अजेंडावंदन

[वाचनकाल : ११ मिनिटे] 
Fake Indian Politician Hurling Indian Flag
आता डेमोक्रसी नाही तिचा डान्स उरलाय फक्त!

वातावरणातील हवा ‘स्फुल्लिंगी’ असणारा हा उत्साही दिवस. अलीकडे देशाच्या समृद्धतेने भारलेले देशप्रेमी हळूहळू ‘राष्ट्रप्रेमी’ होताहेत किंवा काळानुरूप ते तिरंग्यास एकरंगी करू पाहताहेत या बाबी वगळल्या तर नागरिकांच्या मनामनात आपल्या स्वातंत्र्याप्रती प्रेमाचा आणि अभिमानाचा अखंड निर्मळ झरा आहे. आजही तो संग्राम आठवून हरेक जण भावूक होतो – हीच तर गफलत वाटते! कारण, लोकांच्या या भावनिकतेचाच बाजार मांडून काही ‘खुर्च्या’ केवळ टिकल्याच नाहीयेत तर बहरत आहेत . . .

भल्या सकाळी साडेसातला अचानक जाग आली तेव्हाच ‘आज हवेत काहीतरी वेगळं असल्याचं’ जाणवलेलं. हात ‘कानून’ इतके लांबवून घेतलेला मोबाईल पाहिला तेव्हा तर याची खात्रीच पटली. कारण, कोणत्यातरी बाबा-बुवांच्या तद्दन बाळबोध – स्पष्ट सांगायचं तर बालवाडी दर्जाच्या – सुविचारांसोबत रंगीबेरंगी फुले आणि ‘सुप्रभात’ येण्याऐवजी ‘स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा’ वगैरे फोटो दिसत होते.
सगळ्यांनी ठेवलेला तिरंग्याचा स्टेटस वारंवार पाहून होत नाही तोवर दारावर थाप, पाहतो तर सुर्वे काका. हे एक आगळंच व्यक्तिमत्त्व.
‘काय काका सकासकाळी?’
‘अरे आज आपला ७५वा . . .’ आधी तोंडावर मग बोटांवर हिशोब शेवटी काकांनी मोबाईल काढला. ‘हं! अरे आज आपला ७६वा स्वातंत्र्य दिन.’ इत्यादी सांगून त्यांनी मला (मागील वर्षाच्या) हर घर तिरंग्याचा पॉलिस्टरचा तिरंगा ‘प्रदान’ (त्यांचा शब्द) केला. जाणारे सुर्वे थांबले आणि पुन्हा माझ्यासमोर हात जोडून उभे राहिले.
‘तर त्याचं झालं असं की ७६ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची सुरूवात झाली ती खरी १८५७ सालच्या . . .’ मला कळेनाच नक्की प्रकार काय आहे. दोन मिनिटांपूर्वीचे वयोमानाने विसरभोळे सुर्वे आणि आत्ताचे इतिहासकार सुर्वे! त्यांची स्मितहास्यांत बंदिस्त नजर सारखी माझ्या डाव्या हाताकडे जात होती. पाहतो तर तिथे मी नकळतपणे उलटा मोबाईल धरलेला.
‘नाही काका कॅमेरा बंद आहे.’ मी सांगितलं. तेव्हा सुर्वे चेहऱ्यावरचं गालफाड स्मितहास्य थांबवून त्यांच्या पाच-दहा बालतरुणांच्या टोळीला घेऊन पुढे ‘रवाना’ (हाही शब्द त्यांचाच). हल्ली सुर्वेंना अशा प्रसंगी चार-दोन बालतरुण सोबत असले की ‘प्रभातफेरी’ काढल्यासारखं वाटतं. त्यात कॅमेरा पाहिल्याबरोबर सुर्वेंच्यातला वाक्पटू जागा होतो. आपोआप त्यांचे हात जुळतात, जिभेवर गोडवा काय जमतो . . . कॅमेरा पाहून भलेभले बावरतात हे तर बिचारे आपले सामान्य सुर्वे काका होत. तरी नशीब कॅमेरा चालू नाही हे मी वेळेवर त्यांना सांगितलं नाहीतर ‘१८५७ ची क्रांती’ इथपासून ते ‘२०१४ची दुबार क्रांती’ इथपर्यंत सुर्वे आले असते, असो. पण या सगळ्या गोंधळात ‘निदान या झेंड्यासोबत एखादी यष्टी मिळेल का’ हे विचारायचंच राहिलं. मागील वेळीही हीच गफलत झालेली. हेही असो.
घरातील यष्टी शोधून मी झेंडा अडकवला आणि स्वातंत्र्य दिनाचे कपडे शोधायला लागलो – नेहरू कुर्ता. नेहरूंच हेच काय ते चांगलं काम आहे की ते जाताना नेहरू कुर्ता सोडून गेले! ‘स्वातंत्र्यदिनी काय घालावे?’ हा समस्त देशवासियांस पडलेला प्रश्न तरी त्यांच्यामुळे कायमचा मिटला. कुर्ता ठीक होता, इस्त्रीही ठीकच होती; पण पायजम्याची नाडी गायब, ती शेवटी कपड्यांच्या दोरीला जास्तीची बांधलेली सापडली. नाडी ओवण्याचे काम – ओळखपत्र असूनही संसदेत घुसणाचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकाराहून – कठीण.
नाडी ओवली जाता जाता इतका वेळ गेला की तिकडून थेट ‘सुनो गौर से दुनियावालो’ (हळू आवाजात) सुरू झालं. मग घाई गडबडीत अंगावर चार तांबे घेतले, दारबाहेर यष्टीला (पॉलिस्टरचा) तिरंगा अडकवला आणि निघालो.

आवरून मी डांबाजवळ पोहोचलो तर तिथे आधीच तुरळक गर्दी जमलेली. ती गर्दी एकीकडे आणि नेहरू सदऱ्यावर उजव्या हाताला पिळा-बिळा मारून ‘दक्ष’ स्थितीत ‘दंड’ घेऊन सुर्वे दुसरीकडे! त्यांनी दारामागे उभा करून ठेवलेला दंड कधी-कधी कामी येतो तो असा.
एकीकडे सुर्वे तर दुसरीकडे बर्वे. एकाला झाकून दुसऱ्यास काढावे. इथे तर दोघेही बाहेर!
साउंडवर लागलेल्या प्रत्येक गाण्याचे गीतकार जणू तेच आहेत आणि खास आमच्यासाठी हे गीत सादर करत आहेत अशा अविर्भावात ते (साऊंडच्या आवाजाला लाजवेल अशा आवाजात) ‘गुणगुणत’ उभे होते. जो कोणी त्यांच्याकडे पाही – ते तर सगळ्यांकडेच पाहत होते – त्यास मग ते नजरेने दाद वगैरे मागत होते. कसा आहे आवाज? कसं वाटलं कडवं? ख्यालीखुशाली? घरची मंडळी कुठेयत? इथपासून ते अगदी टमाट्याचा भाव काय? सर्व काही गीत न थांबवता इशाऱ्यात विचारत होते! इंग्रजी शब्द आणि वाक्यांवर थोडी गडबड होत होती खरी मात्र इतना तो चलता है.
अजून जरासा तरतरीत तरुण. कुरळे केस, पूर्ण दाढी आणि पातळ कांड्यांचा चष्मा. थोडक्यात कवी वाटेल असा होता उभा होता. त्याच्याकडे (नशीबाने) वही नव्हती नाहीतर थेट कवीच. पण काही भरोसा नाही खिशात कागद वगैरे असू शकतो!
आणि नाडकर्णी आणि इतर काही मंडळी होतीच.
‘व्हेअर इज अवर फ्लॅग . . . सॉरी . . . अवर ‘तिरंगा’?’ हे आमच्या आळीतले उच्चशिक्षित आयटीशन. हेही चष्माधारित कडक इस्त्रीचा इनशर्ट वगैरे.
‘आला आला, झेंडा आला.’ दरवर्षी झेंड्याची जबाबदारी असणारे आष्टे आले. गांधी टोपी, सदरा आणि इत्यादी खादी मट्रेल असणारे आष्टे.
‘आष्टे इट्स नॉट झेंडा!’ आयटीशन मागच्या फळीतून पुढे सरकले. ‘इट्स तिरंगा. ति-रं-गा.’
‘तेच ते.’
‘नो. नॉट तेच ते! गीव मी प्राइड ऑफ अवर ‘भारत’ गीव मी तिरंगा’ म्हणत आयटीशन डांबाखाली.
‘पण आज तिरंगा डांबावर चढवायचा की कसं? म्हणजे गुंडाळून वर चढवायचा आणि तिथे फडकवायचा का मग गुंडाळून खाली ठेवायचा आणि फडकवताना वर न्यायचा? यंदा नियम कोणता?’ नाडकर्णी.
या सुलभ प्रश्नानंतर तिरंगा पुन्हा आष्टेकडे देऊन आयटीशन मागच्या फळीत.
शेवटी झेंडा खाली गुंडाळून बांधावा व फडकवताना वर न्यावा हा ठराव एकमताने (खरंतर बहुमताच्या जोरावर) पास झाला, तो नियमांमुळे नव्हे तर – गुंडाळलेला तिरंगा वर जाताना आणि नंतर तो फडकल्यावर त्यातील झेंडूच्या पाकळ्या उडताना छान दिसतो यामुळे!
गर्दी वाढत होती. एव्हाना ‘दक्ष’ स्थितीतच असणाऱ्या सुर्वेंचा उजवा हात अवघडला होता; पण ‘दंड’ डाव्या हातात घ्यायचा दंडक नसल्याने ते ताटकळत तसेच उभे होते. बर्वेंची गीते ‘मनोगीते’ म्हणावी इतपत ओसरलेली होती. कदाचित त्यांनी आणलेला ‘दंड’ पाहूनच सुर्वे काकूंनी गॅलरीतून सुर्वेंना हाक मारली. सुर्वे एकवेळ ड्रॅगनला लाल डोळे दाखवतील; पण सुर्वे काकूंसमोर म्हणजे . . . ते काहीही असो मात्र माघारी येताना सुर्वे ‘दंड’ पुन्हा दरवाजा मागे ठेवून आले. झालेल्या गर्दीमुळे ही बाब फारशी कोणाच्या लक्षात आली नाही!
बायकांचा घोळका आला. त्यात सोबतीला पेटी असल्याने पर्रिकर बाई जरा तेजीत होत्या. पण पेटी आहे कशासाठी आणि ती ठेवायची कोठे? लगोलग आष्टेंनी घरून टेबलाची सोय केली आणि पेटी टेबलावर ठेवून पर्रिकर बाई तिथल्या तिथे उभ्या राहिल्या. बाकीच्या सर्व जणींनी मिळून केशरी पांढऱ्या आणि हिरव्या साड्या घातलेल्या होत्या. बहुदा ऐनवेळी ठरल्याने तिन्ही रंग कमी जास्त प्रमाणात दिसत होते पण ठीक आहे.
प्रमुख पाहुण्यांसाठी वातावरण खोळंबलेलं होतं. लोकांचा संयम सुटू लागला. सुर्वे तर कंटाळून (बर्वेंच्या) घरून फक्कड इलायची चहा घेऊन आले.
मध्येच एक अलिशान गाडी आली. ‘आले वाटतं, आले वाटतं’ म्हणत सर्वजण ताठ उभे राहिले. गाडी जवळ येईल तसे तसे लोकांची उत्सुकता वाढत होती. काही जण पुढे पळणारच होते तितक्यात आष्टेंनी जाहीर केलं.
‘नाही नाही. ते प्रमुख पाहुणे नाहीत.’ आणि झालंही तसंच गाडी आम्हाला वळसा घालून पुढे! सर्वांनी प्रश्नार्थक नजरेने आष्टेंकडे पहिलं. ‘अरे आपले माननीय नगरसेवक ना ते? मग स्कॉर्पिओ मधूनच येणार ना ते!’
पुन्हा दोन-तीन अलिशान गाड्या येऊन गेल्या; पण त्या स्कॉर्पिओ नसल्याने कोणी त्यांकडे ढुंकूनही पहिले नाही. पुन्हा एकदा सुर्वे आणि बर्वे (नाडकर्णीच्या) घरातून खोवलेला नारळ घातलेले फक्कड कांदेपोहे घेऊन आले तरी प्रमुख पाहुण्यांचा पत्ता नाही.
‘शाळेत वगैरे गेले असतील का रे कोणत्या उद्घाटनाला?’ सुर्वे बर्वेला.
‘शाळेत कोण ते बोलवणार? त्यांची संस्थापक, संचालक बॉडीच सगळी उद्घाटनं करते प्रमुख पाहुणे बनून!’ आष्टे.
‘मेरी शान तिरंगा है’ चौथ्यांदा येऊन खरंच बर्व्यांचं ते पाठ होत आलेलं.
शेवटी सव्वा आठच्या आसपास स्कॉर्पिओ आली आणि सगळे आनंदले. आधी नगरसेवकांचा पीए उतरून आला त्याचं असं जंगी स्वागत, अभिनंदन झालं की त्यालाच पाहूणा समजून तिकडे पर्रिकर बाईंनी पेटीवर बसवलेलं ‘सुस्वागतम्’ सुरू केलं! पेटीचा ‘रे’ अडकत होता हे सोडलं तर बाकी ठीक.
‘सुस्वागतम्’ संपलं तरी नगरसेवक खाली उतरेणात. काय गडबड आहे कोणालाच कळेना. शेवटी कवी सदृश्य तरुणाला अटकल कळाली.
‘अरे फटाके लावा, फटाके!’ तो युरेकाच्या चालीत (कपड्यांसोबत) ओरडला. फटाक्यांची माळ आणण्यासाठी धावपळ झाली मात्र नशिबाने आष्टेंनी ती लगेच आणली म्हणून फार धावपळ करावी लागली नाही. फटाके वाजले तेव्हा मग नगरसेवक उतरले आणि पुन्हा एकदा पर्रिकर बाईंची ‘रे’ अडकलेली पेटी आणि ‘सुस्वागतम्’ झाले. पीएंनी कवी सदृश्य तरुणाला त्यांचा तात्पुरता ‘उपपीए’ म्हणून हाताखाली घेतले. मदत होत असेल तेव्हा अस्तित्वात नसलेलं पद बनवता येतं हे ते नुकतंच शिकले होते. असो.
नगरसेवक सर्वांना अभिवादन करत पुढे येत होते. आजच्या दिवशी कोणी हार किंवा शाल घालत नसल्याने त्यांना थोडं अवघडल्यासारखं होत होतं. नगरसेवकांचं हे भारदस्त व्यक्तिमत्व पाहून जो तो हरकत होता. तरी नशीबाने सकाळ असल्याने व्यक्तिमत्व ‘बार’दस्त नव्हतं!
आता नगरसेवकांचे चार शब्द.
‘आज आपण सर्व, या बलवान भारताचे सुजान नागरिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठ्या संख्येने जमलात त्यासाठी मी सर्वप्रथम तुमचे स्वागत करतो.’ यावर आम्ही स्वागताच्या टाळ्या वाजवल्या.
पण उपपीएने पीएस आणि पीएने नगरसेवकांस हा प्रजासत्ताक नसून स्वातंत्र्यदिन असल्याची आठवण करून दिली. नाही होतो केव्हातरी माझाही गोंधळ होतो!
मग पुन्हा ‘आज आपण सर्व, या बलवान भारताचे सुजाण नागरिक येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त मोठ्या संख्येने जमलात त्यासाठी मी सर्वप्रथम तुमचे स्वागत करतो.’ यावेळीही स्वागताच्या टाळ्या आमच्याच. ‘आज आपण इतक्या सकाळी येथे झेंडावंदनासाठी उपस्थित राहिलात यावरूनच देशात अजूनही देशप्रेमी अस्तित्वात असल्याची खात्री पटते आहे. देशात कार्यरत काही देशविरोधी शक्ती हे पाहून नक्कीच . . .’
उपपीए-पीए-नगरसेवक काहीतरी निरोप गेला. ‘आज आपण इतक्या सकाळी येथे ध्वजारोहनासाठी उपस्थित राहिलात यावरूनच देशात अजूनही देशप्रेमी अस्तित्वात असल्याची खात्री पटते आहे. देशात कार्यरत काही देशविरोधी शक्ती हे पाहून नक्कीच त्यांची कारस्थाने थांबवतील आणि महाशक्तीच्या नेतृत्ववाखाली देशासाठी कार्यरत होतील.’ नगरसेवकांनी आटोपतं घेतलं.
यावर सर्वांनी भल्या आनंदात टाळ्या वाजवल्या ते ‘आपलं चुकतंय हे कळल्यानंतर थांबणारे वक्ते आज फार कमी सापडतात आणि नगरसेवकांना ते जमलं यामुळे!
त्यानंतर अतिशय अजीजीने सर्वांची दोन मिनिटे मागितली आणि ती मंजूर होण्याआधीच कवी सदृश्य तरुणाने खिशातला कागद उपसला. ‘आजच्या या मंगलदिनी काही चंद ओळी माझ्यातर्फे . . .’ आणि या खरोखरच्या कवी पठ्ठ्याने सुरुवात केली.
‘मातरम् मातरम् मातरम्
वंदे मातरम् . . . वंदे मातरम् . . .
मातरम् मातरम् मातरम् . . .’
ही कवीराजांची कविता नसून हे मूळचे ‘वंदे मातरम्’च आहे हे सर्वांना जरा उशिराच कळलं. मग खुद्द ‘आनंद मठ’ वाल्या बंकिमचंद्रांनीही जितकं कसून सादर केलं नसेल तितकं कसून वंदे मातरम् आम्ही (दहा मिनिटे) ऐकलं.
‘नाऊ हाऊ शूड वी होईस्ट अवर तिरंगा . . .’ गुगलवर वाचलेले नियम सांगत पुढे आलेल्या आयटीशनला ‘आता राष्ट्रगीत, का आधी वंदे मातरम् कि मग झेंडा उंचा रहे हमारा सुरुवातीला काय घ्यायचं?’ हा साधा प्रश्न विचारून आष्टेने पुन्हा मागच्या फळीत सारलं.
उत्साहाच्या भरात ‘एक साथ दक्ष.’ सुर्वे ओरडले आणि पायांचा खाड्च काय ठप आवाज देखील झाला नाही. त्यांची चूक कळल्यावर मग त्यांनी ‘एक साथ सावधान!’ ची आरोळी दिली आणि सगळे ताठ झाले.
जनगणमन झाल्यावर नगरसेवक ध्वजारोहणाला सुरुवात करणार इतक्यात गावातून कुठून तरी शंखाचा निनाद घुमला. गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी नियमात नवनवे बदल होत असल्याने यंदा झेंडा फडकवताना शंखबिंख वाजवायचा होता की काय? अशी चिंता सर्वांच्या चेहऱ्यावर दाटली. ऐनवेळी धावपळ नको म्हणून आष्टे शंख आणायला गेले सुद्धा! यंदा ‘तिरंगा रोवायचा होता की भगवा?’ हा प्रश्न सुद्धा आयटीशनने आजूबाजूच्यांना बोलून दाखवला; पण नंतर स्पीकरवर सुखकर्ता दु:खहर्ता सुरू झाल्यावर सर्वांच्या जीवात जीव आला आणि ध्वजारोहण झाले.

तिकडे पर्रिकर बाईंचं ‘झंडा उंचा रहे हमारा’ तर इकडे सुर्वेंचं ‘७६वा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो’ ही समारोप घोषणा (घोषणा द्याव्यात त्या बाकी सुर्व्यांनीच!) तर पलीकडून तिरंग्यातील वेगवेगळ्या रंगाची साडी घालून आतापर्यंत तीन ओळींत थांबलेल्या बायकांची पुढे येण्यासाठी लगबग. बहुतेक स्टेटसवर कोण लवकर सेल्फी टाकणार याची चढाओढ असेल. अचानक सगळ्या परिसरात तीन रंग एकमेकांत मिसळून धावू लागले! तोच अलीकडे आयटीशन पुढे झाले. घसा वगैरे साफ करून समोरच्या बर्वे, नाडकर्णी, आष्टे यांच्यासह काही चंद माणसांना साथीला धरत त्यांनी सुरुवात केली.
‘वी द पीपल ऑफ भारता . . .’ सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. ‘वी द पीपल ऑफ  टू बी  अखंड भारता . . .’ सगळे खुशच म्हणजे एकदम. एक टाळीही आली! ‘द वन अँड ओन्ली हिंदुराष्ट्र, वर्ल्डज् विश्वगुरू नेशन. अवर जर्नी ऑफ लास्ट डेकेड विथ डेमॉक्रसी वॉज मेजमरायजिंग अँड दस न्यू एज ऑफ डेमोक्रसी. वी आर मुविंग टूवर्डस ट्रूथ अन्डर द ग्रेट लीडरशिप ऑफ . . .’
हे सर्व ऐकताना भाव कळकळीने बदलत असणारा एक तरुण चेहरा मला तिथे दिसला. यालाही चष्मा! खरोखर अभ्यासू असेल.
‘काय फार कष्टात दिसता तुम्ही हे ऐकताना?’ मी.
‘कशाचं कष्ट साहेब? हे असलं कष्ट सगळीकडं आहे आजकाल . . . .’ बोट आयटीशनकडे. ‘. . .आजच्या घडीला या देशात सर्वात मोठा प्रॉब्लेम कोणता असेल, सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती ‘चुकीच्या तोंडापुढे माईक आहे’ हीच आहे.’ तो कळकळीने म्हणाला.
‘फार अभ्यासू दिसता.’ मी.
‘कशावरून? या चिकित्सेवरून?’
‘नाही चष्म्यावरून.’
‘चष्मा होय! नाही तो तर गेम खेळून लागलाय! पण तुम्हाला सांगतो, लोकशाहीचे फायदे कोपरापर्यंत ओघळतील तोवर ओरपून खात असलेली हिच माणसं एरवी एका हाताने संपत चाललेल्या लोकशाहीचाही असा उदो-उदो करत असताना स्वतःच्याच दुसऱ्या हाताने हुकूमशाहीचा दरवाजा उघडत आहेत. छ्या, या देशात छान फारसं काही राहिलेलं नाही. आता डेमोक्रसी नाही तिचा डान्स उरलाय फक्त!’
तो विचारांत तिथून (पार्ले न घेताच) निघाला. मी (पार्ले घेऊन) त्याच्यामागे निघालो ते काही त्याच्या पावलांवर चालण्यासाठी नाही. त्याचं असं आहे की आपण पडलो जातीचा फायटिंग शौकीन! आणि हा मनात खदखद दाटलेला तरुण. स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदनाचे राजकीय फायद्यासाठी जे काही ‘अजेंडावंदन’ चालू आहे ते पाहून आज कोणत्यातरी चौकात याचा उद्रेक होणार. आणि त्या उद्रेकाने अमुक-तमुक-बिमुक-प्रमुख समूह-गट-संघ-दल-बिल कोणाच्यातरी भावना दुखावणार आणि फायटिंग होणार!

एकंदरीत फायटिंग होणार तेव्हा फायटिंग चालू असताना निवांत खाता येईल म्हणून मी पार्लेचा पुडा खिशात ठेवला.


{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال