अनवट येसुदास — भाग ४

[वाचनकाल : ४ मिनिटे] 

येसुदास भारतीय गायक, yesudas indian singer
दोस्तमंडळींत बसून ‘जो वादा किया वह निभाना पडेगा’ पासून ‘जो बात तुझमे है तेरी तस्वीरमें नही’ पर्यंत रफीची सारी लोकप्रिय गाणी तो मनापासून गायचा. 

कालजयी युगुल गीतांनी आजही जनमाणसांवर राज्य करणारा हा आवाज तरूणाईत तर विशेष नावाजला जातो. ‘मेरे दो नयन चोर नही सजन’ असो की ‘माना हो तुम बेहद हसीं, ऐसे बुरे हमभी नहीं’ अशी भरपूर सर्वांनाच भावतात. ‘मोहब्बत बडे कामकी चीज है’ म्हणणारा गायक डॉक्टर कट्टासरी जोसेफ म्हणजे येसुदास . . .
 
 
हा गंधर्व जेव्हा आपल्या भात्यातून एखादा उदास सूर काढून प्रत्यंचेवर चढवतो, तेव्हा त्याचं भारदस्त मलमली दुःख काळजाला घरं पाडत नाही, उलट एकाकीपणाच्या आत्मघाती वावटळीशी झगडताना एक दिलासाच घेऊन येतं.
 
चलो मन, जाए घर अपने . . .
इस परदेसमें और परभेसमें, क्यों परदेसी रहे?
आंख जो भाए वह कोरा सपना,
सारे पराये हैं कोई न अपना,
ऐसे झुठे प्रेममें पडना, भूलमें काहे जिए?
 
डोळ्यांना भावणारं सगळं काही खरं मानू नये रे वेड्या मना . . . मना रे माझ्या, तू शोधत आहेस ती ‘साचे प्रेम की ज्योत’ आता तुला मिळणार तरी कुठं? ऐक माझं . . .
‘पाप और पुण्य की गठरी उठाके अपनी राह चले’ हेच बरं नाही का, मना रे माझ्या? ‘परदेस में’ आणि ‘परभेस में’ रमू नकोस, शारीर आसक्ती सोडून निःसंग हो, आत्म्यानं कात टाकण्याची घटिका समीप आली.
एकतारी-टाळ-जलतरंगांच्या संथ गजरासह हे ऐकण्याची बातच काही और.
येसुदासहून चार वर्ष लहान ‘एस्.पी. बालसुब्रमण्यम्’ म्हणजे येसुदासचा महत्त्वपूर्ण समकालीन. ‘फॉर मी, बालू वॉज नॉट जस्ट अ कलिग, बट माय ओन लिट्ल ब्रदर!’ असे भावूक उद्गार येसुदासनं २०२० साली एका अल्बम प्रकाशनाच्या निमित्ताने काढले होते. ‘सुन सजना मेरा मन प्यासा था, प्यासाही रहेगा’, ‘आपने मुझमे क्या देखा, हमने तुझे खुदा देखा’ अशा गीतांमध्ये बालसुब्रमण्यमचा थेट प्रभाव दिसून येतो.
 
श्यामरंग रंगा रे, हर पल मेरा रे,
मेरा मतवाला है मन, मधुबन तेरा रे!
 
हे येसुदासचं किंचित दाक्षिणात्य लहेजातलं उत्तरीय कृष्णभक्तिगीत ऐकलं तर याची प्रचिती येते. मात्र कर्नाटकी संगीताप्रमाणेच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावरही प्रभुत्व असल्यानं मधाळ उच्चारांबाबत सारखीच उंची असूनही येसुदास बालसुब्रमण्यमहून वेगळा ठरतो. उदाहरणादाखल,
 
माना हो तुम बेहद हसीं, ऐसे बुरे हमभी नहीं!
देखो कभी तो प्यारसे, डरते हो क्यों इकरारसे
तुम दो कदम दो साथ अगर, आसान हो जाए सफर . . . छोडो भी यह दुनिया का डर, तोडो न दिल इनकारसे!
 
या गाजलेल्या गीतातल्या ध्रुवपदावर येसुदासनं घेतलेले आरोह-अवरोह अक्षरशः अप्रतिम!
खरं पाहता, येसुदासच्या आवाजाची जातकुळी निराळी. त्याचा शालीन स्वर हिंदी सिनेसृष्टीत अभावानंच दिसणाऱ्या लाजऱ्याबुजऱ्या नायकालाच शोभेल असा. मात्र हिंदीतलं त्याचं पहिलंवहिलं पार्श्वगीत होतं दिग्गज आशासमोर!
 
मेरे दो नयन चोर नहीं सजन!
तुमसेही खोया होगा कहीं तुम्हारा मन,
जानेमन, जानेमन, जानेमन!
 
असं खोडकर आवाजात सुनावणाऱ्या आशानंच तिथं बाजी मारली खरी, पण खोटी आश्वासनं देऊन पदर वाचवणाऱ्या प्रेयसीवर लटका राग काढणारा मध्यमवर्गीय नायक येसुदासनंही उत्कृष्टरीत्या साकारला!
 
तोड दे दिलों की दूरी, ऐसी क्या है मजबूरी,
दिल दिलसे मिलने दे!
अभी तो हुई है यारी, अभीसे यह बेकरारी,
दिन तो जरा ढलने दे!
यही सुनते समझते गुजर गए जाने कितनेही सावन!
छेडेंगे कभी न तुम्हे, जरा बतलाओ हमे,
कब तक हम तरसेंगे?
ऐसे घबराओ नहीं, कभी तो कही न कही,
बादल ये बरसेंगे!
क्या करेंगे बरसके की जब मुरझाएगा यह सारा चमन?
 
‘छोटीसी बात’ मधलं हे गिटार-सॅक्सोफोन-बासरीच्या उडत्या चालीचं जबराट व्दंव्दगीत कोणत्याही निराश क्षणी चित्तवृत्ती प्रसन्न, उल्हसित बनवतं.‘भार्या’ ह्या पहिल्या चित्रपटात सलील चौधरीच्या संगीतासह गायक म्हणून पाऊल ठेवणाऱ्या येसुदासला अल्पावधीतच आघाडीचा नायक ‘प्रेम नझीरचा आवाज’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तिघांचं घट्ट मेतकुट जमून सलील-येसुदास-नझीर असं मस्त त्रिकुट बनलं. साठच्या दशकात कॉलीवुड गाजवल्यानंतर येसुदासनं सत्तरच्या दशकात बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं, त्याआधीपासूनच तो मोहम्मद रफी यांचा निस्सीम भक्त होता. समकालीन गायक जयचंद्रन याच्या आग्रहावरून दोस्तमंडळींत बसून ‘जो वादा किया वह निभाना पडेगा’ पासून ‘जो बात तुझमे है तेरी तस्वीरमें नही’ पर्यंत रफीची सारी लोकप्रिय गाणी तो मनापासून गायचा. जी. देवराजन, एस. बालचंदर अशा गाजलेल्या दाक्षिणात्य संगीतदिग्दर्शकांसह आलेल्या अनुभवांची शिदोरी त्याला पुढं कायम उपयोगी पडली. रवींद्र जैन, खयाम, राजकमल, जयदेव यांसारख्या दिग्गज हिंदी संगीतकारांसह काम करत त्यानं भारतीय सिनेसृष्टीवर स्वरांचं गारूड घातलं. असं असलं तरी, काही गीतांमध्ये सिनेविश्वातल्या पूर्वसूरींनी किंवा अगदी इतर समकालीनांनीही मागं सोडलेला ठसा नव्यानं निर्माण करण्याची कसोटी त्याच्यासमोर कायमच दत्त म्हणून उभी राहिली. उदाहरणार्थ, 
 
तेरी पीड़ा से जो पिघले ये नहीं ये नहीं कोई और है . . .
    ए मेरे उदास मन, चल दोनो कही दूर चलें,
मेरे हमदम, तेरी मंजिल, यह नहीं, यह नहीं, कोई और है! पत्थरभी कभी एक दिन, देखा है पिघल जाते हैं,
बन जाते हैं शीतल नीर, झरनोंमें बदल जाते हैं,
तेरी पीडासे जो पिघले, यह नहीं, यह नहीं, कोई और है!
 
या गीतात ‘ऐ मेरे दिल कहीं और चल गमकी दुनियासे दिल भर गया’मधल्या तलतची तळमळ नाही. कदाचित भ्रमनिरासानं थकल्या-दुखावलेल्या स्वरातलं हे गाणं किशोरला अधिक शोभलं असतं का? माहीत नाही. ‘मोहब्बत बडे कामकी चीज है’ या गाण्यातही किशोरच्या स्वप्नवेल्हाळ आवाजासमोर,
 
किताबोंमें छपते हैं चाहतके किस्से,
हकीकतकी दुनियामें चाहत नहीं है . . .
ये बेकार बेदामकी चीज है!
 
हे येसुदासचं निर्विकार प्रत्युत्तर फिकं भासतं. पण मग ते फिकं भासावं अशीच या गीताची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. ‘आलाप’ चित्रपटातही अमिताभच्या ओठी एक गाणं आहे,
 
जिंदगीको सवारना होगा, दिलमें सूरज उतारना होगा! जिंदगी रात नहीं, रातकी तस्वीर नहीं,
जिंदगी सिर्फ किसी जुल्फकी जंजीर नहीं,
जिंदगी बस कोई बिगडी हुई तकदीर नहीं,
जिंदगीको निखारना होगा, दिलमें सूरज उतारना होगा!
 
आता यात किशोरच्या ‘रूक जाना नहीं तू कहीं हार के’ किंवा अगदी लताच्या ‘छोड दे सारी दुनिया किसी के लिये’ सारखी खुमारी नाही. तरीही येसुदासच्या मुलायम सुरांनी अशा कैक गीतांमध्ये आपली अशी खास जादू घडवली आहे.
उदाहरणार्थ, ‘ओ गोरिया रे! तेरे आनेसे सज गई हमरी यह टूटीफुटी नाव!’ या गाण्यात तर ‘ओह रे ताल मिले नदीके जल में’ मधल्या मुकेशचा सरळ-सरळ आभास निर्माण होतो. पण याच गाण्यातल्या अंतिम अंतऱ्यातले बोल पाहा,
 
सबको किनारे पहुंचाएगा,
मांझी तो किनारा तभी पाएगा!
गहरी नदीका ओर न छोड,
लहरोंसे ज्यादा मनवामें शोर!
किती प्रामाणिक सूर हा!
 
किती प्रामाणिक सूर हा! ‘ओ मांझी रे, अपना किनारा नदियाकी धारा है!’ मधल्या किशोरइतका स्वच्छ, दाणेदार नसला तरी येसुदासचा ईश्वरी स्वर इथं रसिकमन मोहून टाकतो आणि शब्दांची गहनता नव्या उंचीवर नेऊन ठेवतो यात शंकाच नाही.

 
• संदर्भ :
१) छायाचित्र – टाकबोरू
 
• वाचत रहा :


आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال