स्क्विड गेम

[वाचनकाल : ३ मिनिटे] 
स्क्विड गेम मधील एक दृश्य, squid game

अनेकांना वेबमालिका (वेबसिरीज) पहायला आवडतेच. नुकतीच ‘स्क्विड गेम’ नावाची एक वेबमालिका बघितली. स्क्विड गेम जगामध्ये खूप जास्त प्रसिद्ध झाली आहे. या वेबमालिकेतून ज्या काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्यातील काही आज मी इथे मांडण्याचा प्रयत्न करेन. वेळ मिळाल्यास तुम्ही सुद्धा नक्की पहावी अशीच ही वेबमालिका आहे.

‘स्क्विड गेम’चे रहस्य न उलघडता, मी एवढेच सांगेन की ही काही कर्जबाजारी माणसांची कथा आहे, ज्यांना कर्जबाजारीपणामुळे एका अशा खेळाचा हिस्सा व्हावे लागते – जेथे त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो! मात्र तरीसुद्धा, फक्त आपले कर्ज उतरवण्यासाठी ते त्या खेळात सामील होतात आणि त्यानंतर जो अफलातून प्रवास घडतो तो प्रवास म्हणजे ही वेबमालिका ‌. . . 

त्या जीवघेण्या खेळाचे संचालक, त्यांना पटवून देतात की, बाहेरचे जग तुमच्यासाठी नरकापेक्षा कमी नाही. कारण, कर्जबाजारी असल्यामुळे, ज्यांच्याकडून त्यांनी कर्ज घेतले, ते सर्व हात धुऊन त्यांच्या मागे लागलेले असतात व त्यांचे कुटुंबीय किंवा नातेवाईक त्यांना बिलकुल किंमत देत नसतात. त्यांच्या पुढे ‘आता काय करायचे’ ही मोठी समस्या रोज निर्माण होत असते. त्यामुळे ‘जे होईल ते होईल’ हा विचार करून ते या खेळामध्ये सहभागी होतात.

या खेळामध्ये दक्षिण कोरियाच्या संस्कृतीतील अगदी छोटे-छोटे खेळ असतात – जसे आपल्याकडे लहानपणी खेळले जाणारे खेळ असायचे लपाछपी, गोट्या इत्यादी . . . या खेळामध्ये सुद्धा असेच लहानपणी खेळले जाणारे खेळ खेळले जातात. फक्त फरक एवढा असतो की, त्या खेळांमध्ये जर तुम्ही हरलात तर तुम्हाला सरळ सरळ ठार मारण्यात येते!

जीवावर उदार होऊन हा खेळ खेळताना अनेकांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू समजत जातात. काही माणसे खूप चांगली असतात, तर काही अतिशय वाईट. परंतु, काही चांगल्यांमध्ये सुद्धा वाईटपणा जाणवतो आणि याचा अर्थ काय लागतो हे कोणीही सहज कल्पना करू शकेल. हा प्रवास आपल्याला अनेक गोष्टी शिकवतो.

जगामध्ये तुम्हाला व्यवस्थित जगायचे असेल तर – इतर काही आले नाही तरी चालेल –  परंतु आर्थिक नियोजन मात्र जमले पाहिजे. आपल्याकडे काही वेळा खूप कमी पैसा असेल, तर काही वेळा खूप जास्त असेल मात्र या दोन्ही स्थितींमध्ये तुम्हाला त्याचे नियोजन करणे व तो पैसा तुमच्या भविष्यासाठी उपयोगात आणणे, हे जमलेच पाहिजे. नाहीतर मग आयुष्यामध्ये विदारक स्थिती निर्माण होते.

कोणताही निर्णय खूप विचारपुर्वक घ्यायला हवा – छोट्यात छोटी गोष्ट असेल तरीही. कारण, छोट्या-छोट्या गोष्टीच मोठे बदल घडवितात. तुमचा प्रत्येक निर्णय तुमचे व्यक्तीमत्व व तुमच्या भोवतालचे जग बदलत असतो. त्या जगातील, तुमचे स्थान बदलत असतो.

पैसा खूप महत्त्वाचा आहे. त्याचे स्थान जरी आयुष्यात खूप महत्त्वाचे असले, तरीसुद्धा तो आपण कोणासाठी कमावतोय, का कमावतोय, याचे भान कायम असायला हवे. आपण पैशांसाठी आपल्या जवळच्या व्यक्तींना दूर सारत असू, त्यांना हवा तो वेळ देत नसू तर मग आपण तो कमवण्याचे जे मूळ उद्दिष्ट आहे, त्यापासून भटकत जातो. थोडक्यात आपण अशा एका शर्यतीत सहभागी होतो, जी तुम्हाला कुठेच घेऊन जात नाही . . .

या जगामध्ये कोणीही पूर्णपणे चांगला वा पूर्णपणे वाईट असा नसतो. लोकांचे व्यक्तिमत्त्व ‘ग्रे शेड’मध्ये असते – काहीसे काळे, काहीसे सफेद. याचा अर्थ, कोणीही काही काळासाठी पूर्णपणे चांगला असू शकतो किंवा काही काळासाठी पूर्णपणे वाईट असू शकतो. परंतु, एखादी व्यक्ती पूर्ण वेळासाठी वाईटच आहे किंवा पूर्णपणे चांगलीच आहे असं निश्चितच होऊ शकत नाही. त्यामुळे, कोणी कितीही चांगला असेल तरी त्यापासून सावध राहावे व कोणी कितीही वाईट असेल; तरी त्यावर थोड्या वेळासाठी का होईना विश्वास ठेवायला हरकत नसते.

जेव्हा आपण खूप दुखी असतो, तेव्हा आपण दुसऱ्यांचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कधी असे होऊ शकते की, आपले दुःख खूप मोठे असेलही; पण एखाद्या व्यक्तीचे असे काही दुःख असेल की, त्याला जगण्यासाठी काही उद्दिष्टचं राहिले नसेल.‌ अशा व्यक्तींच्या वेदना आपण जाणून घेतल्या, तर आपणांस लढायचे बळ आपोआप मिळते! 

आपणाला ज्याचे कोणीच नाही त्याचे होता आले पाहिजे. ही खरेतर तुमची परिक्षा असते. सर्वांना काही ना काही हवे असते मात्र, तुम्ही देण्याची क्षमता किती ठेवता, ती तुम्हांला मोठे करते. दिल्याने कधी काहीच संपत नाही. 

जे जसे दिसते, नेहमी तसे असेलच असे नाही. फक्त त्याविषयी कुतूहल हवे व ते जाणून घेण्याचा प्रयत्न हवा. मन फार विशाल असते. गोष्टींमधील नेमकेपणा जाणून घेण्यास सक्षम असते मात्र, त्याला चालना द्यायला हवी. प्रत्येक बाजूने विचार करण्याची तयारी हवी.

या जगात तुम्हाला वापर करून घेणारे अनेक मिळतील . . . त्यामुळे कोणावर अतिविश्वास नसावा. दुसऱ्यांच्या निर्णयावर चालण्याआधी स्वतःचे मन काय बोलतेय, याकडे नीट लक्ष द्या. जेव्हा वापर करून घेतल्याचे लक्षात येते, तेव्हा होणारे दुःख आपल्यास संपवते.

न्याय हा कायम होत असतो, अन्यायाची एक मर्यादा असते! त्यापलीकडे तो झालाच, तर ठिणगी पडते. कमजोर वाटणारी ती छोटीशी ठिणगी संपुर्ण लंका जाळू शकते. त्यामुळे, प्रत्येकास उचित सन्मानाने न्याय देणे आवश्यक असते.

जगण्यासाठी उद्दिष्ट हवे. त्याशिवाय जगणे म्हणजे, एकप्रकारे मरणचं . . .


/• संदर्भ :

• वाचत रहा :


आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال