ऑस्कर २०२३ : एक नाकावर शास्त्रोक्त आपटणे

[वाचनकाल : ७ मिनिटे] 

हसणारी ऑस्करची बाहुली, laughing doll of oscar
कुठलीही भाषा चालेल; मात्र जबरदस्तीची भाषा नको हे प्रकर्षाने पाळले जाणे आवश्यक आहे.
 
मानवाच्या उत्क्रांतीत निर्माण झालेल्या कलांच्या सर्व क्षेत्रात मातब्बर असतात. आणि अशा मातब्बर लोकांना शोधण्यासाठी काही मातब्बर संस्था अहोरात्र झटत असतात. या सर्वच संस्थांचा (खासकरून देशीय!) कारभार पारदर्शी असतो अशातला भाग नाही पण जागतिक स्तरावर या संस्थांच्या निकषांना मान आहे. मनोरंजन क्षेत्रातील अशीच एक मातब्बर संस्था ‘ऑस्कर’. या ऑस्करने भारताला यंदा दोन प्रेमळ धक्के दिले . . .

भल्या पहाटे ऑस्कर सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पाहताना वेगळाच आनंद मिळत होता. एकूण ऑस्करचा मंतरलेला माहोल . . . सादरीकरण, उत्सुकता आणि उत्कंठा . . . देखणे तारे-तारका . . . काय नसतं ऑस्करमध्ये . . . !
आजच्या ऑस्करने एक खूप चांगली आशा जागी केली. भारत देखील ऑस्करमध्ये आपली छाप सोडू शकतो याची खात्री पटली. ‘बेस्ट ड्रेस्ड वुमन इन ऑस्कर सेरेमनी’ म्हणून कोणी मन जिंकलं असेल तर ते अर्थातच दीपिका पदुकोणने. फक्त आपण भारतीयच नाही तर जगभरचे ऑस्कर रसिक तिची प्रशंसा करत होते. आज ट्विटरवर पण दीपिका ‘ट्रेण्ड’ होतेय. तिचे मनमोहक हास्य आणि ‘लुई वित्तोन ब्लॅक ड्रेस’ची तोंड भरून तारीफ होतेय. अर्थात बॉयकॉट गँगपण गारद झाली म्हणा. आपल्या खास शैलीत नाटू-नाटू सादर करताना दीपिकाने सर्वांची मने जिंकली!
याच नाटू-नाटू गाण्याने ‘बेस्ट ओरिजनल साँग’चा ऑस्कर किताब पटकावला. अर्थात भारताचा हा पहिला ऑस्कर नव्हे. रेहमानच्या ‘जय हो’ने यापूर्वी ही कामगिरी केलेली आहे.
यंदा भारतासाठी आणखी एक पुरस्कार खेचून आणला ‘द एलेफंट विस्परर’ ह्या माहितीपटाने (शॉर्ट डॉक्युमेंटरी फिल्म कॅटेगरी)!

• • •

आजवर ऑस्करने मुख्यत्वेकरून हॉलिवुडमधील सिनेमा कलाकार आणि तंत्रज्ञ यांची जास्त दखल घेतली असा त्यांच्यावर आरोप होतो. बऱ्याच प्रमाणात तो खराही आहे. पण ‘पॅरासाईट’सारखा सिनेमा किंवा आज भारताला काही क्षेत्रांमध्ये मिळालेले यश यातून ऑस्करची प्रतिमा बदलत असल्याचा दाखला मिळतो.
इथे प्रश्न हा आहे की आपण म्हणजे भारत या जागतिक पातळीवर, त्या दर्जाला पोचणार आहोत का? त्यातल्या अडचणी नक्की काय आहेत? त्यात कोण आणि कसले अडथळे निर्माण करते आहे? वर्षाला साधारणपणे हजार एक सिनेमे तयार करणारे बॉलिवूड या स्पर्धेत अजून तरी नाहीये – ही दारुण वस्तुस्थिती आहे.
१९८२ मध्ये ‘गांधी’ सिनेमाला (बेन किंग्जले) भानू अथय्या यांना वेशभूषेसाठी/कॉस्च्युम डिझाईनिंगसाठी ऑस्कर मिळाला होता. भारताचा हा पहिला ऑस्कर. सिनेमा होता इंग्रजीमध्ये. अर्थातच बॉलिवूडचा दुरान्वयेही संबंध नाही.
पुढे सत्यजित रे यांना ऑस्करने ‘लाईफ टाईम ऑनररी अवॉर्ड’ने सन्मानित केले. अर्थातच इथेही तद्दन व्यावसायिक हिंदी सिनेसृष्टी या अर्थाने बॉलिवूडचा काडीचाही संबंध नाही. पुढे रसूल पूकुट्टी, ए आर रेहमान, गुलजार ह्यांना २००९ मध्ये ‘स्लमडॉग मिलेनियर’साठी ऑस्कर मिळाले. अर्थातच पुन्हा हा इंग्रजी सिनेमा. बॉलिवूड इथेपण नाही.
आज २०२३ मध्ये जे दोन ऑस्कर भारताला मिळाले ते मात्र तमिळ आणि तेलगू या भाषांमधील सिनेमा आहेत. बॉलिवुड नव्हे! थोडक्यात दर्जा असेल तर ऑस्कर आशियाई किंवा भारतीय सिनेमा कलाकार-तंत्रज्ञ यांना सन्मानित करते. त्यामुळे आता ही लंगडी सबब यापुढे चालणार नाही, की ऑस्कर पक्षपात करते. आता यापुढे आंतरराष्ट्रीय बाजारात दर्जा असल्याशिवाय आपले नाणे खणखणणार नाही हे नक्की.

• • •

‘स्टार किड्स’ असणे यामध्ये वाईट काही नाही. पण ‘स्टार्स म्हणजे फक्त स्टार किड्स, इतरांना तिथे प्रवेशच नाही’ हे मात्र बॉलिवूडच्या पतनाचं सगळ्यात मोठं कारण म्हणता येईल.
‘स्टार किड्स’ दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत सुद्धा आहेत. पण कथा, संवाद, आशय हे मांडत असताना तिथे त्यांचे सिनेमे लेखक आणि दिग्दर्शक जोखीम घ्यायला तयार होतात. पटकथेच्या माध्यमातून अगदी तळागाळातल्या लोकांचे आयुष्य टिपणे असो की कलाकारांची निवड असो की विचारसरणी धीटपणे पुढे करणे असो, ते मागेपुढे पाहत नाहीत. धाडस करतात.
हे असं धोका पत्करून झोकून देणं बॉलिवूडनं कधीच थांबवलं आहे, जी जोखीम दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी घेत राहते. ‘जय भीम’ सारखा प्रचंड चाललेला सिनेमा हे याचं ठळक उदाहरण. बॉलिवूडमध्ये असं कुठलं उदाहरण आहे? बॉलिवूडमध्ये पूर्वी हे व्हायचं. ‘जाने भी दो यारो’, ‘रंग दे बसंती’, ‘पीके’ . . . हे असे सिनेमे आज बॉलिवूड करण्याचे धाडसच करत नाही. आज कोणी ‘पीके’सारखा सिनेमा करण्याचे धाडस करेल बॉलिवूडमध्ये?
एखादी ‘बॉयकट गँग’ येईल, पोलीस खटले उभे राहतील, एफ. आय. आर. होईल, सरकारी आदेश निघतील, कुठल्या चिरकुट संघटनांचे फतवे निघतील, माफीनामे लिहून द्यावे लागतील . . . या भीतीपायी जर रिस्क घेणे होणार नसेल तर सशक्त कथा, धाडसी विषय, नवीन विचारसरणी आणि त्यातून येणारा दर्जा यांची कमतरता बॉलिवूडला नेहमीच मारक ठरणार आहे.
याचा अर्थ बॉलीवूडमध्ये शंभर टक्के अंधार आहे असंपण नाही. अनुभव सिन्हाचा ‘भीड’ येतोय. दोनच वर्षांपूर्वी देशामध्ये जे काही घडलं, त्यावरचा हा सिनेमा असणार आहे.
इथे सीनमध्ये येतो आपण प्रेक्षक . . . देशाचे नागरिक!
आता लगेच हा सिनेमा देशावर टीका करतोय म्हणजेच – ‘देशविरोधी आहे, देशाचा आदर नाही, देशद्रोही आहे’ अशा पुड्या सोडणे यातच जर आपल्याला आनंद मानायचा असेल तर आपण आपल्या डबक्यातच सुखी राहणे चांगले. मग उगाच ऑस्कर, आंतरराष्ट्रीय सिनेमा, दर्जा वगैरे यांच्या कोरड्या व दिखाऊ गप्पा मारण्यात काही अर्थ नाही.
उद्या जर कोणी नोटबंदी किंवा ८० कोटी जनता फुकट धान्यावरती जगते आहे हा विषय किंवा बेरोजगारी हा विषय घेऊन बॉलीवूडमध्ये सिनेमे काढले तर . . . तर नक्कीच आधी त्याला ‘अर्बन नक्षलवादी’ ठरवले जाईल याची कोणीही खात्री देईल. सिनेमामध्ये हे असे ढळढळीत सत्य, कडवट वस्तुस्थिती दाखवणे अगर पाहणे याची क्षमता तरी आपल्यामध्ये उरली आहे का? पाहू अनुभव सिन्हाच्या ‘भीड’चं काय होतंय ते. आपली ‘प्रेक्षक’ म्हणून खरी भुमिका तिथेच समजेल.

• • •

प्रेक्षकाच्या भूमिकेबरोबरच, ‘नागरिक’ म्हणूनही आपण जर असेच रिस्पॉन्स देत असू, तर सिनेमा बनवणाऱ्या बॉलिवूडला दोष देण्यात काय अर्थ आहे?
सिनेमाने ज्वलंत प्रश्न मांडायचेच नाहीत, प्रश्नांना भिडायचेच नाही, कुठे किंवा कोणावर टीकाटिप्पणी करायचीच नाही – अशी जर आपली गुळगुळीत आणि गोलमाल अपेक्षा असेल, तर चाललेय हे चांगले आहे. यामुळेच मग बॉलिवूड ‘कोणाला राग तर येणार नाही, कोणाच्या भावना तर दुखावणार नाहीत, कोणी बॉयकॉट तर करणार नाही’ या भीतीतून नुसतेच मसाला सिनेमे तयार करत राहील. नुसताच खोटा राष्ट्रवाद किंवा धार्मिक भावना न दुखावणे याचीच भीती बाळगत सरधोपट (टिपीकल) सिनेमे तयार करत राहील. अक्षय कुमार छाप सिनेमांची रद्दी नव्या आवरणात झळकवली जाईल.

• • •

इतक्यात यशस्वी झालेले दोन सिनेमे घेऊत. ‘RRR’ ची जेव्हा प्रसिध्दी जाहिरात आणि ‘ट्रेलर’ यायला लागले तेव्हा बीजेपीचे तेलंगण राज्य अध्यक्ष (कोणी फुटकळ नेता नव्हे) आणि आमदार श्रीयुत बंडी ह्यांनी त्यावर बॉयकॉट शस्त्र उगारले होते. जिथे जिथे हा सिनेमा झळकेल तेथे थिएटर जाळण्याची धमकी दिली गेली.
का? कशासाठी?
तर त्यातले एक प्रमुख पात्र ‘भीम’, मुस्लिम वेशभूषेमध्ये दाखवले होते. टोपी, सुरमा वगैरे . . . आज त्याच सिनेमाने भारताचे नाव जगभर प्रसिद्ध केलेय. त्यातल्या ‘नाटू-नाटू’ वर ऑस्करचा प्रेक्षकवर्ग थिरकला हे जगाने पाहिले. जगभरात ते गाणे आणि तो सिनेमा पोहोचलाय. त्याची कथा, त्याचे सादरीकरण याचे कौतुक होतेय.
याच यशस्वी सिनेमा श्रृंखलेतला दुसरा सिनेमा ‘पठाण’ एक तर नाव पठाण, बनवलाय शाहरुख खानने, त्यात आहे दीपिका (ह्या दोघांची टोचणारी विचारसरणी) आणि दीपिकाने एका गाण्यात तिच्या असंख्य वेगवेगळ्या रंगांच्या बिकिनी घातलेल्या दिसतात. त्यात दोन सेकंद दिसलेला ‘गेरूआ’ म्हणजे भगवा रंग. मध्यप्रदेश राज्याच्या गृहमंत्र्याला (पुन्हा कोणी चार आण्याचा नेत्यास नाही, तर चक्क राज्याचा गृहमंत्र्यास) खटकला. त्यांनी चक्क धमकी दिली. ‘बेशरम रंग’ वरून ‘बंदी घालू आणि बॉयकॉट करू!’ असे धमकावले गेले.
पुढे लोकांनीच ह्या सिनेमाला डोक्यावर घेतले.

• • •

तेलगू भाषेत ‘नाटू-नाटू’ आणि तमिळमध्ये ‘द एलिफंट विस्परर’ ह्यांनी ऑस्करमध्ये भारताची मान उंचावली. इथे हिंदी कुठेच नाहीये. लक्षात घ्या, हे सगळं तेव्हा होतंय, जेव्हा पूर्ण देशाने हिंदी भाषेत बोलावं याचा दुराग्रह मांडला जातोय. ‘एक देश एक भाषा’ अशी खोचट कल्पना मांडली जातेय. प्रादेशिक भाषांना महत्त्व न देता हिंदीचं घोडं पुढं दामटलं जातंय.
अशा वातावरणामध्ये तेलुगु आणि तामिळ जाऊन देशासाठी ऑस्कर आणत आहेत, ही हिंदीचं भाषिक वर्चस्व निर्माण करू पाहणाऱ्यांना सणसणीत चपराकच आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नसून २२ अधिकृत भाषांपैकी एक असताना तसा आभास जाणूनबुजून निर्माण करण्यात येतोय. तो माथीही मारण्यात येतोय. अर्थातच याचा प्रतिवाद आणि विरोध दक्षिण भारतामध्ये कधीच सुरू झालेला आहे. हे असे भाषिक वाद यापूर्वीही घडले आहेत. आता ते मुद्दाम विशिष्ट प्रचार राबवण्यासाठी (अजेंडा) निर्माण केले जात आहेत. त्यातून केवळ निवडणुकांमध्ये होणारा फायदा बघितला जातोय – ना की कुठलेही देशहित. भारतासारख्या बहुभाषिक देशामध्ये एकच एक भाषा लादण्याचे दुष्परिणाम भयानक असतील हे सांगायला कुठल्याही ज्योतिष्याची गरज नाही.
उलट वेगवेगळ्या भाषांमध्ये कला आवर्जून पुढे आणली गेली तर त्याचा देशालाच फायदा होणार आहे. भाषिक वैविध्य सांस्कृतिक वैविध्यदेखील जपते. ह्याचा सन्मान राखणे आवश्यक आहे.

• • •

थोडक्यात, भारतासारख्या देशात प्रत्येक भाषेचे स्वागत संवर्धन हे अत्यावश्यक आहे. ‘कुठलीही भाषा चालेल; मात्र जबरदस्तीची भाषा नको’ हे प्रकर्षाने पाळले जाणे आवश्यक आहे.
केवळ आपल्याकडे जास्त संख्याबळ आहे, बहुसंख्येने पाठिंबा आहे म्हणून आम्ही दुसऱ्यांवर काहीही लादू . . . हे विध्वंसक आहे. भिन्न विचार, भिन्न लिंग, भिन्न भाषा, भिन्न धर्म यांचा आदर होतो तेव्हाच आणि तिथेच दर्जेदार कलाकृती जन्म घेतात.
जसे आम्ही म्हणू तसेच घडेल, सगळे आमच्याच विचाराप्रमाणे होईल, जे आम्हाला पचते तेच खावे लागेल, जसे आम्हाला भावते तशीच वेशभूषा करावी लागेल, आमच्याच चष्म्यातून जग पहावे लागेल आणि मांडावे लागेल . . . बहुसंख्येने जे ठरवतील तेच योग्य; बाकी सगळे देशद्रोही अर्बन नक्षलवादी! असे वातावरण निर्माण झाले की दर्जा मरतो. कलासक्ती लयाला जाते.
थोडक्यात कथानक, मांडणी, वैचारिकता, भाषा, कला यांच्यातल्या वैविध्यातूनच दर्जेदार कलाकृती जन्माला येतात.
आमची तरूण माणसे जगभरच्या कंपन्यांचे सीईओज्, शास्त्रज्ञ, आयटी इंजिनियर्स होतायत. गेमिंग असो की सिनेमा, भारतीय तंत्रज्ञ हॉलिवूडच्या सिनेमाचे ‘व्हिएफएक्स’ तयार करतात. इतर देशांचे उपग्रह आपण अवकाशात सोडतोय. मग सिनेमाच्या प्रांतातच आपण जगभर मागे का?
‘द एलिफंट विस्परर’ नेटफ्लिक्सवर जाऊन आवर्जून पाहणे किंवा येणारा ‘अनुभव सिन्हा’चा ‘भीड’ तितक्याच रसिकतेने पाहणे हे आम्ही कधी करणार? पाहून मग ते चांगले आहेत की वाईट हे ठरवू – ना की कोणी तरी उपटसुंभ बॉयकॉट करा म्हणतोय म्हणून भाबडेपणाने मान डोलवत बसू! इथे आपलीही जबाबदारी येते.

• • •

भारतातही उच्च दर्जाचे माहितीपट (डॉक्युमेंट्री फिल्म्स) बनतात हे माहीत आहे आपल्याला? आपण कधी शोध घेतलाय त्याचा? त्या खजिन्यात कधी डोकावलोय आपण? कोण बनवते असे माहितीपट हे कधी तपासलंय? अगदी मराठी-हिंदीतही अरविंद गजानन जोशीसारख्यांचे माहितीपट नि:स्तब्ध करतात हे आमच्या गावी तरी आहे? अरविंद जोशी यांचा ‘अजात’, अतुल पेठेंचा ‘कचरा-कोंडी’ आणि आनंद पटवर्धन यांचे ‘राम के नाम’, ‘विवेक’ हे माहितीपट आपण पाहिलेले आहेत का? या तिघांचे सर्व माहितीपट वारंवार पहावेत.
का मग आता ‘उरलो फक्त प्रोपोगांडा किंवा मसाला मूव्ही पुरता’ अशी परिस्थिती आहे?
की कोणी चारआण्याने यावे आणि मेंढराप्रमाणे आम्ही समजूत करून घ्यावी . . . की ओह! ह्या सिनेमाने आमच्या भावना दुखावतील हो! आमचे सगळेच खतरेमें आहे . . . आणि मुकाट बॉयकॉट गँगमध्ये सामील व्हावे!
लक्षात घ्या – ज्या इसमाने ‘RRR’चे थिएटर्स जाळण्याची धमकी दिली होती, त्याच महाशयांनी आज ‘RRR’चे अभिनंदन करणारे ट्विट आज सकाळी केले आहे. कारण वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायचे आहेत! मधल्या मध्ये त्यांना पाठिंबा देणारे बिचारे चरफडत आहेत.
अशा सगळ्यांनाच आजच्या ऑस्कर घोषणांनी सणसणीत चपराक दिलेली आहे. तीही सार्वजनिकरीत्या – जागतिक स्तरावर.

• • •

तरी कुपमंडूक मानसिकता सोडून . . . मन मोठे करूयात.
२०२३चा ऑस्कर सोहळा पाहून घ्या. दीपिकाची ‘एन्ट्री’ नि दीपिकाचे सादरीकरण पहा. ‘नाटू-नाटू’ वर झालेला जल्लोष पहा. नेटफ्लिक्सवर जाऊन चाळीस मिनिटांची ‘द एलिफंट विस्परर’ तिथे तमिळ किंवा हिंदीमध्ये पहा . . . येणाऱ्या ‘भीड’ सिनेमाचे स्वागत खुल्या दिलाने करा. आजच्या ऑस्कर निकालाने जे नाकावर शास्त्रोक्त पद्धतीने आपटले आहेत, त्यांच्या कळपातून मुक्ती मिळवा आणि स्वतःच्या मताने वागण्यातला आनंद मिळवा!

नाटू-नाटू – हिंदीत त्याचा अर्थ होतो नाचो नाचो – लेट्स डान्स!


 लेखनजय
 मेल

• संदर्भ :
१) ऑस्कर सोहळा २०२३
२) छायाचित्र : टाकबोरू

• वाचत रहा :
१) हाथरस : आणखी एक बलात्कार आणखी एक निकाल (लेख)
२) आईपण वागवलेला माणूस (लघुकथा)
३) अनवट येसुदास (लेखमाला)
{fullWidth} 


आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال