निरामय पाऊलवाट

[वाचनकाल : ३ मिनिटे] 

निरोगी आनंदी कुटुंब, healty happy family
कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय उपचार न घेता ज्या व्यक्ती आपले जीवन जगतात त्याच व्यक्ती खऱ्या अर्थाने सर्व बाबतींमध्ये श्रीमंत असतात.

परदेशातील कोणतेही अहवाल मान्य करायचेच नाहीत हे धोरण ‘न्यू इंडिया’ने स्वीकारले असल्याने ‘आंनद’ अहवालात आपली घसरण आणि चुकीच्या राजकीय भूमिका दोन्ही नाकारणे ओघाने आलेच. नुकताच आलेला आणखी एक धक्कादायक अहवाल सांगतो त्याप्रमाणे येत्या काही वर्षांत बव्हंशी भारतीय जनतेचं शरीर औषधांना प्रतिसाद देणेच थांबवेल! हे नक्की कशामुळे . . . ?

आरोग्य म्हणजे काय?
तर ‘एखाद्या व्यक्तीची शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्टीने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजे आरोग्य’ थोडक्यात आरोग्य म्हणजे शरीर आणि मन व्यवस्थित असणे त्यास कोणताही रोग, आजार किंवा वेदना नसणे. परंतु, ह्या व्याख्या फारच पुस्तकी किंवा आदर्श झाल्या!
वरील व्याख्या ढोबळमनाने सर्वांनाच माहीत असतात. खरा विचार केला तर कुठलीही व्यक्ती इतकी स्वस्थ आणि आरोग्यपूर्ण राहूच शकत नाही. कितीही म्हटले तरी धकाधकीच्या दैनंदिन जीवनात तारेवरची कसरत करताना आहार, व्यायाम, तब्येत यांकडे दुर्लक्ष होतेच. कामाच्या ठिकाणी, कुटूंबात किंवा इतर सर्वच ठिकाणी अपेक्षांच्या ओझ्याखाली वावरणारे आपण स्वतःच्या नकळत प्रचंड ताणतणावात जगत असतो. याचा परिणाम सहाजिकच कधी चिडचिड, राग व्यक्त करून तर कधी भावनांच्या आहारी जाऊन अश्रू ढाळण्यात होतो.
अशावेळी आपण ना शारीरिक ना मानसिक ना भावनिकरीत्या आरोग्यमय राहू शकतो. आणि अशा व्यक्ती जेव्हा समाजात वावरतात तेव्हा सामाजिक आरोग्य तरी कितपत जपले जाईल? तेव्हा मी म्हणेन तन, मन, भावना व आचरण ह्या सगळ्यात समतोल राखण्यासाठी सतत प्रयत्‍नशील असणे म्हणजे आरोग्य राखणे! माझ्या दृष्टीने आरोग्याची व्याख्या ही ‘शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक दृष्ट्या संतुलित असणे’ अशी करता येईल.
एखाद्या व्यक्तीचे आरोग्यपूर्ण जीवन हे केवळ तिच्यासाठीच नव्हे तर तिच्या कुटुंबासाठी, तिच्या समाजासाठी आणि त्या राष्ट्रासाठी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपली कार्यक्षमता ही केवळ आपल्या आरोग्यावर अवलंबून असते. शरीर आरोग्यासोबतच एखाद्याचे मानसिक स्वास्थ्य आणि समाजस्वास्थ्यही चांगलेच असायला हवे, कारण या तिन्ही अंगांचा परिणाम व्यक्तीच्या जडणघडणीवर होत असतो.
आपण सर्वजण मानतो, की आपले स्वास्थ्य चांगले आहे आणि आपण विकार विरहित आहोत. मुळात स्वास्थ्य म्हणजे काय, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जागतिक स्वास्थ्य संस्थेच्या मतानुसार स्वास्थ्य म्हणजे ‘परिपूर्णता’. ही परिपूर्णता फक्त शारीरिक स्वास्थ्यामध्ये नसून मानसिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक स्वास्थ्यामध्येदेखील आहे. केवळ आपल्याला काही आजार नाही म्हणून आपले स्वास्थ्य उत्तम आहे, असे म्हणून चालणार नाही.
अन्यथा बाहेरून उत्तम शरीरयष्टी असलेले नट-नटी आतून मात्र भावनिकरीत्या संपूर्ण पोखरलेले असल्याने कमी वयातच कसे आत्महत्येला प्रवृत्त होतात याची बरीच उदाहरणे आहेत. आजच्या काळातील कित्येक आजार आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे असतात. मधुमेह, रक्तदाब, स्थूलता, संधिवात, मानसिक ताण, कर्करोग, कंबरदुखी असे अनेक आजार आज सामान्य झाले आहेत. आपण त्यांना आपल्या जीवनाचा घटक म्हणून मान्यदेखील केले आहे; पण, खरी बाब ही आहे की हे सर्व आजार पूर्णपणे रोखले जाऊ शकतात. ज्यासाठी एक सर्वोत्तम गुरुमंत्र आहे – व्यायाम!
व्यायामामुळे आपल्या शरीराची कार्यक्षमता व क्रियाशक्ती वाढते. त्याचबरोबर आपली प्रतिकारशक्ती देखील वाढते व त्यामुळे खरी सुदृढता लाभते. परंतु याचा अर्थ असाही होत नाही की केवळ आजकालची ‘फॅशन’ म्हणून शरीर क्षमतेच्या पलीकडे जाऊन स्वतःला त्रास करून घेणे. बारीक होण्याच्या नादात ‘फॅड डाएट्स’ स्विकारणे. हे अत्यंत चुकीचे.
शरीर व मन दोन्हीही सुदृढ असणे हे त्या व्यक्तीच्या दृष्टीने चांगले समजले जाते. कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय उपचार न घेता ज्या व्यक्ती आपले जीवन जगतात त्याच व्यक्ती खऱ्या अर्थाने सर्व बाबतींमध्ये श्रीमंत असतात. ज्या व्यक्तींजवळ खूप पैसा आहे; पण त्यास रोगाने जर्जर केले असेल तर अशा व्यक्तीस जीवन जगणे कठीण जाते. काही वेळा एखादी व्यक्ती जर निरोगी असेल तर त्याच्या सभोवती संपूर्ण समाजसुद्धा निरोगी असावा लागतो. परंतु, समाजामधील काही माणसे हे या ना त्या मानसिक रोगाने आजारी असतात. त्यामुळे अशांच्या संपर्कातील ती व्यक्तीसुद्धा रोगट मानसिकता घेऊन वाढत जाते व म्हणून समाजाच्या तसेच देशाच्याही सर्वांगीण प्रगतीवर यांचा परीणाम होतो.
ज्या देशातील समाज हा निरोगी असतो तो देश प्रगतीच्या उंचच-उंच टप्प्यावर जाऊन पोहोचतो, म्हणून या सर्व बाबींसाठी जनमानसाचे आरोग्य महत्त्वाचे असते. त्यासाठीच दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याला विशेष महत्त्व आहे व आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य बिघडल्यावर सुधारत बसण्यापेक्षा, आरोग्य बिघडू नये म्हणून काळजी घेणे हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे.
बदलत्या काळात आरोग्य समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन जागतिक आरोग्य संघटना काम करीत असतात. जगभरात ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर आरोग्य समस्या, त्यांचे निवारण व उपाय यांवर चर्चा करण्यासाठी या दिवशी १९४८ साली एक आरोग्य संमेलन झाले होते.
दरवर्षी काही विशिष्ट आरोग्य समस्यांकडे सजगतेने बघण्याचा या दिवशी प्रयत्न केला जातो. यावर्षी आरोग्य दिन साजरा करण्यासाठीची थीम म्हणून ‘डिप्रेशन अर्थात नैराश्य’ या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सर्व देश मिळून असणार्‍या लोकसंख्येतील साधारण ३५ कोटी लोक नैराश्याच्या विकाराने ग्रस्त आहेत. तशी मानसिक आरोग्याशी संबंधित असणारी ही बाब असली तरी यावर उपाय करणे शक्य आहे. नैराश्यातून जाणारा माणूस आत्महत्येच्या वाटेवर असतो. त्यामुळे हा विकार अधिक गांभीर्याने आपण बघितला पाहिजे. या दृष्टिकोनातूनच हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा आरोग्य संघटनांचा प्रयत्न असेल.

तंत्रज्ञानाची आस आणि त्यामुळे निर्माण झालेली मानवाची स्पर्धात्मक वृत्ती, तसेच निसर्गापासून हळूहळू दूर होत जाणे हे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक सिद्ध ठरलेले आहे. त्याची जाण ठेवून प्रत्येकाने स्वतःच्या गरजा आणि मर्यादा ओळखून एका आरोग्यदायी जीवनाची वाटचाल सुरू ठेवली पाहिजे. एक सर्वांगीण व संतुलित आरोग्यमय जीवन जगण्यास प्राधान्य दिले पाहिजे. तेव्हा;

‘आपले आरोग्य आपल्या हाती काळजी घ्या स्वत:ची!’



{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال