धर्म व्यापकतेने संकोचताना

[वाचनकाल : ४ मिनिटे] 
Protester, Hindu Monk and Tajmahal
आणीबाणीदरम्यान ‘सेक्युलर’ शब्द घटनेत अंतर्भूत करण्यात आला. एकतर्फी निधर्मी मुखवट्यामुळे चिडलेल्या विरोधकांना सत्ता मिळवण्यासाठी आता बहुसंख्यांकांचा धर्म हाताशी धरला.

‘जर हरेक घरातील एका मुलाला संगीत शिकवलं असतं तर भारताची कधी फाळणी झाली नसती’ असे काहीसे विचार उस्ताद बडे गुलाम अली खान जेव्हा प्रकट करतात तेव्हा नक्कीच त्यामागे तथ्य असलं पाहिजे. आज पाकिस्तानी कोक स्टुडिओ भारतात आणि भारतीय शास्त्रीय/बॉलीवुड संगीत पाकिस्तानात ऐकताना तरुण पिढी हेच विचार सार्थ ठरवते आहे ना? आणि जर कलात्मकता भेद संपवते असे असेल तर देशांतर्गत जे धार्मिक दुफळीचे राजकारण फोफावतेय ते कोणाकडून, कोणासाठी आणि कशासाठी . . .

‘A Hindu has to glorify a Muslim and a Muslim has to glorify a Hindu!’

‘मजहरखानला हिंदू जिवबाची भूमिका अन् मला मुसलमान मिर्झाची भूमिका का?’ या गजानन जागीरदार यांच्या प्रश्नावर ‘व्ही. शांताराम’ यांनी दिलेलं हे उत्तर होतं. ‘प्रभात’च्या ‘पडोसी’ (१९४०) या मराठी ‘शेजारी’च्या हिंदी आवृत्तीत हिंदू-मुसलमान शेजाऱ्यांची कथा सादर केली होती. चित्रपट हे प्रामुख्याने मनोरंजनाबरोबरच समाजशिक्षणाचं माध्यम मानलं जाण्याचा तो काळ. आजच्यासारखा माध्यमांचा अतिरेकी भडिमार तेव्हा नव्हता. त्या फाळणीपूर्व दशकात मुस्लिम-लीगने वेगळ्या राष्ट्राची मागणी केली होती.
त्यापूर्वीच्या इतिहासात, हिंदू-मुसलमानांच्या सहजीवनाची, धार्मिक सौहार्दाची गंगा-जमुनी तहजीब (अर्थात संस्कृती) मोगल-निजामशाहीच्या काळात उत्तरेत दिल्लीपासून दक्षिणेत हैद्राबादपर्यंत अस्तित्वात होती. उत्तर प्रदेशातील ‘अवध’ हे या संस्कृतीचं उगमस्थान.
लखनौ-अलाहाबाद-कानपूर, अयोध्या-फैझाबाद-वाराणसीपासून हैद्राबाद-तेलंगणा भागात ही संस्कृती वाढली. इस्लामी रमजान-मोहरम, हिंदूंची बसंत पंचमी, होळीसारखे सण मिळून मिसळून साजरे होत. हिंदू मंदिरातील फळे-सुकामेवा मुस्लिमांच्या इफ्तारसाठी जायचा. कलागुणांची देवाण-घेवाण व्हायची. दिल्लीच्या स्थानिक खडीबोलीवर पर्शियन भाषेचा प्रभाव पडून हिंदवी वा हिंदी भाषा हिंदुस्थानी होत गेली. ब्रिटिशांच्या साम्राज्यात हिंदुस्थानी उर्दू झाली. तहजीबची आठवण करून देणारे शेरवानी-कुर्ता-कमीज, सलवार-लेहेंगा-दुपट्टा आदी पहेराव आजही लोकप्रिय आहेत.
कबीर, गुरुनानक यांच्या विचारधारेचाही समाजमानसावर प्रभाव होता. ‘कोई जपे रहीम, कोई जपे है राम, दास कबीर है प्रेम-पुजारी, दोनों को परनाम!’ म्हणणाऱ्या कबीराच्या ‘निर्गुण-भक्ती’ने प्रभावित झालेल्या उपासकांना कुठल्याच धर्माचं बंधन नव्हतं! दोन्ही धर्मातील वाईट घातक चालीरीतींवर कबीर सडकून टीका करायचा, त्यामुळे दोन्ही धर्मातील सनातनी कबीराला धमकावत . . . त्यातूनही ‘कबीर पंथ’ आजवर तरला आहे! धार्मिक समभाव जोपासणाऱ्या शहेनशहा अकबराच्या दरबारातला कवी अब्दुल रहीम खान-इ-खाना तर कृष्ण भक्त होता!
त्या सुमारास व्यापाराच्या मिषानं आलेल्या ब्रिटिशांनी १६०० साली ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून अंमल वाढवायला सुरुवात केली. तेव्हा त्यांचं अडीच लाखांचं सैन्य होतं. त्या विरोधात झालेल्या १८५७ च्या उठावात हिंदू-मुसलमान समाज एकत्र लढल्याची जाणीव झाल्यावर, ब्रिटिशांनी फो,डा आणि राज्य करा हा मार्ग अनुसरला. १९०६ साली ढाक्क्याला स्थापन झालेल्या मुस्लिम लीगची सुरुवातीची ‘वेगळ्या राज्याची’ मागणी चाळिशीच्या दशकात ‘वेगळ्या राष्ट्रापर्यंत’ येऊन ठेपली. १९४७ साली फाळणी होताना झालेल्या धार्मिक दंगलीत लाखो निरपराध्यांची हत्या होऊन, भारत आणि पाकिस्तान (पूर्व आणि पश्चिम) असे दोन शेजारी देश निर्माण झाले. फाळणीनंतर पाकिस्तान इस्लामी देश जाहीर झाला तर भारतीय घटनेनं अल्पसंख्यांकांच्या सुरक्षिततेसाठी उदात्त निधर्मी तत्व स्वीकारलं. परिणामी ब्रिटिशांनी मागे ठेवलेला फोडा आणि राज्य करा हा वारसा आजतागायत सत्ता टिकवण्यासाठी निरंतर चालूच आहे . . . पुढच्या पिढ्यांना देण्यासाठी.

स्वातंत्र्यानंतर हिंदी चित्रपटाने मात्र नेहमीच राष्ट्रीय एकात्मतेची स्वप्नं दाखवली. ‘ये चमन हमारा अपना है, इस देशपे अपना राज है’ किंवा ‘अब कोई गुलशन ना उजडे, अब वतन आझाद है’ हे सांगताना ‘हिंदू-मुस्लिम सिख-ईसाई सबको मेरा सलाम!’ किंवा ‘प्यार बांटते चलो, क्या हिंदू क्या मुसलमान, हम सब हैं भाई-भाई’ अशी धार्मिक सलोख्याची लोकप्रिय गाणीदेखील होती. साठीच्या दशकात ‘शकील बदायुनी-नौशाद-मोहम्मद रफी’ या मुस्लिम त्रिकुटानं ‘मन तरपत हरी दर्शनको आज’ हे हिंदू भजन ‘बैजू बावरा’ला दिलं, तर ‘सी. रामचंद्र-राजेंद्र कृष्ण-लता मंगेशकर’ या हिंदू त्रिकुटानं ‘दुवा कर गम-ए-दिल खुदासे दुवा कर’ ही मुस्लिम इबादत ‘अनारकली’ला दिली. के. आसिफच्या अनारकलीनं अकबराच्या दरबारात ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे’ म्हणत कृष्ण जन्माष्टमीला नृत्य केलं, तर अनारकलीवर प्रेम करण्याचा गुन्हा केल्याबद्दल सलीमला तोफेच्या तोंडी दिलं जात असताना, ‘मंदिर में और मस्जिद में तू और तूही हैं इमानों मे . . . मुरली की तानों मे तू और तू ही हैं अजानों मे!’ असं शकील बदायुनी मुहब्बतीचं महत्व सांगून गेला! ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद ही इन्सान बनेगा’ लिहिणारा साहीर लुधियानवीनं त्याच्या अजरामर कव्वालीच्या अखेरीस हिंदू दाखले देत इश्कची अंतिम पायरी गाठली . . .
‘भक्तावर प्रेम करणाऱ्या ईश्वरा’भोवतीच मानवतेच्या पायावर सारे धर्म उभे आहेत, हे सत्य धर्मग्रंथातच बंदिस्त राहिलं. स्वातंत्र्यानंतर मुस्लिम भावना जपताना, स्वातंत्र्य लढ्यात जनमानसात वसलेलं ‘वंदे मातरम’ मागे पडून ‘जन गण मन अधिनायक जय हे’ हे निधर्मी गीत राष्ट्रगीत ठरलं. १९०६ साली ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा’ असं अजरामर काव्य लिहून जाणारा, मूलतः निधर्मी असणारा कवी डॉ. इक्बाल, ज्याचे पूर्वज मूळ हिंदू होते, त्याने देखील स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राच्या मागणीला पाठिंबा देत निष्ठा बदलली, काव्याच्या ओळी बदलल्या . . .
‘चीनो-अरब हमारा, हिंदोस्तां हमारा, मुस्लिम हैं, वतन हैं, सारा जहां हमारा!’ त्यामुळे हे सुरेख काव्य भारताचं राष्ट्रगीत होता होता राहिलं. नंतरही ‘सारे जहांसे अच्छा’ हे गीत ‘हिंदोस्तां हमारा’, ‘अपना घर’, ‘भाई-बहेन’ या चित्रपटात येऊन गेलं. साहीरनं ‘फिर सुबह होगी’ या आशेवर स्वातंत्र्यानंतरचं उपरोधिक वास्तव लिहिलं . . .

‘चीनो-अरब हमारा, हिंदोस्तां हमारा,
रहेने को घर नहीं है, सारा जहां हमारा!
जितनी भी बिल्डींगे थी, सेठों ने बाट ली हैं,
फुटपाथ बंबई के हैं आशियां हमारा!
तालीम है अधुरी, मिलती नही मजुरी,
मालूम क्या किसी को दर्द-ए-निहाँ हमारा!’

या विदारक सत्याकडून देशाचं लक्ष्य हटवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नेहमीच धर्म हाताशी धरला. आणीबाणीदरम्यान ‘सेक्युलर’ शब्द घटनेत अंतर्भूत करण्यात आला. एकतर्फी निधर्मी मुखवट्यामुळे चिडलेल्या विरोधकांना सत्ता मिळवण्यासाठी आता बहुसंख्यांकांचा धर्म हाताशी धरला. दोन्ही समाजात स्वातंत्र्यपूर्व सामाजिक दरी निर्माण झाली. दोन्ही समाज पुन्हा संशयास्पद नजरेनं समोरासमोर उभे ठाकले! राहिल्या त्या ऐतिहासिक सुरेख वास्तू, वसलेली शहरं . . . त्यांचं अस्तित्व मिटविण्यापेक्षा अशा वास्तूंचं-शहरांचं नामांतर करणं सोप्पं! पण, औरंगजेबाच्या बिबीचा - दिलरस बानोचा मकबरा, तो ज्याच्यावर बेतलाय त्या यमुनेकाठच्या शहाजहानच्या बिबीच्या - मुमताजच्या मकबऱ्याचं भवितव्य काय?

समाजाचा आरसा असलेल्या चित्रपटाच्या पडद्यावर आता धार्मिक अत्याचारांच्या ‘फाईल्स’ दिसू लागल्या. त्यात उजव्याचं डावं, डाव्याचं उजवं होणारच! थोडक्यात, गंगा-जमुनी संस्कृती आता इतिहासजमा होत आहे . . . परंतु, ७५ वर्षांपूर्वी रिव्हॉल्वरच्या तीन गोळ्यांनी झालेली शरीराची राख गंगा-यमुना संगमावर विसर्जित झाली, त्यातून तरलेला ‘सत्य-अहिंसा’ हा धर्मनिरपेक्ष विचार जिवंत आहे.


{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال