दांडी यात्रा : गांधीजींची की सामान्यांची?

[वाचनकाल : ५ मिनिटे]  

महात्मा गांधी, mahatma gandhi
गांधींनाच एवढी विराट आंदोलने उभी करण्यात यश आले, ते का? याचा आपण विचार करत नाही. त्यामागे या माणसाची ‘भारताला व भारतीयांना समजून घेण्याची कुवत’ महत्त्वाची ठरली.

केवळ ७८ साथीदार सोबतीला घेऊन निघालेली दांडी यात्रा नंतर इतकी विराट झाली की संपूर्ण देश या यात्रेने व्यापून टाकला. असहकार चळवळसुद्धा सामान्यांना घेऊन पुढे निघाली; पण दांडी यात्रेने स्वातंत्र्याचा संबंध सामान्यांशी जितका जोडला तितका इतर कोणत्याही चळवळीला जोडता आला नाही. क्रूर कायद्यांना प्रतिकार करण्याची वृत्ती भारतात भिनवलेल्या या चळवळीनंतरही लोक ‘गांधीने देशासाठी काय केलं’ हा प्रश्न सर्रास विचारतात . ‌. .

 

‘या भारतीयांना स्वातंत्र्य पाहिजे म्हणे . . . स्वतःचे संविधान बनवण्याइतपत तरी यांची पात्रता आहे का?’ भारत सचिव लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतीयांना उद्देशून मारलेला टोमणा भारतातील सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांना झोंबला होता.

आपण दांडी यात्रेबद्दल वाचतो – १२ मार्च १९३० ला या यात्रेची सुरुवात झाली व ६ एप्रिल १९३० ला गांधींनी मीठ उचलून, कायदेभंग करत या यात्रेची सांगता केली. हे सर्व अचानक नाही घडले, यामागे पार्श्वभूमी होती. नेमके हेच व असेच घडले या मागेसुद्धा कारणे होती.

बर्कनहेड यांच्या आव्हानाला स्वीकारत, भारतातील सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येण्याचे ठरवले. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बसली व भारतीय संविधानाचे एक छोटेसे प्रारूप तयार करण्यात आले. भारताच्या आजच्या संविधानाशी तुलना करता, त्याला छोटेसे मानावे लागेल. परंतु, जगातील इतर संविधाने फारशा विस्तृत स्वरूपात आढळत नाहीतच. मुस्लिम लीग वगळता इतर सर्व पक्षांनी यास पाठिंबा दर्शवला. हे संविधान तयार करण्यासोबतच, भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्याची मागणी करण्यात आली. वसाहतीचे स्वराज्य म्हणजे, भारताची प्रमुख म्हणून राणीचेच नाव राहील, परंतु प्रशासन पूर्णपणे भारतीयांच्या हातात असेल.

जवाहरलाल नेहरूंसारख्या काही नेत्यांना ही मागणी योग्य वाटली नाही. त्यावेळी ऑस्ट्रेलिया, कॅनडा व न्यूझीलंडसारख्या देशांना ब्रिटिशांनी वसाहतीचे स्वातंत्र्य दिले होते. परंतु, नेहरूंना अगदी नावालासुद्धा ब्रिटिशांचे अस्तित्व भारतात नको होते. त्यामुळे १९२९ ला ऐतिहासिक ‘लाहोर’ अधिवेशनात अध्यक्ष झाल्यानंतर नेहरूंनी पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला. ब्रिटिश स्वतःहून आपल्याला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य देणार नाहीत व त्यामुळे एक मोठे आंदोलन करण्याची गरज आहे, हे या अधिवेशनात मांडले गेले.

असहकार आंदोलनाला दहा वर्षे होत आली होती. असहकार आंदोलनाच्या वेळी भारतीयांनी ब्रिटिशांना हादरवून सोडले होते. भारताची ही एकता व ताकद ब्रिटिशांना पुन्हा दाखवण्याची गरज निर्माण झाली होती. बर्कनहेडचे वक्तव्य असो किंवा सायमन कमिशनचा अहवाल, ब्रिटिशांकडून कायदेशीर स्वरूपात न्याय केला जाईल, ही अपेक्षा व्यर्थ ठरली होती. त्यामुळे त्यांचे हेच कायदे मोडून, त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी ‘कायदेभंग आंदोलन’ सुरू करण्याचे निश्चित झाले. भारताला लवकरच स्वातंत्र्य प्राप्त होणार, ही उमेद मनात बाळगत २६ जानेवारी १९३० ला रावी नदीच्या किनारी तिरंगा फडकावत, नेहरूंनी पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला. त्यानंतर, अगदी भारत स्वतंत्र होईपर्यंत दरवर्षी २६ जानेवारीला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत होतो. हे आंदोलन फक्त काँग्रेसचे आंदोलन राहू नये व सामान्य व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात यात सहभाग घ्यायला हवा, यासाठी गांधींनी काही आराखडे तयार केले, त्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजेच ‘दांडी यात्रा’.

जरी हे स्वातंत्र्ययुद्ध असले, जरी गांधी द्रष्टे नेते असले, तरी सर्व भारतीयांना एखाद्या आंदोलनात समाविष्ट करणे हे काही खायचे काम नव्हते. गांधीपूर्वीचे नेते फक्त शिक्षित मध्यमवर्गाला उद्देशून धोरणे तयार करत असत. गांधींना मात्र समाजातील सर्व घटकांचा सहभाग हवा होता. मग ते श्रीमंत असो, गरीब असो, स्त्रिया असो, पुरुष असो, उच्चवर्णीय असो वा मागास असो – सर्वांनी एकत्र होऊन लढले पाहिजे, असा त्यांचा ध्यास होता. स्त्रियांनी आंदोलनात उतरण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पत्नीला मुद्दाम पुढे केले होते. त्याचबरोबर गांधींची प्रतिमाच या प्रकारची होती की, भारतीयांनी आपल्या घरातील स्त्रियांना या आंदोलनात सहभागी होण्यास हरकत घेतली नाही.सोबतच आंदोलनाची सुरुवात अशा गोष्टीपासून होण्याची गरज होती, जी भारताच्या सर्वसामान्य लोकांच्या मनाला भिडेल. तसे तर भारतात सर्वच वस्तूंवर ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात कर लावले होते, परंतु, सर्वांच्या रोजच्या खाण्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ. याच्या कराविरुद्ध जर आंदोलन सुरू झाले तर समाजातील सर्व घटकांचा सहभाग होणे निश्चित होते.

आपल्याला वाटते की, गांधी मोठे नेते होते व सर्व भारतीयांना ब्रिटिशांविरुद्ध चीड होतीच; त्यामुळे अशी आंदोलने उभारणे ही काही जिकिरीची गोष्ट ठरत नसेल. परंतु, गांधींनाच एवढी विराट आंदोलने उभी करण्यात यश आले, ते का? याचा आपण विचार करत नाही. त्यामागे या माणसाची ‘भारताला व भारतीयांना समजून घेण्याची कुवत’ व ‘आंदोलन उभे करण्यासाठी लागणारी योजनाबद्ध विचारसरणी’ महत्त्वाची ठरली.

हे आंदोलन सुरू करताना, गांधींनी साबरमती आश्रम कायमचे सोडले व स्वातंत्र्य मिळेपर्यंत मी इथे परतणार नाही ही प्रतिज्ञा केली. साबरमती आश्रम भारताच्या एका कोपऱ्यात स्थित होते व ही अडचण गांधींना सतत जाणवायची. स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशभर सतत भ्रमण करत राहायचे व लोकांमध्ये स्वातंत्र्याची उमेद सतत तेवत ठेवायची, या उद्देशाने त्यांनी ही घोषणा केली. भारतामध्ये जातिभेद मोठ्या प्रमाणात आहे व असा विखुरलेला देश इंग्रजांविरुद्ध कधीच जिंकू शकत नाही, याची गांधींना कल्पना होती. १८५७ च्या उठावात हे प्रत्ययास आलेही होते. त्यामुळे मागासवर्गाला आपल्या बरोबरीने घेत, लोकांमध्ये समानतेचा संदेश देत, ‘फक्त इंग्रज हेच तुमचे शत्रू असावेत’ ही शिकवण देण्यासाठी, त्यांनी आपल्या निवडक ७८ सहकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मागासवर्गातील लोकांचा समावेश केला व दांडी यात्रा सुरू केली.

दांडी हे गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील एक छोटेसे गाव होते. येथे समुद्राचे पाणी अडवून, त्याचे बाष्पीभवन करत मीठ प्राप्त केले जाई. भारतीयांच्या भूमीवरील हे मीठ घेण्याचा अधिकार मात्र भारतीयांना नव्हता. हे मीठ स्वहस्ते उचलत कायदा मोडण्याचा संकल्प गांधींनी केला. गांधींच्या या घोषणेने धास्तावत, इंग्रजांनी आधीच तेथील सर्व मीठ मातीत व चिखलात पसरले होते. तरीही, तेथे पोहोचल्यानंतर गांधींनी ते मातीतील मीठ उचलत हा कायदा मोडला.

दांडी यात्रा हा ब्रिटिशांना एक जळजळीत इशाराच होता की, तुम्ही आमच्यावर राज्य करू शकता, याचे कारण आम्ही तुम्हाला ते करू देतोय. जर आम्ही तुमच्यासोबत सहकार्य करण्याचे टाळले, तर तुम्ही भारतावर आपला हक्क नाही गाजवू शकणार. सोबतच भारतीयांसाठी हा संदेश होता की ही भूमी तुमची आहे व तुम्ही या भूमीचे राजे आहात. ब्रिटिशांना घाबरण्याची काहीही गरज नाही. क्रांतिकारक ब्रिटिशांवर अचानक हल्ला करायचे, तरीही त्याचा परिणाम म्हणजे त्यांना फासावर लटकवले जायचे. धास्तावलेल्या भारतीयांना, ‘त्यापलीकडे काही करणे शक्य नाही’ असे वाटायचे. या आंदोलनात मात्र, ‘आम्ही कायदेभंग करणार’ असे ब्रिटिशांना आव्हान देत, ते करूनही दाखवले! या गोष्टीने सामान्यातल्या सामान्य भारतीयाचा उत्साह शिगेला पोहोचला.

दांडी यात्रेचा परिणाम म्हणजे देशभरात जागोजागी कायदेभंग होणे सुरू झाले. काँग्रेसच्या मुख्य नेत्यांपैकी सर्वात पहिली अटक जवाहरलाल नेहरूंना सहा महिन्यासाठी झाली. त्यानंतर महिन्याभरातच गांधींनासुद्धा अटक करण्यात आली. झाडून सगळ्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात डांबूनसुद्धा हे आंदोलन काही थांबले नाही. गांधींनी आगच अशी पेटवली होती की, ते विझविण्याचे सामर्थ्य ब्रिटिशांकडे नव्हते. ‘टाईम्स’ या मासिकाने या घटनेची दखल घेत, गांधींना ‘टाईम्स पर्सन ऑफ द इयर’ हा बहुमान दिला.

ब्रिटिशांनी माघार घेतली. व्हाईसरॉय आयर्विनने गांधींसमोर तडजोडीचा प्रस्ताव ठेवला व लंडनमध्ये गोलमेज परिषदांचे नियोजन करण्यात आले. हा तडजोडीचा प्रस्तावसुद्धा गांधींनी अतिशय विचारपूर्वक वापरत अनेक भारतीय कैद्यांची सुटका करून घेतली व ज्यांना शासनाने नोकरीतून काढले होते अशा भारतीयांना पुन्हा नोकरी मिळवून दिली. सर्व क्रांतिकारकांना सुद्धा सोडावे, ही गांधींची मागणी मात्र मान्य नाही झाली. कारण, हिंसक कारवायांना ब्रिटिश माफ करत नसत.


भारताचे स्वातंत्र्य ही सहजसाध्य घडलेली घटना नव्हती. अशी अनेक आंदोलने, अनेक योजना, अनेक करार व वाटाघाटी करत आपण स्वातंत्र्यापर्यंत पोहोचलो. या प्रत्येक घटनेमागे काहीतरी विशिष्ट कारणे होती व घेतलेले अमूल्य परिश्रम होते. आज स्वातंत्र्य उपभोगताना, ‘गांधीने काय एवढे मोठे केले?’ हा प्रश्न अनेक जण सहज विचारतात. ‘गांधीने काही मोठे केले’ हे मुळात महात्मा या शब्दानं संकोचून जाणारे आणि शेवटच्या मिनिटापर्यंत देशकार्याचाच विचार मनात दीपस्तंभाप्रमाणे तेवत ठेवून कष्टणारे गांधीजीसुद्धा मान्य नाही करणार. मात्र आजच्या स्वतंत्र भारताला, आपल्या स्वातंत्र्यसेनानींना अपेक्षित असा समानतेने, एकतेने व प्रगत विचारांनी नटलेला भारत बनविण्यात आपला वाटा काय? याचा नागरिक म्हणून आपण निश्चितच विचार करायला हवा.



लेखन – अमित


संदर्भ : 
१) Plassey to partition - Shekhar Bandopadhyay Gandhi - Ramchandra Guha

वाचत रहा :


आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال