निसर्ग आणि माणूस, माणूस आणि निसर्ग. निसर्ग माणूस आहे; पण माणूस मात्र काही केल्या निसर्ग होऊ शकत नाही! परिणामी माणसात जी किड आहे ती निसर्गात सापडेल मात्र निसर्गाचं उदात्त मन माणसात? क्वचितच.
बांडगूळाला पोटजाती असतील की नाही माहिती नाही; पण बांडगूळाचा धर्म तो सारखाच – एखाद्याच्या बोकांडी बसून त्याच्या देहातील जीवनरस शोषणं. हा जीवनरस नुसता शोषायचाचं नाही तर त्यावर आपली प्रगती साधायची, आपली भलावण करायची, पैदास करायची, मस्त जाडजूड व्हायचं.
सुरुवातीला बांडगूळाची वेल फार सुरेख दिसते, हे तिचं आणखी एक वैशिष्ट्य. नाजूक पालवी फुटलेली छोटी-छोटी पानं असा काही घेर मारतात झाडाच्या खोडाला जसं कोण्या मुलीनं नाजूक हातांनी मजबूत पुरुषाला थोपवून धरावं – केवळ मायेच्या बळावर. नंतर मात्र त्या झाडाच्या आयुर्मानातील काही वर्ष खेचून ती वेल अशी काही मजबूत होते जणू हरणाला अजगराने मारलेली मगरमिठी. निर्दयी आणि करकचून आणि हिंस्त्र.
बांडगूळं खूप पाहिली. या निसर्गात कशाची कमी नसेल तर ती बांडगूळांची. काही बांडगूळांच्या वेली तर एकट्या झाडाचं आयुष्य नासवून थांबत नाहीत, त्या एकाच वेळी कैक खोडांवर विसावतात, जिथे पैदा होतात, तिथेच घाव घालतात.
बांडगूळाच्या वेलीला छोटं झाड कळत नाही, ग्रासलेलं झाड कळत नाही, उमेदीनं जगू पाहणारं झाड कळत नाही की जीवन-मरणाच्या टोकावर झुलत असलेलं झाड कळत नाही. तिला फक्त जाणवतं – झाडाच्या धमन्यांतून वाहणारं पोषण!
अगदी अलीकडेच मात्र एक अतिशय वेगळंच बांडगूळ पाहण्यात आलं. इतकं वेगळं, इतकं
विचित्र की विचारांत रुतून बसलं.
दुभंगून कोसळलेल्या झाडाच्या खोडावर फोफावलेलं बांडगूळ.
जगाने तोडून फेकलेल्या त्या झाडावर बांडगूळाने नंतर येऊन घर केलं. माणसातला ‘मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार’ निसर्गात बांडगूळानं घडवून दाखवला याचं जसं आश्चर्य वाटायला नको तसंच – किंवा त्याहून जास्त – जगात बांडगूळं फक्त वेलीच्या रूपातच वावरत नाहीत याचंही वाटायला नको.
{fullwidth}