होतं. याच चित्रपटातील ‘मै सोया अखियाँ मिचे’ या गाण्यात मधुबालाचे
अप्रतिम ‘क्लोज-अप’ शॉटस् आहेत. तिच्या
सान्निध्यात असणारे लोक सांगायचे की, मधुबाला कॅमेऱ्यामधून दिसते त्यापेक्षा कैक पटीने
सुंदर होती! ‘जिंदगीभर नही भुलेंगी’ ह्या ‘बरसात की रात’ या चित्रपटातल्या गाण्यातून
साहीरने केलेलं तिचं वर्णन किंवा ‘संगदिल’ चित्रपटात ‘ये हवा ये रात ये चांदनी’ या गाण्यात गीतकार
राजेंद्र कृष्णने केलेल्या वर्णनापेक्षाही मधुबालाचं लावण्य लोभस होतं!
निराला मधलं ‘महफिल में जल उठी शमा’, ‘आराम’मधलं ‘मन में किसी की प्रीत बसा ले’, ‘नादान’मधलं ‘अच्छा होता जो दिल में’, ‘अरमान’मधलं ‘चाहे कितना तुम मुझे भुलाओं
जी’, ‘काला पानी’मधलं ‘अच्छा जी मैं हारी’, ‘जाली नोट’मधलं ‘चांद सर्द सर्द है’ ही मधुबालावर
चित्रित झालेली गाणी कोणीही विसरू शकणार नाही! १९५८ मध्ये आलेल्या ‘हावड़ा ब्रीज’ मध्ये तर तिनं धमाल
करून सोडली होती. ओ. पी. च्या ठसकेबाज गाण्यावर ती रंगात आली होती. ‘ऐसी मोहब्बत से हम बाज आए’ (निराला), ‘प्रीतम आन मिलो’ (मिस्टर अँड मिसेस ५५
), ‘इश्क में जो कुछ न
होना था’
(साकी), ‘दो दिनके लिए मेहमान यहाँ’ (बादल) या दुःखी गाण्यात मधुबाला मूर्तिमंत
कारूण्यमूर्ती दिसते.
१९५८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटातील ‘हाल कैसा है जनाब का’ ह्या गाण्याच्या आधी, मधुबाला, किशोर कुमारला
कोंबडी धरायला पाठवते तेव्हाचं खळाळणारं हास्य, बॉलिवूडच्या इतिहासात
आजपर्यंत कोणीही दाखवू शकलेलं नाही! मधुबाला कित्येक वेळा फक्त नजरेने बोलतेय असं
मला वाटतं. १९५५ च्या ‘नाता’ चित्रपटात ‘लगन लगी है सजन मिलन की’ ह्या गाण्यानंतर ती
स्टेशनवर उभी असते. गावाहून परत येणाऱ्या अभी भट्टाचार्यला शोधताना तिची आतुरलेली
नजर व अभी भट्टाचार्य लग्न करून बायकोला घेऊन आलाय हे बघितल्यावर चेहऱ्यावरचे बदलणारे
भाव बघून आपलं काळीज हलतं!
१९६० मध्ये प्रकाशित झालेला ‘मुघल-ए-आझम’ पहाताना मधुबाला ‘अनारकली’च्या व्यक्तिरेखेशी अतिशय
एकरूप झाल्या सारखं वाटतं. ‘मुघल-ए-आझम’ने तिला एक अभिनेत्री म्हणून स्वतःला परिपूर्ण करण्याची
संधी दिली,
कारण अनारकलीची अशी भूमिका साकारणे कित्येक अभिनेत्रींचे स्वप्न असते.
याआधी पडद्यावर अनेक अनारकली दिसल्या होत्या. तिचं पात्र लोकांसाठी नवीन नव्हतं.
ही बहुचर्चित व्यक्तिरेखा साकारणं आणि ती यशस्वी करणं हे आव्हान होतं. परंतु, जेव्हा मधुबाला
अनारकलीच्या रूपात पडद्यावर आली, तेव्हा सर्व शंका दूर झाल्या. मुघल-ए-आझमच्या पडद्यावर
मधुबालाचे पहिले दर्शन होते ते संगमरवरी पुतळ्याच्या वेशात. अकबराच्या राज्यामध्ये
एक जिद्दी शिल्पकार राहत असतो. पैशासाठी तो आपल्या कलेचा व्यापार मांडायला तयार
नसतो. तरूण सलीम अनेक राजांशी युद्ध करून परत दिल्लीमध्ये येणार असतो. त्यावेळी
त्याच्या स्वागतासाठी जे अनेक कार्यक्रम ठरवलेले असतात त्यामध्ये त्याला
पुतळ्याचेही अनावरण करायचे असते. पण शिल्पकाराच्या हातून तो पुतळा तयार होत नाही.
तेव्हा तो त्या ठिकाणी एका खऱ्या स्त्रीलाच आणून उभी करतो, असा हा प्रसंग.
या दृश्यासाठी मेकअप करताना मधुबालाला दररोज कित्येक तास
खर्च करावे लागत. तिचं पूर्ण शरीर चिकणमातीसारख्या रासायनिक पदार्थाने लिंपून
टाकले जात. त्यामुळे मधुबालाला कित्येकदा श्वास घ्यायलाही त्रास होत असे. शिवाय
तिला त्यावेळी दिलेला पोशाख दगडासारखा कठीण दिसावा म्हणून तो रबराचा बनवला होता.
त्यावर रंगाचे लिंपण केलेले होते. असा पोशाख परिधान केलेली मधुबाला खरोखरीच दगडाचा
पुतळा असावी असे कुणालाही वाटले असावे. हा पुतळा पाहून मूर्तिकाराची तारीफ करणार्या
अकबराला सलाम करायला मधुबाला पुढे येते तेव्हा अक्षरश: संगमरवराचा पुतळाच सजीव
होतोय असं वाटतं. अकबर तिला विचारतो, ‘लेकिन, तीर चलते वक्त तू खामोश क्यों रही?’ यावर ती उत्तर देते, ‘कनीज देखना चाहती थी
की, अफसाने हकीक़त में
किस तरह बदलते हैं।’ तिच्या या उत्तराने अकबर खुश होतो आणि या खुशीतच तो तिला ‘अनारकली’चा किताब बहाल करतो. ‘मुगल- ए-आझम’ मधल्या मधुबालाच्या
या प्रथम दर्शनाने प्रेक्षकांच्या मनात तिची प्रतिमा खूप उंचावून जाते.
१९४९ मधील ‘पारस’ चित्रपटात ‘प्रिया’ (मधुबाला) मानसिक
धक्क्याने मुकी होते. कोर्टामध्ये ती साक्ष द्यायला येते तेव्हा, तिची वाचा परत येते
व जज् तिला विचारतो ‘राम का खुन किसने किया?’ तेव्हा मधुबाला ‘मैंने...’ असं करारी मुद्रेने
त्यांना सुनावते या प्रसंगातील तिची ती करारी, डिफायंट मुद्रा आपल्याला
पुन्हा दिसते ती ‘मुगल-ए-आझम’मध्ये ‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्यात सर्वांसमक्ष अनारकली सलीमवरचं प्रेम व्यक्त
करते तेव्हा.
मधुबालाचं डायलॉग म्हणणं, संवादाची फेक याची अदाच
निराळी होती. कधी लटके संवाद तर कधी गंभीर, कधी तरल तर कधी अवखळ अशा
सगळ्या प्रकारचे संवाद बोलताना तिची अदाकारी बघून घ्यावी. सलीमचं पत्र वाचताना ती
प्रथम दार बंद करून घेते, एका कोपऱ्यात जाऊन पत्र वाचताना त्याने लिहिलेलं ‘मरते है’ वाचण्यापूर्वी अगदी
धीम्या आवाजात ‘खुदा ना करे!’ म्हणते, तो क्षण मधुबालाप्रेमींनी हृदयात जतन करून ठेवला आहे!
असाच एक हृदयाशी जपलेली सीन आहे ‘हम भी देखेंगे’ या कव्वालीनंतरचा.
हातात गुलाबाचे फुल घेऊन शहजादा सलीम फैसला करायला उठतो. तो देठापासून फूल तोडून
ते फुल बहारच्या हातात देतो आणि अनारकलीच्या हातात तो फुलाचा काट्यांनी भरलेला देठ
देताना म्हणतो, ‘तुम्हारे हिस्से में ये कांटें आये है।’ व ती ‘ज़ह-ए-नसीब़’ म्हणत ते स्वीकारते
आणि पुढे म्हणते;
‘काटों को मुरझाने का खौंफ़ नहीं होता।’
निव्वळ अप्रतिम!
१९५४ मध्ये ‘बहुत दिन हुवे’साठी मधुबाला शूटिंगसाठी मद्रासला गेली होती. दोन
दिवसांच्या कामानंतर अचानक खोकल्यामुळे ती खूप आजारी पडली. दुसऱ्यादिवशी सकाळी
तिने खोकल्याची उलटी केली आणि तिच्या आजारीची बातमी सगळीकडे पसरली. मधुबालाला ‘Congenital Cardiac
Defect’ होता. संभवत: तिच्यात एट्रियल सेप्टल डिफेक्ट होता. म्हणजे हृदयाच्या
तिच्या कर्णिकांच्या मधोमध असलेल्या पडद्याला (सेप्टम) छिद्र होतं. ज्यामुळे
डाव्या कर्णिकेतील शुद्ध रक्त त्या छिद्रातून उजव्या कर्णिकेत अतिरिक्त प्रमाणात
जात राहिलं आणि परिणामी अशुद्ध रक्ताचा फुफ्फुसांकडे जाणारा प्रवाह वाढून नको इतका
रक्तदाब वाढला.
याचा परिणाम साधारण वयाच्या तिशीच्या आसपास दिसू लागतो आणि
तसंच झालं. डॉक्टर्सनी जास्तीत जास्त २-३ वर्ष आयुष्याची शक्यता बोलून दाखवली
होती. पण जबरदस्त इच्छाशक्तीचं वरदान असलेल्या मधुबाला आणखी ९ वर्ष जगली.
यातील पहिल्या ४ वर्षांत तिनं ‘झुमरू’, ‘पासपोर्ट’, ‘हाफ टिकट’ आणि ‘शराबी’ पूर्ण केले. १९६६
साली जे. के. नंदा यांनी राज कपूर व मधुबालाला घेऊन ‘चालाक’ सुरू केला. पण एका
दिवशी मधुबाला सेटवरच खाली कोसळली. तिच्या कमकुवत हृदयानं तिच्या इच्छाशक्तीपेक्षाही
आपण अधिक चलाख असल्याचा धोक्याचा इशाराच जणू दिला होता. यानंतर मधुबाला जवळजवळ
अंथरूणाला खिळल्यासारखीच झाली. १४ फेब्रुवारी १९६९ च्या तिच्या ३६ व्या
वाढदिवसानंतर आठ दिवसात मधुबालाची तब्येत आणखीनंच ढासळत गेली. अखेर २३ फेब्रुवारी
१९६९ ला तिचं हृदय थांबलं. एक आरस्पानी लावण्य अनंतात विलीन झालं.
मधुबालाने तिच्या ३६ वर्षांच्या आयुष्यात एकूण ७३ चित्रपटांत काम केलं. या
प्रत्येक चित्रपटाबद्दल बरंच काही लिहिता येण्यासारखं आहे. परंतु ‘मधुबाला — हर रिअल लाईफ्
स्टोरी’ या मंजू गुप्ता
यांच्या पुस्तकातील पत्रकार ‘जेरी पिंटो’ यांचं मत वाचलं होतं ते शेवटी नमूद करतेय. जे अतिशय समर्पक वाटतं,
‘Why is she still on
everyone's list of wonderful Indian actresses? She was stunningly beautiful . .
. she was a brilliant actress who could bring you to tears with 'Mohabbat ki
jhooti kahani pe roye . . .’ Think of Madhubala and your memory turns into a
kaleidoscope. Rain-drenched in ‘Chalti ka Naam Gaadi’; love-drenched as a
feather teases her cheek in ‘Mughal-e-Azam’; the heiress who must marry to
satisfy the conditions of her father's will in 'Mr. & Mrs. '55'. There is a
certain sensuousness that fills those memories. It is not just the appreciation
of a lovely body; it isn't just that midriff in ‘Mohe panghat pe Nandalal . .
.’ It's the comfort with which she seemed to live in that body.’
• संदर्भ :
• वाचत रहा :
खूपच छान माहिती. आज मधुबालाच्या चित्रपटांची आठवण येऊन उगाचंच हळवं व्हायला झालं.
उत्तर द्याहटवाखरंय. तिची आठवण आपल्या हृदयात एखाद्या शिल्पासारखी कोरली गेलीय . . .🌼
हटवा