हे प्रेमाचे दिवस आहेत! या दिवसात प्रेमातील सच्चेपणा दाखवण्याची स्पर्धाच जणू लागलेली असते. प्रेम खरे आहे की खोटे यापेक्षा महत्वाचा प्रश्न हा आहे की प्रेमाचे ठराविक ‘दिवस’ असतात का मग हे प्रेम बारा महिने वाहतच असते? जर प्रेम अखंड असेल तर दर दिवसाला ‘समजूतदार प्रेमाचे दिवस’ म्हणता येईल का?
१४ फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस आहे म्हणतात . . . हा दिवस उजाडला की मुलं-मुली तयारीला लागतात. कुणी प्रेम जाहीर करण्याच्या, तर कुणी जाहीर झालेले प्रेम व्यक्त करण्याच्या, कुणी टाईमपास मित्रमैत्रिणी शोधण्याचा तर कुणी खऱ्या प्रेमात अडकण्याच्या!
मग तेच फिरायला जाणं . . . महागलेले गुलाब देणं, गिफ्ट्स, चॉकलेट्स, टेडीबेअर्स देणं! या एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या युगुलांना बागेतून हाकलणं, हा दिवस कसा आपल्या संस्कृतीची वाट लावतोय याचे पोवाडे गाणं, मारामाऱ्या करणं वगैरे वगैरे . . . दरवर्षीचं तेच ते दळण!
काहींच्या या प्रेमाचा शेवट लग्नात होतो तर काहींच्या नाही! ज्यांचा शेवट कडू झालाय ते झुरत राहणार; पण ज्यांचा शेवट गोड झालाय, त्यांचं प्रेम लग्नानंतर कुठे जातं? हा प्रश्नच पडतो.
काही दिवसांपूर्वी आमच्या सोसायटीखाली महिला मंडळ जमलं होतं, छान गप्पा रंगल्या होत्या. मी नुकतीच येऊन सहभागी झाले, तेव्हा आमच्याच बिल्डींगमधल्या एका मुलाचा घटस्फोट झाला असे कळले. तशी माझ्यासाठीही ही बातमी धक्कादायकच होती, कारण दिवाळी संपली आणि नुकतेच तर त्याचे लग्न झाले होते. म्हणजे जेमतेम दोन महिन्यांपूर्वी . . . तेही मुलीच्या घरच्यांच्या विरोधात अगदी पळून जाऊन थेट लग्न करून आले वगैरेच्या पद्धतीने.
जरासा धक्का बसल्याने मीही मग कान टवकारून ऐकू लागले, तेव्हा कळले की मुलाचा कसलातरी व्यवसाय होता, तो कोरोना काळापासून जरा तोट्यात चालत होता; पण आताशी तो पूर्णपणेच ठप्प झाला. त्यामुळे लग्नानंतर जास्त काही हौसमौज न करता आल्याने त्या दोघांत खटके उडू लागले, त्यात ती मुलगीच वरचढ होऊन सतत त्याला सोडून जायची धमकी देता देता थेट निघूनच गेली व नंतर मग घटस्फोट!
कुठे गेले प्रेम?
ही सगळी चर्चा सुरू असता एक काकू म्हणाल्या, ‘काय ह्या आजकालच्या मुली! अहो, आमच्या ह्यांनी तर आयुष्यभर मला अक्षरशः केस धरून धरून मारले! एकदा मी केलेल्या श्रीखंडात साखर कमी झाली म्हणून माझे डोके भिंतीवर आपटले आणि कहर म्हणजे माझ्या मोठ्याच्या वेळी गरोदर होते तेव्हा पोटावरच लाथ मारली होती! पण मी निमुटपणे संसार निभावलाच की नाही?
हं ह्यांच्या वागण्याचे मुलांवर जरा परिणामच झाले; पण मी सोडून गेले नाही हो!’
हे कसले प्रेम?
हे सगळं माझ्या डोक्याच्या वर झाल्याने मी फक्त येते म्हणत तिथनं लगेच निघाले. वरील दोन्ही उदाहरणात मला एकच गोष्ट आढळून आली, ती म्हणजे समजूतदारपणाचा अभाव!
पहिल्या उदाहरणात एकेकाळी इतकं प्रेमाने आणि विरोध पत्करून केलेलं लग्न फक्त नवर्याचा उद्योग ठप्प झाला म्हणून पूर्णपणे तोडून टाकण्यापेक्षा, त्याला अशा अडचणीच्या वेळी थोडी साथ देत आणि थोडा समजूतदारपणा दाखवत दोघांनी मिळून या संकटावर विजय मिळविता आला नसता का ?
दुसऱ्या उदाहरणात त्या काकूंनी ‘मी किती सहनशील आहे’ याचा गर्व न बाळगता अशा नराधम व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा मुलांवर परिणाम होतोय हे वेळीच लक्षात घेऊन समजूतदारपणे वेगळे व्हायला नको होते का? की वडिलांचा असा राक्षसी चेहरा पाहत मोठा झालेला मुलगा उद्या लग्न करून त्याच्या बायकोशी असा विक्षिप्त वागण्याची वाट पाहतायत त्या?
आता तिसरे उदाहरण बघूया . . .
आमच्या एक दूरच्या नातेवाईक काकू . . . त्यांचा नवरा म्हणजे ते काका अतिशय तापट! अगदी जमदग्नीचा अवतार म्हणा –
काकूंना दहा वर्षे मूल झाले नाही, तेव्हा त्यांच्या सासुने त्यांना नुसते छळले; पण काकांनी आपल्या आईसमोर त्यांची बाजू कधी सोडली नाही. अशी इतर वेळेला त्यांची सतत तू तू मैं मैं चाले. भांडणात सगळ्यात आधी जेव्हा काकांनी त्यांच्यावर हात उगारला होता, तेव्हा काकूंनी ठामपणे सांगितले ‘हात उचलायचा नाही! काय बोलायचे ते तोंडाने बोला. कारण, हात मलाही आहेत. तुम्ही माझ्यावर हात उगारला हे बाहेर कळले तर विशेष काही वाटणार नाही पण मी तुमच्यावर उगारला तर मोठी बातमी बनेल!’
तेव्हापासून काकांनी कधी हात उगारला नाही.
काका व काकू दोन विरुद्ध स्वभावाचे असल्याने त्यांच्यात सततच वादावादी सुरू असते; पण काकांनी त्यांना मूल होत नसताना दिलेली साथ त्या न विसरता त्या एकाच गोष्टीचे समाधान मानून सोबत चालत राहिल्या.
पुढे काकूंना मुलगा झाला. सारखी वादावादी होत असतानाही दोघांनी मिळून त्याला मोठे केले. सुशिक्षित बनवले आणि लग्न झाल्यानंतर त्या जोडप्याला एकांत हवा म्हणून एक वेगळा फ्लॅटही घेऊन दिला. आता दोघेही सुखात आहेत. तू तू मैं मैं संपत नाही मात्र एकमेकांची साथ सोडायला दोघेही तयार नाहीत.
ही झाली समजूतदारी !
आजच्या काळात या नात्यांत समजूतदारपणाचा प्रचंड अभाव असल्याचे दिसून येते. स्त्री अत्याचारांवरचे कायदे कडक झालेत खरे परंतु बर्याच ठिकाणी या कायद्याचा गैरफायदा घेण्याचा प्रकारही दिसून येतोय.
थोड्या-थोड्या कारणांसाठी नवरा व सासरच्या मंडळींना दोष देत बसणे, सतत माहेरी जाऊन सासूसासऱ्यांच्या चुगल्या करणे, घरातील अगदी छोट्यातल्या छोट्या बातम्या माहेरी पोचवणे आणि या गोष्टींवर जराही आक्षेप घेतल्या गेला तर लगेच पोलीसात तक्रार करण्याची धमकी देणे हे सर्रास चालू असल्याचे दिसून येते.
जरा काही मनाविरुद्ध झाले की लगेच घटस्फोट घेऊन मोकळे होणे याचे प्रमाण अधिक वाढलेले दिसते.
स्त्रियांनी सासरी अत्याचार सहन करणे आणि लोक काय म्हणतील याच्या भीतीने ते नाते रेटत बसणे हे चुकीचेच आहे परंतु केवळ आपल्या बाजूने कायदा आहे म्हणून महिलांनी मनमानी करीत जगणे व सासरच्यांना त्रास देणे हेही चुकीचे आहे. समाजातील ही बाजू जराशी दुर्लक्षित आहे असे वाटते. प्रत्येक वेळी स्त्रियांवरच अत्याचार झाला असेल असे नसते काही ठिकाणी याउलटही झालेले असू शकते. घरात आलेल्या नवीन मुलीच्या कोरड्या आणि तुसडेपणाने वागण्याचा नवरा व सासूसासरे दोघांनाही मानसिक त्रास झालेला असू शकतो; पण याकडे सहसा लक्ष वेधलं जात नाही! मुलगी आणि तिच्या आईवडिलांना जशी ती सासरी गेल्यावर तिला सगळ्यांनी समजून घ्यावं अशी अपेक्षा असते, तशीच आणि तितकीच अपेक्षा मुलाला आणि त्याच्या आईवडिलांनाही असते की येणाऱ्या मुलीने आपल्याला समजून घ्यावे.
आजकाल बऱ्याच ठिकाणी, मुलांपेक्षा मुलींच्याच लग्नाच्या वेळी अपेक्षा वाढलेल्या दिसतायत. आपणही मुलांसारखे खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहोत व त्यांच्याएवढा किंबहुना त्यांच्याहूनही जास्तच पैसा कमावू शकतो याचा काहीसा गर्व मुलींना आणि त्यांच्या आईवडिलांनाही झालेला दिसतोय.
परिणामी ‘व्हाय शुड बाॅईज हॅव्ह ऑल द फन’ (Why should boys have all the fun) करता-करता आणि वाढलेल्या अपेक्षा पूर्ण होण्याची वाट बघता-बघता लग्नाचे वय उलटून जाते.
आणि मग उशीर झाल्याने एक मानसिकता बनून स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगण्याची सवय लागते व असमजूतदारपणात आणखीन भर पडते – सगळे माझ्याच मताने घडावे हा अट्टहास निर्माण होतो! याचे परिणाम मग नात्यांवर होतात आणि एकदा का समजूतदारपणाची गाडी रूळावरून घसरली की मग काय आजकाल घटस्फोट लवकर मिळतोच!
हे असे होण्यापेक्षा आपापल्या परिस्थितीनुसार समजूतदारीने मार्ग शोधणे कधीही चांगले. संसारात एकमेकांसोबत राहताना फारच शारीरिक व मानसिक त्रास होत असेल तर वेळीच्या वेळी कारवाई करून वेगळे होणे – स्वतःसाठी व मुलांसाठी – किंवा आपल्या आटोक्यातले असेल तर छोट्या-छोट्या गोष्टीत कुरबुरी न करता, सासरच्यांना समजून घेत थोडे शहाणे होऊन एकत्र राहणे – हेही स्वतः व मुलांसाठीच – महत्त्वाचे आहे. असे घडले तर सगळेच दिवस प्रेमाचे आहेत!
शेवटी,
तुम भी चलो
हम भी चले
चलती रहे जिंदगी!
• संदर्भ :• वाचत रहा :