कर्तव्याने पिडलेला माणूस


young boy trapped under responsibility
वय साधारण पंचविशीच्या आतबाहेर. जू खांद्यावर देऊन खिलारी खोंडाला पहिल्यांदाच नांगराला लावावं तसा वाटायचा


जबाबदारी आणि कर्तव्यात मुलभूत फरक कोणता असेल तर तो म्हणजे जबाबदारी झटकता येते कर्तव्य नाही! तसे पाहता कर्तव्य कोणतं आणि जबाबदारी कोणती हेही आपणच ठरवतो. थोडक्यात आपल्या खांद्यावर पेलायची आव्हाने आपणच घडवून आणायची. इतर वेळी ठीक आहे; पण जर ही आव्हाने डोईजड झाली तर? या स्वनिर्मित कर्तव्यानेच आपल्याला पिडले तर?


माणसाला असत्य आवडत नाही – दुसऱ्याचं. माणसाला खोटं पटत नाही – दुसऱ्यानं बोललेलं. माणसाला गैरवर्तन खपत नाही – दुसऱ्यानं केलेलं. माणसाला अन्याय आवडत नाही – दुसऱ्यानं लादलेला. माणसाला गुलामी पचत नाही – दुसऱ्यानं घडवलेली. माणूस मुळातच भंपक, खोटारडा आणि स्वार्थी प्राणी. अर्थात मीही याला अपवाद नाही. इथूनच सुरुवात केली तर फार बरं राहील.

मला लपवाछपवी आवडत नाही आणि म्हणूनच दवाखाना नामक इमारतीची घृणा वाटते. या इमारतीत मृत्यूचा वास लपवला जातो. नेमकं याचसाठी दवाखान्यात इतर रासायनिक जंतुनाशके – आणि खासकरून फिनाईल – इत्यादी सर्व. मी ज्यावेळी सरकारी दवाखान्याच्या सामान्य कक्षात सुरक्षा रक्षकाच्या नोकरीवर आला दिवस ढकलत होतो तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं दवाखान्यात स्वच्छता राहावी वगैरे सगळी कारणं बेलाशक झुट आहेत, खोटी आहेत. खरंतर तिथं मृत्यूचा वास लपवण्यासाठी भरमसाठ फिनाईल मारलं जातं. मृत्यूला वास नसतो म्हणू धजेल त्यानं केवळ दशक्रिया विधी पाहिले असावेत; मृत्यू नाही. मृत्यूला स्वत:चा स्वतंत्र नकोसा वास असतो. कोणताही मेंदू ताळ्यावर असणारा प्राणी मृत्यूच्या जवळ देखील फिरकणार नाही. माणसात आपण मढं जाळतो, पुरतो किंवा त्याला निलगिरीच्या तेलानं अंघोळ घालून, तेही काही काळासाठी, सुशोभित करून ठेवतो म्हणून हा वास जाणवत नाही इतकंच.

मला मात्र आताही दवाखान्यात मृत्यूचा वास ओळखू येतो. फिनाईल तो वास लपवण्यासाठी पुरेसं नाही. विरोधाभास असा की त्यावेळी जर ती नोकरी मला मिळाली नसती तर, किंवा मी ती स्वीकारली नसती तर, आज ही कथा सांगण्यासाठी मी शिल्लक राहीलो असतो की नाही यावर सुद्धा मोठ्ठं प्रश्नचिन्ह आहे. दवाखान्यात फिनाईल मारण्याचं जे कारण तेच घरी आणून ताबडतोब मढ्याची विल्हेवाट लावण्याचं सुद्धा – माणसांना मृत्यूचा वास आवडत नाही. धाय मोकलून रडणाऱ्यांनाही एका क्षणापलीकडे मढं सहन होत नाही. थोडसं भानावर येऊन मग ते म्हणतात . . . उचला . ‌. ‌.


तो भलामोठा सरकारी दवाखाना होता. एखाद्या पर्यटन स्थळासारखा प्रचंड. संपूर्ण बघायचा म्हणलं तर अर्धाधिक दिवस खर्ची पडेल. साहजिकच तिथं पर्यटन स्थळापेक्षा जास्त वास्तविक काहीतरी शिकायला मिळालं असतं तर; पण माझ्याच्यानं तो एकदाही पूर्ण फिरून झाला नाही. त्या जागेनं माझ्या आयुष्यास अशी भयावह वळणं दिली आहेत जी इथं उल्लेखनीय नाहीत आणि श्रवणीय तर अजिबातच नाहीत. त्यात पुन्हा या दवाखान्याची – डाॅक्टर स्वतःहून जटील रुग्णांना जीवे मारतात, त्यांचा इलाज नीट करत नाहीत, चुकीची औषधे देवून हालहाल करतात, कर्मचारी सरकारनं पाठवलेले पैसे खातात अशी कुख्याती पसरलेली होती. ज्यांना इतर कुठंही त्यांचा रुग्ण खपवता आला नाही असे मरणासन्न झालेले गरीब झाडून तिथं येत. गाव म्हणू नये, जिल्हा म्हणू नये अगदी राज्य सोडून सुद्धा लोक रुग्णांना घेऊन येत. त्यांना भीतीदायक अफवांनी काही फरक पडायचा नाही. त्यांचं दैनंदिन जगणं त्याहून कितीतरी भयंकर.

दवाखान्यात या सर्वांना आधार हवा असायचा. तिथं माझ्या लक्षात आलं. कोणीही असो त्याला आधार हवा असायचा. कसाही असो, कितीही असो, कोणत्याही स्वरूपात असो पण आधार हवा असायचा. सुरक्षा रक्षकाची भूमिका वगळता मी जेव्हा केव्हा दवाखान्याची पायरी चढलेलो आहे तेव्हा मी सुद्धा असा मानसिक आधार शोधलेला आहे. संकटसमयी मन मोकळं करायला, आपलं ऐकायला कोणीतरी असावं असं वाटण्यात काही गैर नाही. निसंशयपणे काहीही गैर नाही.

आधी रुग्णाला जागा भेटण्याची मारामार. त्यात पुन्हा परराज्यातून आलेल्यांची राहण्याची सोय रुग्णाला भेटलेल्या खाटाच्या खाली. इतर मग खाण्यापिण्याची सोय नाही. दवाखान्यात जे मिळतंय त्याचा दर्जा जितराबांच्या खाण्याहून बरा नाही. जवळ पुरेसे पैसे नाहीत. कित्येक संकटं, कित्येक अडचणी. साहजिकच चांगल्या डॉक्टरांपाठोपाठ त्यांना सर्वाधिक गरज कशाची असेल तर ती मानसिक आधाराची, तो काहींनी माझ्या खुर्चीत शोधला.

कोण, काय, कुठले, कशासाठी आलेत, पूर्वीच्या इलाजाचा इतिहास, कौटुंबिक घडामोडी, आर्थिक संकटं, रुग्णाच्या आठवणी, वरिष्ठ डॉक्टरांनी भविष्याच्या दिलेल्या नकोशा कल्पना, बेशिस्त आणि अस्वच्छतेसाठी शिपायांनी दिलेल्या शिव्या, शहरानं-नव्या राज्यानं दिलेला दगा, शिकवलेल्या चार शहाणपणाच्या गोष्टी काही-काही म्हणून या लोकांनी सांगायचं बाकी ठेवू नये. आपला माणूस समजून त्यांनी सांगितलं – मी ऐकलं. काहींनी तर मला न कळणाऱ्या भाषेत सांगितलं मी त्यांना न कळणाऱ्या भाषेत आधार दिला, शब्दांविना सगळं व्यवस्थित पार पडत होतं. जर माणसांनी आधारासाठी माझी निवड केली नसती तर कदाचित दुसऱ्याच दिवशी मी तिथून निघालो असतो असं मला आज वाटतं. ज्यांनी दु:ख पांगवण्यासाठी माझी निवड केली – आणि अप्रत्यक्षपणे मला जिवंत ठेवलं – त्यातील ‘तो’ एक होता.

वय, साधारण पंचविशीच्या आतबाहेर. जू खांद्यावर देऊन खिलारी खोंडाला पहिल्यांदाच नांगराला लावावं तसा वाटायचा. लहान वयात कुटुंबाची जबाबदारी पेललेला तो दवाखान्यात एकटा यायचा. मी अधूनमधून निरीक्षण करत होतो. त्याच्यासोबतचा रुग्ण – कायम खाटावर – बहुदा वडील असावेत (नंतर माझा अंदाज खरा निघाला ते त्याचे वडीलच). अंगाने किरपान, अकाली रापलेला हा आपला कायम घाईत असायचा. चिरका बायकी आवाज जणूकाही पुढच्या शब्दाला हमसून रडायला सुरुवात करेल. उद्याचा अंश संपलेले डोळे सोबत घेऊन फिरणारा तो आला त्याच्या दोनेक दिवसानंतरच त्याची व माझी ओळख झाली. अधेमधे नजरानजर झाली की एकमेकांची ख्यालीखुशाली नजरेनेच आकळत असू.

आठवडा गेला असेल आणि एकाएकी त्याच्या हिरवा पडदा लावून स्वतंत्र उभ्या केलेल्या कक्षातून भांडण्याचे जोरदार आवाज येऊ लागले. निश्चितच कोणाततरी बेबनाव झाला होता. डॉक्टरांनी दरडावलं तेव्हा आवाज थांबले; पण परत पुढच्या दिवशी तेच. दररोज भांडणं वाढत गेली. त्याच्या चेहऱ्यावरची होती तेवढी तकाकी नष्ट झाली व त्याची जागा कायम रागीट असणाऱ्या चेहऱ्यानं घेतली. त्या दिवशी भांडं पडण्याचा मोठा आवाज झाला. लगोलग मारल्याचे, गुद्दे घातल्याचे, बेदम बडवल्याचे सोबतीला ओरडल्याचे आवाज. मी धावलो. पाहतो तर त्याची रूग्णाला जबर मारहाण सुरू. मार थांबला तसं रूग्णाच्या बोंबलण्याची जागा शिव्यांनी घेतली. मी त्याला बाजूला घेऊन गेलो. तिथे शिव्या ऐकून त्याचा बांध फुटला.

“साहेब.” मी त्याला माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसवलं पाणी दिलं. “काय सांगू साहेब जीव नकोसा झालाय पहा. या म्हाताऱ्यासाठी काय केलं नाही आजपर्यंत तुम्हीच सांगा . . . याने दारूच्या रूपात विध्वंस आणला. आमचं बालपण बाटलीत बुडवलं, शिक्षणाला बट्टा लावला, भविष्य नासवलं. काम करून करून आईचं आयुष्य उध्वस्त झालं. शरीर, मन, मानसिकता आई सगळीकडून संपली. अजून दोन मोठ्या बहिणींची लग्न बाकी आहेत. एकीचं झालंय ती इकडंच पाहून तिकडं अत्याचारात मुकाट्याने नादंते. लहान भाऊ शिकतोय. पाच पोरं हळजली याने आणि मोठं कोणाला म्हणून केलं नाही. दारू पिऊन पिऊन सगळं संपलं – खुद्द हाही संपला; पण दारू प्यायचा थांबला नाही. साहेब सगळी व्यसन आहेत त्याला कोणतं व्यसन नाही असं नाही. त्या व्यसनासाठी कुटुंबाची वाताहात करून टाकली याने. याला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो. आईबहिणींनी याला बडवून घराबाहेर गटारात फेकून दिलं मरण्यासाठी. माझं काळीज मानत नाही. बापाच्या जीवात जीव आहे तोवर आपण लढणार म्हणतोय तर घरचे साधा डबाही भरून देत नाहीत साहेब. मी काय काय करून याला जगवतो तर हा औषध घेत नाही, डॉक्टरांचं ऐकत नाही. सलाईन उपसतो, डॉक्टरांना शिव्या देतो. या गार फरशीवर, असल्या थंडीत, मी कशा रात्री ढकलतोय गेले कित्येक दिवस तर हा गेले तीन दिवस दारू पाहिजे म्हणून झगडतोय. बांधून ठेवलं खाटाला तर डॉक्टरला शिवीगाळ सुरू. आज तर याने कहरच केला. मुतायचं भांडं लाथ मारून खाली पाडलं . . . तुम्ही स्वतः पाहिलं साहेब . . . मला याचं मूत पुसताना पाहिला का नाही खर सांगायचं. माझी तक्रार नाही हो पण त्याला जाण नाही माझी. म्हणतो, मरू दे मला. तू माझा कोण नाही मी तुझा कोण नाही. तुझ्या आईनं तुला इतर कोणाकडून काढलं असेल. दारूच माझी सर्वकाही. आणि मग साल्याला सोडलं नाही साहेब. मी तरी काय करू तुम्ही सांगा . . . साहेब . . .”


आणि मग पुढे बराच वेळ तो काहीबाही सांगत राहिला. पलीकडं त्याच्या बापाच्या शिव्यांचे आवाज वाढत होते त्यात इकडं याचा आक्रोश अस्पष्ट होत गेला. आणि त्याच वेगानं हळूहळू माझ्या डोक्यात ही घाणेरडी जागा सोडण्याचा विचार अधिक स्पष्ट होत गेला.





आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال