[वाचनकाल : ५ मिनिटे]
✒ लेखन - जान्हवी
✆ मेल
संदर्भ :
१) छायाचित्र : टाकबोरू
वाचत रहा :
१) झुंजार प्रीती आगळे (लेख)
२) आनंदीबाई जोशी (लेख)
३) डॉक्टर रखमाबाई (लेख)
{fullWidth}
ज्ञानाचा उजेड व आत्मविकासाची वाढ दिसल्यावर स्त्रियांना आता थांबता येणार नव्हते. स्त्रियांची लेखनाची, व्यक्त होण्याची ओढ दबून राहणार नव्हती. |
धार्मिक बाबतीत स्त्रियांना स्वातंत्र्य होतंच; पण व्यावहारिक जगात तिचं अभिव्यक्ती म्हणून उभारत असलेलं स्वातंत्र्य अलीकडचंच. शिक्षणातून घडलेल्या बदलांचे पडसाद आता कुठं दिसू लागलेत, तेव्हाच स्त्रियांना पुन्हा वैचारिक तिमिराकडे ढकलणेही सुरू आहे. दुबार त्या धार्मिक स्वातंत्र्याची भूल पडून सुशिक्षित वैचारिक मागास स्त्री उभी होताना पहायला मिळते. ज्याला आपण जन्मजात हक्क म्हणवतो ते शिक्षण आणि सामाजिक वातावरण निर्माण करण्यासाठी कित्येकींचं आयुष्य पणाला लागलेलं आहे याचं भान तरी पुन्हा गुलामीत जाण्याआधी रहावं . . .
१८७१ च्या पॅरिस कम्यूनच्या उठावात स्त्रीस्वातंत्र्याविषयीचे व समानतेचे विचार ऐरणीवर आले. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीनंतर इंग्लंडसोबतच अन्य युरोपीय देशांतही स्त्रीस्वातंत्र्याच्या चर्चेला सुरुवात झाली. याच दरम्यान ‘मेरी वॉलस्टोनक्राफ्ट’ यांनी ‘विंडिकेशन ऑफ विमेन्स राईट्स’ हे पुस्तक लिहून त्यास अधिक चालना दिली. इकडे भारतातही त्याच सुमाराला फुले दाम्पत्याच्या सत्यशोधकी मार्गानं प्रभावित झालेल्या ‘ताराबाई शिंदे’ यांनी स्त्रीशिक्षणाबद्दल सडेतोड विचार मांडले. यानंतरच्या काळात भारतभर नवशिक्षितांची एक पिढी उदयाला आली. अनेकांच्या प्रयत्नातून शिक्षणाचा रथ प्रगती करीत होता. त्यात ‘अॅनी बेझंट’, ‘मारिया माँटेसरी’, ‘मेरी कार्पेन्टर’, ‘रिबेका सिमियन’ यांसारख्या स्त्रियांचाही मोठा वाटा होता.
पुढे १८९२ मध्ये पंडिता रमाबाई यांनी ‘शारदा सदन’, १९०९ मध्ये रमाबाई रानडे यांनी मुंबईत ‘सेवासदन’ या शिक्षणसंस्थांची स्थापना केली. काशीबाई हेरलेकर, डॉ. काशीबाई नवरंगे यांचीही या कामात साथ मिळाली. १९२३ ते १९७३ या अर्धशतकात ‘ताराबाई मोडक’ यांनी भारतभर बालशिक्षणाचं बीज रोवलं आणि बालशिक्षणाच्या क्षेत्रात उचित तंत्र निर्माण केलं. मुस्लिम मुलींसाठी ‘आतिया’, ‘जोहरा’, ‘रुकैया हुसैन’ यांनी शिक्षणक्षेत्रात योगदान दिलं.
१९३७ मध्ये गांधीजींनी ‘नई तालीम’ ही शांती आणि अहिंसेच्या तत्त्वांचा आविष्कार असलेली नवी संकल्पना मांडली. गांधीजींच्या प्रेरणेनं सरोजिनी नायडू, कमलादेवी चट्टोपाध्याय, मुत्थुलक्ष्मी रेड्डी या स्त्रियांनीही शिक्षण आणि स्वातंत्र्यलढ्यात मोठं काम केलं. स्वातंत्र्यचळवळीत बेधडक उड्या घेणाऱ्या हजारो स्त्रिया, देशासाठी हौतात्म्य पत्करून फासावर हसत हसत चढलेल्या स्त्रिया, संप, हरताळ, मोर्चे काढून महागाईविरोधात लढणाऱ्या स्त्रिया समाजाच्या मध्य प्रवाहात येऊन आपले अस्तित्व सिद्ध करू लागल्या होत्या. मोठमोठ्या सभा आयोजित करून विदेशी बांगड्या आणि विदेशी कपड्यांचा त्याग करून स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात देशाबद्दलची आपली बांधीलकी व्यक्त केली. देशभक्तीचा हा वणवा भारतातल्या कानाकोपऱ्यात पसरला, त्यात बायकांचा मोठा सहभाग होता. ही गोष्टच समाजजीवनात महिला कार्यशील होऊ लागल्याची खूण नव्हती का?
नाचो! खुशियाँ मनाओ!
जो कहते थे की स्त्रियों का पुस्तक छुना पाप है,
वे मर चुके है।
जो मूर्ख कहते थे की वे स्त्रियों को
घरो में कैद कर देंगे
वे अब अपनी सूरत नहीं दिखा सकते।
‘स्वाधीनता का नृत्य’ नावाची ही मूळ कविता तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांनी चक्क १९२० मध्ये लिहिली आहे. ‘स्त्रीपुरुषांमधील बरोबरी समानतेच्या सिद्धांतावर आधारित आहे. कोणाच्या दयेवर नाही!’ हे शब्द आहेत इंद्राणी चॅटर्जी यांच्या ‘बंगाली भद्र महिला’ या १९३० सालच्या निबंधातील. स्त्रिया बंडाची भाषा बोलू लागल्या होत्या. ‘स्त्रियांविषयी लेखन’ ते ‘स्त्री-एक लेखक’ हा टप्पा विकसित होण्यासाठी काही काळ जावा लागला. याला अपवाद म्हणजे १८५५ मध्येच प्रसिद्ध झालेला महात्मा फुले यांची विद्यार्थिनी मुक्ताबाई हिचा ‘ज्ञानोदय’मध्ये ‘मांग-महारांच्या दु:खाविषयी निबंध’ हा लेख.
मासिकांमधून प्रथम कविता, स्फुट लेखन, संवाद, लेख, प्रासंगिक लेख, पत्रे लिहिता लिहिता स्त्रीलेखनाचा विकास, विस्तार होऊ लागला. १८९० नंतर स्त्रियांची नावे प्रसिद्ध होऊ लागली. स्त्रियांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जात. स्त्रिया त्यांच्या स्वाभाविक भाषेत लिहीत. ज्ञानाचा उजेड व आत्मविकासाची वाढ दिसल्यावर स्त्रियांना आता थांबता येणार नव्हते. स्त्रियांची लेखनाची, व्यक्त होण्याची ओढ दबून राहणार नव्हती.
आत्ताच्या काळातील स्त्रीलिखित साहित्याचा सूर तुलनेनं अधिक निर्भय झाला आहे. विभावरी शिरूरकरांपासून सुरू झालेली बंडखोर लेखिकांची परंपरा पुढे गौरी देशपांडे, मेघना पेठे, आशा बगे, प्रज्ञा दया पवार अशा अनेकींनी विस्तारत नेली. या लेखिकांनी मानुषधर्म आपल्या लेखनातून अधोरेखित केला आहे. त्या आर्थिक शोषणावरही कडक शब्दांत प्रतिक्रिया देतायत. त्यांनी लेखनगर्भ निष्ठा आणि निर्भयता ही मूल्यं जोरकसपणे उजागर केली आहेत. निर्मला पुतुल, जसिंता केरकेट्टा, अन्ना माधुरी तिर्की, ग्रेस कुजूर या आदिवासी कवयित्री आदिवासींच्या प्रश्नांना निर्भयपणे भिडतात. यांची कविता प्रखर राजकीय भानाची कविता आहे. आदिवासी जमिनीवर टपून बसलेली सरकारी यंत्रणा, कॉर्पोरेट घराणी व त्यांची जमीनलालसा ती दमदारपणे मांडते. वनसंपत्तीवर कसा घाला घातला जातोय, आदिवासींची भाषा कशी मरत आहे, हा आशय या कवयित्री मांडत आहेत.
साहित्यासोबतच चित्रपटांमधूनही समाजाचे प्रश्न व जीवन प्रतिबिंबित होत असते. कोणत्याही काळातील चित्रपटांतून समाजाचे, समाजमनाचे, त्याच्या आशा-निराशेचे चित्रण दृश्य रूपात चित्रित होत असते. सुरूवातीच्या काळात मूकपटांमध्ये स्त्री भूमिकाही पुरुष करत असत. मात्र १९३१ मध्ये ‘आलम आरा’ हा पहिला बोलपट आला ज्यामध्ये ‘झुबेदा बेगम’ या अभिनेत्रीने भूमिका साकारली होती. शांता आपटे, हंसा वाडकर, वनमालापासून चित्रपट क्षेत्रात अभिनय आणि दिग्दर्शनाची स्वतंत्र मोहर उमटवणाऱ्या स्त्रियांची नावं घेता येतात. १९७०-८० चे दशक गाजवलेल्या स्मिता पाटील यांनी स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या, त्यासाठी झगडणाऱ्या, निराश होणाऱ्या, पुन्हा पेटून उठणाऱ्या स्त्रीचे अनेक पैलू साकार केले.
मुळात स्त्री-केंद्रित कथा असणारे चित्रपट आख्ख्या कणगीत मूठभर म्हणावेत इतकेच. कथेसाठी नायक-नायिका दोघेही महत्त्वाचे असले तरी खरे महत्त्व नायकालाच असते, हे सगळेच जाणून असतात. त्यामुळे अशा गदारोळात ज्या चित्रपटांमध्ये सशक्त स्त्री भूमिका आपल्याला पाहायला मिळाल्या त्यांपैकी श्रीदेवीने साकारलेले ‘इंग्लिश-विंग्लिश’, ‘मॉम’ हे काहीसे वेगळ्या धाटणीचे चित्रपट, कंगनाचा ‘क्वीन’, ‘सिमरन’, ‘तनू वेड्स मनू’, दीपिकाचा ‘पिकू’, ‘कॉकटेल’, सोनमचा ‘नीरजा’, तापसी पन्नूचा ‘पिंक’, ‘थप्पड’, ‘नाम शबाना’ ही काही प्रातिनिधिक उदाहरणे.
स्त्रियांसाठी शिक्षण हे पाप असं मानलं जाण्याचा काळात गाणे किवा नाचणे यांचा तर विचारच करता येणे शक्य नव्हते. केवळ स्त्रियांनाच कलांचे दरवाजे बंद होते असे नव्हे, तर सभ्य पुरुषांनीही गाणे-बजावणे, नाटक करणे निषिद्धच होते. तरीही लोकनिंदेचा स्वीकार करत हळूहळू स्त्रियांनी तीही क्षेत्रे आपल्या कर्तृत्वाने गाजवली. हिराबाई बडोदेकर, मोगुबाई कुर्डीकर, केशरबाई केरकर, सुंदराबाई अशा प्रारंभीच्या गायिकांनी कला म्हणून गाण्याला आणि कलांवत म्हणून गायिकेला प्रतिष्ठा मिळवून दिली. आकाशवाणीच्या प्रारंभाला सुंदराबाईंकडे संगीत विभागाचे प्रमुखपद आले आणि नव्या युगाची नांदीच झाली, असं म्हटलं पाहिजे.
मालिनी राजूरकर, लता मंगेशकर व श्रेया घोषाल यांसारखी नावे आज संगीत क्षेत्रात सन्मानाने स्थिरपद झालेली दिसतात. राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतराष्ट्रीय पातळीवर नृत्याचे सन्मान मिळवणाऱ्या कथ्थकनर्तकी रोहिणी भाटे किंवा भरतनाट्यमच्या पारंपरिक शैलीचा प्रतिभाबळाने विकास घडवणाऱ्या सुचेता भिडे-चापेकर यांचे ऋण वर्तमान तरुण कलावतींवर मोठेच आहे.
स्त्री ही केवळ चूल व मूल यामध्ये रमलेली अबला न राहता पुढे तिने जागतिक क्रीडा क्षेत्रातही आपल्या देशाची प्रतिमा उंचावली. क्रीडा क्षेत्रात स्त्रियांनी बजावलेली उत्कृष्ट कामगिरी आज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मेरी कोम, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, पी. व्ही. सिंधू, दीपा मलिक, हीना सिंधू, मिताली राज यांच्या जीवनकथा अनेक भारतीय खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहेत. यंदाच्या वर्षी भारताच्या स्त्री क्रिकेटपटूंनी मैदानावर दाखवलेल्या लक्षवेधी कामगिरीचा उल्लेख करायलाच हवा.
समाजपरिवर्तनाच्या लढ्यात स्त्रीचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. बालपणीचा विवाह अमान्य करण्याचं धाडस डॉ. रखमाबाईंना शिक्षणानेच दिलं आणि वैद्यकीय शिक्षणाच्या ध्यासापोटीच आनंदीबाई जोशी अमेरिकेला गेल्या. कॉर्नेलिया सोराबजीला मुंबई विद्यापीठाने प्रवेश नाकारला, ऑक्सफर्ड आणि अलाहाबाद येथेही वकिलीच्या परीक्षा देऊन पदवी नाकारण्यात आली, तरी त्या यशस्वी वकील झाल्या. १८४८ मध्ये स्त्रियांसाठी पुण्यातल्या भिडेवाड्यात महात्मा जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या शाळेत शिकवणाऱ्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई यांच्या एका साध्या, सरळ, पण अर्थगर्भ विधानाने या वाटचालीची सुरुवात केली, त्याला आता जवळजवळ १८५ वर्षे उलटून गेली आहेत. ‘शिक्षणाने मनुष्यत्व येते आणि पशुत्व हटते’ या विचारांच्या प्रकाशात पशूतुल्य जीवन जगणाऱ्या स्त्रीच्या आयुष्याने किती खाचखळगे ओलांडत, अवघड वळणे पार करत, वाटेवरच्या काचा चुकवत मनुष्य म्हणून जगण्यासाठी प्रवास करत स्वत:त व समाजात बदल घडवून आणला. अपमान, विरोध, टीका, एवढंच काय प्रसंगी घरच्यांनी दिलेल्या शिक्षा भोगतही त्या काळातल्या स्त्रिया शिकत राहिल्या.
आपल्या आज्या-पणज्यांनी त्यांच्या हातात आलेले हे दिवे समर्थपणे आपल्याकडे सुपूर्त केले, म्हणूनच आज खंबीरपणे वाऱ्यावादळाशी सामना करत आपण आपले पाय रोवत उभ्या आहोत.
✒ लेखन - जान्हवी
✆ मेल
संदर्भ :
१) छायाचित्र : टाकबोरू
वाचत रहा :
१) झुंजार प्रीती आगळे (लेख)
२) आनंदीबाई जोशी (लेख)
३) डॉक्टर रखमाबाई (लेख)
{fullWidth}