हयगय

[वाचनकाल : २ मिनिटे] 
कुरळ्या केसांचा, मोठ्या डोळ्यांचा, गोंडस लहान मुलगा, beautiful small child with curly hair and big eyes

मानवा-मानवात पक्षपात सुरू झाला तो अनादी-अनंत कालाआधी; पण धार्मिक कट्टरतेतून थेट माणूसकीवर पक्षपाती घाला घालण्याचा काळ हाच. गेल्या काही वर्षांत चिघळलेले धार्मिक तेढ पाहता भविष्यात काय अंधार वाढून ठेवलाय याची एक प्रत्यक्षदर्शी चुणूक . . . पुढच्या पिढीला खरोखर काही मुल्ये शिकवायची असतील तर ही चुणूक दुर्लक्षित ठेवता येणार नाही.

आधी तर नळ बंद कर तो – अमुल्य पाणी वाहून वाया चाललंय इथे! . . . हं, आता सांग आतमध्ये कशाला आलास? चेंडू न्यायला? कुठे आहे चेंडू ‌. . . काय? मैदानावर फेकलास – खोटे बोलतोस! चेंडू मैदानावर मग तू इथे कशाला थांबलास? आणि जरी चेंडू न्यायचा होता तरीही आत शिरण्याची हिंमत कशी झाली तुझी? . . . पाणी प्यायचे होते? – ते सोड आधी तुला खेळायला कोणी घेतले तेच पाहतो मी! . . . कडक ऊन होते म्हणून पाणी प्यालो, असे म्हणतोस? – कितीही कडक ऊन असेल तरी अक्षम्य अपराधचं हा तुझा! ‌. . . नमस्कार, नमस्कार. काय म्हणताय कशाला ओरडतोय मी या पोराला? अहो पाणी पिला हो तो या नळाचे – तेही नळाला तोंड लावून! . . . म्हणून मग काय झाले विचारता? ही पहा, ही सफेद टोपी खिशातून मिळाली याच्या! टोपीवरून ओळखले नसेल तुम्ही तर चड्डी काढून दाखवतो तुम्हाला, याची खरी हकीकत . . . दररोज काहीही खाणारे लोक यांचे आणि हा इथे येऊन, नळाला तोंड लावून, पाणी पितो म्हणजे हो काय! . . . समजतंय का तुम्हाला काही? – हां दुखू देत तुझा कान जरा! त्याशिवाय अक्कल यायची नाही, कळायचं नाही की पुढच्या वेळी इथे आत शिरायचे नाही ते! . . ‌. अहो थांबा, थांबा. तुमचे आपले ते समानतेचे तुणतुणे आणि मुले देवाघरची फुले वाजवू नका पाहू! त्यांची मुले पहा धार्मिक कट्टरतेत कुठे पोहोचलीत आणि आपली निघालीत धर्म बुडवायला! – खेळायला घेतले हो याला! आणि हा इथल्या नळाचे पाणी पितो? – यासाठी जबाबदार कोण सांगा? तुम्ही सांगा की? . . . ‌बर ते सोडा मला या नसत्या वादात पडण्यापेक्षा याच्याकडे पाहू द्या जरा! . . . बघ तिकडे बघ आणि हात जोड . ‌. . हात जोड आत पाहून . . . हात जोडत नाहीस? कसा जोडणार नाहीस? – हां! कसा एकाच दणक्यात सरळसोट झालास, जोडलेस ना हात! आता रडू नकोस उगाच आणि इथून निघालास की सरळ घरी जायचं – मी जातो मैदानावर तुला खेळायला कोणी घेतले ते पहायला . . . धर तुझी ही टोपी, खिशात घाल आणि निघ. पुन्हा इथे दिसायचे नाही! . . . की देऊ आणि एक तडाखा, लक्षात राहण्यासाठी की पुन्हा आत घुसायचे नाही आणि इथल्या नळाचे पाणी तर चुकूनही प्यायचे नाही, बाहेर कितीही कडक ऊन असेल तरीही! . . ‌. रडायचे बंद कर आणि चल तडक निघ बाहेर . . ‌. इथून पुढे कधी मंदिरात दिसायचे नाहीस – कसे?

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال