‘खादी घालेल तो गांधीवादी’ असाही एक प्रचंड काळ देशाने पाहिलेला आहे. या खादीने किती राजकारण्यांच्या कशाकशा पोळ्या भाजल्या हे सारे जाणतात. अगदी असंच आत्ताच्या काळी ‘जो सुट घालतो तो पत्रकार’ अशी मानसिकता बनत आहे. पण या सुटामागे वैयक्तिक पोळीभाजणी किती आणि बुटचाटू वृत्ती किती हे सगळे जाणत नाहीत. एकतर हिंदी वर्तमानपत्र सर्वाधिक वाचलं जाणारं वृत्तपत्र आणि हिंदी बातमी वाहिन्या या सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या वाहिन्या. यांवर सध्या सुटाबुटात द्वेषाची साखरपेरणी करणारे कोण आहेत?
‘अँकर’ म्हणजे जहाजाचा नांगर. जहाज एका जागी स्थिर राहावे यासाठी त्याचा वापर करतात. हाच शब्द वृत्तवाहिन्यांतील सूत्रसंचालकासाठी योजण्यात आला आहे. याचे कारण हेच की, त्यानेही वाहिन्यांतील बातम्या वा वादचर्चा भरकटू नयेत याची काळजी घ्यायची असते; परंतु आनंद बक्षी यांच्या एका गीतात ‘सावन जो अगन लगाये’ किंवा ‘मांझी जो नाव डुबोये’ अशा कल्पना मांडण्यात आल्या आहेत, तद्वत हे अँकरच कार्यक्रम भरकटवू लागले आहेत.
या सर्वभाषिक वृत्तवाहिन्या आणि त्यावरील ते सर्वज्ञानी सूत्रसंचालक यांनी देशातील सौहार्द, सामंजस्य आदी भावनांचा बट्ट्याबोळ केला आहे. आज देशासमोर ‘हेट स्पीच' म्हणजेच द्वेषोक्ती नावाचे एक प्रचंड धोकादायक आव्हान उभे ठाकले आहे, ते कशामुळे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी त्या वाहिन्यांवरील ते वादचर्चेचे कार्यक्रम पाहणे पुरेसे ठरावे. मासळी बाजारातील कलकल आणि भटक्या सारमेयांची कलागत यांचा एकसमयावच्छेदेकरून मिळणारा दिव्य अनुभव असतो तो.
वस्तुतः भारतीय परंपरेत वादचर्चा यास एक महत्त्वाचे स्थान आहे. हल्ली आपल्याकडे थोर विचारवंत पु. ग. सहस्त्रबुद्धे यांच्या शब्दांत सांगायचे तर ‘नरोटीची उपासना’ करणारेच वाढले आहेत. त्यामुळे त्यांना हिंदू धर्म म्हणजे नेमके काय, याची माहिती असण्याचे कारण नाही. हिंदू असणे आणि हिंदुत्ववादी असणे यात मोठाच फरक आहे, हे तर त्यांच्या खिजगणतीतही नसते. तेव्हा त्यांना हे माहीत असण्याची शक्यता कमीच की, हिंदू धर्मात न्यायदर्शन नावाचे एक वैदिक दर्शन असून, वाद हा त्याचा एक भाग आहे. वाद म्हणजे काय, तर तत्व जाणण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीबरोबरचा संवाद. सत्याचा शोध हाच त्याचा अंतिम हेतू. ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ असे म्हटले जाते, तेव्हा त्याचा अर्थ हा असतो. परंतु आता तो अर्थ केव्हाच धुळीस मिळाला असून, त्याची जागा वेगळ्याच ‘अर्था’ने घेतलेली आहे. गेल्या शुक्रवारी द्वेषोक्तीबाबतच्या खटल्यात बोलताना सर्वोच्च न्यायालयाने नेमका हाच मुद्दा अधोरेखित केला.
या वाहिन्यांचा अवघा वृत्तकारभार हा ‘टीआरपी’लक्ष्यी असल्याचे न्यायालय म्हणाले, ते खरेच आहे. प्रेक्षकसंख्या वाढावी आणि त्या योगे आपल्या जाहिरात महसुलात भर पडावी, या हेतूने वृत्तवाहिन्या हे समाजद्रोही उद्योग करीत आहेत. परंतु, ते केवळ पैशाचेच गणित आहे असे नव्हे. त्यामागील कर्तुम शक्ती आहे ती सत्ता! देशात वाढलेल्या द्वेषोक्तीस आळा घालण्यात यावा या हेतूने करण्यात आलेल्या याचिकेवर गेल्या शुक्रवारी झालेल्या सुनावणीत वृत्तवाहिन्यांना झापताना सर्वोच्च न्यायालयाच्या हातून नेमका हा मुद्दा सटकला.
येथे एक बाब पहिल्यांदाच स्पष्ट करावयास हवी की, आज देशात वृत्तवाहिनी नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. जगातील घटना-घडामोडींबाबत माहिती देऊन नागरिकांना जागे करणे, शहाणे करणे हा बातम्या देण्यामागील प्रमुख हेतू. एकेकाळी तसे करणारी माध्यमे या देशात होती. दूरदर्शनवरून सरकारी प्रचार-प्रसार होत असला, तरी त्यावरून लोकशिक्षणही होत असे. पुढे वाहिन्या वाढल्या. स्पर्धा आली आणि हळूहळू वृत्तवाहिन्या या वृत्त-रंजनवाहिन्या बनल्या. त्यावर ‘नागीन की शादी’ वगैरे बातम्यांचे कार्यक्रम येऊ लागले. आज ते रुपही पालटून त्यास हिडिस कळा आली आहे.
सामाजिक नीतिमत्तेच्या प्रचंड काळजीपोटी एका थोर महिला नेत्याने मध्यंतरी माध्यमांतून ‘नंगटपणा’ हा शब्दप्रयोग केला. हल्लीच्या वाहिन्या त्या नंगटपणाच्याही पार गेल्या असून, ती निव्वळ द्वेषाची दुकाने बनली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत रास्त चिंता व्यक्त केली. प्रत्येक गोष्टीचे सनसनाटीकरण करायचे. केवळ दृश्यमानतेपोटी कोणत्याही गोष्टी दाखवायच्या आणि त्यातून समाजात तेढ निर्माण करायची, हेच या वाहिन्यांचे धंदे बनले आहेत. सतत हिंदू-मुस्लिम करीत राहायचे आणि त्यासाठी एरवी काडीचीही किंमत नसलेल्या भिकारबुद्धी वाचाळवीर वा वीरांगनांच्या तोंडापुढे बूमचे बोंडके धरणे, अक्कल गुडघ्यात आणि ताकद घशात हीच ज्यांची ओळख, अशांना तज्ज्ञ म्हणून स्टुडिओत बसविणे हीच या वाहिन्यांची धोरणे बनली आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे या आशयाचे विचार आज येथील प्रत्येक जाणत्या प्रेक्षकाच्याही मनात आहेत. दुर्दैवाने अशा प्रगल्भ प्रेक्षकांच्या संख्येची आपल्याकडे कमतरता आहे. परिणामी संपूर्ण देश आज विखाराच्या धुरक्यात गुदमरत आहे. त्यात काळजीची आणखी एक बाब अशी की, अनेकांना देशात द्वेषमयी वातावरण आहे हेच अमान्य आहे. गटाराच्या शेजारी राहणाऱ्यास कालांतराने ती दुर्गंधीही जाणवेनाशी होते, तसेच हे. परंतु मुद्दा असा की, या दुर्गंधीला केवळ वृत्तवाहिन्याच कारणीभूत आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने या वृत्तवाहिन्यांचे लगाम कसावेत असे म्हटले आहे. ते कसलेच पाहिजेत, परंतु दुर्गंध येतो म्हणून हवा बंद करणे हा उपाय नसतो. ज्यामुळे तो वास येत असतो, त्या कुजलेल्या, सडलेल्या गोष्टी नष्ट करणे हा त्यावरचा मार्ग असतो.
वृत्तवाहिन्यांवरील द्वेषोक्तीस केवळ त्यावरील अँकर कारणीभूत असूच शकत नाहीत. पत्रकारितेत ‘सूत्रां’ना फार महत्त्व, पण आज पत्रकारिताच उरलेली नसल्याने तेथे ‘कळसूत्रां’ना महत्त्व आलेले आहे. हे वाहिनीवीर स्वतःला कितीही निर्भीड वगैरे म्हणू देत, आपण म्हणजेच देशाचा आवाज असे कितीही त्यांना वाटू दे, ते अखेर असतात कळसूत्री बाहुलेच. आवाज त्यांचा असतो, शब्द तिकडे ‘कॉर्पोरेट बोर्डरूम’मध्ये बसलेल्यांचे असतात. ते बोर्डरूम, ते माध्यमांचे मालक वाहिन्यांची धोरणे ठरवित असतात.
वृत्तवाहिन्यांतून पडणाऱ्या द्वेषोक्तीच्या पिचकाऱ्या थांबवायच्या असतील, तर प्रथम त्यामागील आर्थिक-राजकीय आणि माध्यमी गणिते लक्षात घ्यावी लागतील. द्वेषाच्या दुकानांचे नेमके लाभार्थी कोण आहेत हे पहावे लागेल.
काही वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांवर टीका करणे हे टीआरपीवर्धक होते. तेव्हा ते टीका करीत होते. आज तसे नाही. आज विरोधकांवर टीका करणे फायद्याचे ठरते. आज द्वेष पसरविणे हे लाभदायक आहे. कारण ते स्वतःस धर्माचे ठेकेदार म्हणविणाऱ्या अतिरेकी प्रवृत्ती आणि त्यांच्या साथीने स्वतःची सत्तापिपासा भागविण्यासाठी धडपडणारे राजकारणातील पिग्मी यांना सुखावणारे आहे. ते सत्तेनजीक नेणारे आहे. त्यातूनच वाहिन्यांना नफा मिळणार आहे. त्यातूनच आपले अन्य उद्योग सुखेनैव चालू राहणार आहेत, हे भांडवली श्रेष्ठींना माहीत आहे. असे असताना कोण कशास येथे मोहब्बतीचा कारभार करायला जाईल? तो पडद्यावरून नफरती चिंटूंनाच उत्तेजन देईल.
हे बंद करायचे असेल, तर प्रथम ही राजकीय आणि माध्यमी गणिते आपल्याला लक्षात घ्यावी लागतील. द्वेषाच्या दुकानांचे लाभार्थी कोण आहेत हे पाहावे लागेल. त्याहून महत्त्वाचे म्हणजे या असुरी उद्योगाने होणारा देशाचा तोटा ध्यानी घ्यावा लागेल. देश मोठा की द्वेष मोठा हे ठरवावे लागेल. द्वेषाचे राजकारण कोणत्याही समाजात अमृतकाल आणू शकत नाही, हे लक्षात ठेवावे लागेल.
{fullwidth}