आणि रोल्स-रॉयस भारतापुढे झुकली

[वाचनकाल : ४ मिनिटे] 
 
१९२०ची रोल्स रॉयस, rolls royce 1920 model
कंपनीने पत्र लिहून, त्यामध्ये सविस्तर माफी मागितली व सांगितले की आम्ही तुम्हाला सहा नवीन रोल्स-रॉयस मोफत देऊ!

भारतीयांच्याकडे अणुबॉम्ब सर्वात आधी होते असल्या पुराणातील पिपाण्या असोत की हल्ली भारताला जगातून अगडबंब मान मिळतो या तुताऱ्या असोत अस्सल खणखणीत नाण्यांचा आवाज कुठेतरी दाबून टाकतात. जाणूनबुजून उठवल्या गेलेल्या राळेत इतिहासात भारताची मान उंचावणारे क्षण लुप्त होतात. इतिहासात रमणे कधीही चूकच; पण इतिहासात स्वातंत्र्यापूर्वी एका भारतीयाने इंग्रजांना तुकवले होते हे प्रत्येकाला माहिती असावे . . .

या कथेचा भारतीय इतिहासात अतिशय अभिमानाने उल्लेख केला जातो. मात्र खूप कमी भारतीय असतील, ज्यांना याबद्दल माहिती आहे.
१९२० सालची घटना आहे. या काळात, आपल्या भारतावर इंग्रजांचे राज्य होते. विविध स्वातंत्र्ययोद्धे प्राणपणाने इंग्रजांविरुद्ध लढत होते. गांधीयुग नुकतेच सुरू झाले आणि त्याच काळात ही घटना घडली. पुस्तकरूपाने आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे आपण गुणगान गातो. मात्र काही लढाया वेगळ्या स्वरूपात घडल्या, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आंदोलन अथवा रक्तपात घडला नाही. तरीही, इंग्रजांना भारतीयांसमोर लोटांगण घालावे लागले.
इंग्रज आपल्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्याकडील औद्योगिक क्रांतीमुळे अनेक प्रकारची यंत्रे, तसेच मोटारी, जगभरात प्रसिद्ध होत्या. त्यातील वाहनांसाठीची सर्वात प्रसिद्ध कंपनी म्हणजे ‘रोल्स-रॉयस’. ह्या कंपनीची प्रसिद्धी एवढी जास्त होती की, ही गाडी असणारा खूप श्रीमंत असलाच पाहिजे असे लोकमत होते (आजही आहे). त्यामुळे, त्या व्यक्तीला खूप मानसन्मान दिला जात असे. परिणामी, फार कमी लोकांकडे ही मोटार होती व याचे विक्रेतेसुद्धा त्या प्रकारचा अहंकार बाळगून असायचे.
याच काळात राजस्थानमध्ये, ‘अल्वारहे एक छोटेसे संस्थान होते आणि या संस्थानाचे राजे जयसिंग प्रभाकरहे इंग्लंडमध्ये  शिक्षणासाठी गेले होते. जयसिंग प्रभाकर हे राजे असूनसुद्धा, इंग्लंडमध्ये त्यांचे राहणीमान अतिशय साधे होते. जे सर्वसामान्य ब्रिटिश नागरिक होते, त्याप्रमाणे यांचा पोशाख होता व ज्याप्रमाणे बाकी गरीब भारतीय तिथे राहायचे, त्याप्रमाणे हेसुद्धा राहायचे. हो‌ . . . ते खूप मोठ्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते व त्यांच्याकडे कोणत्याही सोयीसुविधांची कमतरता नव्हती. परंतु, ते आपल्या व्यवहारांमध्ये जास्तीत जास्त साधेपणा ठेवण्याचा प्रयत्न करत असत. याचे कारण असे की, लोकांमध्ये मिसळून, त्यांच्या खर्चाच्या पद्धती, बाजाराबद्दलच्या धारणा व वस्तू निवडप्रक्रिया जाणुन घेण्यात त्यांना रस होता.
राजे असल्याने, राजघराण्यांमध्ये व श्रीमंतांमध्ये वावर असल्याने, त्यांना तसा महागड्या गोष्टींत खूप रस होता. त्यामध्ये मग कपडे असोत, अत्तर असो, वेगवेगळ्या वस्तू असोत अथवा महागड्या गाड्या असोत. इंग्लंडमध्ये काही त्या प्रकारचे मिळाले, तर ते खरेदी करून, त्याला भारतामध्ये पाठवायचे व आपल्या संस्थानांमध्ये त्यांच्या राजवाड्यात किंवा राजवाड्याच्या बाहेर सुद्धा, कधीकधी लोकांसाठी काही उपयोगी असेल, तर ते खरेदी करून तेथून पाठवून द्यायचे.
असंच एक दिवस, ते एके ठिकाणी जात असताना त्यांना रोल्स-रॉयसया गाडीचे शोरूम दिसले. त्यांना या गाड्या खूप आकर्षक वाटल्या. त्यांनी शोरूमबाहेरील दोन तीन गाड्या तर पाहिल्याच, सोबतच या गाड्यांबद्दल जास्त माहिती घेण्यासाठी ते आतमध्ये गेले. तिथे एक गाडी होती, जी त्यांना खूपच जास्त आवडली. तेव्हा तेथे उभ्या असलेल्या एका कर्मचा‌ऱ्याला त्यांनी विचारले की, ‘ह्या गाडीबद्दल माहिती दे, नेमक्या काय आधुनिक सुविधा आहेत यात, ते कळव.
त्याला मात्र साध्या वेषातील हा भारतीय अतिशय तुच्छ वाटला. त्याला असे वाटले की, याची ही कार घेण्याची ऐपत नाही. उगाच काहीतरी वेळ जावा म्हणून, येऊन चौकशी करत आहे. त्यामुळे त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. राजे जयसिंग प्रभाकर यांनी पुन्हा चौकशी केली, पुन्हा विचारले. मग मात्र त्या कर्मचाऱ्याचा संताप अनावर झाला व त्याने अतिशय अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. राजे जयसिंग प्रभाकर यांनी तो सर्व अपमान निमूटपणे सहन केला, ऐकून घेतले. त्यावेळी ते काहीही बोलले नाहीत.
त्यावेळी त्यांच्या मनात हा विचार आला की, लोकशाही मूल्ये असणाऱ्या इंग्लंडमध्येसुद्धा या प्रकारचा भेदभाव दिसतोय. या प्रकारची वाईट वागणूक भारतीयांना तर मिळतेच, किंबहुना सामान्य ब्रिटिश नागरिकांनाही हेच सहन करावे लागतेय. यावर आपण काही करणे गरजेचे आहे. या इंग्लंड साम्राज्याला तर धडा देणे कठीण आहे, परंतु त्यांचे मानाचे स्थान असलेल्या या रोल्स-रॉयस कंपनीला आपण जबरदस्त झटका देवू. यासाठी काय करता येईल याचा त्यांनी नेमकेपणाने विचार केला.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, आपल्या राजाच्या पोषाखामध्ये तिथे जाऊन त्यांनी रोल्स-रॉयसच्या सात गाड्या बुक केल्या. या सात गाड्यांचे पैसे त्यांनी रोख किंमतीत, तिथल्या तिथे देऊन टाकले. त्यामुळे सर्व कर्मचारी अतिशय आनंदित झाले. रोल्स-रॉयस कंपनीच्या मालकांनासुद्धा एवढी मोठी ऑर्डर मिळाल्याबद्दल प्रचंड आनंद झाला.
रोल्स-रॉयस कंपनीची गाडी ही जगातल्या सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक मानली जाते. त्यामुळे त्याचे खरेदीदार अतिशय कमी आहेत व कंपनीला एवढा मोठा फायदा झाल्याने सर्व खुश होते. राजा जयसिंग प्रभाकर यांनी एक विनंती केली की, ज्या कर्मचार्‍याने त्यांचा अपमान केलेला त्याच कर्मचाऱ्याने ही ऑर्डर घेऊन भारतात त्यांच्या साम्राज्यात जाऊन या गाड्या पोहोचवाव्यात व कंपनीने ती मागणी हसत हसत मान्य केली.
ठरल्याप्रमाणे, या सर्व गाड्या भारतात अल्वार संस्थानात राजस्थानमध्ये पोहोचवण्यात आल्या. तिथल्या आपल्या मंत्र्यांस त्यांनी पत्र लिहून सूचित केले होते की या गाड्यांना आपल्या संस्थानातील प्रमुख शहरात कचरा गोळा करण्यासाठी वापरले जावे. त्याप्रमाणे मंत्र्यांनी या गाड्यांना अल्वरच्या पालिकेकडे सोपवल्या व त्या पालिकेने या गाड्या कचरा भरण्यासाठी वापरल्या. हे घडताना पाहून त्या कर्मचाऱ्याला अतिशय आश्चर्य वाटले व त्याची मान शरमेने खाली गेली. त्याला समजले, की हे का केले गेले आहे.
या घटनेचे चित्रण करून, त्याचे फोटो त्यांनी वृत्तपत्रांना दिले. हे चित्र जगभर पसरले व जगभरात या कंपनीची नाचक्की झाली. ज्या गाडीला खूप महत्व दिले जाते, त्या गाडीला भारतातील एका पालिकेकडून कचराभरण्यासाठी वापरले जाते, हे समजल्यानंतर त्या गाडीचे आकर्षण कमी होऊ लागले. कंपनीचे उत्पन्न घटू लागले व एका कर्मचाऱ्याने केलेली चूक कंपनीला खूप महागात पडली. त्या कंपनीच्या कर्मचार्‍याने मालकांना सर्व हकीकत सांगितली.
त्यानंतर कंपनीने राजे जयसिंग प्रभाकर यांना पत्र लिहून, त्यामध्ये त्यांची सविस्तर माफी मागितली व सांगितले की आम्ही तुम्हाला सहा नवीन रोल्स-रॉयस मोफत देऊ, परंतु या प्रकारे रोल्स-रॉयस गाड्यांमधून कचरा जमा करणे थांबवा. याप्रकारे सहा गाड्या लवकरात लवकर अल्वार संस्थानात पोचवण्यात आल्या. त्यासोबतच सर्व कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली की, शोरूममध्ये कोणत्याही प्रकारचा मनुष्य चौकशीसाठी येऊ दे, त्याला आदराने व सन्मानाने वागणूक दिली गेली पाहिजे.
 
जरी ते राजे असले, तरी एका बलाढ्य कंपनीसमोर एवढे मोठे आव्हान उभे करणे व त्यांना गुडघ्यावर आणणे, यामुळेच शक्य झाले की त्यांनी त्याच वेळी काही रागात निर्णय न घेता, शांतपणे आपला अपमान सहन केला व त्यानंतर सारासार विचार करून या प्रकारची योजना आखली, जेणेकरून त्या कंपनीला मोठी अद्दल घडली.
या गोष्टीतून राजे जयसिंग प्रभाकर यांनी संपूर्ण भारताला तसेच जगाला एक शिकवण दिली की, माणसाच्या पेहरावावरून, त्याच्याकडे असलेल्या संपत्तीवरून, कधीही त्याचे मोल केले जाऊ नये. त्याची विद्वत्ता, त्याचे विचार ही सर्वात मोठी शक्ती असते आणि ही शक्ती जगातल्या कोणत्याही व कितीही मोठ्या शक्तीला गुडघ्यावर आणू शकते.
 
 

 लेखन – अमित
मेल

 
 
संदर्भ :
१) छायाचित्र : टाकबोरू
 
वाचत रहा :
 

2 टिप्पण्या

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

  1. तुम्ही इथे दिलेल्या या माहितीचा स्त्रोत कळू शकेल काय? कारण माझ्या माहितीप्रमाणे ही गोष्ट पतियाळा संस्थान आणि त्याचा राजा यांच्याशी संबंधित आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. इंग्लंडच्या प्रतिष्ठित द स्टेट्समन या वृत्तपत्राने यासंबंधीचा लेख छापलेला तो मी पहिल्यांदा वाचला. त्यानंतर विविध विश्वसनीय संकेतस्थळांवर अधिक माहिती जाणून घेतली व हा लेख लिहिला. अल्वार संस्थानासंबंधीच ही कथा आहे.

      https://www.google.com/amp/s/www.thestatesman.com/features/rolls-royce-used-garbage-vans-1503050263.html/amp

      या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही वाचू शकता.

      हटवा
थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال