तीव्र दुपार


shadows of swimming pool waves summer day
मला फक्त दिसत राहतं तुफान वेगाने बदलत निघालेलं हे जग दिवसेंदिवस हिंसक होत निघालय.


काही प्रसंगात तर आपण चुकीच्या हातात आहोत हे कळायलाच फार उशीर होतो, इतका की, तोपर्यंत वेळ गेलेली असते. फायदा नाही. स्वतःच्याच हाताने मान कसायाच्या ताब्यात देण्यातला हा प्रकार आहे. कशासाठी? तर कसल्या तरी अलौकिक, अत्युच्च, अवास्तवी प्रेमाच्या भुकेने . .‌‌ .


तीव्र दुपार. गेले चार दिवस झोप नाही. त्यात पुन्हा एका रात्री खासकरून दोनच तास आराम. एव्हाना तुझ्या-माझ्या संवादातील धागा तुटून काही दिवस होत आलेले म्हणून मग तुझीही आठवण फारशी नाही. दुपारी मात्र अनपेक्षित झोपेनं गाठलं. मध्येच कधीतरी, काम पूर्ण करण्याच्या भितीने, दचकून जाग येणे . . . तीव्र दुपार आणि तितकीच तीव्र तुझी आठवण.

फोन करायचा नाही . . . कितीही ठरवलं तरी अर्धवट झोपेत चुका होतात. तुला बोलण्यासाठी दुपारी वेळ असतो हे माहिती असल्याने मी फोन लावला; पण व्यर्थ, अर्थातच, नंबर ब्लॉक. मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करतो.


माहिती नाही मात्र कधीकधी उगाच विनाकारण काही गोष्टी जाणवत राहतात. एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांत पाहून, तिचा आवाज ऐकून किंवा फोटो वगैरे पाहून कधीही काहीतरी जाणवतं. यातलं सगळंच खरं म्हणता येत नसलं तरी सगळंच खोटं म्हणावं असंही नाही. त्यातून मला तुझ्याबद्दल जाणवत राहिलं की . . . सांगण्यासारखं असं काहीच नाही. काय जाणवतंय हे शब्दांत कसं सांगणार? निदान माझ्या ताकतीच्या ते बाहेर आहे. त्या जाणिवेतून मला तुला कशाबद्दल तरी सावध करायचं आहे. कसं करणार? तुझ्याशी संवाद होण्याचा कोणताच मार्ग राहिलेला नाही.

गेल्या काही दिवसात झालेली घुसमट मी पूर्वीही अनुभवलेली आहे, ही काही नवीन नाही मात्र, बऱ्याच वर्षांनी परत आली म्हणून आनंदी व्हायचं का दुःखी माहिती नाही. घुसमट होण्याचं कारणही माहिती नाही. मी त्या विचारांना टाळत स्वतःला कामात झोकून दिलं. आज मात्र कागदाची गरज भासत होती. शेवटी तडकत्या उन्हात तंगडतोड करून आलो तरी अशांतता . . . मी अनिच्छेने कागद-पेन हातात घेतला. त्याशिवाय ही तगमग शांत होणार नाही, शमणार नाही.


‘तू कधी चुकीच्या हातात जाऊ नकोस’ इतकंच मला सांगायचंय. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक मैत्रिणीला मी कायमच हे सांगण्याचा कधी ना कधी प्रयत्न केलेला आहे. मात्र तुम्हा सर्वांनाच ते फारसं कळालंय अशातला भाग नाही. तुला सांगण्याचा योग यापूर्वी जुळून आला नाही आज आलाय तर सांगण्याचा मार्ग नाही. तरीही सांगून टाकतो – चुकीच्या हातात जाऊ नकोस.

केवळ इतकं सांगून मी थांबू शकतो, यापुढचा अंदाज तू बांधू शकतेस. कायम हे असंच होत आलेलं आहे. यावेळी स्पष्ट करेन म्हणतो. बघू प्रयत्न तर करतो नाहीच काही झालं तर निदान माझ्या भूमिका तरी पक्क्या होतील.

चुकीचे हात कोणते? कोणाचे? आणि त्या हातात जाणं म्हणजे काय? समाजात फिरतो. दोन्ही हात खिशात घालून खिशात कोंबून येणाऱ्या-जाणाऱ्यांचं निरीक्षण करतो. कधी संवादाचे तुकडे ऐकून परिस्थितीचा अंदाज बांधतो. कधी मित्रात बसतो, फिरतो. त्यांच्या कथा ऐकतो. नेटवर कधी वेळ घालवला तर जगाच्या उखाळ्या-पाखाळ्या काढत बसतो. मला फक्त दिसत राहतं तुफान वेगाने बदलत निघालेलं हे जग दिवसेंदिवस हिंसक होत निघालंय. इथे सगळे द्वेषाची, सुडाची भाषा करतात, इच्छा धरतात, प्रेमाची गोष्ट करताना कोण दिसत नाही. सगळे एकमेकांना ओरबाडण्याचा प्रयत्न करतात, जपण्याची, जोडण्याची भाषा कोणी करत नाही. माझं काही बिघडत नाही; पण एकेका मुलींच्या कथा ऐकतो तेव्हा तिच्या जवळपास जाणाऱ्या तुमच्या कोणाचीतरी आठवण येते. तुम्हीही अशाच कोणत्यातरी चुकीच्या हातात असाल तर? अवघड आहे.

पोरींवर बंधने लादायची. त्यांचा मानसिक, भावनिक, शारीरिक उपसा करायचा. त्यांच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन त्यांना लुटत राहायचं हेच मी पाहतो आहे. माझे हात चांगले आहेत का? अजिबात नाही. मी माणूस म्हणून फारसा स्वीकारार्ह नाही हे कळत असल्याने मी कधी तुम्हा कोणाला हात घातलेला नाही. जे आपल्याला घडवता येणार नाही ते आपण निदान बिघडवू तरी नये असं मला वाटतं आहे, वाटत राहील. याचवेळी तुम्ही इतर वाईट कोणाच्या – किंवा माझ्यासारख्याच कोणाच्या – हातात जाऊ नये असंही वाटत राहतं. विचित्रच विरोधाभास आहे.

मुलींच्या स्वातंत्र्याला आपला विरोध कधीच नव्हता. त्यांच्या स्वातंत्र्याला स्वैराचार ठरवण्याचा मूर्खपणा सुद्धा आपण कधी केलेला नाही; पण त्यांनी स्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पना बाळगून कधी नसत्या फंदात फसू नये असंही वाटत राहतं. निदान तुम्हा मैत्रिणींच्या बाबतीत तरी हे होऊ नये.

अचानक कधीतरी कोणतीतरी मैत्रीण चुकीच्या हातात गेल्याचं कळतं . . . एकदा का तुम्ही चुकीच्या हातात गेलात – खेळ खलास. नंतर तिथून बाहेर निघण्याचा कोणताच मार्ग नाही. पक्के मानसिक गुलाम बनत जाता तुम्ही. मग काही ऐच्छिक किंवा अनैच्छिक शोषण सुरू. शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक किंवा हिंसक किंवा उगाचच खेळवणं किंवा काहीही. मी ऐकत असलेला एकेक किस्सा नीचपणाच्या पातळ्या ओलांडून जाणारा आहे. त्यात पुन्हा जुन्या ऐकलेल्या, पाहिलेल्या कथा आठवतात. काही प्रसंगात तर आपण चुकीच्या हातात आहोत हे कळायलाच फार उशीर होतो, इतका की, तोपर्यंत वेळ गेलेली असते. फायदा नाही. स्वतःच्याच हाताने मान कसायाच्या ताब्यात देण्यातला हा प्रकार आहे. कशासाठी? तर कसल्या तरी अलौकिक, अत्युच्च, अवास्तवी प्रेमाच्या भुकेने . .‌‌ . असलं काही मुळात अस्तित्वातच नसतं हे तुम्हाला कोण सांगणार नाही. कारण तुमचं धुंदीत जगणं त्यांच्यासाठी फायद्याचं आहे. तुमचं अज्ञान बरं आहे.

सांगता सांगता बराच पाल्हाळ लागला. बिन महत्वाचं बोलत राहिल्याने मूळ मुद्दा बाजूलाच राहिला. सुंठ जळला तरी पीळ जात नाही, काय करणार? आज दुपारी उठल्यापासून मला जाणवत राहिलं की तू चुकीच्या हातात आहेस. याला काही अर्थ नाही यातलं काही खरं नसेलही; पण म्हणून भविष्यात तू चुकीच्या हातात जाऊ शकत नाही असं म्हणता येणार नाही. मग मला भूतकाळ आठवतो, पुष्कळ. मला कायमच वाटत राहिलं की स्वातंत्र्याच्या एकतर तुझ्या कल्पना फार वेगळ्या आहेत किंवा माझ्या वेगळ्या आहेत; गैर नाहीत वेगळ्या आहेत इतकंच. मित्रांनी तुझ्या आयुष्यातील सांगितलेले चढउतार आठवले. त्याच्याने तू चुकीच्या हातात गेली आहेस, जात आहेस असं वाटत राहीलं. विनाकारण आताही तीच भावना, तीच आठवण . . . तुला एखादं वाक्य समजावून फोन ठेवावा म्हणलं तर तेही अशक्य; पण तू मात्र चुकीच्या हातात जाऊ नयेस.

पुरूषसत्ताक संस्थेने आधीच तुझ्यावर भरपूर घाव पेरलेले आहेत, प्रत्येक मैत्रीणीवर पेरलेले आहेत, हे मला माहिती आहे. अशाने मग आपण आपले हात चांगले करून पुढे धरावे असं वाटायला लागतं. यातही काही अर्थ नाही. जे आपल्याच्याने होणार नाही ते करण्याचं नाटक करण्यातही मजा नाही.


एकेका चुकीच्या हातात गेलेल्या मुलीची व्यथा आठवत राहते, मी लिहायला घेतो, तुझी आठवण येते, तू चुकीच्या हातात जाऊ नयेस एवढंच सांगायचं असतं आणि तीव्र दुपार.





{fullwidth}

2 टिप्पण्या

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

  1. Hats off!

    या जगात प्रत्येक व्यक्ती अशा विचारांचा होईल?

    उत्तर द्याहटवा
  2. कदाचित - कधीच नाही!

    याला बरीच कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे लोक आता समोरच्याला सुद्धा भावना नावाचा प्रक्रार अस्तित्वात आहे हेच जाणायला मागत नाहीत. परिणामी मग अजाणतेपणी किंवा जाणूनबुजून इतरांना जखमा करत फिरतात. हे थांबण्याचा, कमी होण्याचा कोणताच (आशेचा) किरण सध्यातरी नाही.

    भविष्यात असेल असंही नाही.

    धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال