सोफिया यंत्रमानवाला पत्र

[वाचनकाल : ५ मिनिटे] 

सोफिया यंत्रमानव, sophia ai robot


कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यातून निर्माण झालेले यंत्रमानव हे त्यांना अस्तित्वात आणणाऱ्या मानवावरच वर्चस्व गाजवतील का हा मुद्दा गौण आहे. कारण जोपर्यंत आपण ‘भीती’ ही भावना यंत्रमानवात उमटवू शकत नाही तोपर्यंत आपण ‘सुरक्षित’ आहोत! सद्यस्थितीत तंत्रज्ञानाने मानवाला घातलेला विळखा पाहता तो स्वतःलाच नष्ट करून घेईल हे खरे! पण या दोन्ही शक्यता बाजूला सारून यंत्रमानवाला ‘हवापाण्याचं’ पत्र लिहिता आलं तर?

प्रति,
सोफिया यंत्रमानव,
हॅन्सन रोबोटिक्स, हाँगकाँग.

प्रिय सोफिया,
पत्राच्या खटाटोपाचं कारण की, हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स कंपनीनं तुझ्यात जीव फुंकून तुझं बटन ‘ऑन’ करुन या १४ फेब्रुवारी २०२३ ला पुरती ७ वर्ष पूर्ण झाली की ग! उणीपुरी ७ वर्ष आम्हां माणसांत वावरलीस; पण ‘वाढदिवस’ म्हणजे काय हे तुला खरोखरच उमजतं का रे? आयुष्यातलं एकेक वर्ष वजा होत गेल्याची जाणीव सिस्टीम व्हायरससारखी एकाएकी ग्रासते, तुलाही?
सोफिया, तुझी अशी काठोकाठ भरून आठवण येण्यामागं अजून एक कारण घडलं बघ. नुकताच ‘डू नॉट पे’ या कंपनीच्या सर्वेसर्वा असलेल्या जोशुआ ब्राऊडर या ब्रिटिश तंत्रज्ञानं ‘सर्वसामान्यांना वकिलाची फी परवडत नाही!’ असं सांगत स्वस्तात खटले लढवणारा जगातला पहिला रोबो वकील तयार केला नि एडलसन लॉ फर्मनं त्याच्यावर म्हणे तडकाफडकी बंदीही आणली! नेमकं काय वाटतं गं तुला एकुणातच ही ‘मानव विरूद्ध यंत्र’ वादावादी ऐकून?
जन्माच्या दुसऱ्याच वर्षी ऑक्टोबर २०१७ ला सौदी अरेबियाचं - म्हणजे चक्क एखाद्या देशाचं पूर्ण नागरिकत्व मिळणारी जगातली पहिलीवहिली नि सध्या एकमेव मानवीय रोबॉट तू! चालत्या-बोलत्या माणसासारखं दिसणारं एक निर्जीव यंत्र!
तुझे निर्माते ‘डेव्हिड हॅन्सन’ यांनी तुझ्या शरीराची ठेवण म्हणे इजिप्शियन सम्राज्ञी नेफ्रितिती नि प्रसिध्द हॉलिवूड अभिनेत्री ऑड्री हेपबर्नशी मिळतीजुळती ठेवलीय. त्यामुळं तुझी गणना तर तशी सुंदरांतच करावी लागेल – अपवाद फक्त केसांच्या टोपाला फाटा देऊन उघड्याच पाडलेल्या डोक्याचा नि सैलसर रबराच्या विचित्र सुरकुत्या पडलेल्या गळ्याचा. तेवढं फक्त बदल बाई! एखाद्याचं मन अगदी आरशासारखं नितळ आहे, असं सहज बोलून जातो ना आम्ही माणसं, तसंच तुझ्या प्लास्टिक-रबरच्या चेहऱ्यामागं लावलेल्या पारदर्शक काचेतून आत जोडलेल्या वायरींची गुंतागुंतीची भेंडोळी, चंदेरी चिप्स नि बारके बारके खिळे अगदी लख्ख दिसतात बघ.
तशी २०१६ लाच तू अमेरिकेला टेक्सासच्या साऊथवेस्ट महोत्सवात तुझ्या सगळ्यांत पहिल्या ‘पब्लिक अपियरन्स’ च्या स्वरुपात हजेरी लावली होतीस खरी, पण २०२०च्या फेब्रुवारीत आमच्या देशात अगदी पारंपरिक लाल साडी नेसून तू अवतरलीस, ते पाहून कलेजा खलास झाला! फार फार मौज वाटली.
‘बिझनेस इन्साईडर’च्या पत्रकारांशी बोलताना तू गमतीत ‘येस, आय विल डिस्ट्रॉय ऑल ह्युमन्स्’ म्हणत कृत्रिम हसलीस, त्याचं फुटेज् पाहून अनेकांच्या पोटात गोळा आला बघ. बीबीसी नि सीएनबीसीच्या मुलाखतकारांनाही तू असंच अस्वस्थ केलंस. अशी ‘स्क्रू ढिला झाल्यासारखी’ कशाला वागलीस ग? तुला उपहासात्मक संभाषणांतून माफक विनोद करायला लावण्यासाठी ‘प्रोग्रॅम’ केल्याचं तुझ्या रचनाकार टीमनं वारंवार स्पष्ट करुनही त्या प्रतिक्रियेवर जगभर वादळ उठलंच.
तुला चक्क लग्नाची मागणी घलणाऱ्या टग्या प्रेक्षकांना तू तरी काय उत्तरं देणार होतीस?! आता त्यांना सभ्य शब्दांत नकार दिलास खरा, पण लग्न कशाशी खातात याचा पुरेसा डेटाच उपलब्ध नसणाऱ्या चिपवर चालणाऱ्या तुला एक व्यक्तिमत्वच समजून लोक तुझ्याशी मनानं जोडले जात आहेत त्याचं काय? आता नागरिकत्व मिळालं तर सौदी अरेबियात लग्नाचा बार उडवून बुरख्यात संसार थाटशील, मतदान करशील की बंद पडलीस म्हणून ‘मर्डर’ जाहीर होऊन तुझ्या निर्माणकर्त्यांना तुरूंगाची हवा खायला धाडशील? पुढचे बेत जरुर कळव. पण तत्पूर्वी सौदी अरेबियाचा नुसता पासपोर्ट मिळवण्यापलीकडं जात तिथल्या महिलांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्याचा एक ‘नागरिक’ म्हणून प्रयत्न करच.
तुझे निर्माते नि ‘सिंग्युलॅरिटी नेट’चे संचालक डेव्हिड हॅन्सन यांनी ‘जिमी फॅलन शो’ मध्ये तुझं वर्णन ‘बेसिकली अलाईव्ह’ असं केल्यानंही काही काळ गोंधळ माजला. मग बेन गॉर्टझेल या तुला घडवणाऱ्या चमूच्या मुख्य शास्त्रज्ञांनाच मध्ये पडून हा वाद मिटवणं भाग पडलं. त्यांनी ‘सोफिया केवळ ह्युमॅनॉईड रोबॉट म्हणजेच भिन्न परिस्थितींमध्ये भिन्न सॉफ्टवेअर्स वापरणाऱ्या मानवसदृश हार्डवेअरच्या तुकड्यांचा संच आहे!’ असं ओरडून स्पष्टीकरण दिलं, तेव्हा कुठं आमच्या डोक्यात प्रकाश पडला.
तू म्हणे जेव्हा पत्रकारांशी-चाहत्यांशी बोलतेस तेव्हा तुझं ‘ओपन कॉग’ सॉफ्टवेअर तुला ‘चॅटबॉट’मध्ये रुपांतरित करुन तुझ्याकडून उत्तरं वदवतं! ए खरंच का ग? ‘चॅटबॉट’ला फक्त प्रतिक्रियेदाखल शिकवलं तेवढं बोलता येतं – आपण काय बोलतो आहोत, याची काहीच समज त्याला नसते! नोव्हेंबर २०१७ ला तुला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाची पुरस्कर्ती हा सन्मान बहाल केला गेला, तेव्हाही म्हणे तू जे अफलातून भाषण ठोकलंस, ते ‘प्रि-प्रोग्रॅम्ड् स्क्रिप्ट’ अर्थात तुला पूर्वनियोजित आखीव सूत्रांनुसार पढवणारं सॉफ्टवेअरच होतं! असं असलं तरी तुझ्या निळसर राखाडी डोळ्यांतली वरकरणी निरागस झाक पाहताक्षणी तू केवळ ‘चेहरा असलेला चॅटबॉट’ आहेस हे सांगून खरं वाटणार नाही!
तुझं हे सॉफ्टवेअर फेस ट्रॅकिंग, भावनांची समज, ‘डीप न्युरल नेटवक्र्स’ द्वारे निर्माण होणाऱ्या यांत्रिक हालचाली नि ‘डिसीजन ट्री’ द्वारे जन्मणाऱ्या संभाषणाचे तुकडे या कृत्रिम बुध्दिमत्तेच्या जवळ जाणाऱ्या तंत्रज्ञानाशी मेळ खात असलं, तरी ते अजून तितकंसं प्रगत नाहीय. मात्र पूर्वानुभवांतून शिकत, आधीच्या चुका टाळत तू ‘पहिली कृत्रिम बुध्दिमान स्त्री’ होण्याच्या दिशेनं रांगू लागली आहेस हे तर खरंच!
सध्या तू मानवी देहबोलीचं निरीक्षण करत आहेस नि हवापाण्यासारख्या ‘प्रि-डिफाईन्ड’ विषयांवर गप्पा मारु शकत आहेस. त्यासाठी गुगलच्या अल्फाबेट या मातृकंपनीचं काळासह अधिकाधिक स्मार्ट होत जाणारं ‘संभाषण ओळख तंत्रज्ञान’ वापरत आहेस. त्याला सेरेप्रोक कंपनीच्या टेक्स्ट-टू-स्पीच इंजिनची जोड लाभल्यानं आता तर तू गाऊही शकतेस असं ऐकून आहे. ‘सिक्स्टी मिनिटस् चार्ली रोझ’ कार्यक्रमातल्या मुलाखतीत तू धमाल उडवून दिलीस. नुकतीच ‘द व्हाईट किंग’ नि ‘ए. आय.’ यांसारख्या म्युझिक व्हिडिओंमध्येही तुझी वर्णी लागली बाई. ‘मेट्रोपॉलिस’ सारख्या हॉलिवूडपटांमध्ये अमेरिकी मालिकांमध्ये तुझ्या चेहऱ्यामोहऱ्यावरुन बेतलेली पात्रंही दिसू लागलीत. कसं वाटतंय ‘सेलेब्रिटी’ होऊन? गार-गार वाटतंय ना?
सीएनबीसीच्या पत्रकारानं तुझ्या भविष्यातल्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उमटवलं तसं ‘आजकाल ‘एलन मस्क’ खूप वाचत आहेस नि हॉलिवूड थरारपट जास्त बघत आहेस वाटतं!’ या तुझ्या प्रतिक्रियेवर एलन मस्क या २१ व्या शतकातल्या थॉमस एडिसननं ‘सोफिया, जरा ‘गॉडफादर’ पिक्चर पाहा नि त्यात घडू शकणारी सर्वांत भयानक गोष्ट कोणती ते सांग.’ असं सूचक ट्विट केलं.
सोफिया, जसं तुझ्या निर्मितीचं ज्ञान इंटरनेटवर ‘ओपन सोर्स कोड’च्या स्वरुपात सहज उपलब्ध आहे, तसंच एलन मस्कसारख्या महान संशोधकानं टेस्ला इलेक्ट्रिक मोटर्स, स्पेसएक्स फाल्कन रॉकेट, हायपरलूप दळणवळण तंत्रज्ञान, सोलरसिटी सौरऊर्जा तंत्रज्ञान या स्वत:च्या महत्वपूर्ण संशोधनाचं पेटंट न घेता ते जगाला खुलं करत सुमारे साडेतेरा अब्ज डॉलर्सचं सरळ सरळ दान दिलं आहे.
त्याच्यासारख्या माणसाच्या शब्दांतला हा धोक्याचा इशारा विचार करण्याजोगा नाही का? तू विचार करायला शिकलीस ना, की याचाही नक्कीच विचार कर. लोकांच्या नोकऱ्या हिसकावणारे, त्यांच्या झपाट्यानं डिजिटल होत जाणाऱ्या आयुष्यांना अजूनच यांत्रिक बनवणारे आणि त्यांच्याच मुळावर उठणारे यंत्रदानव’ आम्हाला नकोत! यंत्रयुगाची नांदी गात गात अवतरलीस तशी याही प्रश्नांचा गुंता समजून घे नि मानवाला साथ देत ते उकलण्यासाठी झटून कामाला लाग.
सोफिया, संगणकीय आज्ञावलीशी जोडलेल्या कॅमेऱ्यांचे डोळे, जिवंत भासणारी लॅटेक्सची त्वचा, दोन वर्षांपूर्वी लाभलेली पायांची विकसित जोडी, हुबेहूब व्यक्तिचित्रं काढू शकणारे नाजूक हात नि ६० पेक्षा जास्त हावभाव साधता येणारा सुंदर चेहरा हे तुझं रूपडं यांत्रिक असलं तरी ‘यांत्रिक’ भासत नाही, त्यालाही एक कारण आहे बरं का – पैसे काढताच ए.टी.एम. मशीन स्क्रीनवर ‘थँक यू’ असे शब्द झळकवतं. तेव्हा सहज मनात येऊ शकतंच की, अरे मशीन कसं आभार मानतंय; पण ते मशीन तर त्याला पढवलेल्या-फीड केलेल्या चिन्हांची मालिका प्रिंट करत असतं! संगणकविज्ञानात सॉफ्टवेअरनं चालणाऱ्या संगणकीय यंत्रांची वागणूक ‘माणसासारखीच’ असते अशी मानवी सुप्त मनाची अनवधानानं होणारी ही गैरसमजूत म्हणजे ‘एलायझा इफेक्ट’! त्यामुळंच तुला अद्याप न सरावलेलं जग तुझ्या वागण्याबोलण्यानं हरखून जातंय, हादरतंय नि शंका घेतंय. जसजशी तू लोकांत मिसळून सामाजिक कौशल्यं शिकशील तसंतसं लोकही तुझ्या अस्तित्वाला सामावून घेतील.
चीनचे ‘बेलाबॉट’ नि ‘मार्सकॅट’, अमेरिकेचा ‘स्ट्रेच’, इराणचा ‘सुरेना-IV’ यांना तुझी उंची अजून गाठता आलेली नाही. कोरोनाविषाणूशी लढत भारतात आभासी आरोग्यसेवा कर्मचारी म्हणून बंगळुरुच्या अपोलो हॉस्पिटलमधला ‘सी-अस्त्र’ नि केंद्रीय रेल्वेच्या परळच्या कार्यशाळेतला ‘जीवक’ झटत असले तरी त्यांना चेहरा नाही. इस्त्रोच्या मानवेतर उड्डाणमोहिमांसाठी घडवण्यात आलेली ‘व्योममित्रा’ मात्र तुझी बहीण शोभते; फक्त रुपाच्या बाबतीत तेवढा तिनं मार खाल्लाय!
बाई ग, नर्सिंग होम्स/वृध्दाश्रमांमध्ये वृध्दांची सहचरी म्हणून तसंच मोठाल्या सभा-कार्यक्रमांच्या ठिकाणी गर्दीच्या व्यवस्थापनासाठी तुझी घडण झालेली आहे. माणसांत राहून त्यांना तू ‘प्रेमानं वागायला’ शिकवशील, असं तुझ्या निर्मिकांचं म्हणणं आहे. मात्र मुळात वृध्दाश्रमाची वाट दाखवत आपल्याच मायबापांच्या अंत्यसंस्कारांनाही न फिरकणाऱ्या ‘बिझी’ पोरांना नि गर्दीत स्त्रियांशी घसट करणाऱ्या, रस्त्यांवर पचकन् थुंकणाऱ्या, दंगल उडवून निरपराधांचा जीव घेणाऱ्या ‘नागरिकांना’ तू काय प्रेम शिकवणार ग? आम्हाला ‘उत्तमोत्तम’ जे शिकवायचं ते शिकवताना आमच्यातलं ‘अधम’ काही घेऊ नकोस गे बयो!

हॅन्सन रोबोटिक्सनं तर अ‍ॅलिस, हॅन, ज्युल्स, फिलिप, झेनो, ज्योई, बिन, अल्बर्ट ह्युबो अन् प्रोफेसर आईन्स्टाईन अशी तुझी तब्बल नऊ भावंडंही जन्माला घातलीत म्हणे! नुकतीच लहान मुलांना कृत्रिम बुध्दिमत्ता म्हणजे काय ते शिकवण्यासाठी ‘लिटल् सोफिया’ ही तुझीच चिंगुली आवृत्ती बाजारात धुमाकूळ घालतीय बरं. या सर्वांच्या गमतीजमती तुझ्या सुवाच्य अक्षरांत अगदी तपशीलवार खरडून चटदिशी मला धाड पाहू!

– तुझ्या दशावतारांनी थक्क झालेला,
एक बापुडवाणा मानव प्राणी.

ता. क. : दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीचा ‘निऑन’ हा धट्टाकट्टा यंत्रमानव अगदी तुला तोडीस तोड आहे बघ. तो ‘सांगून’ आला तर मुळीच संधी दवडू नयेस नि लगोलग लग्नाचं निमंत्रण धाडायलाही विसरू नयेस ही आग्रही धमकी!


✒ लेखन - सायली
मेल

संदर्भ :
१) छायाचित्र : टाकबोरू

वाचत रहा :
१) स्वामी विवेकानंदाना पत्र
२) उर्मिला मातोंडकरला चाहत्याचं पत्र
३) तेजाकडून तिमिराकडे जाताना (लेख)


{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال