विवेकाच्या समया

[वाचनकाल : ३ मिनिटे] 
Narendra Dabholkar
संतांचा सुधारणावाद घेऊन उभे राहिले पाहिजे हा दाभोलकरांचा विचार होता. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ हे त्यांच्या संघटनेचे नाव.

धर्मकारण आणि राजकारण एकोप्याने देशातील समाजकारणाला सुरूंग लावण्याच्या मार्गावर असताना त्यांच्यासमोर दाभोळकरांनी मोठं आव्हान उभं केलं. हळूहळू जनमानसावर दाभोळकरांचं गारूड बसायला आणि दुसरीकडे त्यांची ‘धर्मबुडव्या’रूपात पिसाट निंदा पसरायला एकच गाठ पडली. शेवटी निंदा, धमक्या, बहिष्कार, कायद्याचा धाक काही लागू पडेना म्हणून ज्याच्यात पटाईत आहेत तेच धर्ममार्तंडांनी घडवून आणलं – वैचारिक परिपक्वता संपवण्याच्या नादात शारिरीक – खून . . .

विरोधक एखाद्या व्यक्तीला मारू शकतात परंतु त्या व्यक्तीचे विचार मात्र मारले जाऊ शकत नाहीत. ते अमर असतात. हे वारंवार सिद्ध झालेले आहे. त्याची उदाहरणे पाहण्यासाठी फार दूरही जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या अनेक संतांना त्या–त्या काळातील सनातन्यांचा छळ सहन करावा लागला. संत तुकाराम महाराज हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण. तुकोबारायांच्या अभंगांची गाथा बुडवणे हा त्यांच्या विचारांची हत्या करण्याचाच प्रयत्न होता. पण ते झाले नाही. तुकोबांचे विचार लोकगंगेत केवळ तरलेच नाहीत, तर ते आजही येथील बहुजनांना दिशा दाखविण्याचे काम करीत आहेत. महात्मा गांधींना तर गोळ्याच घालण्यात आल्या. तेवढ्यानेही भागले नाही, म्हणून रोजच त्यांच्यावर शाब्दिक विषाचे फवारे उडविण्यात येतात. टिंगलटवाळीपासून चारित्र्यहननापर्यंत सगळी विकृत अस्त्रे त्यांच्यावर चालविण्यात येत आहेत पण तरीही त्यांचे विचार संपू शकले नाहीत.
उलट आज जेव्हा सगळे जग हिंस्र–विखाराच्या निखाऱ्यांवर भाजून निघत आहे, तेव्हा तर गांधीमार्गाची आवश्यकता अधिक प्रखर होताना दिसत आहे. केवळ हेच नव्हे, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जेव्हा अवघे जगणेच भेलकांडल्यागत झालेले आहे, तेव्हा ‘ऑल्विन टॉफलर’सारखा द्रष्टा विचारवंत ‘गांधी विथ सॅटेलाईट’ या पर्यायाची मांडणी करताना दिसतो.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याबाबत हेच म्हणता येईल. आज, २० ऑगस्टला दहा वर्षे होतील त्यांच्या हत्येला. पुण्यात प्रभातफेरीसाठी (व्यायामाला) निघाले होते ते. एकटेच. मारेकऱ्यांनी त्यांचा पिस्तुलाच्या चार गोळ्या झाडून खून केला. त्यांना वाटले असेल, दाभोलकर मेले म्हणजे त्यांचे कार्य मरेल. विचार संपतील. पण तसे झालेले नाही. दाभोलकरांच्या पुस्तकांचा वाढता खप, त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणावर होणारे लेखन, ठिकठिकाणी होत असलेली व्याख्याने, त्या व्याख्यानांना होत असलेली जाणत्या जनांची गर्दी हे सारे दाभोलकर अमर आहेत हेच दर्शवित आहे. दाभोलकरांचा हा विचार नेमका काय होता? किंबहुना त्यांची हत्या का करण्यात आली? या प्रश्नांची उत्तरे पुन्हा मानवजातीच्या वैचारिक इतिहासातच दडलेली आहेत.
कोणत्याही बदलाविषयी सामान्य माणसाच्या मनात एक भय असते. जे काही सुरू आहे, जी काही व्यवस्था लावलेली आहे, ती ठीक आहे, त्यात आता बदल नको ही अनेकांची भावना असते. बदल म्हणजे आधी आहे ते सारे विस्कटणे आणि नवी घडी बसवणे. बदल म्हणजे उलथापालथ. ती नको असते. क्रांतीबद्दल थोर आकर्षण जरी असले मनात, तरी जेव्हा ती करण्याची वेळ येते तेव्हा अनेकांची पावले मागल्या दिशेकडे वळतात. हे झाले सामान्यांचे यात इतरांचे काय? त्यांचा बदलांना, व्यवस्थेतील सुधारणांना विरोध असतो, कारण त्या व्यवस्थेत त्यांचे हितसंबंध निर्माण झालेले असतात. त्याला कोणी हात लावू गेले, की ते चवताळतात.
इतिहासात नव्याने निर्माण झालेल्या धर्म वा पंथांच्या संस्थापकांना झालेला विरोध पहा. श्री चक्रधरस्वामी किंवा ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सामान्यांच्या भाषेत धर्मविचार घेऊन जाऊ पाहात होते, तेव्हा त्या सुधारणेला झालेला विरोध पहा. ‘उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा’ असे म्हणत तुकोबारायांनी श्री चक्रधरस्वामींप्रमाणे थेट वेदप्रामाण्यालाच हात घातला होता. ‘वर्ण अभिमाने कोण जाले पावन’ असा रोकडा सवाल विचारत येथील समाजरचनेलाच त्यांनी प्रश्न विचारले होते. अशा वेळी तेव्हा विद्यमान असलेल्या व्यवस्थेत – मग ती धार्मिक असो की सामाजिक – ज्यांच्या हितसंबंधांची जपणूक होते ती मंडळी चवताळून सुधारणावादी विचारांच्या विरोधात उभी राहतातच. त्या मूठभरांचे हे स्वार्थी राजकारण समाजातील बहुजनांच्या पटकन लक्षात येणे कठीण. आहे ती घडी विस्कटण्याचे भय हे अखेर सामान्यांच्या मनातही असतेच. पण, त्याचबरोबर त्यांच्या मनात जे जे जुने त्याचे एक आकर्षणही असते. जुने ते सोने म्हणतात ते त्यामुळेच. गंमत म्हणजे प्रत्येक पिढी हेच म्हणत असते.
परंपरा, रुढी मग त्या कितीही कालबाह्य असल्या, मूर्ख असल्या, तरी त्या टिकवून ठेवणे यातच स्वार्थी, धूर्त आणि दांभिक लोकांना पुरुषार्थ वाटत असतो. त्यात किंचित पूर्वजगौरवाचाही भाग असतो. याचाच फायदा प्रतिगामी घेत असतात. जुनाट विचारांना आधुनिकतेचा मुलामा चढवून लोकांसमोर मांडत असतात. ‘आमचे पूर्वज फार हुशार होते. आजचे हे उपटसुंभ त्यांना काय शिकवणार?’ असा अस्मितांचा बाजार भरवत असतात. एकदा असे केले, की मग येथील बहुजन वर्ग पेटलाच. मग तो तुकोबांना मंबाजी मारहाण करतो तेव्हा मध्ये पडणार नाही, की सावित्रीबाई फुलेंवर शेणाचे गोळे फेकणारांना अडवणार नाही. किंबहुना कधी कधी अशा कृत्यांत स्वतःच सहभागी होईल. डॉ. नरेंद्र दाभोलकरांबाबत हेच झालेले आहे.
समाजातील अंधश्रद्धांमुळे, घातक रूढी–परंपरांमुळे येथील गोरगरिबांची, सामान्य जनतेचीच हानी होत आहे. ‘ऐसें कैसें झाले भोंदू । कर्म करोनि म्हणती साधु ॥’ अशा धर्माचा ‘लटिका वेव्हार’ करणाऱ्यांचे ‘हाणोनि फोडा तोंड’ असे तुकोबाराय म्हणाले होते. पण समाज तर डोळे झाकून यांच्याच मागे लागलेला. त्यांच्यामुळे अनेकांना प्रसंगी जीव गमवावा लागलेला. याच्याविरोधात आपण संतांचा सुधारणावाद घेऊन उभे राहिले पाहिजे हा दाभोलकरांचा विचार होता. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ हे त्यांच्या संघटनेचे नाव. त्यांना निर्मूलन करायचे होते ते अंधश्रद्धांचे. तो सुधारणेचा विचार होता. चमत्कारांना, जादूटोण्याला, पशुबळीला विरोध करणारा. तुकोबारायांचा, संत गाडगेबाबांचा विचार घेऊन दाभोलकर चालले होते. अंधश्रद्धांतून गोरगरिबांचे होणारे आर्थिक आणि सामाजिक शोषण पाहून ते गप्प बसू शकत नव्हते.
शोषण हाच ज्यांच्या सत्तेचा आधार होता, अशा प्रतिगाम्यांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडली. ते देवधर्माच्या विरोधात असल्याचा प्रचार सुरू केला. तुकोबांच्या विरोधात मंबाजीने पुणे–शिरवळ प्रांताचे देशपांडे आपाजी गोसावी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, ‘स्वधर्माचा लोपहोतस होतसे देखोन । धाडीलें लिहोन म्हणोनीया’. सुधारणा करू इच्छिणाऱ्यांना धर्माचा, व्यवस्थेचा विरोधक म्हणून लोकांसमोर आणणे हा प्रतिगाम्यांचा नेहमीचा उद्योग राहिलेला आहे. तो फारसा यशस्वी ठरत नाही, हे दिसल्यानंतर मग एकच उपाय – हत्या. सुधारणेचा, विवेकाचा, विज्ञाननिष्ठेचा, सामाजिक भल्याचा विचार संपवण्यासाठी प्रत्येक काळात मारेकरी उभे राहतात. अखेरीस पराभव होतो तो त्या मारेकरी विकृतीचाच.

पण ही सततची लढाई आहे. या लढाईत आपल्याला करायचे असते ते एकच काम – मनातील विवेकाच्या समया विझू न देण्याचे . . .


{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال