महाड : जातीव्यवस्थेस धक्का देणारा सत्याग्रह

[वाचनकाल : ४ मिनिटे] 
महाडचा सत्याग्रह, satyagraha of mahad
२० मार्च १९२७ रोजी शिस्तीने मोर्चा चवदार तळ्याकडे गेला. बाबासाहेब स्वतः पुढे होत चवदार तळ्याचे ओंजळभर पाणी प्यायले.


आजच्या दिवशी, म्हणजे २० मार्चला,‌ साधारणतः ९६ वर्षांपूर्वी एक सत्याग्रह झाला होता. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अन्यायाला वाचा फोडून, जुन्या रिती तोडून, नव्या विश्वाकडे वाटचाल सुरू झाली ती या दिवशी. प्रस्थापित जातीव्यवस्थेला जोरदार धक्का देणारा हा सत्याग्रह म्हणजे सामान्यांच्या मनात आजही रुजलेला आणि बाबासाहेबांची ओळख बनलेला महाडचा सत्याग्रह . . .

महाड सत्याग्रहाबद्दल आज सर्वांना वाटते की तो पाण्याचा साधासुधा प्रश्न होता. अस्पृश्यांना चवदार तळ्यावर पाणी पिण्यास मिळावे यासाठीचा तो एक लढा होता. मात्र मानवाधिकारांशी निगडित व माणुसकीनं प्रेरित असा हा एक ऐतिहासिक विद्रोह होता.
हिंदू धर्मामध्ये आलेल्या वर्णव्यवस्थेने नंतर जातीव्यवस्थेचे रूप घेतले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी जातीची उतरंड तयार केली गेली. गुप्त साम्राज्याच्या काळापासून त्या उतरंडीमध्ये ‘अस्पृश्य’ नावाने शूद्र जातीमध्ये एक वर्ग तयार झाला. शूद्रांना गावात व समाजात, दुरून का होईना, सामील होण्याचा हक्क असे. परंतु अस्पृश्यांना नेहमी गावाबाहेरच राहावे लागे व फक्त सफाईच्या कारणास्तवच त्यांना गावात येण्याची परवानगी असे. त्यांचे सर्व अधिकार निलंबित केले होते.
चुकून कोणा अस्पृश्याचा स्पर्श झालाच तर उच्चवर्णीय ताबडतोब पंचगव्य (गाईचे – दूध, दही, लोणी, मूत्र व शेण) घेत व स्वतःला शुद्ध करत. या गोष्टी फक्त प्राचीन किंवा मध्ययुगीन भारतापुरत्या मर्यादित नव्हत्या, तर अगदी आधुनिक भारतात टिळकांसारखे लोकमान्य म्हटले जाणारे नेतेसुद्धा, अस्पृश्यांचा स्पर्श होताच पंचगव्य घेत! इंग्रजांनी या मागास समाजाची जनगणना करत त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने त्यांची वेगवेगळ्या सूचीमध्ये विभागणी केली. जसे की, आदिवासी झाले एसटी (ST), अस्पृश्य झाले एससी (SC) व शुद्र झाले ओबीसी (OBC).
अशा पार्श्वभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे शिक्षण हे समाजोद्धारासाठी कसे वापरता येईल यावर चिंतन करून आपला प्रवास सुरू केला. ज्यातील महाडचा सत्याग्रह, ही पहिली लक्षणीय घटना म्हणावी लागेल.
४ ऑगस्ट १९२३ रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते ‘सी. के. बोले’ यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात एक ठराव पास करून घेतला. ज्यानुसार सार्वजनिक पाणवठे, धर्मशाळा, विद्यालये व बगीचा या ठिकाणी अस्पृश्यता पाळू नये. या ठरावाची अंमलबजावणी न करणाऱ्या नगरपालिका, लोकल बोर्ड अशा स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनुदान बंद करण्यात यावे, अशीदेखील तरतूद या ठरावात होती. तो ठराव मंजूर होऊन सरकारने ११ सप्टेंबर १९२६ रोजी आदेश काढला. याच ठरावानुसार महाड नगरपालिकेने आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले होते; पण सवर्ण लोकांच्या भीतीमुळे तेथील अस्पृश्य लोकांनी तलावाचे पाणी भरण्याचे धाडस केले नाही.
त्यामुळे बाबासाहेबांनी अस्पृश्य लोकांत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी महाड येथे सत्याग्रह करण्याचे ठरवले. १९ व २० मार्च १९२७ रोजी महाड येथे कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद घेण्याचे ठरवले. महाड नगरपरिषदेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ टिपणीस यांच्या निमंत्रणावरून ही परिषद भरवण्यात आली. टिपणीस हे समाजसुधारक आगरकरांचे भक्त व बाबासाहेबांचे मित्र होते. स्वतः डॉ. बाबासाहेब या परिषदेचे अध्यक्ष होते.
असे नाही की, या सत्याग्रहात फक्त अस्पृश्य समाज सामील होता. परिषदेसाठी फतेह खान या मुस्लिम व्यक्तीने जागा दिली. अनेक उच्चवर्णीय लोक हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेच्या निंदनीय प्रकाराला विरोध करत सत्याग्रहात सामील झाले होते. महाडच्या सत्याग्रहात अनंत चित्रे, वामन पत्की, केशव देशपांडे, सुरेंद्रनाथ टिपणीस, शांताराम पोतनीस, गं. वि. सहस्त्रबुद्धे हे ब्राह्मण सहभागी झाले होते.
जरी महाड नगरपालिकेने सरकारी अखत्यारीतील सर्व पाणवठे अस्पृश्यांना खुले केले असले, तरीही त्या पाणवठ्यांवर तसा कसलाही उल्लेख केला गेलेला नव्हता. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने अस्पृश्य जमा होऊनही त्यांनी आसपासच्या कोणत्याही पाणवठ्यावरून पिण्यासाठी पाणी घेण्याची हिंमत केली नाही. म्हणूनच ह्या सभेसाठी आलेल्या लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी ४० रुपये किमतीचे पाणी उच्चजातीय हिंदूंकडून विकत घेण्यात आले होते. कारण सभेच्या ठिकाणी अस्पृश्यांना आसपासच्या पाणवठ्यावरून पाणी घेण्यास मनाई होती.
२० मार्च १९२७ रोजी शिस्तीने मोर्चा चवदार तळ्याकडे गेला. बाबासाहेब स्वतः पुढे होत चवदार तळ्याचे ओंजळभर पाणी प्यायले. बाकीच्यांनी त्यांचे अनुकरण केले. चवदार तळ्याचे पाणी पिऊन आंबेडकर ते सभेपुरते राहत असलेल्या सरकारी बंगल्यावर परतले आणि इतर सर्व लोक सभेच्या मंडपात परत गेले.
चवदार तळ्यावरून सर्वजण निघाल्यानंतर सुमारे दोन तासाच्या आतच महाड गावात एक अफवा उठली की, ‘तळ्यातील पाणी बाटवल्यानंतर आता जमलेला जमाव वीरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहे.’
धर्म धोक्यात आल्याचे उच्चजातीय हिंदूंनी महाड गावभर रान उठवले. त्यातून उच्चजातीय हिंदूंचा एक घोळका हत्यारे, लाठ्या-काठ्या घेउन सभेच्या ठिकाणी आला आणि त्यांनी सभेनंतर गावाकडे जाण्यापूर्वी जेवण करत असणाऱ्या अस्पृश्यांना मारहाण केली. बाबासाहेबांना हे समजल्यावर ते परत मंडपात गेले. जखमींना दवाखान्यात नेले. हा उच्चजातीयांचा घोळका नंतर महाड शहरभर फिरून सर्व अस्पृश्यांना धमकावत होता. शिवाय आसपासच्या सर्व गावांमध्ये ह्या सभेला आलेल्या सर्व अस्पृश्यांना धडा शिकवण्याबद्दल संदेश पोहोचवला गेला. त्यामुळे अनेक अस्पृश्यांना स्वतःच्या गावी पोहोचल्यानंतरही हिंसेला सामोरे जावे लागले. ह्या सत्याग्रहाला गांधींनी पाठिंबा दिला आणि स्पृश्यांनी अस्पृश्यांवर अश्या प्रकारे हिंसा करून चूक केली आहे असे मत त्यांच्या ‘यंग इंडिया’मध्ये प्रकाशित केले!
वीरेश्वर मंदिराच्या पंडिताने अस्पृश्यांनी वीरेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याचा कट रचला आहे अशी अफवा उठवल्यामुळे गावातील सनातनी हिंदूंनी अस्पृश्य सत्याग्रहींवर हिंसा आरंभली. परंतु अहिंसा हे तत्त्व मानणाऱ्या आंबेडकरांनी सत्याग्रहींना सनातनी हिंदूंविरूद्ध ‘हिंसा करू नका’ असा आदेश दिला होता. त्यामुळे एवढी जाळपोळ होऊनही आणि प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठीधारी अस्पृश्यांनी संयम ठेवला. त्याबद्दल गांधींनी सर्व सत्याग्रहींचे कौतुकही केले होते. खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनीसुद्धा बाबाराव सावरकरांना पत्र लिहून या सत्याग्रहाबद्दल व आंबेडकरांबद्दल स्तुतिसुमने उधळली.
दंगलीची सर्व माहिती गोळा करून बाबासाहेब मुंबईला गेले, तेव्हा इकडे महाडला गोमूत्र टाकून तळ्याचे शुद्धीकरण केले गेले. तळ्यातून १०८ घागरी पाणी काढून त्यात पंचगव्य मिसळून वेदमंत्र म्हणून ते पाणी पुन्हा तळ्यात ओतले व तळे ‘शुद्ध’ झाल्याचे घोषित केले. ह्या अशा प्रकारच्या मूर्खपणाची भलावणसुद्धा या सत्याग्रहानंतर पहायला मिळाली.

आज या विषयावर चर्चा करण्याचे महत्त्व काय? कारण, आज भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झालेली असताना सुद्धा २१ व्या शतकात ही जातिव्यवस्था नामक गोष्ट संपलेली नाही. मागील महिन्यातच ‘आय.आय.टी.’ मधील एका मुलाने जातिवाचक टोमणे सहन न होऊन आत्महत्या केली. हैद्राबाद विद्यापीठाचा ‘पीएचडी स्कॉलर रोहित वेमुला’ मृत्यू प्रकरण असो की मुंबईतील ‘एमबीबीएस पायल ठाकूर’ची आत्महत्या असो, आजही या गोष्टी सर्रास घडत आहेत. काही बुरसटलेल्या संघटनांद्वारे उच्चवर्णीयांना मागास लोकांविरुद्ध भडकवले जात आहे.
अशा वेळी गरज आहे ती या प्रकारच्या घटनांमधून संयमी लढा कसा द्यायचा असतो हे शिकण्याची. हा सत्याग्रह फक्त पाणी पिण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. शूद्र व अस्पृश्य स्त्रियांना गुडघ्याच्या खाली लुगडे नेसण्याची परवानगी नव्हती. बाबासाहेबांनी त्यांना आवाहन केले की, तुम्ही स्वतः जोपर्यंत बदल घडवून समाजापुढे आव्हान निर्माण करत नाही, तोपर्यंत समाज तुमचे अधिकार स्वीकारणार नाही. स्त्रियांनी हा बदल ताबडतोब घडवून आणला. शेतकरी व कामगारांना योग्य मोबदल्याशिवाय काम न करण्याचे, तसेच मुलांना शिक्षित करण्याचे आवाहन बाबासाहेबांनी केले.
संविधानानुसार जातिव्यवस्था नष्ट केली गेली आहे; परंतु, प्रत्यक्षात आज जातिव्यवस्था जरी नष्ट झाली नसली, तरी अस्पृश्य समाज हा मोठ्या प्रमाणात शिक्षित व यशस्वी दिसून येत आहे. याचे श्रेय संघर्षाची ठिणगी पेटविणाऱ्या या पहिल्या सत्याग्रहाला जाते, यात शंकाच नाही.


✒ लेखन - अमित
मेल

संदर्भ :
१) भारताचा इतिहास – समाधान महाजन
२) जातीप्रथेचे विध्वंसन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३) राष्ट्रनिर्माते – मा. म.‌ देशमुख
४) wikiwand.com
५) छायाचित्र : टाकबोरू

वाचत रहा :
१) कार्ल मार्क्स : साम्यवादाच्या पलीकडून (लेख)
२) लालपांढरा (लघुकथा)
३) हाथरस : आणखी एक बलात्कार आणखी एक निकाल


{fullWidth}

1 टिप्पण्या

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال