आज मी पाहतो चौफेर . . . पाहतो मक्कारी, पाहतो हिंसा, पाहतो द्वेष, मत्सर, असूया, अहमहमिका, पाहतो माणसांच तोडत जाणं माणसाला, पाहतो माणसाचं गाडत जाणं स्वतःला, अविश्वास, असत्य, मानसिक खून, आणि कवट्या शेणानं बरबटलेल्या . . . मी पाहतो एक मक्कार आरशातला . . . आठवणींवर जगणाऱ्या एका माणसाचं आक्रंदन फारतर ऐकतो आणि . . . आज मी पाहतो चौफेर
पूर्वीची माणसं, त्यामानानं भाबडी म्हणावं अशी, भलतीच निरागस होती. वैयक्तिक जीवनातील एकंदर वर्तनात कितीही विरोधाभास ठासून भरलेला असूद्यात; पण बहुतेक वेळा यांच्यातून निरागसता चमकायची. ती माणसं नक्की गेली कुठं?
आप्पा. आमच्या बापाचा बाप. नुसता नावानं तुकाराम उरला नव्हता इतका भला माणूस. त्याचीही आपल्यातच एक लकब होती.
‘आप्पा कोणता डॉक्टर भारी?’
तर ‘जो जास्त वेळ आपल्या अंगाला हात लावतो लावेल तो!’ बाकी त्याचं शिक्षण, तो देत असलेली औषधं सगळं फोल. डॉक्टरनं कसं रुग्णाशी रसभरीत गप्पा माराव्यात, त्याला आंजारावं-गोंजारावं, त्याच्या पाठीवरून हात वगैरे फिरवावा की तो चांगला!
आप्पा नेहमीच चांगल्या डॉक्टरच्या शोधात राहिले.
दुसरा एक गृहस्थ माळीनगरचा. ‘डॉक्टरने आठवड्याच्या गोळ्या दिल्यात त्याच्याने माणूस आठवड्यात बरा होणार मग या सगळ्या गोळ्या एकदमच खाल्ल्या तर झटक्यात बरं होईल की?’ म्हणणारा!
तसं त्यानं कधी केलं नाही नशिबाने.
तिसरा असाच – नावही ठाऊक नसलेल्या कोण्या एका गावचा – भारदस्त माणूस. डॉक्टरांनी आजार पाहून जेवण अगदीच कमी करायला सांगितलं – चार भाकऱ्यांवरून दोनच.
तेव्हा बायकोला म्हणायचा ‘चार भाकऱ्यांचं पीठ घे आणि त्याच्या दोनच भाकऱ्या थाप – दोन भाकऱ्यांत पोट भरत नाही.’
अशीच अजून कितीतरी भन्नाट निर्मळं लोकं कोण, कधीचा, कुठला, कितपत निरागस हे आपल्याला कळण्याआधीच पृथ्वीगोलावरून लुप्त झाली. थोडीशी अज्ञानी; पण भरपूर सालस, लाघवी, लहानग्यांच्या उत्सुकतेने तुडुंब भरलेली ही सगळी माणसं जर एका वेगळ्याच जगात एकवटली असतील तर . . .
तर आता या जगात माणसांकडून माणसांना बांधणारी कोणतीच चीज शिल्लक उरली नसती . . .
वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे
रोज अत्याचार होतो आरशावरती आता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे
– इलाही जमादार
{fullwidth}