[वाचनकाल : ५ मिनिटे]
माझ्या आवाजात काही प्रमाणात कौतुक जाणवेल खरं; पण केवळ तो आदिवासी होता म्हणून हे कौतुक नाही. तर माणूस म्हणूनसुद्धा तो मला वेगळा भासला, आजही भासतो. |
बापाला आई होता येतं; पण आईला बाप होता येत नाही. तसं पाहता यातही फारसा दम नाही. अटीतटीची वेळ आली की आपल्या प्रेमासाठी माणूस कोणतंही बंधन पार करून जातो. अपत्यप्रेमात आईपण जगलेले बाप आणि बापपण जगलेल्या आया मुबलक प्रमाणात नसले तरी ते अस्तित्वात असतात. ‘आईपण वागवलेला’ मात्र तो एकटाच होता, कदाचित निदान एकट्यानं तरी आईपण वागवावं म्हणून तो शेवटपर्यंत लढत राहिला . . .
पांढरपेशांना ग्रामीण जीवनशैलीचं वाटणारं आकर्षण हे काही आजचं नाही. फक्त काळानुरूप या आकर्षणात सुलभता येत गेली. पूर्वी जर हे आकर्षण अनुभवायचं म्हणलं की खरोखर जगापासून विभक्त अशा कोणत्यातरी जमिनीच्या तुकड्यात ‘अडकून’ पडावं लागायचं. आता जग जेव्हा ‘लहान’ झालंय तेव्हा सर्व ग्रामीण भाग शहरी लोकांना सुसह्य झालेत. आदिवासी पाडे मात्र अजूनही अस्पर्शित आहेत.
ही गोष्ट मी महाविद्यालयातून समाजशास्त्राचा पदवीधर होऊन बाहेर पडलो तेव्हाची. त्याकाळी कोणतं शिक्षण घ्यावं हा प्रश्नच नव्हता. फक्त शिक्षण घ्यावं ही अट होती. इतकंच काय तर नोकऱ्यासुद्धा पदवी पाहून नाही, तर शिक्षण पाहून दिल्या जात असत! सांगायचा भाग म्हणजे, मी त्या काळी हवं तर एखाद्या प्राथमिक शाळेत मास्तर, नाही तर कोण्या कारखान्यात पर्यवेक्षक म्हणून सहज चिकटलो असतो. मला स्वतःला मात्र ग्रामीण जीवनशैली खुणावत होती. परिणामी पदव्युत्तर शिक्षणासाठी मी विद्यापीठात अर्ज टाकला आणि विद्यावेतन घेऊन खेडोपाडी जाऊन तिथल्या जीवनशैलीवर प्रबंध लिहायला मोकळा झालो!
मी अभ्यास पूर्ण करून आणखी अभ्यास करणार आणि जीवनाचा अभ्यासक-बिब्यासक होणार ही बाब कुटुंबाला तितकीशी पटलेली नव्हतीच. पण मी अभ्यासक्रमातून नाव कमी केल्यास ‘विद्यावेतन’ मिळणार नाही या विधानाची मात्रा त्यांच्यावर योग्य बसली, लागू पडली! मी अभ्यासासाठी घर सोडलं.
सामान्य ग्रामीण भाग कित्येक संशोधकांच्या जीवनकार्याने बऱ्यापैकी जगासमोर आलेला होता. मी आदिवासी पाडे निवडण्यामागे हे पहिलं कारण होतं आणि तेथील लोकगीते व कलांना जवळून जाणून घेणं हे दुसरं. आदिवासींना भेटायचं, त्यांच्यात खायचं, फिरायचं, नाचायचं, झोपायचं हा माझा साधासोपा उद्देश होता.
काही रूढी प्रथा वगळता आदिवासी पाडे जवळपास एकसारखेच . . . त्यामुळे मी त्याला कोणत्या पाड्यावर भेटलो हे आता आठवणं अशक्य आहे. एकाच पाड्यावर अनेक वस्त्या असतात. हरेक त्या वस्तीचा देव वेगळा, श्रद्धास्थाने वेगळी, त्यांना पुजण्याची रीत वेगळी. परिणाम मी त्याला कोणत्या वस्तीवर भेटलो हेसुद्धा लक्षात नाही. हल्ली अधेमधे कधीतरी मला त्याची-माझी भेट आठवली. आयुष्यभर त्यानं आईपण कसं वागवलं हेही आठवलं. म्हणून मी ही गोष्ट सांगतो आहे. माझ्या आवाजात काही प्रमाणात कौतुक जाणवेल खरं; पण केवळ तो आदिवासी होता म्हणून हे कौतुक नाही. तर माणूस म्हणूनसुद्धा तो मला वेगळा भासला, आजही भासतो.
दागिने म्हणजे बायकांची आभूषणे ही समजूत जवळपास सगळ्याच विश्वात रुजलेली आहे. मग आदिवासी पाड्यांवरील पोरीबाळी याला अपवाद कसा ठरणार होत्या? त्या संपूर्ण पाड्यावर कोणी कधी समुद्र पाहिला होता की नाही मला शंका आहे. मात्र तेथील प्रत्येकीच्या गळ्यात कवड्यांच्या माळा होत्या – बहुदा त्या माळा वंशपरंपरागत चालत आलेल्या असाव्यात – अपवाद विधवांचा. विधवांच्या नशिबी तिथेही गुलामीच होती. चांदी-रुप्याचे दागिने क्वचित पाहायला मिळायचे. सोनं तर पाहण्यातसुद्धा नव्हतं. अशा परिस्थितीत मला तो दिसला.
त्याचं जर्जर झालेलं शरीर एकीकडे आणि कानात असणाऱ्या सोन्याच्या कुडक्या दुसरीकडे. या कुडक्या त्याचं वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी पुरेशा होत्या. आदिवासी पाड्यावर वैयक्तिक स्वच्छतेच्या संकल्पना जवळपास अस्तित्वात नसतात, त्यास तसा तोही अपवाद नव्हता.
मूळचा काळा रंग, त्यात पुन्हा मळलेलं अंग, त्यावर फक्त एक – जुनं, रंग न ओळखता येणारं – लंगोट. चिपडांनी भरलेले, धूसर दृष्टी असणारे डोळे आणि दात नसल्यानं बोळकं झालेलं तोंड. डोक्यावर टक्कल पडून केस गळालेले, वयाने पाठीत निघालेलं पोक, अस्ताव्यस्त वाढलेली नखं.
मी त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तो इतरांनी दयेत दिलेल्या अन्नावर जगत होता. फुकट कोणाला पाळण्याची चैन आदिवासी लोकांना परवडत नाही. मुळात जे कमी अन्न उपलब्ध असतं ते कष्टानं मिळवावं लागतं. त्यात कुटुंबाचे वाटेकरी असतात. मग काहीच काम न करणारा म्हातारा जमेत कसा धरणार? याहून वाईट म्हणजे त्याला कुटुंबही नव्हतं. त्याच्या कुटुंबाचा तो शेवट होता. दर दिवशी गावातील कोणाला तरी दया येऊन त्याला जिवंत राहण्यापुरतं मिळत होतं.
पाड्यावरील सर्वात वयस्कर लोकांना भेटून, त्यांच्याशी चर्चा करून, स्थानिक लोककलांचा माग काढावा म्हणून मी त्या पाड्यावर गेलो होतो. तिथल्याच एकाने मला या म्हाताऱ्याचा पत्ता सांगितला होता; पण ‘त्याला ऐकायला येत नाही’ हे मला प्रत्यक्षात तिथे पोहोचूनच कळलं. थोडा वेळ थांबून मी तिथून निघालो. नंतर इतरांशी बोललो, काही लोककलांचा तपशील जुळवला, तरी त्याच्या कानातील सोन्याच्या कुडक्या माझ्या मेंदूतून हटत नव्हत्या. पागळलेल्या कानाच्या पाळ्या . . . आणि त्यावर छोट्या सोनेरी कुडक्या . . .
त्याच्याबद्दल पाड्यावरील कोणाला थेट विचारत नसलो तरी विषयात विषय मिसळून मी इतरांकडून माहिती जमवून कुतूहल शमवत होतो. असंच एकदा अनवधानाने त्याची कथा कळाली आणि मग तो माझ्या आठवणीतील न पुसता येणारा भाग बनला – कायमचाच.
ऐन तरूणपणात कुटुंबावरचा राग डोक्यात धरून म्हणा किंवा मग आदिवासी पाड्याला कंटाळून म्हणा; पण वस्तीतून त्याचे वडील बाहेर निघाले. पाडा सोडून गावात आलेला हा पहिला माणूस. गावात मोलमजुरीची, शेतीची कामं करत त्यांनी बस्तान बसवलं. पाडा आता मागे सुटला होता, हळूहळू प्रगती होत होती. आत्तापर्यंत पाडा पाहिलेल्या त्याच्या वडिलांसाठी गावसुद्धा शहराहून कमी नव्हतं. अशातच ते, केवळ चटणी-भाकरीवर, ज्या पाटलाच्या रानातली कामं उपसत त्यांच्या पोरीला हा निरागस, भोळाभाबडा; पण अंगपिंडाने मजबूत आणि रूपाने बरा आदिवासी भावला.
त्याच्या सवयीत गावाच्या रीती मुरत गेल्या. शेवटी तो गावचाच एक भाग झाला आणि तिने थेट लग्नालाच विचारलं! बातमी गावात झाली आणि पाटलाच्या बहिणीच्या पोरांनी याला संपवण्याचा निर्णय घेतला. पोरीला हे कळालं तेव्हा रात्रीच ती याला घेऊन पुन्हा गाव सोडून त्याच्या पाड्यावर. येताना सोबत तिच्या आईने दिलेली प्रेमळ भेट होती – स्वतःचे कान उघडे ठेवून हिला दिलेल्या कुडक्या . . .
सुडाला चेहरा नसतो, अक्कल नसते, नातं नसतं.
हा जेमतेम पाच-सहा वर्षांचा असताना एका रात्री आईच्या आतेभावांनी पाड्यावर हल्ला केला. याच्या बापाला मारायला आलेले ते लोक याच्या आईचा बलात्कार करून मगच पाड्यावरून बाहेर निघाले. घटनेच्या धक्क्याने मनाला किंवा अत्याचाराने शरीराला आघात सहन न होऊन तिचा मृत्यू झाला. बाप जन्मभर जळत राहिला, मनातला सूड गिळत राहिला. कारण, समोर ताकदवान माणसं होती आणि हा बापडा आदिवासी.
हा वीस वर्षाचा असताना मरणशय्येवर असलेल्या बापानं आईची शेवटची आठवण म्हणून जपलेल्या कुडक्या याच्या हातावर ठेवल्या. ‘बाईच्या कानातील कुडक्या तिच्यासोबत सरणावर जातात, मढं जाळतेवेळी सुहासिनीच्या कुडक्या काढणे म्हणजे साक्षात पाप’ ही आदिवासी समजूत जाणून असणाऱ्या बापाने त्या पंधरा वर्षे जपून ठेवल्या, लपवून ठेवल्या. याच्याने ते शक्य झालं नाही.
बाप वारला तेव्हा आईच्या कुडक्या सोबत ठेवणाऱ्या त्या एकट्या पोरावर अख्खी वस्ती उलटली. ‘ही कसली तऱ्हा, असं वागणं ठेवलं, रीती सोडल्या तर देव कोपेल’ असा कांगावा करणाऱ्या गावाचा मूळ राग पाड्यात बाहेरची पोरगी आणलेल्या याच्या बापावर होता. परिणामी हे गद्दाराचं पोर . . . याने कुडक्या जाळून त्या नष्ट करण्याचं नाकारलं तेव्हा वाळीत जाण्याची वेळ आली. ‘बंडखोरी केलीच तर अशी अर्धीमुर्धी करणार नाही’ म्हणत या पठ्ठ्याने त्या कुडक्या थेट आपल्याच कानात घातल्या!
हा पुढे आयुष्यभर लग्न न झालेल्या अवस्थेत, हलाखीचं, एकलकोंडेपणाचं जिणं जगला. निसर्गातून मिळतंय त्यावर दिवस रेटत राहिला. आता तर तेही होत नव्हतं. त्याची अवस्था पाहून गावातून कोणीही भाकरी पुरवत होतं. काहीही झालं तरी शेवटपर्यंत कुडक्या जाळून गावात मिसळायचं नाही हे त्यानं जणू काही रक्तात भिनवलं होतं.
त्या पाड्यापुरता माझा लोककलांचा आवाका संपत आला होता. मी तिथून निघणार होतो. असंच एकदा दुपारी वस्तीवर मी जेवत असताना तो गेल्याची बातमी आली. कुडक्या कानात घालून आयुष्यभर आईपण वागवलेला माणूस मी त्याच कुडक्यांसह जळताना पाहिला.
• संदर्भ :
१) छायाचित्र : टाकबोरू
• वाचत रहा :
१) कसलीशी माणसं (सर्व भाग)
२) दांडी यात्रा गांधीजींची की सामान्यांची? (लेख)
३) लालपांढरा (लघुकथा)