तथा प्रजा यथा राजा

[वाचनकाल : ५ मिनिटे] 
Narendra Modi Advertising
सेल्फी काढताना फ्लाइंग किस देणाऱ्यास आणि/किंवा डोळे मिचकावणाऱ्यास देशद्रोही समजावे.
मास्टरस्ट्रोकऽ मास्टरऽस्ट्रोक माऽस्टरस्ट्रोक . . . आज पहाटेचा मास्टरस्ट्रोकऽऽऽ . . . ताजा-ताजा, गरम-गरम मास्टरस्ट्रोकऽऽऽ . . . . आजचा मास्टरस्ट्रोक आज वाचा, उद्याचा नवा येतोच आहे . . . सर्वांत आधी आमच्याकडून जाणून घ्या आजचा मास्टरस्ट्रोकऽऽऽ . . . अशा शब्दांसह खपतील तशा भन्नाट वेगात विश्वगुरू मास्टरस्ट्रोकवर मास्टरस्ट्रोक मारतच आहेत! ‘स्टॅन्ड’मधील दर्शकांना उमजण्याची उसंत न देता कायम ‘एज ऑफ द सीट’ ठेवत त्यांचे ‘मनोरंजन’ करण्याचे धक्कातंत्र विश्वगुरूंना बखूबी सापडलेले आहे. नुकत्याच क्रांतीदिनी त्यांनी ठोकलेल्या आणखी एका मास्टरस्ट्रोकऽऽऽचे हे समालोचन . . .

रशिया-युक्रेन युद्ध थांबवून तिथे पुतीन-झेलेन्सकी ही जोडगोळी कशी प्रस्थापित करता येईल, वर्णद्वेषाने धुमसत असलेल्या अमेरिकेतील बायडेनांस बंधुभाव कसा चोजविता येईल, तुर्की एर्दोगणांस महागाई घटवण्यासाठी अर्थसल्ले कसे देता येतील, चीनातील आंतरिक राजकीय संघर्षातून जिनपिंगांस कसे वाचवता येईल किंवा जळता फ्रांस विझवून तिथे सामंजस्य कसे पेरता येईल या आणि अशा कैक आंतरराष्ट्रीय जागतिक समस्या सोडविण्यात गर्क असलेल्या विश्वगुरूंस इंडियाच्या किरकोळ क्रांतीदिनाचे स्मरण झाले आणि आपल्या ‘अठराचे’ ‘साडेअठरा’ करत त्यांनी – यंदा गंगेत बुडी घ्यायला पाणी नसल्याने अन् कुठलेही उद्घाटन (दुबार) शिल्लक नसल्याने – नवा प्रकल्प जाहीर केला.
देशाच्या विविध भागांतून जळलेली घरं, पेटत्या बस आणि दुकानांपुढून लोक भरमसाठ सेल्फी टाकत आहेत. तसेच काही लोक बंदूकांसोबतही सेल्फी वैगेरे घेताहेत हे त्यांच्या (जरा उशीराच) निदर्शनास आले. जनतेचे हे सेल्फीवेड ध्यानात घेऊन – किंबहुना व्हॅलेंटाईनला गोमातेसह सेल्फी काढता न आल्याने हिरमुसलेल्या तरुणाईकडे पाहून – विश्वगुरूंनीं ‘मेरा देश माटी माटी’ . . . माफी असावी . . . ‘मेरी माटी मेरा देश’ हे सेल्फी अभियान रूजवले.
कसलातरी शिलाफलक आणि त्यासोबत सेल्फी ही बातमी जाहीर झाली आणि लगोलग व्हाट्सॲपवर हिंदू खतऱ्यात असल्याच्या दुःखद परभारे राजस्थान, बंगालच्या ‘कलेजीचीर’ हिंसक बातम्या वाचून हताश झालेल्या राष्ट्रप्रेमी लोकांत आनंदाची लहर उमटली. जीवनात टोमॅटो नाही तर निदान ५० मेगापिक्सेलचा मोबाईल असल्याचा हर्ष तत्क्षणीच त्यांच्या नसानसांत धावला. दिवे-टॉर्च, थाळ्या-टाळ्या-झेंडे सारखं यंदा काही नसल्याने हतबल झालेल्या या देशप्रेमी वर्गास झळाळी आली.
आत्मनिर्भर भारत आणि ‘जनतेचे’ हे इव्हेंट प्रेम लक्षात घेऊनच परमपूज्य विश्वगुरूंनी हा मास्टरस्ट्रोक चालवलेला आहे यात संदेह तो नसावा. सेल्फी ही व्यक्तीकेंद्रीतता नसून ‘आत्मनिर्भरता’ आहे. इतकंच काय तर ही सेल्फी घेताना दुसऱ्या हातात घ्यावयाची मातीसुद्धा आपली देशीच!
‘अठराचे’ ‘साडेअठरा’ करत त्यांनी हा घाट ‘छप्पन्नचे’ ‘साडेछप्पन्न’ करून घेण्यासाठी घातलेला आहे असा जर तुमचा दावा असेल तर तो तुमच्या जवळच ठेवा!

प्रथमतः हे अभियान म्हणजे नक्की काय?

होय. नावात ‘पीएम’ नसले तरी हे अभियान महाशक्तीचेच आहे. गोंधळ टाळण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर यास ‘श्री पीएम मेरी माटी मेरा देश’ अभियान म्हणू शकता. या अंतर्गत ईश्वरकृपेने आणि परमपूज्यंच्या वरदहस्ताने गावागावात संबंधित गावातील क्रांतिकारी, सैन्यातील, पोलीस विभागातील शहिदांची नावं व त्याखालोखाल परमपूज्य महाशक्तीचा उद्बोधक ‘जीवनसंदेश’ असणारा शिलाफलक लावण्यात येणार आहे. यासोबत ‘अमृत काल के पंच प्रण’ नामक (महाशक्तीचा फोटो असलेला) आणखी एक फलक असेल. २०४७ ला येणाऱ्या अमृतकाळाची वाट पाहत कंटाळून न जाता जनतेने ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी ‘पंच प्रण’ पाळायचे आहेत. सोबतच या ‘सेल्फी पॉइंट’वर हातामध्ये माती घेऊन (महाशक्तीच्या फोटोसह) आपला ‘सेल्फी’ सरकारी संकेतस्थळावर टाकायचा आहे. असो.

जनतेचे हे अतूट विश्वगुरूप्रेम पाहता आणि देशप्रितीचा अतिउत्साह विचारात घेता या नादात अभियान चुकीचे होऊ नये यासाठी काही नियम आणि सूचना (आमच्यातर्फे) . . .

१) विश्वगुरूंप्रमाणेच शिलाफलकाच्या ऊंचीचाही मान राखण्यासाठी पावसाने पडलेले खड्डे बुजवून मगच शिलाफलक उभे करावेत.
२) पावित्र्य जपण्यासाठी हे शिलाफलक पूर्वेकडे तोंड करून उभे करावेत.
३) हे शिलाफलक येड्या बाभळीच्या खाली न लावता सुबाभळीच्या बुंध्याशी लावावेत. जेणेकरून ‘पंच प्रण’ फलक सावलीत राहून शिलाफलकला वंदन करणारे फोटोतील परमपूज्य सावलीत येतील याची सोय होईल. खरंतर या फलकाची जागा चंदनाच्या बुडात आहे. मात्र विरोधक ‘चंदनाच्या बुडात साप असतो’ हे सत्य चेकाळू शकतील. त्यामुळे येड्या बाभळीप्रमाणेच हेही टाळावे.
४) भाषा शुद्धीकरण मोहिमेअंतर्गत सेल्फीस ‘सेल्फी’ न म्हणता ‘स्वयंप्रतिमा’ म्हणावे.
५) शहरातील (ज्यांच्याकडे माती असेल त्या) शेतकऱ्यांनी ‘मेरी माटी नही दुंगा’ असे न म्हणता बड्या दिलाने नवराष्ट्रनिर्माणासाठी शेतातील माती लोकांसाठी खुली करावी!
६) मुठीतील माती ही परमपूज्यंनी ‘पीएसयूं’ना दिलेल्या मुठमातीचे प्रतीक नसून देशभक्ती, देशप्रेम व देशाप्रती सद्भावना याचे प्रतीक आहे हे ध्यानी घ्यावे.
७) सेल्फी काढताना फ्लाइंग किस देणाऱ्यास आणि/किंवा डोळे मिचकावणाऱ्यास देणाऱ्यास देशद्रोही समजावे. बहुदा परमपूज्य अशा व्यक्तींवर पावित्र्यभंगाचा खटला घालता येईल का याविषयीची तरतूद देखील करत असावेत, नाही कोणी म्हणावे?
८) स्वयंप्रतिमा सरकारी संकेतस्थळावर टाकताच जे (रद्दी) प्रमाणपत्र उर्फ सर्टिफिकेट मिळेल ते कोणत्या कुटुंबातून जास्त आणि लवकर येतात याची एक स्पर्धा सोसायटीच्या व्हाट्सॲप ग्रुपवर घ्यावी.
९) स्वयंप्रतिमेत एकवेळ गावाचे नाव आणि तितकाच लहान ‘अमृतकालीन ब्याच’ किंवा पूर्वीच्या क्रांतिकारी जणांसाठी असलेला महाशक्तींचा मोठा संदेश किंवा नंतरच्या अमृतकालीन राहिवासीजणांसाठी असणारा त्याहून मोठा उद्बोधक (महाशक्तींचाच) ‘जीवनसंदेश’ किंवा भला मोठ्ठा असा नवाकोरा शिलाफलक किंवा प्रसंगी दस्तूरखुद्द प्रतिमा घेणारा ‘स्वयं’ हे घटक आले नाहीत तरी चालेल मात्र शिलाफलकाच्या शेजारी ‘पंच प्रण’ घेतानाची विश्वगुरूंची तसबीर जरूर असावी.
१०) अतिरिक्त टिप वजा सुचना : शिलालेखाला चिकटून लागलेल्या अथांग रांगेत हाफचड्डी घालून ‘स्वयंप्रतिमा’ ‘खेचण्यासाठी’ जाणाऱ्यास (चड्डीचा!) रंग पाहून विशेष सवलत देण्याच्या आतल्या गोष्टी ऐकून आहोत. तरी काय घालून जावे याचा निर्णय ज्याने त्याने घ्यावा; पण काहीतरी अवश्य घालावे.
११) अतिरिक्त सुचना वजा टिप : इव्हेंट संपल्यावर शिलाफलक खेड्यात लोक पान थुंकण्यासाठी व शहरात – पहाटे-पहाटे आपापल्या समर्थांना फिरण्यासाठी घेऊन आलेले – श्वान सीमानिश्चितीसाठी वापरणार नाहीत हे कटाक्षाने पाळावे. कारण, आपल्या स्वतंत्र्यासाठी झिजलेल्या व्यक्तिंच्या नावाचा वापर होऊन तो शिलाफलक उभा आहे.

तसं तर देशातील सुशिक्षित लोक व्हॉटस्ॲपवर माहिती मिळवतातच पण तरीही सामान्य जणांसाठी ‘पंच प्रण - सुलभ एडिशन’ खाली देत आहोत (हेही आमच्या तर्फेच) . . .

१) ‘विकासित भारताचे लक्ष्य’ गाठण्यासाठी जिओचा लॅपटॉप आणि अदानी समूहाची वीज घ्यावी.
२) ‘गुलामीच्या प्रत्येक अंशातून मुक्ती’साठी भारताची तथाकथित अधोगती प्रकट करणारे जगातील सर्व अहवाल अमान्य करावेत.
३) ‘विरासतवर करण्याचा जो गर्व आहे’ तो २०१४ नंतरचा असावा.
४) ‘ऐक्य आणि एकता टिकवण्यासाठी’ सर्वांनी मिळून, नसते प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारास पाणीही मागता येऊ नये इतपत मारहाण करावी.
५) आणि फुलांचा हार हा महाशक्तीची तसबीर असलेल्या ‘पंच प्रण’ फलकाला घालावयाचा नसून शिलालेखाला घालावयाचा आहे या ‘कर्तव्याचे भान’ राखावे.

विश्वगुरूंच्या एकेका निर्णयाचे फायदे सर्वश्रुत असले तरी त्यांवर बोलण्याचा मोह टाळता न आल्याने काही फायदे प्रस्तुत करीत आहोत . . .

१) शहरातील बेरोजगार तरुणांना शिलालेखाजवळ काळी माती आणून विकण्याचा रोजगार मिळेल. कमीत-कमी दरात कसदार माती आपल्या देशबांधवांसाठी उपलब्ध करून देणे हे त्यांच्या पुढील आव्हान असेल!
२) ‘बोलणाऱ्याची’ माती खपते याची प्रचिती येईल व हरेकात बोलण्याचे कौशल्य निर्माण होईल.
३) नाकाला चिकटून सेल्फी घेणाऱ्या ‘अंकल’ वर्गास सेल्फीचे मोफत प्रशिक्षण मिळेल.
४) यंदा टाळी-थाळीची कसरत सेल्फीवर भागेल.
५) सकाळच्या हास्यक्लबमध्ये हा प्रकल्प ‘अमृतकाळाची पायाभरणी आहे’ असं छातीठोकपणे सांगता येईल.


इकडे स्वराज्यात महाशक्तीचे उपासक ‘गोविंदा’ प्रमाणे दर पावसागणिक हरिहर गडावर जाणाऱ्यांस ‘मावळा’ संबोधून गिर्यारोहण हा क्रिडाप्रकार घोषित करता येईल का? या मौलिक विचारात दंग असताना अमात्य (नवे आणि जुने) या अभियानाचे कौतुक करत आले. मात्र महाशक्ती ज्यास ‘अपयशाचे स्मारक’ म्हणत त्या ‘मनरेगा’वर या शिलफलक प्रकरणाची संपूर्ण भिस्त रोवलेली आहे हे सांगायला विसरले. ‘ग्रामीण रोजगार पुरवणाऱ्या या भक्कम योजनेचं पेकाट यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे ३२% टक्के घट करून आधीच मोडलेले असताना विश्वगुरू या नव्या अभियानाचा सर्व खर्च ‘मनरेगा’वर सोडत आहेत. अशाने बेरोजगारी आणखी धगधगेल.’ अशी मामुली सूचना निदान शिलाफलकच्या पाठीमागे तरी लिहा असे नवे अमात्य पूर्वी कदाचित बोलले असते. आणि ‘अपयशाचे स्मारक नक्की कोणते?’ हा प्रश्नही त्यांनी विचारला असता. परंतु ही शक्यता आता अस्तित्वातच नसल्याने महाशक्तीचे उपासकांनी ‘अरे आपल्या या सिमेंटच्या शहरात मुळी मातीच्च नाही म्हणून नाराज होण्यापेक्षा ‘त्याहून’ मोठा प्रकल्प महाशक्तीने आपणास दिलेला आहे याचा आनंद साजरा करा!’ असा फतवा काढण्याचा विचार त्यांच्यापुढे बोलून दाखवला . . .
एकंदरीत ‘मेरी माटी मेरा देश’ मुळे ‘सब चंगा सी’ आहे; पण हे सर्व जर खरोखर क्रांतीदिनासाठी, स्वातंत्र्याच्या आठवणीसाठी असेल तर ‘पंच प्रण’ फलकावर ज्या त्या प्रदेशातील क्रांतिकारकांची तसबीर का नसावी? हा क्षुल्लक प्रश्न जनता विचारायला विसरली आहे आणि परमपूज्य याचे उत्तर द्यायला . . . तथा प्रजा यथा राजा!


{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال