काचेला चिकटलेला माणूस

[वाचनकाल : ४ मिनिटे] 

शून्यात पाहणारा म्हातारा, old man observing nothing
एक मध्यम उंचीचा माणूस काचेतून दिसणाऱ्या वीस पंचवीस टीव्हीवर एकच चित्र पाहत होता. मी याकडे बारकाईने दुसऱ्यांदा पाहिलंही नसतं मात्र तिथं दुकानातील कोण्या कर्मचाऱ्याची आणि त्याची जुगलबंदी सुरू होती.

चिकटून राहण्याची विलक्षण क्षमता माणसांमध्ये असते. जीवनाची समरसता अनुभवण्याच्या ठोस विचारधारेतून आलेली ही क्षमता नाही; तर जगण्याचं कारण बनलेल्या बाबीला गमावण्याच्या भितीतून जन्मलेली ही वृत्ती आहे. अशाने जुन्या आठवणींना, व्यक्तींना इतकंच काय, तर निर्जीव वस्तूंनाही माणूस चिकटून राहतो. जगताना आडव्या आलेल्या डांबाने माणसाला धरलेलं नसतं याउलट, गर्दीत हरवू नये म्हणून माणसानेच दिसेल त्या डांबाला धरलेलं असतं . . .

चंगळवादी बनण्याची अतोनात इच्छा असूनही चंगळवाद करताच येणार नाही असा तो काळ होता. मध्यमवर्गाची व्याप्ती खूप मोठी होती आणि मध्यमवर्ग गरिबीकडे जास्त झुकलेला देखील होता. सामान्यांनी ‘आपण जगायचं, कुटुंबाला जगवायचं’ इतक्याशा ध्येयावर आयुष्य झिजवली होती. कळत-नकळतपणे पुढच्या पिढीवर सुद्धा अनुकरणातून हेच संस्कार केले जात होते. चाकोरी सोडून जर कोणी चंगळवादी बनलाच तर त्याचे हाल खायला सुद्धा कोणी उरत नाही, हे आजूबाजूच्या काही उदाहरणातून शिकता येत होतं. श्रीमंतांची श्रीमंती कमी असली तरीही सामान्यांचे डोळे दिपवायला व तशाच जीवनशैलीची दिवास्वप्ने पेरायला पुरेशी होती. मात्र इतकं असूनही आश्चर्यकारकरीत्या सामाजिक संतुलन टिकून होतं.
दररोज संध्याकाळी कामावरून घरी निघालेल्या नोकरदारांचे जथ्थेच्या जथ्थे चौकाचौकात लागत. दुचाकी किंवा क्वचितच दिसणाऱ्या चार चाकी गाड्यांपेक्षा सायकलींची वर्दळ फार सायची. त्याहून जास्त पायी चालणारे. खाजगी वाहनातून प्रवास करायला कोणाला उसंत नव्हती ना खाजगी खाजगी वाहने घेऊन ती धंद्याला लावण्यात कोणाला रुची.
त्यावेळी मनोरंजन या शब्दाचा मायनाच प्रचंड वेगळा होता. जत्रा-यात्रा, सण-उत्सवातून किंचित बाहेर निघालेला परंतु, अद्याप पहिला फक्कड सिनेमा न पाहिलेला, पर्यटन, नाच-गाण्याकडे वळलेला एकसंध समाज तयार झाला होता. रामायण-महाभारत, कसोटी क्रिकेटचा सामना आणि बिना का गीतमाला हेच त्याकाळी परवडणारं मनोरंजन होतं. खूप जास्त चहा खपवायचा असेल तर सोबतीला आकाशवाणी वाजवणे हे त्याकाळी यशस्वी व्हायचं गमक होतं. या साध्या बाबी अवघड होत होत्या. नुकतंच गावांचं शहरीकरण होऊ लागलं होतं.
क्रिकेटचा सामना सुरू झाला की ज्या चौकात टीव्हीचं दुकान असायचं तिथली वाहतूक ठप्प व्हायची – इतकी गर्दी तो सामना पाहायला दुकानासमोर हजर! गल्लीत तुरळक असणाऱ्या टीव्ही संचांसमोर व रेडिओसमोर सुद्धा हीच अवस्था होती. घरी येताना कितीही दमलेलो असलो तरी तासनतास ताटकळत उभं राहून चकचकीत पुसलेल्या काचांतून टीव्हीच्या दुकानाबाहेर मीही क्रिकेटचे सामने पाहिलेले आहेत. पण क्रिकेटचा सामना सुरू नसताना देखील कोणीतरी त्या दुकानाच्या काचांना चिकटून उभा राहिलेला कोणी मी पाहिलेला नव्हता अगदी त्या दिवसापर्यंत – कदाचित त्या दिवसानंतरही . . .

मी माझ्या धांदलीत रस्ता ओलांडला, घराकडे निघालो होतो. आजूबाजूचं निरीक्षण करत घर गाठणे या स्वाभाविक खोडीनुसारच मी वागत होतो. त्या दिवशी निश्चितच क्रिकेटचा सामना नव्हता, तरीही एक मध्यम उंचीचा माणूस काचेतून दिसणाऱ्या वीस पंचवीस टीव्हीवर एकच चित्र पाहत होता. मी याकडे बारकाईने दुसऱ्यांदा पाहिलंही नसतं मात्र तिथं दुकानातील कोण्या कर्मचाऱ्याची आणि त्याची जुगलबंदी सुरू होती. सुटातला तो कर्मचारी उजवीकडे येऊन उभा राहिला की हा माणूस डावीकडे मान करून टीव्ही पाहायचा. कर्मचारी डावीकडे येऊन याच्या व टिव्हीच्या मध्ये उभा राहिला की हा मान उजवीकडे न्यायचा. मी रस्त्याचा कोपरा पकडला आणि हा अजब खेळ पाहू लागलो. माझ्या मनोरंजनाच्या कल्पनांत त्याकाळी हेही बसत होतं.
एरवी त्या बहारदार दुकानाबाहेर आपल्यासारखा माणूस जायला कचरणार; पण क्रिकेटचा सामना अलग बात होती. लाजेवर क्रिकेटप्रेम मात करायचं. नेमक्या त्याच वेळी दुकानदार सुद्धा सामना लावायचा लोकांना पाहू द्यायचा. इतरवेळी त्यानं माणूसकीचा हा पाझर फोडण्याची आवश्यकता नव्हती. परिणामी आत्ता त्या माणसानं दुकानाबाहेर उभं रहावं हे प्रतिष्ठेला धरून नव्हतं.
आता दुकानात आलेले ग्राहक त्या माणसाला पाहून उगाचच कोणत्यातरी परग्रहावरील किळसवाणा जीव पाहिल्यासारखे करू लागले, तेव्हा तो कर्मचारी या माणसाची आणखी हाड-हाड करू लागला. हा कर्मचाऱ्यांच्या हातवाऱ्यांना, रागीट डोळ्यांना, हाव-भावांना बधत नव्हता. हा तर शांतपणे बघत होता – टीव्ही.
शेवटी दोन कर्मचाऱ्यांनी मिळून याला हाकलण्याचा प्रयत्न केला. मग त्यातील पहिला कर्मचारी – जो बराच वेळ आबदला होता – शेवटी मुख्य दरवाजा उघडून बाहेर आला. त्याला पाहताच हा माणूस पायऱ्या उतरून रस्त्यावर धावत सुटला, अपघाताची पर्वा न करता . . .
मात्र धावण्याच्या नादात त्याचं उतारवय उघडं पडलं. जरी त्यानं ढगळा पायजमा, सदरा घातला होता तरी त्याचं वय धोतर घालण्याचं निश्चितच होतं. पिकलेले आणि वाढलेले केस, तितकीच प्रचंड दाढी, मातकट कळकट शरीर, एखाद्या अट्टल बेवड्याची भूमिका निभावली असती तर त्याला अचूक दर्जा मिळाला असता. तो संथ हालचाली करत, हळू वेगात, मात्र ज्या रीतीने धावत होता त्यावरून तो बेवडा नव्हता इतकं नक्की.
तो नजरेआड गेल्यावर मी आजूबाजूला पाहिलं तर आणखी पाच-दहा जण हाच प्रकार बघायला जमलेले होते. दुसऱ्याच्या वेंधळेपणात वैयक्तिक मनोरंजनासाठी हपापलेली मानवी वृत्ती त्याकाळी सुद्धा होती हेच खरं.
मी तिथून पाचशे मीटरहून कमी अंतरावर असण्याऱ्या – त्याकाळी माझ्या असणाऱ्या – घरात पोहोचलो. हात-पाय धुवून गादीवर लोळून थोडा आराम केला. मग जेवण सुद्धा उरकलं. तरी तो माणूस आणि हा सगळा घडलेला प्रसंग माझ्या डोक्यातून माघार घेत नव्हता.
टीव्हीबद्दल त्या माणसाचं असणारं आकर्षण मला कुठेतरी माझं स्वतःचं प्रतिबिंब दाखवून गेलं होतं. ठराविक काळापर्यंत कोणतीच इच्छा किंवा आपण म्हणूयात छानछौकी, चंगळवाद पूर्ण न झालेल्या माणसाचं तसं होत असावं का? का मग विज्ञानाचे नवे चमत्कार पचवायला जड गेलेल्या माणसाचं?
रेल्वे पहिल्यांदा भारतात टेकली तेव्हा विना घोड्यांची, बैलांची धावणारी गाडी म्हणजे झपाटलेल्या भुताटकीचं द्योतक असली पाहिजे, असं आपल्या आज्या-पणज्यांना वाटलं होतं. त्याकाळी बळजबरीने मारून-मुटकून लोकांना आगगाडीत बसवल्याच्या गोष्टी ऐकिवात आहेत, असो.
शेवटी विचारांची कोंडी असह्य होऊन मी शांततेच्या शोधात शतपावलीसाठी बाहेर निघालो. गोंगाट शामला होता, कालव्याची सवय झालेल्या मेंदूला तुरळक वर्दळीत शांततेचा अनुभव येत होता. मी आपसूकच टीव्हीच्या दुकानाकडे वळालो आणि तिथे अनपेक्षित धक्का बसला तो अजूनही तिथेच काचेबाहेर जणू चिकटला होता, खिळला होता.
पाच-पंचवीस टिव्हींवर त्याच टीव्ही कंपनीची जाहिरात चालू होती. मी पुन्हा त्याचं निरीक्षण करत मघाच्या जागी उभा राहिलो. सर्व टिव्हींवर एकाच वेळी लागणारी जाहिरात तो पाहत होता असंच म्हणावं लागेल. बाकी तो काय पाहत होता त्याचं त्यालाच माहिती. कोणत्याही वासनेने पछाडलेल्या लिंगपिसाट माणसाच्या डोक्यात नेमकं काय घोळत असतं हे कळणे कठीण.
काचेपलीकडं पाहण्यात तो एकरूप झालेला, त्याच्याकडे पाहण्यात मी दंग झालो होतो. अचानक त्या मघाच्या कर्मचाऱ्याने त्याला मागून पकडलं तेव्हा त्याच्याप्रमाणेच मीही दचकलो. त्याला एक कठोर चापट बसवत ‘पुन्हा दिसू नको’ असं काहीसं आणि मोफत शिव्या देत पायरीवरून खाली ढकललं गेलं. तो घसरत खाली आला नशीबानं पडला मात्र नाही. माहिती नाही का मात्र मी धावतच त्याच्या जवळ जाऊन पोहचलो. त्याला मी जिथे उभा होतो त्या जागी आणून उभं केलं. कर्मचारी सुटाला लागलेली धूळ झटकत दुकानात परतला. यात त्याचाही दोष नाही त्याला हे अनिच्छेने का होईना; पण नोकरीसाठी करावं लागलं असणारं, बाकी काय.
‘लागलं का बाबा?’
त्याने नकारार्थी मान हलवली.
‘कोण आहात?’
उत्तर नाही.
‘कुठून आलात?’
उत्तर नाही. नजर अजूनही टिव्हीच्या दुकानाकडे.
‘कोणाकडे आलात?’
‘मुलीकडे.’
तो मुका नव्हता तर! ‘कोठे राहते ती?’
‘माहिती नाही.’
अजबच आहे. ‘चला माझ्यासोबत.’
शहरात हरवलेला बुद्धी भ्रष्ट झालेला खेडवळ म्हातारा म्हणून मी त्याला पोलीस चौकीपर्यंत तरी पोहोचवू तर शकतच होतो की!
‘नाही, नको.’ म्हणत माझा हा झटकून तो परत तिथं जाऊन टिव्ही पाहू लागला – यावेळी पायरी खालून.
‘काय पाहताय? त्यानं जायला सांगितलंय ना बाबा? चला तुम्ही इथून.’
जणूकाही माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहचत नव्हता. शेवटचा प्रयत्न म्हणून ज्या गोष्टीवर तो बोलता झाला होता तो प्रश्न विचारण्याचं मी ठरवलं.
‘तुमची मुलगी कशी दिसते हे तर सांगा बाबा आपण शोधू तिला.’
एकदा माझ्याकडं पाहिलं आणि तो वयाला लाजवेल अशा वेगात पायऱ्या चढून गेला. तेथून काचेपलीकडं बोट दाखवलं.
‘ती टीव्हीतली मुलगी आहे ना अगदी हुबेहूब तशीच दिसते माझी ठकी!’

त्यानं ओरडून मला सांगितलं. मी विचारात अडकलो होतो. तेवढ्यात तो माघारी आलेला पाहून कर्मचारी पुन्हा बाहेर आला. मी भानावर आलो तेव्हा तो माणूस मोकळ्या रस्त्यानं धावत सुटला होता. कुठे? माहिती नाही. एव्हाना सगळ्या टीव्हींवरची जाहिरात बदलली होती आणि तो माघारी येण्याची शक्यता सुद्धा . . .


{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال