‘व्हॅलेंटाईन डे’ला चोरून वाचण्याची प्रेमपत्रे

[वाचनकाल : ६ मिनिटे] 
लपून-छपून व्हॅलेंटाईन पत्र वाचणारा मुलगा, boy reading letters of valentine day

काही गोष्टी लपूनच करायच्या असतात जसे की प्रेम! आणि या प्रेमात पडण्यासाठी/पाडण्यासाठी ज्या पत्रांची देवाणघेवाण होते तीही लपूनच व्हायला हवी!‌ कधीतरी मात्र ही पत्रे कोणाच्या हाताला लागली तर सगळाच बट्ट्याबोळ! वरून गरम आणि आतून नरम असणाऱ्या काही (अ)राजकीय नात्यांचा हा नर्मविनोदी बट्ट्याबोळ . . .
आज 'व्हॅलेंटाईन डे' असला म्हणून काय झाले ?

माणसाने दुसऱ्याची पत्रे चोरून वाचू नयेत असा संकेत आहे. दुसऱ्याची प्रेमपत्रे चोरून वाचणे हे तर पाप आहे; पण अमृत-काळात सगळेच चव्हाट्यावर धुण्याची अमृत-प्रथा जन्मास आली आहे. आणि अमृत-काळाचे खंदे (अंधे नव्हे खंदे!) समर्थक असल्याने या प्रथेत आम्ही आमचा सहभाग नोंदवत आहोत.
     अमृत-काळात ‘व्हॅलेंटाईन डे’च्या प्रातःसमयी आमचे हाती काही निवडक प्रेमपत्रे लागली. त्यातील आणखी काही निवडक तुमच्यापर्यंत आणीत आहोत. दुसऱ्यांची प्रेमपत्रे न वाचण्याची नैतिकता गुंडाळून ठेवण्याची अमृतकालीन आत्मनिर्भरता तुम्हाला प्राप्त झाली असेल तर तुम्ही ही विरहपत्रे वाचून आत्मबोध घेऊ शकता.


• पहाटेचे पत्र

रात्रभर मिरची होम-हवन करून, त्याच्या धुराने डोळे लालेलाल होऊन, पुन्हा पहाटे आपण दोघांनी कोशियारी आजोबांच्या साक्षीने शपथा घेतल्या. आपल्या दोघांत काय चालले होते हे दुनियेला कळू न देता आपण आणाभाका घेतल्या. ‘जळणारे जळतील’ असे समजून त्या खुशीत मी चंद्रकांत दादांना पण अंधारात ठेवले. पण हाय रे दैवा! औट घटकेचे माझे मुख्यमंत्रीपद तुम्ही औटच केलेत दादा. तेव्हा जी मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली, ती गुवाहाटी पलायनानंतरही कायम राहिली. कष्ट आमचे फळ मात्र पडले नाथरावांच्या ताटात. मी रोज झुरतोय. पहाटेच्या त्या आठवणी आठवत रात्रीची झोप उडतेय. पुन्हा कधी ती पहाट उगवेल का?

पुन्हा आपले जुळेल का? 
खुलता कळी खुलेल का? 

‘मुख्य’ वरून ‘उप’ ही घसरगुंडी आता सहन होत नाही आणि कोणाला सांगताही येत नाही. किती विरह सहन करावा प्रेमिकाने? पुन्हा ती रम्य पहाट उगवो व पुन्हा आपण दोघे एकत्र येऊन जोडीने शपथ घेवो हीच त्या व्हॅलेंटाईन चरणी प्रार्थना.


• भरपेट नाष्ट्याचे पत्र

ठाण्याहून रात्रीत सुरतमार्गे गुवाहाटी काय गाठली, नागपूरहून डाव साधला गेला. फक्त हवाबदल म्हणून गुवाहाटीला येणे केले होते. तसा त्यांचा आधीपासून डोळा होताच माझ्यावर, त्यांचे घराणे मातब्बर, पैशाने मजबूत – महाशक्तीच म्हणाना! नको-नको म्हणताना रोज रात्री भेटायला यायचे, तेही वेश बदलून! मलाही भूल पडली. आता कुठलेच स्वातंत्र्य उरले नाही. ‘काय बोलायचे’ याची वाक्येही लिहून मिळतात. बोलायला लागल्यावर माईक खेचून घेतात. कधी मिळेल पुन्हा मला माझे स्वातंत्र्य? नेशील का मला इथून पळवून तू? खूप कडा पहारा असतो इथे‌ . . . नावाला ‘मुख्य’ पण परिस्थिती अंगवस्त्रासारखी झाली आहे. पुन्हा आपले प्रेम जुळेल काय? मानाने ताठ मान होईल काय? आजही स्वप्नं तुझीच पडतात.
      ‘व्हॅलेंटाईन डे’ आधी तर तुझ्या आठवणीत रात्र जागवली. नजर चुकवून तुझ्याकडे पळून यायला आवडेल – पळण्यात पटाईत झालोय – तू बस 'हो' म्हण! 

काय पद, काय खुर्ची, काय सत्ता? 
तुझ्यासाठी सोडून येईन सगळं! 
 

• दुपारी उशिराचे पत्र

‘लाव रे तो व्हिडिओ’ हे शब्द जरी कोणी आता उच्चारले तरी खुपते. वो दिन भी क्या दिन थे! स्टेज तुमचा, गर्दी आमची. मुलाखत तुमची, प्रश्न आमचे. घड्याळाच्या टिकटिक बरोबर आठवणाऱ्या एकेक आठवणी. पूर्ण भाषणाचे लाईव्ह प्रक्षेपण आणि ते धमाल व्हिडिओ. पण शत्रूने चिडीचा डाव खेळला (ईडीचा नव्हे चिडीचा)! आणि मला आपले प्रेमसंबंध सोडून त्यांच्याशी गाठ बांधावी लागली. तिथे आता मी उरलो फक्त सूचना आणि मध्यस्थीपुरता. ‘ही निवडणूक बिनविरोध करा’, ‘यांना आवाहन करा’, ‘टोल बंद करा’, ‘भोंगे बंद करा’, ‘इंग्रजी पाट्या बंद करा’ इतकेच! अजूनही माझे मन तुमच्याचसाठी झुरते, हे संबंध तोडून पुन्हा यावेसे लाख वाटते, पण आता ते जमेलसे वाटत नाही. मला विसरून जा. तुला माझ्यापेक्षा चांगला पार्टनर मिळेल . . . पाहू पुढच्या जन्मात पुन्हा एकत्र येता आले तर . . . ‘व्हॅलेंटाईन दिनी’ तेवढीच एक इच्छा!


• भरपेट जेवणवेळचे पत्र

हिंडनबर्गजी अमेरिकावाले,
                  तुम्हास प्रेमभरली आलिंगने. चोरून पत्र लिहीत आहे. कधीपासून निरखत आहे. आज ‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त प्रेमपत्र लिहायचे धाडस करत आहे. कित्ती-कित्ती कौतुक करावे तुमचे . . . कसे जमते हे तुम्हांस? म्हणजे सगळा धमाका करायचा, तोही सत्तेत असलेल्यांबद्दल. विरोधी पार्टीबद्दल नाही. वर पुरावे द्यायचे. वर शॉर्ट सेलिंग करून घबाडही कमवायचे. माझे घोडे इथेच पेंड खाते! मी केवळ विरोधी पार्टीतल्या लोकांची प्रकरणे बाहेर काढतो. आधीच ते डिक्लेअर करून शॉर्ट सेलिंग पण करतो. मात्र तुला त्यातून जसे घबाड मिळते, तसे मला काहीच का मिळत नाही – पार्टीला मिळते रे – माझे काय? त्यात आता इथले वात्रट लोक मला ‘गरीबांचा हिंडणबर्ग’ म्हणून हिणवतात. माझा चेहरा लाजून चूर होतो. तुझ्या पिरतीचा लालिमा तो. लोकांना वाटतं मी चिडलो; पण चोरट्या प्रेमाची हीच तर गंमत असते ना? तुझ्या प्रेमात मी बद्ध का? तेच, सगळे करून वर घबाड मिळते . . . प्रेम (कसे) नाही जुळणार? व्हॅलेंटाइनची शपथ तुला, होशील ना माझा तू? आय मीन देशील ना टीप मज तू? फक्त विरोधकांची दे!

सारा ज़माना है मेरे पीछे
पर ये दीवाना है तेरे पीछे
सर ये झुकने ना दूँ दुनिया के आगे
पर तुझसे टीप मांगू कर के सर निचे
ना तमन्ना हीरा, पन्ना
मुझको है तेरा खास बनना
एक टीप जो दे दे तू मुझे 
काम बन जाये
तेरी झलक हिंडनबर्गजी, ओ सर्जी, 
मै सम्भालू आपकी मर्जी!
 

• वामकुक्षीचे पत्र

मय अन्ना. अब तो तू मुजे भूल बी ग्या. हम दोनो का अफेयर पुरे देश ने देखा था. फिर बी तुम मुझे छोड के गया. ‘मेरी चीठी तेरे को, तेरी मेरी को’ देने के काम मे मधल्यामध्ये वो झेंडा हिलाने वाली बेदी बाई, वो दाढी मे तिनका वाला सिसोदिया . . . सब का भला हुआ. रामदेव लाला हुआ. रसोई लगाने वाले, पडदे के पीछे से गर्दी जमाने वाले तो सब से उपर चढ गये. तेरा भी तो कल्याण हुआ. पर इस संबंध से मुझे क्या मिला? अरविंद मिल का धोतर का कपडा? आज तू तेरे संसार मे खुश है. बाकी के भी मजे मे रहे है. मेरा क्या? तू तो मुझे भूल भी गया. शाने मनुष्य ने प्रेम के झंझट मे पडना नही चाहिए. पर अब बोल के क्या फायदा? हमारे राळेगण साईड मे एक म्हण है ‘तेल गया, तूप भी गया, हाथ में आया धुपटणा!’ मेरी वैसी गत हुई है. ‘मय भी अन्ना’वाली टोपी अब किसी ऑर को ना पेहणाना! अब व्हॅलेंटाईन डे का भी कोई कवतुक नहीं रहा मुझे.  अन्ना भी तुजे भूलेगा, यह व्हॅलेंटाईन डे की शपथ है! 

हमको पता लगे बिन तुने ये कब कर लिया, 
‘अन्नाजी’ बोल के काहे तुने ब्रेकअप कर लिया!
 

• संध्याकाळचे पत्र

संध्यास्मरणीय लालजींस,
                    मार्गदर्शक मंडळात आपली रवानगी केल्यापासून, प्रत्येक ‘व्हॅलेंटाईन डे’ला तुमची याद काढून डोळे पाणावतात. आठवते आपली रथ यात्रा? तुम्ही तिचे उत्सव मूर्ती आणि मी सारथी. तसे ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटो मुद्दाम तयार करून घेऊन आयटी सेलकडून पसरवून घेतलेत. तेवढीच तुम्हाला मानवंदना. पण आता त्या लोकांनी देखील ‘भारत जोडो यात्रा’ काढली. यात्रा काढून का कोणाला सत्ता मिळते? त्यासाठी गुजरात मॉडेल करावे लागते. त्या बीबीसीवाल्यांनी किती ही बोंब मारूदेत. यात्रेतला रथ पुढे न्यायला सारथी तयारीचा लागतो. महाभारतमंदी पण तेच लिहिलंय. पण तरी यात्रा काढायला हवी. मध्येच हे हिंडनबर्ग उपटलंय. मी करतोय शांत. पण ते सोडा. तुम्ही यात्रा काढा. तसदी देणार नव्हतो. पण नागपूरहून सुचवले गेले. म्हणून ही विनंती. आदेश इतरांना देतो. तुम्ही विनंतीस आदेश मानू नये. तुम्ही मार्गदर्शक आहातच. ह्या मार्गदर्शनास विनंती मानावी. अमृत काल सुरू आहेच. व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर यात्रेचा आशीर्वाद द्यालच. पुरा देश जानता है, ‘आप से मेरा पुराना नाता है!’ २०२४ आपलेच आहे. जै श्री क्रिष्ण! 


• अंधाऱ्या रात्रीचे पत्र

प्राणप्रिय रोजगार,
             तुझे प्रेम मिळावे म्हणून काय केलं नाही मी? आयुष्याची १७-१८ वर्षे शिक्षणात घालवली. आई वडिलांचे लाखो रुपये खर्च केले. मोजून साऱ्या परीक्षा दिल्या. बाबा म्हणाले, आता वर्षाला २ करोड रोजगार देणार आहे सरकार. म्हणजे पाच वर्षात दहा आणि दहा वर्षात वीस करोड रोजगार देणार सरकारजी! तू नवाकोरा मतदार आहेस. आता ह्यांनाच मत द्यायचे हं! . . . मी, ताईने दिलेही! आई-बाबा तर त्यांच्या तरूणपणापासूनच देतायत . . . पण तू आहेस कुठे? कधी भेटणार तू? दिवसरात्र तुझ्या प्रतीक्षेत झुरतोय! तुझी भेट तर राहोच, मुखदर्शनही नाही. 

मैं ढूंढ़ने जो कभी मनचाहा रोजगार निकला
पता चला के ग़लत लेके मैं पता निकला . . . 

‘चीटिंग’ झाल्याचा फिल येतोय. परवा बाबांना तसे म्हणालो तर त्यांनी माझीच समजूत घातली म्हणाले, ‘सकारात्मक रहा. देश बदलतोय. रोजगार म्हणजे नोकरी असे नाही. तू पकोडे तळू शकतोस. कामाची लाज कशाला? आदरणीयजी आणि त्यांचे सहकारी तेच सांगतायत ना? मग झाले तर. देशप्रेमाचे अमृत पी आणि हो तयार!’ श्रमाची शरम नाही. पण मग हेच करायचे होते तर इतके शिक्षण कशासाठी घेतले?  शिक्षण संपल्यानंतरचा हा पाचवा व्हॅलेंटाईन. कधी आपण एकमेकांना भेटणार? कधी हा विरह संपणार? 

• • •

इतरांची पत्रे वाचून झाली असतील तर आता स्वतःची प्रेमपत्रे सुरक्षित ठेवायला घ्या – कोण कधी काय उकरून काढेल, उघड करेल ह्याचा नेम नाही. नतद्रष्ट मेले!


• संदर्भ :
१) छायाचित्राचा गुगलस्त्रोत

• वाचत रहा :


 

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال