नात्यांचा गोडवा - मकर संक्रांती

[वाचनकाल : ३ मिनिटे]
family celebrates makar sankranti
स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे, जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.

सण म्हणजे आनंद, समृद्धी, एकी आणि सण म्हणजे आठवणी. सण, त्या सणामागची कथा, असेलच तर, त्यातील वैज्ञानिक तर्क आणि निरनिराळ्या सणांच्या बालपणातील निरनिराळ्या आठवणी. सणांच्या बदलत्या स्वरूपावर, औपचारिकतेतून उगम पावलेल्या कोरडेपणावर आणि आजच्या मकर संक्रांतीवर भाष्य करणारा लेख . . .


नव्या वर्षाची गोड सुरूवात करणारा सण म्हणजे मकर संक्राती. आपल्या महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी आणि त्यानंतर मकर संक्रात आणि त्यानंतर किंक्रात असे एकूण तीन दिवस हा सण साजरा केला जातो. नात्यांतील कटुता मिटवण्याचा व गोडवा निर्माण करण्याचा सण म्हणजे मकर संक्राती. या सणादिवशी सर्वांनी एकमेकांना तिळगुळ देऊन ‘तिळगुळ घ्या गोड बोला!’ असा संकेत देण्याची प्रथा आहे. हिंदू धर्माच्या पंचांगानुसार हा सण पौष महिन्यात येतो.

भोगी :

संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात ‘भोगी’ नावाने साजरा केला जातो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंगभाज्या, फळभाज्या यांची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून बनवले जातात.

मकर संक्रांतीची पौराणिक कथा :

हिंदू धर्मात प्रत्येक सण साजरा करण्यामागे पौराणिक कथा असते. संक्रांतीच्या या सणाला सुद्धा पौराणिक कथा आहे. मकर संक्रातीच्या पौराणिक कथेनुसार मकर संक्रांत या दिवसापासून स्वर्गाची दरवाजे उघडतात आणि स्वर्गाचा दिवस सुरू होतो अशी मान्यता आहे. संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी असुरांचा पराभव करून पृथ्वीवर विजय मिळवला होता, असे मानण्यात येते. तेव्हापासून भगवान विष्णूंच्या या विजयाचे प्रतीक म्हणून मकर संक्रांती सण साजरा करण्यात येतो.

भौगोलिदृष्ट्या मकर सक्रांतीचे महत्व :

दरवर्षी साधारण २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या दक्षिणी अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. याच सुमारास सूर्य मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करतो, त्यामुळे ‘साडेतेवीस दक्षिण’ या अक्षवृत्ताला ‘मकरवृत्त’ म्हणतात. बदलत्या काळात (सूर्याच्या उत्तरायणाची सुरूवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली तरी) पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंक्रमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच मकरसंक्रांतीची तारीख सुद्धा बदलत राहिली. पृथ्वीवरून निरीक्षण केले असता उत्तरायणात सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस थोड्या-थोड्या प्रमाणात उत्तरेकडे सरकत जाते.

आरोग्याच्या दृष्टीने मकर संक्रांतचे महत्त्व :

मकर संक्रांतीत सर्वात जास्त बोलले जाणारे वाक्य – तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. एकूणच संक्रांतीच्या सणात गुळाची पोळी आणि तिळगुळाला विशेष महत्त्व असते, स्थान असते. हा काळ थंडीचा, त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. तीळ वापरण्यातील दुसरा अर्थ – सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री. या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात, स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण-घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे, जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.

मकर संक्रांत आणि पतंग उडवणे :

आपल्या देशामध्ये पतंग उडवण्याचा जुना इतिहास आहे. प्राचीन धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा पतंग उडवण्याचा प्रकार आढळून आलेला आहे. खासकरून मकर संक्रांतीच्या वेळी पतंग उडवण्याची प्रथा आपल्या देशात आहे. पतंग उडवण्याचे वैज्ञानिक कारण लक्षात घेतले, तर पतंग उडवण्यामुळे शरीराला सूर्यप्रकाश मिळतो तसेच आपले शरीर निरोगी राहते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या सणाला पतंग उडवण्याची प्रथा आहे.

किंक्रांत :

संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात.
संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदीकुंकू समारंभ साजरा करतात.
दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस ‘मट्टू पोंगल’ म्हणून साजरा करतात. या दिवशी गाई-बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्य-गायनाचा कार्यक्रमही केला जातो.

लहान असताना या सणाचे एक वेगळेच अप्रूप होते. त्यावेळी मोबाईलचे अस्तित्व जवळपास नव्हतेच. लहान असताना प्रत्येक जण एकमेकांना ‘ग्रीटिंग कार्ड’ देत असत, शाळेत गेल्यानंतर आपल्या आवडत्या सर्व शिक्षकांना तिळगुळ आणि एखादे आपण स्वतः हाताने बनवलेले ‘ग्रीटिंग कार्ड’ देत असत. संक्रांतीच्या दिवशी सर्व मित्र एकमेकांना प्रत्येकाच्या घरी जाऊन तिळगुळ देत असत. ते देत असताना एक वेगळ्या प्रकारचा गोडवा निर्माण होत असे. मात्र आजकालच्या सोशल मीडियाच्या काळात ‘ब्रॉडकास्ट लिस्ट’ बनवून एक फोटो सर्वांना पाठवला की झाले!
‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ म्हंटले जाते तरी सगळा भार आपण तिळगुळावरच का द्यायचा? आपण देखील चांगलं, गोड बोललं पाहिजे. प्रत्यक्षात डिजिटल युगात प्रगती करत असताना नात्यातील कटुता मात्र वाढत जाते. ही कटुता मिटवण्याचा हाच एक क्षण आणि हाच एक सण - मकर संक्रात. सर्वांना तिळगुळ देऊन आपण या सणाचं व या नवीन वर्षाचे स्वागत करूयात. या मकर संक्रातीच्या सोबतच नववर्षाच्या तुम्हा सर्वांना व तुमच्या परिवाराला माझ्या परिवारातर्फे खूप-खूप शुभेच्छा.

कणभर तीळ, मनभर प्रेम
गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला





उत्तम साहित्य वाचत राहण्यासाठी आमच्यासह जोडले जा :
• Whatsapp
• Facebook
{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال