जीवनाची परीक्षा आणि परीक्षेचे जीवन

[वाचनकाल : ४ मिनिटे] 
 
पुस्तकांच्या गराड्यात फसलेला विद्यार्थी, student trapped in stack of books
हे सगळे दबावतंत्र एखाद्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेतच अडथळा आणू शकते आणि अभ्यास करणे आपोआपच कठीण होऊन जाते. त्यामुळे गुणांवर परिणाम होतो.

बालपणी अपार गरीबी सोसून विराट श्रीमंती कमावल्याच्या बनावट  प्रोत्साहन कथा जशा अबालवृद्धांना भुलवतात तशाच बालपणी कमी गुणवत्ता ते महाविद्यालयात गुणवंतया बनावट प्रवासाच्या कथा विद्यार्थ्यांना आणि पालकांना भुरळ घालतात. ज्या पसरवल्या जातात खाजगी शिकवण्यांमार्फत!‌ सोबतच जोडीला असलेली ही काय आयुष्यातील शेवटची परीक्षा नाहीसारखी गुळगुळीत वाक्ये जी विद्यार्थ्यांच्या ताणात भर घालतात. हे चक्र थांबणार कोठे . . .

बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. शिक्षक म्हणून वर्षभर या विद्यार्थ्यांसोबत असताना दर वर्षी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे विद्यार्थ्यांचा वाढलेला ताण’!

करोना काळात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिल्या, तेव्हा परीक्षेचा इतका ताण जाणवला नसेल. मात्र त्यानंतर प्रत्यक्ष परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांना प्रचंड ताण आल्याचे दिसते.
     विद्यार्थ्यांना, ‘ही परीक्षा म्हणजे काही आयुष्याची परीक्षा नाही, याच्यापुढेही खूप काही आहे. असा विचार करून परीक्षा दिलीत, तर परीक्षेचा ताण तुम्हाला कधीही येणार नाही.असे सल्ले नेहमीच दिले जातात. परंतु असली वक्तव्यं ही भाषणांत आणि पुस्तकांतच शोभून दिसतात. अशा वाक्यांनी खरोखरच परीक्षेची भीती आणि त्यामुळे आलेला तणाव कमी होतो का? हा खरा अनुत्तरित प्रश्न आहे!
     खऱ्या आयुष्यात कुठलीही परीक्षा असो, परीक्षार्थी थोडा तणावात दिसतोच. पण हा तणाव मुलांना येऊ नये यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा पालक, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणीसुद्धा उगाचच जास्त अपेक्षा लावून व सतत उपदेशपर बोलून नकळत का होईना पण मुलांच्या तणावात आणखीन भर घालीत असतात.
     घरातून, शाळेतून आणि समाजातूनही, ‘हे दहावीचं-बारावीचं वर्ष आहे, जास्त अभ्यास करा!असं सतत बिंबवलं जातं. त्यामुळे नववीपर्यंत हसतखेळत गुण मिळवणारी मुलं अचानक तणावाखाली येतात.
     दहावी, बारावी म्हणजे काहीतरी वेगळं असं दाखवून मग त्यांच्या छंदांवर बंधनं घालणं, वेळांवर बंधनं घालणं, इतकंच नाही झोपण्या-उठण्याच्या वेळांवरही आपलं मत लादणं हे प्रकार सुरू होतात. जास्तीत जास्त गुण मिळण्याच्या अपेक्षा वाढतात व त्यामुळे मुलं गोंधळून जातात. या असल्या प्रकारांत मोलाचा वाटा उचलतात ते कोचिंग क्लासेस’! विद्यार्थी आणि पालक ह्यांच्या तणावात भरीस भर घालतात या स्वतःला तथाकथित टाॅपर्सची फॅक्टरीसमजणाऱ्या शिकवण्या!
शिकवण्या, मग त्या कुठल्याही वर्गाचे असोत, कुठल्याही पातळीच्या असोत, आजच नाही तर पूर्वीपासूनच जो बिकता है वो चलता है!या तत्त्वावर चालतात. काही ठिकाणी तर अशी स्थिती आहे की त्यांच्या फलकावर झळकलेले विद्यार्थी आणि त्यांचे फोटो हेसुद्धा खोटे असतात! फक्त आपल्या खाजगी शिकवण्या कशा जोमात चालून गुणवंत तयार करतात हे दाखवण्याचं मार्केटिंग असतं ते! कारण कोणी काही माहिती काढत नाही की हे फोटो, मुले, त्यांची गुणवत्ता हे सगळं खरं आहे की नाही. आणि हे त्या शिकवणीवाल्यांस आधीच माहीत असते. यात शाळा, महाविद्यालयेदेखील मागे राहिलेले नाहीत. ही केवळ एक जाहिरातबाजी असते – निव्वळ जास्तीचे पैसे उकळण्यासाठी! परंतु शोकांतिका अशी आहे की लोक मग ते कुठल्याही स्तरावरचे असोत, गरीब, मध्यमवर्गीय अथवा श्रीमंत, ह्या अशा फसवणुकीला बळी पडतात आणि मुलांच्या कुवतीबाहेर त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतात. आणि मग विद्यार्थी बनतो हे ओझे वाहणारे गाढव . . . भविष्य – किंवा आपण म्हणू करिअर – बनवण्यासाठी सतत तणावाखाली असणारे!
 
या वर्षी परीक्षा सुरू होण्याआधी मला एका विद्यार्थ्याचा फोन आला. तो अतिशय घाबरलेला होता. मी कारण विचारले असता म्हणाला मला एकही प्रकरण व त्यातील रिॲक्शन्स, गणितं काही काहीच आठवत नाही, डोक्यात सगळं जम्बलिंगहोतंय! कुठल्या नोट्स वाचाव्यात तेही कळत नाही.
पेपरच्या इतक्या तोंडावर कुठल्या नोट्स वाचू?’ हा प्रश्न मला गारद करणारा होता. मी विद्यार्थ्याच्या आईशी बोलले. तेव्हा त्यांनी मोठ्या गर्वाने मला सांगितले, की त्यांनी मुलाला रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व गणित या विषयांसाठी तीन कोचिंग क्लासला घातले होते. का? तर डिटेल्डअभ्यास होऊन अधिक चांगले गुण मिळवता यायला हवेत म्हणून!
पण झाले उलटच! परिपूर्ण अभ्यास तर दूरच राहिला, ऐन पेपरपूर्वी मुलगा इतका भांबावून गेला की त्याला काहीच आठवेनासे झाले. कारण प्रत्येक शिकवणीच्या वेगळ्या पद्धतीच्या नोट्स होत्या. शेवटी त्याला सगळ्यांनी मिळून अगदी महत्त्वाचे प्रश्न शांत डोक्याने परत एकदा तयार करायला सांगितलं आणि त्याला परीक्षेबद्दल थोडा आत्मविश्वास आला.
या उदाहरणाचा विचार करता, हा विद्यार्थी वर्ष दीड वर्षांपासून किती तणावाखाली राहिला असेल? ह्याला जबाबदार कोण? इतक्या लहान वयापासून जर मुलं तणावाच्या आधीन होतील, तर पुढील आयुष्यात त्यांच्या आरोग्यावर याचे किती दूरगामी परिणाम होतील?

कुठल्याही तणावाच्या स्थितीत मज्जासंस्था ॲड्रिनॅलिनआणि कॉर्टिसोलयांसारख्या तणावाच्या रसायनांचा पूर सोडते. आपत्कालीन तणावाच्या या प्रतिसादामुळे हृदयाचे ठोके जलद होतात, रक्तदाब वाढतो, स्नायू आकुंचन पावतात आणि श्वसन जलद होते. परंतु हा वारंवारचा तणाव शरीराला उच्च-तणाव स्थितीत ठेवू शकतो, ज्यामुळे कमी प्रतिकारशक्ती, मंद पचनहृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोकादेखील वाढू शकतो. तणावामुळे नैराश्य आणि चिंता यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांचा तीव्र धोका निर्माण होऊ शकतो.
शैक्षणिक काळात परीक्षा, नंतर भविष्य, नोकरीच्या समस्या, जीवनातील महत्त्वपूर्ण निर्णय, आव्हाने आणि आर्थिक चिंता हे सर्व तणावाचे प्रचलित स्त्रोत आहेतच. त्याला कोणतीही सीमा नाही. प्रत्येकावर त्याचा कमीअधिक परिणाम होतोच. परंतु सततच्या दबावामुळे तयार होणारा ताण निव्वळ विनाशाकडे नेतो!

थोडासा ताण आपल्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी सैद्धांतिकदृष्ट्या प्रोत्साहित करू शकतोच; परंतु आत्यंतिक ताण शरीरावर भयंकर दुष्परिणाम घडवतो. कारण तणाव, चिंता आणि दुःखासारख्या, विविध मानसिक आरोग्य समस्यांशी जोडला गेलेला आहे. त्यासाठी शरीर मोठ्या प्रमाणात रासायनिक कॉर्टिसोल’, ‘एपिनेफ्रिनआणि नॉरएपिनेफ्रिनतयार करते, ज्याचे जास्त स्त्रवणे हे पूर्णत: विघातक असते.
परीक्षेचा कालावधी एक स्वाभाविक तणावपूर्ण परिस्थिती आहे. सर्वांच्या अपेक्षांव्यतिरिक्त, शाळांतील, महाविद्यालयातील तीव्र स्पर्धा, कुटुंब व नातेवाईकांचा दबाव आणि निकालातील गुणांवरून गुणवत्तेला दिलेले अपार महत्त्व यासारख्या बाबींमध्ये आजचा विद्यार्थी भरडला जातोय, ताणतणावाला बळी पडतोय याकडे कुणाचे लक्षच नाही! खुद्द पालकांचे व शिक्षकांचेदेखील नाही!
खरे म्हणजे, हे सगळे दबावतंत्र एखाद्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेतच अडथळा आणू शकते आणि अभ्यास करणे आपोआपच कठीण होऊन जाते. त्यामुळे गुणांवर परिणाम होतो, अखेरीस मुलं नकारार्थी दुष्टचक्रामध्ये अडकून पडतात आणि आपल्याला कळतही नाही. यातून वाचण्यासाठी काहीजण मग व्यसनाधीनतेच्या मार्गावर नकळतपणे चालू लागतात.
 
आताशा फक्त टीव्हीवर जाहिरात बघून काही सहा आणि सात वर्षांची मुलं कोडिंगशिकून ॲप्लिकेशन बनवतायत, आईवडील गर्व करतायत हे तर आहेच. पण यामुळे त्यांच्याकडून आतापासूनच मोठमोठ्या कामगिरीची अपेक्षा ठेवताना त्यांचं बालपण हरपतंय हे कोणाला कळणार? हे सगळं करताना ते त्यांच्याही नकळत तणावाखाली वावरतायत त्याचे काय?
 
 
 लेखन – जुईली
 

संदर्भ :
१) छायाचित्र टाकबोरू
 
वाचत रहा :
 

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال