भारत : चांद्रयान ते मणिपूर

[वाचनकाल : ४ मिनिटे] 
AI image of Manipur riots India
आपल्या माता-भगिनी सुरक्षित नसतील तर आपण चंद्रावर जाऊन वास्तव्य केले तरी त्याचा काही उपयोग नाही!

आधी तर सर्व शांतताच असते. त्यानंतर इंटरनेट बंदीतूनही एक चित्रफीत येते तेव्हा भारत ढवळून निघतो. न्यायालयाची ‘मध्यस्थी’ करण्याची हालचाल सुरू झाल्यावर मग सत्ताधारी बोलते होतात! आणि चांद्रयान कौतुकात मग्न असणारा सामान्य माणूस अचानक मणिपूरच्या हिंसेशी परिचित होतो. चित्रपटातील कथानक म्हणून शोभेल अशी सर्व परिस्थिती देशात सुरू होती. इतर बातम्यांनी ती आता दाबली गेली असली तरी सामान्य माणसाच्या मनात काही प्रश्न आहेतच. त्यांचाच हा ऊहापोह . . .

गेल्याच आठवड्यात भारताने चांद्रयान मोहीम फत्ते केली. समस्त भारताला या मोहिमेचा अभिमान वाटला, संपूर्ण जगात भारताचा जयजयकारही होतो आहे. त्या दिवशी तर दुपारी अडीच वाजता याचे थेट प्रक्षेपणही केले होते. त्या दिवशी संपूर्ण ‘मीडिया’वर फक्त याच सगळ्या बातम्या होत्या. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेला भारत विकसशील देश म्हणून पुढे येतो आहे. जगभरात आपल्या देशाचे नाव उज्वल होते आहे; पण खरचं भारतात विकास झाला आहे का? ज्या विकासाची देशाला गरज आहे तो झाला आहे का? आपल्या माता-भगिनी सुरक्षित आहेत का? हे प्रश्न मनात उभे राहिले आहेत.
चांद्रयान पाठवून भारताने एक नवे पर्व सुरू केले आहे. कदाचित पुढच्या काळात भारत अनेक विक्रम प्रस्थापित करेल यात शंकाच नाही; पण गेल्या पंधरवाड्यातील मणिपूरच्या बातमीने मन सुन्न झाले. तंत्रज्ञानात भारत चंद्रावर जात आहे मात्र आपण आणि आपली शासनव्यवस्था डोंगरावर आहे! मणिपूर मधील अत्यंत वाईट व मन हेलावून टाकणारी घटना. ही घटना मे मध्ये घडून सुद्धा याचा कोणताही तपास झाला नाही. तीन महिलांवर सर्वांसमक्ष सामूहिक बलात्कार होतो, त्यांना वाचवताना वीस वर्षीय भावाची हत्या केली जाते, त्यातील एक महिला आपला जीव मुठीत घेऊन स्थानिक लोकांच्या मदतीने पलायन करण्यात यशस्वी होते; पण बाकीच्या त्या दोन महिलाची निवस्त्र धिंड काढली जाते. जवळपास ७७ दिवसांनंतर या घटनेला वाचा फुटते. माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडून ७७ दिवस झाल्यानंतर काल-परवा या बद्दल फोटो, व्हिडिओ येतात. एखादया महिलेला निर्वस्त्र करून तिची धिंड काढणारे माणूस असूच शकत नाहीत. खरचं पशूसारखी मने असणाऱ्या या नीच गुन्हेगारांना आपल्या व्यवस्थेचं भय राहिले नाही का? हा प्रश्न उभा राहतो.
या घटनेची वाच्यता होते तरी काहीच घडले नसल्याप्रमाणे सर्व सत्ताधारी वावरत आहेत. देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का? देश लोकशाहीकडून झुंडशाही ते हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे – हे आजचं आपल्या देशाचं विदारक वास्तव आहे. ठराविक धर्माला लक्ष्य करून चित्रपट मोफत दाखवणारे आज कुठे आहेत? दोन समाजात जातीय तेढ निर्माण करून संपूर्ण देशात अराजकता माजवणारे आज कुठे मूग गिळून गप्प बसले आहेत? दर मिनिटाला ‘सुपर फास्ट ब्रेकिंग न्यूज’ देणारे बातमी वाहिन्यावाले आज गप्प का आहेत? एरवी करीना कपूरच्या पोराने काय खाल्ले? मलायका अरोराने कोणते कपडे घातले? या बातम्या दाखवतात, आपल्या वाहिनीच्या ‘टीआरपी’साठी त्यांचा घरापुढे वाट बघत बसतात. यांना ७७ दिवस या घटनेची कोणतीच माहिती उपलब्ध न होणे हे आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत आज भारत ‘फाईव्ह जी’ (5G)कडे वाटचाल करत आहे; पण शासनव्यवस्था आणि आपण ‘टू जी’ (2G) पर्यंतच आहोत. लोकशाहीचा चौथा स्तंभ जर झोपेत असेल किंवा झोपेचे सोंग घेत असेल तर हुकूमशाही यायला फारसा वेळ लागणार नाही. नेहमी सत्ताधारी पक्षाच्या नावाने उदो-उदो करणारे सर्व भक्तगण आज शांत आहेत. हे असंच चालू राहिलं तर आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. आपण ‘ट्रॅफिक’मध्ये अडकलेलो असतो तेव्हा अचानक एक रूग्णवाहिका येते त्या रूग्णवाहिकेला वाट देण्यासाठी आपल्याला काही काळ थांबावे लागते त्यावेळी त्या गर्दीमध्ये काही जणांचे चेहरे एरंडेल पिल्यासारखे झालेले असतात. उद्या हीच वेळ आपल्याला वर आली आणि आपल्याला वाट मिळाली नाही तर? . . . जेव्हा आपल्या घरी एखादी घटना घडते तेव्हाच त्याचे गांभीर्य आणि त्या वेदनेची परिसिमा कळते.
मणिपूरची घटना अत्यंत वेदनादायी व आपल्या या नव्या भारताच्या दृष्टीने गंभीर आहे. आपण सगळेजण जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहोत; पण या भारतात महिलांवर अत्याचार होऊन देखील त्यावर काही कारवाई होत नसेल तर व आपल्या माता-भगिनी सुरक्षित नसतील तर आपण चंद्रावर जाऊन वास्तव्य केले तरी त्याचा काही उपयोग नाही!
गेले तीन महिने सगळे झोपेत होते का? एखादे चांगले काम सत्ताधारी पक्ष करतो तेव्हा आठवडाभर सगळे त्या घटनेचा उदो-उदो करत असतात मात्र यासारख्या अत्यंत वेदनादायी घटना घडतात तेव्हा सर्वजण शांत बसतात. करोना सारखी महामारी येऊन गेल्यानंतर सुद्धा आपण वैद्यकीयदृष्ट्या किती पाठीमागे आहोत ते सर्वांनी बघितलेले आहेच. आज देखील गावोगावी डॉक्टर व दवाखाने उपलब्ध नाहीत. वाडी-वस्तीवर राहणाऱ्या अनेक महिलांना जर दवाखान्यात जायचे असेल तर पाच-आठ किमी पायपीट करावी लागत आहे. ‘मंदिर उभारणी’ एवढंच हेही मनावर घेऊन जर गावोगावी दवाखाना मिळाला असता तर बरे झाले असते. सर्वांच्या आनंदासाठी त्या दवाखान्याला प्रभूचे नाव देऊन चालू केले असते तर आपल्या अनेक भगिनींना, मातांना सुविधा मिळाल्या असत्या आणि त्यामुळे अनेक महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले असते.
‘आपल्या प्रिय नेत्याने किती विकास केला आहे’ हे लाळ पडेपर्यंत सांगणारे भक्तगण आज गप्प आहेत, ‘बाईपण भारी देवा’ म्हणून डंका पिटणारे सर्व जण काहीच बोलत नाहीत हे विचार करण्यासारखे आहे. भारतातील महिलांचे संरक्षण होणं गरजेचं आहे. चांगल्या गोष्टींचे कौतुक नक्कीच केले पाहिजे; पण एखादी वाईट गोष्ट घडून ७७ दिवस झाल्यानंतर देखील त्या वर काहीच कारवाई होत नाही ही खरी देशाची शोकांतिका आहे. एरवी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर टीका केली म्हणून लगेच कारवाई होते आणि सभेत टीका करणाऱ्यांना लगेच नोटीस दिली जाते; पण या घटनेवर अशा जलदगतीने काहीच होत नाही ही अत्यंत वाईट व शरमेची गोष्ट आहे. ‘सुपरफास्ट’ कारवाई करणारे जेव्हा सामान्य माणसाच्या आयुष्यात अशा घटना घडतात तेव्हा मतिमंद का होतात? न्यायव्यवस्था व प्रशासनव्यवस्था राज्यकर्त्यांच्या हातचे बाहुले होते आहे का? हा प्रश्न उठतो.

आपण लहान असताना एक गोष्ट नेहमी सांगितली जात असे . . .
आई आपल्या कडेवर मुल घेऊन जात असते. त्या आईला एक टोपलीतून आंबा घेऊन जाणारी एक महिला भेटते आणि मग त्या दोघी बोलत असतात. त्या बोलत असताना ते मुल आंबा चोरून घेते आणि आपल्या आईच्या पदराखाली लपवते. ही गोष्ट आई बघते; पण ती त्या वर काहीच बोलत नाही आणि पुढे जाऊन हा मुलगा मोठा दरोडेखोर होतो. या कथेतील आई म्हणजे आपण सगळे आहोत आणि आंबा घेऊन जाणारी स्त्री म्हणजे आपली लोकशाही आहे. आणि मुलाच्या रूपात सत्ताधारी नेतागण. जर त्या आईने वेळीच त्या मुलाला हटकले असते तर तो चांगल्या मार्गाला लागला असता. तसंच लोकशाहीचं रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. मणिपूरसारख्या घटना मनाला वेदना देणाऱ्या ठरतात. देशात अशाच घटना घडत राहिल्या तर भारतात उद्या ‘तालिबान’शासन यायला वेळ लागणार नाही आणि ते आले तरी आश्चर्य वाटायला नको. मणिपूरसारखा प्रसंग उद्या आपल्यावरसुद्धा येऊ शकतो याचा विचार सर्वांनी नक्कीच करावा.
आपल्या समाजाचे होत असलेले हे अध:पतन आपण माणूस म्हणून जगण्यास पात्र आहोत का? हा प्रश्न विचारण्यास भाग पाडते. ‘चंद्रावर’च्या वास्तव्याचे स्वप्न बघणारे आपण या ‘डोंगरा’वरच्या शासनव्यवस्थेला जागं करणार तरी कधी? अशा चुकीच्या घटनांना पायबंद वेळीच घातला गेला पाहिजे.


{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال