कार्ल मार्क्स : साम्यवादाच्या पलीकडून

[वाचनकाल : ५ मिनिटे] 

कार्ल मार्क्स, karl marx
धर्म ही अफूची गोळी आहे, जिने समाजाला एका नशेमध्ये ठेवले आहे.


आपण जे घडवतो तेच बहुतेक वेळा आपल्यावर उलटतं. अशाने ज्याच्या बुद्धिवादातून साम्यवाद किंवा म्हणूयात कम्युनिझम जन्मला, त्या कार्ल मार्क्सलाच या साम्यवादाने इतिहासापासून वर्तमानापर्यंत कुप्रसिद्ध करून सोडलं! साम्यवादाचे नकारात्मक पडसाद उमटले असले तरी या रशियन राज्यक्रांतीला पुरोगामी क्रांतिकारकांनी का उचलून धरले हे पाहणे आवश्यक; तसेच साम्यवादाच्या पलीकडला कार्ल मार्क्ससुद्धा . . .

‘बालकांनी शाळेत गेले पाहिजे, मनसोक्त बागडले पाहिजे, नवनवीन कल्पना मांडल्या पाहिजेत, लहान वयात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या कामाचा ताण नको.’
या विधानावर कोणाचाही आक्षेप नसणार. परंतु, एकोणिसाव्या शतकात बालमजुरी ही अतिशय सामान्य बाब होती आणि गरीब घरांमध्ये मुलांना आपले बालपण सोडून लवकरात लवकर कुटुंबीयांसाठी पैसे कमावण्याचे माध्यम व्हावे लागत असे.
कल्पना करा की, तुम्ही कामाला गेलात आणि तुम्हाला जेवणासाठी मधली सुट्टी मिळालीच नाही. आठवड्याची सुट्टी तुम्हाला मिळत नाहीये व रोज कमीत कमी १२ तास काम करावे लागत आहे. आज तुम्ही म्हणाल, हा तर आमच्यावर अन्याय होईल. तुम्ही न्यायव्यवस्थेकडे या प्रकाराविरुद्ध दाद मागाल. एकोणिसाव्या शतकात मात्र, या प्रकारे कामगारांकडून काम करून घेणे ही अतिशय सामान्य बाब होती. फक्त भारतामध्येच नाही, तर संपूर्ण जगात याप्रकारे कामगारांची पिळवणूक होत असे.
अर्थव्यवस्थेमध्ये विविध साधनांद्वारे पैसा निर्माण केला जातो. या कमाईमागे अनेकांचे कष्ट असतात. परंतु, या पैशाचे वितरण मात्र असमान होते. मूठभर श्रीमंतांच्या हातात गडगंज संपत्ती पाहायला मिळते; तर अपार कष्ट करूनसुद्धा मोठ्या प्रमाणात लोक गरीब राहतात. त्यातही पूर्वापार कमी उत्पन्न दिले जाणाऱ्या गरीब वर्गाकडूनच मोठ्या प्रमाणात कष्ट करून घेतले जाई.
या सर्व गोष्टींना विरोध करत अर्थव्यवस्थेमध्ये समाजवादाची पेरणी करणाऱ्या अर्थतज्ञाचे नाव होते – ‘कार्ल मार्क्स’.

कार्ल मार्क्स (५ मे १८१८ – १४ मार्च १८८३) हे प्रशियाचे (सध्याचा जर्मनी) राजकीय अर्थशास्त्रज्ञ, पत्रकार आणि ‘द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ व ‘दास कॅपिटल’ या पुस्तकांचे लेखक होते. ‘कम्युनिझमचे जनक’ म्हणूनही ते ओळखले जातात. मार्क्सच्या विचारांनी उग्र, रक्तरंजित क्रांती घडवून आणली, शतकानुशतके जुनी सरकारे पाडली आणि आजही जगातील २० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येवर राज्य करणाऱ्या राजकीय व्यवस्थेचा पाया म्हणून काम केले. ‘द कोलंबिया हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड’ नुसार मार्क्सचे लेखन ‘मानवी बुद्धीच्या इतिहासातील सर्वात उल्लेखनीय आणि मूळ संश्लेषणांपैकी एक’ आहे.
आज जर एखादी व्यक्ती कमी पैसे मिळणाऱ्या एखाद्या कामावर रुजू असेल, तर त्या व्यक्तीला समाजाकडून कमी प्रमाणात आदर मिळतो. कचरा साफ करणारे किंवा हातगाडी कामगार यांना तर समाज कोणत्याही प्रकारे आदर देत नाही. आजसुद्धा एखादी अशिक्षित व दुर्व्यवहारी व्यक्ती का असेना, जर तिच्याकडे पैसा मोठ्या प्रमाणात असेल तर तिला समाजात मान मिळतो. ही गोष्ट चूक आहे हे आपल्याला कळत नाही, असे नाही. परंतु, ते आपल्या आचरणात मात्र येत नाही. हीच गोष्ट काल मार्क्सने आपल्या लिखाणात मांडली आणि समाजाला संदेश दिला की, ‘कोणत्याही प्रकारचे काम हे खालच्या दर्जाचे नसते व समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तींना समप्रमाणात आदर हा मिळायलाच हवा. तरच प्रत्येक व्यक्तीला हवे तसे आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य मिळेल.’
शालेय शिक्षण संपल्यानंतर मार्क्स लेखन व पत्रकारितेकडे वळला. परंतु, जर्मनीमध्ये त्याच्या लिखाणावर बंदी घातली गेल्याने त्याने तो देश कायमचा सोडला व फ्रान्समध्ये स्थलांतरित झाला. तिथे त्याला त्याचा सहकारी ‘एंजल्स’ भेटला. त्याच्यासोबतच पुढे त्याने ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ हे पुस्तक लिहिलं. त्याच्या लिखाणातून त्याने जगभरातील कामगारांना एक होण्यास सांगितले. कामगारांना स्वतःलाच त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढावे लागेल व त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही, ही जाणीव त्याने त्याच्या लिखाणातून कामगारांना करून दिली. त्याच्या लिखाणावर जेव्हा फ्रान्स व बेल्जियममध्येसुद्धा बंदी घालण्यात आली, तेव्हा तो लंडनमध्ये स्थायिक झाला व आयुष्याच्या अखेरपर्यंत लंडन शहरातच राहिला.
१८४४ साली मार्क्स यांनी ‘इकोनॉमिक ॲंड फिलॉसॉफिक मॅन्युस्क्रिप्ट’ नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं, त्यात ‘सुखी आयुष्य हवं असेल तर आपण जे काम करतो, त्यातून समाधान मिळणं आवश्यक आहे’, असा विचार मार्क्स यांनी मांडला. आपण जे काम करतो, त्यातून जर एखादी नवीन निर्मिती होत असेल; तर ती निर्मिती आपल्या मनाला समाधान देते. परंतु, औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कारखानदारी पद्धतीमुळे एकाच प्रकारचे काम करण्याची गरज निर्माण झाली. जर एखादी व्यक्ती रंग मारणारी असेल, तर तिने सतत तेच काम करावे. एखादा सळ्या तयार करणार असेल, तर त्याने तेच करावे. याप्रकारे प्रत्येकाची कामे आता ठरवून दिलेली असतात. २१ व्या शतकात संगणकावर काम करणारे तंत्रज्ञ दिवसभर एकाच प्रकारचं ‘कोडिंग’ करत बसतात.
यातून होते असे की विविध गोष्टी करण्याचा आपल्या मनाला आनंद मिळत नाही. आपल्या मनात नैराश्य निर्माण होते व त्या कामाकडे दुर्लक्ष केले जाते किंवा ते करण्याचा आळस केला जातो. या सर्व गोष्टी हेरून, अशा साचेबद्ध कामाने कामगारांचा कामातील आनंद निघून जाईल व तेच काम खूप कष्टप्रद ठरेल असे मत मार्क्सने मांडले.
ज्याप्रकारे आज भारतामध्ये प्रधानमंत्री मोदींचे अदानी समूहासोबत संबंध आहेत असे आरोप केले जातात (जे बव्हंशी खरेही आहेत!), त्याप्रमाणेच जगभरात विविध देशाच्या महत्त्वाच्या नेत्यांचे, तेथील प्रस्थापित उद्योजकांसोबत संबंध आहेत. शासन व उद्योजक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांचा प्राथमिक उद्देश हा गरिबांची पिळवणूक करून, स्वतःला जास्तीत जास्त लाभ कसा होईल हे पाहणे असतो.

मार्क्सने हे विचार मांडत मध्यम व श्रीमंत वर्गाला ‘बुर्ज्वा’ असे नाव दिले. शासनाच्या सहकार्याने हे लोक भांडवलशाहीचे रूपांतर हुकूमशाहीमध्ये करतात. देश व व्यवस्था ही स्वतःच्या लाभासाठीच या लोकांद्वारे चालवली जाते. मार्क्सच्या म्हणण्यानुसार, या गोष्टी फार काळ टिकत नाहीत व गरिबांकडून याचा प्रतिशोध घेतला जातो. जेव्हा अन्याय अत्युच्च पातळीवर पोहोचतो, तेव्हा व्यवस्था उलथवली जाते. रशियन राज्यक्रांती याचे मुख्य उदाहरण ठरेल. आज जगात सर्वात प्रभावशाली ठरत असलेला चीनसुद्धा, तत्त्वतः मार्क्सच्या साम्यवादावर आधारित व्यवस्था चालवतो.
समाजामध्ये असलेली आर्थिक विषमता मार्क्सच्या मते काही ठराविक लोकांकडून जाणून-बुजून तयार करण्यात आलेली असते व ती कायम राहावी यासाठी ते विशेष कष्ट घेत असतात. शासनाला हवा तेवढा पैसा पुरवून आपल्या मुठीत ठेवणे, हे त्यापैकीच एक. मार्क्सच्या मते, कामगारांमध्ये याची जाणीव निर्माण होताच संघर्ष पेट घेतो. परंतु, त्या संघर्षाला यश मिळण्यासाठी कामगारांमधील एकजूट आवश्यक आहे.
समाजातून वर्गव्यवस्था नष्ट करून श्रीमंत व गरीब हा भेद संपायला हवा, हे विचार मार्क्सने मांडले. त्यासाठी त्याने स्त्रियांच्या उत्कर्षावर विशेष प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे, हे सांगितले.
‘धर्म ही अफूची गोळी आहे, जिने समाजाला एका नशेमध्ये ठेवले आहे’, असे मार्क्स नेहमी म्हणत असे. शासक व उद्योजकांद्वारे या नशेचा वापर, समाजामध्ये आर्थिक विषमतेची जाणीव होताच करून घेतला जातो आणि समाजाला मागास ठेवण्यात धर्मव्यवस्था अशा प्रकारे महत्त्वाचे स्थान निभावते, असे त्याचे म्हणणे होते. आर्थिक समानता आल्याशिवाय, ‘धर्मापेक्षा जास्त माणुसकीला महत्त्व दिले पाहिजे’ हे समाजाला कळणार नाही व त्यासाठी कामगारांनी अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे, असे मार्क्सचे म्हणणे होते.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सुद्धा जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस इ. यांसारखे अनेक स्वातंत्र्ययोद्धे मार्क्सच्या विचारांनी प्रेरित झाले होते. भगतसिंगने तर त्याच्या संघटनेच्या नावामध्येसुद्धा समाजवादी हा शब्द जोडला होता. तसेच, तो नास्तिक असल्याचे जाहीर केले होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार करत, लोककल्याणासाठी पंचवार्षिक योजनांची सुरूवात केली.
समाजाला समानतेच्या स्तरावर एक होण्याचा ध्यास दाखवणारा मार्क्स, हे ध्येय साध्य करण्यासाठी रक्तरंजित क्रांती झाली तरी चालेल या विचारांचा होता. जगातील बहुतेक ठिकाणी त्याच्या या रक्तरंजित मार्गाच्या विचारसरणीचा अवलंब करत आमुलाग्र बदल घडले. यातून निर्माण झालेल्या व्यवस्थेवर लोकांद्वारे तयार केलेल्या शासनाकडे सर्वाधिकार दिले गेले. शासनाच्या ताब्यात सर्व गोष्टी असाव्यात व शासनाने लोककल्याणासाठीच कार्य करावे अशा व्यवस्थेला ‘साम्यवाद’ म्हटले गेले. साम्यवादाचे काही नकारात्मक परिणामही रशिया किंवा चीनसारख्या देशांमध्ये पुढे पाहायला मिळाले.
कधी-कधी उद्दिष्ट जरी योग्य असले, तरी ते ज्या मार्गाने साध्य केले जाते तो मार्ग जर अयोग्य असेल, तर साध्य केलेल्या गोष्टी परिणामकारक ठरत नाहीत. समाजामध्ये समानता, गरिबीचे उच्चाटन, न्याय हे पुरोगामी विचार निश्चितच चांगले आहेत. परंतु, ते साध्य करण्याचा मार्गसुद्धा योग्य हवा. एका व्यक्तीने दारू पिऊन कार चालवताना एका लहान मुलास चिरडले, तर त्याचा बदला म्हणून मृत बालकाच्या वडिलांनी दारू प्यालेल्या व्यक्तीच्या मुलास ठार मारले व यास त्याने न्याय म्हटले तर चालेल का? हिंसक विचार व अशांत मन न्यायाचे आपापले परिमाण ठरवतात. रशियामध्ये अन्याय करणाऱ्या झारचे साम्राज्य उलथवून आलेला लेनिन व स्टॅलिन यांनीसुद्धा स्वकीयांची पिळवणूकच केली. कारण साम्यवाद फक्त उद्दिष्ट पाहतो व त्यासाठी वापरला जाणारा कोणताही मार्ग तो योग्य ठरवतो.
यातून धडा शिकून भारतासारख्या देशांनी, मार्क्सवाद एका विशिष्ट पातळीपर्यंत स्वीकारला व त्याला ‘समाजवाद’ या अवस्थेपर्यंतच मर्यादित राहू दिले. ज्यानुसार शासनाने लोककल्याणासाठी कार्य तर करायचं, मात्र शासनाकडे अनियंत्रित अधिकार मात्र नसतील.
साम्यवाद असो वा समाजवाद, मार्क्सने त्याचे विचार मांडण्यामागचा हेतू गरिबांचे कल्याण हाच होता. गरिबी येण्यामागची कारणे व ती दूर करण्यासाठी काय केले जावे, याची शिकवण त्याने आपल्या लिखाणातून संपूर्ण जगासमोर ठेवली. या गोष्टीची जाणीव करून देणेसुद्धा जगभरातील लोकांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरले व त्यातून जगामध्ये अपेक्षित चांगले बदल होत गेले. आज जर जगामध्ये समानतेचे वारे वाहत आहेत, तर त्यामागे मार्क्सचे विचार हा एक महत्त्वाचा दुवा ठरतात.

हे विचार समजून घेतले तर, जगाला व त्यातही आपल्या देशाला समानतेच्या एका नव्या पर्वाकडे नक्कीच घेऊन जातील अशी अपेक्षा आहे.


✒ लेखन - अमित
मेल

संदर्भ :
१) कार्ल मार्क्स – राहुल सांस्कृत्यायन
२) बुद्ध की कार्ल मार्क्स – डॉक्टर आंबेडकर
३) BBC Report

वाचत रहा :
१) दांडी यात्रा : गांधीजींची की सामान्यांची (लेख)
२) गझलपर्व एक डाव भटाचा (लेख)
३) ऑस्कर २०२३ : एक नाकावर शास्त्रोक्त आपटणे (लेख)


{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال