प्रतिबिंब

[वाचनकाल : ५ मिनिटे] 
तप्त सुर्य, glazing sun

इंग्रजीत ‘पर्सोना’ असा एक सुंदर शब्द आहे. कोणत्याही व्यक्तीरेखेचं आपल्या मनातील प्रतिबिंब म्हणजे ‘पर्सोना’. प्रतिकात्मक रूपात एखाद्या व्यक्तीचं प्रतिबिंब मनात उतरवण्यात सर्वात मोठा धोका असतो दिशाभूलीचा. कारण, हरेक बऱ्यावाईट प्रसंगानिशी – पाण्यावर धावणाऱ्या लहरींच्या सावलीप्रमाणे – हे प्रतिबिंब बदलत राहतं. पण या प्रतिबिंबाला पर्याय सुद्धा नसतो. कारण, या प्रतिबिंबाशिवाय आपल्याला कोणाला जाणताच येणार नसतं . . .
 
बाहेर बरीच दुपार आहे. तसं म्हणायला बरंच ऊन सुद्धा आहे. इथं आत मात्र थोडं बर वाटतंय. नाही म्हणायला गादीवर पाठ जास्त वेळ एकाच ठिकाणी टेकवून झोपता येत नाही ही गैरसोय. छातीवर – अस्वस्थ झोपलेल्या तिच्या – हाताचं वजन असल्यानं पुरेसा श्वास घेताना तकलीफ जाणवती आहे तेवढीच. आणि या दोन्ही अडचणीत म्हणावं तर मार्ग काढता येत नाहीये. कारण, माझा डावा हात झोपलेल्या तिच्या उशाला आहे – गेल्या तासाभराचं रडणं आणि सकाळी भेटल्यापासूनची ती अविश्रांत बडबड दोन्ही संपवून . . .

तिनं डोक्याखाली घेतलेला हात सोडवण्याच्या बेतात मी वर छताच्या पीओपीकडे आणि छोट्या हळूहळू गरगरणाऱ्या पंख्याकडे बघत आजूबाजूच्या घटना मोजतो आहे. घटका मोजतो आहे. डावा हात अवघडलाय; पण तो खेचून बाहेर काढण्याची शक्ती नाही. त्या हातावर जो घामेजलेला चेहरा अधून-मधून झोपेतच हुंदका देत स्थिर आहे त्याकडे पाहता येत नाही. न जानो आयुष्यभर आपण ज्या चेहऱ्यावर भाळत राहिलो त्याकडे पाहून आपली नियत भिंगली तर . . . तर तो चेहरा इतक्या आश्वस्थ खांद्याचा पुन्हा कधी शोध घेणार नाही. भर उन्हात सावली आपणहून भेटली तरी मोकळ्या मनानं त्या सावलीत आराम करणार नाही. आपण कपाळावर घामानं चिकटून बसलेली कुरळ्या केसांची ती लव पाहता कामा नये. बाहेर बरीच दुपार आहे. तसं म्हणायला बरंच ऊन सुद्धा आहे.
     हिचं घर मात्र मस्त झाडीत. झाडी त्यामानाने कमी असली तरी गर्द आहे. झाडांमधून दिसत नसल्यानं पलीकडं नकाशावर शहर अस्तित्वातच नाही असं समजायला वाव आहे, हे फार सुंदर आहे. पण नेमकी माझ्या शेजारची खिडकी बंद आहे. ती उघडली तर वारा येऊन मलाही झोप लागू शकते आणि अवघडलेल्या हाताचं मला जाणवणं बंद होऊ शकतं मात्र ती खिडकी दूर असल्याने हात खेचून ती उघडावी लागेल. ह्या उचापतीत – रडताना अकस्मात लागलेली – तिची झोप मोड झाली की ती उठून पुन्हा आपला शर्ट चुरगळणार, तो ओला करणार त्याहून हे बरं आहे . . .

छताला एकुण आठ एलईडी बल्ब आहेत. त्यातील मोठे पांढरे चौकोनी त्या दोघांच्यामध्ये एक रंगीत त्रिकोणी असे तीन-तीन बल्ब आहेत. मधल्या पट्टीत त्रिकोणीच्या जागी चार पात्यांचा मंदपणे गरगर फिरणारा पंखा. पुढच्या भिंतीवरील हौसेनं आणलेलं – नक्कीच हिची आवड असेल असं वाटतंय – मोठं लंबकाचं घड्याळ आहे. टिक . . . टिक . . . टिक . . . टिक.
     दर मिनिटागणिक पंखा घेत असणाऱ्या गिरक्या मोजायचा प्रयत्न करतो. मग शेवटी दूरच्या खिडकीतून झाडांची सळसळ ऐकत त्यांच्या आकाराचा, हिरवळीचा आणि थंड सावलीचा भास मेंदूत उभा करतो. भिंतीवर एवढा वेळ धावणाऱ्या सावल्या झाडांच्या पानांतून उमटलेल्या नसून आपण हिच्या बंगल्यात शिरताना पाहिलेल्या जलतरण तलावाच्या पाण्याची हालचाल आहे हे उशीराने लक्षात येतं. एकीकडं अंगाला थंड पाण्याचा स्पर्श जाणवतो. आणि दुसरीकडं डावा हात कळ मारतो. तिच्या डाव्या हाताखाली दबलेली छाती भरून येते. आजूबाजूला सर्व भिंती मोकळ्या . . . माणसाने मोकळ्या भिंतींच्या घरात राहू नये, अशा भर उन्हात ते हिडीस वाटतं. तेवढ्यात तिची चुळबुळ, अचानक एक अस्पष्ट हुंदका, की हुंकार, काही समजत नाही. तिच्या डाव्या हाताने शर्ट पुन्हा एकदा घट्ट चुरगळला जाणार असं वाटून, तिला जाग येण्याच्या भीतीने, तिच्याकडे पाहतो. तिचं कुशीवर थोडफार वळून पुन्हा स्थिर होणं. झोपेतच मग छातीवरचा डावा हात विळख्यात परावर्तीत होतो, झोपेतच तिच्याकडे खेचू पाहतो . . . तिच्या निद्रिस्त मेंदूत माझ्या जागी नक्की कोण असतं माहिती नाही, कळायला मार्ग नाही.
     मी अंग आखडतं घेतो.
     पण ती झोपेत तिच्या डाव्या हाताने माझा उजवा हात पुन्हा तिच्या कमरेभोवती गुंडाळते आणि माझ्या आणखी छातीत घुसण्याचा प्रयत्न. गुदमरण्याच्या परिसीमा गाठलेला मी जे वळण टाळत होतो ते समोर पाहत राहतो. तिचा घामजलेला रडून थकलेला, अचानक कमालीचा निर्विकारपणा उमटलेला, स्तब्ध चेहरा.
     आणि ही मला सांगत राहते शाळेतलं सगळं विसरले म्हणून . . .
     खरं म्हणतेस का मग भूतकाळ आठवायला नको म्हणून खोटं सांगतेस विचारल्यावर कोरडं हसते फक्त, विषय बदलते.

मी मात्र त्याच्या चार भिंतीतच अडकलो. मला कधी शाळेचं कुंपण पार करता आलं नाही. शालेय जीवनात प्रेम असणाऱ्या एकमेव पोरीवर आपण जीव बहाल करतो – ती कायम नकार देत राहते – शाळा संपते. सगळे निघून जातात. कोण कुठे, कोण कुठे. कोण या शाखेत, कोण त्या शाखेत. कोणी या महाविद्यालयात, कोणी त्या महाविद्यालयात. मी मात्र दिशाहीन भटकत राहतो, ओळखीचे चेहरे शोधत फिरतो. ते सापडतात; पण त्या चेहऱ्यामागची आपली जुनी ओळख टाकून, विसरून, लपवून, निर्धास्त फिरताना . . . जग वेगवान होत जातं एकीकडं आणि माझ्या शाळेच्या गल्लीत फेऱ्या वाढतात दुसरीकडं. तुम्ही सगळे निघाला त्या शाळेतून मला निघता आलं नाही यापेक्षा वाईट वाटतं की मागे उरलेल्या मला पाहायला कोणीच कसं आलं नाही. निदान मित्रांनी तरी यावं – माझ्यासाठी नाही तर निदान शाळेला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी यावं – कोणीच येत नाही. ही शाळेतलं सर्वकाही विसरल्याचं सांगते . . . मग खरंच विसरलीये की खोटं सांगते, माहिती नाही. मात्र या दोन्ही शक्यता फार भयानक आहेत. मला या दोन्ही शक्यतांची भीती वाटते.

शालेय जीवनानंतर महाविद्यालयात काढलेला तिचा माग आठवतो, तिनं दरवेळी भेटीत, फोनवर अपमान केलेला, नाकारलेलं आठवतं, विनाकारण आपलं घर आठवतं. शाळेनंतर प्रेमाच्या शक्यता सोडल्या नसतात; पण त्यांना मागे टाकून मैत्री निभवायची हे ठरवलेलं असतं. नंतर मग अधून-मधून मित्रांकडून बऱ्याच नकोशा बातम्या. ऐकताच त्यावर विश्वास ठेवल्याचं सुरुवातीला नाकारतो. नंतर मित्र पुरावे देतात. त्यानंतर आणखी भूतकाळात गुडूप होत जातो. शाळेचं कुंपण उंच होत जातं. त्यानंतर मात्रा अचानक हिचं गाव सोडून जाणं, त्याबरोबर जुनी ओळख सोडणं, कसला तरी अपराध केल्यासारखं जुनी माणसं टाकणं – कोणालाच काही खबर नाही. वर्ष-वर्ष निघून जातात. दर भेटीत मित्रांना माहिती विचारतो – अपयश. ताईच्या मदतीने जुन्या मैत्रिणींकरवी माहिती मिळवतो, तर ती म्हणते, असलेली माणसं जप. ज्यांना मुळातच तुझी किंमत नाही अशांसाठी झुरत बसणं सोड – अपयश. तोंडपाठ असलेले नंबर वगैरे फिरवतो – अपयश. ती कोण? कुठे? पुढं काय करते? काहीच माहिती नाही . . .

अंगाभोवतीचा विळखा आणखी घट्ट झाला तसं मी समोर पाहीलं तर दिसतात घामेजलेले किंवा मग भिजलेले डोळे, नाक सडपातळ असणारं . . . आणि तिचं झोपेत पुन्हा मी नसलेल्या व्यक्तीला मी समजणं.
     कमरेवरचा उजवा हात उचलून मी तिची बट मागे सारतो, त्यावर हळुवार फुंकर घालतो, मिनिटभरात ते केस मोकळे होऊन वाऱ्यावर भुरभुर उडायला लागतात, मी ते पुन्हा कानामागे सारतो . . . एक मोहाचा क्षण आणि . . . समोरचा आधीच भरपूर पोळलेला जीव आणखी पोळणार. विश्वास विसरून जाणार. परत एकदा मी डोळे मिटतो, आवंढा गिळतो. झोपेत तिचं हात पुन्हा खेचून कमरेभोवती गुंडाळून घेणं, यावेळी जरा घट्ट . . . पंख्याची घरघर वाढत जाते.
‌     खिडकीपर्यंत हात पोहचवण्याचा आणखी एक अयशस्वी प्रयत्न करून मी डोळे मिटतो. आणि एकाएकी उत्पन्न झालेल्या माशीची गुणगुण, क्षणाक्षणाला वाढत जाणारी. मला पहिल्यांदा कळतं माशीचा आवाजही फार मोठा असतो . . .

बाहेर बरीच दुपार आहे. तसं म्हणायला बरंच ऊन सुद्धा आहे. इथं आत मात्र थोडं बर वाटतंय. नाही म्हणायला गादीवर पाठ जास्त वेळ एकाच ठिकाणी टेकवून झोपता येत नाही ही गैरसोय . . .
आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال