माणसानं माणसाचा कौल लावला की ही दुनिया आता संपत निघाली असल्याच्या गप्पा होतात; पण त्याच माणसानं ‘बाई’माणसाचा कौल लावल्यावर मात्र अचानक सर्वकाही योग्य – उत्कर्ष! कौल कोणाच्या बाजूने लागतो? कौल खरा की खोटा? हे सगळं बाजूला सारलं असता तो बाई लावत नाही आणि तो बाईच्या बाजूने लागतही नाही हे वास्तव मागे उरतं . . .
अक्षांश रेखांश कर्कवृत्त अक्षवृत्त
पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण
आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य
पृथ्वीचा सगळा आस तिने
पाहिला गरागरा फिरताना
कोलमडताना तिचं स्थान
अंतराळात कुठल्याकुठे
आईला आई म्हणू नये
बापाला बाप तिने फक्त
पाहत रहावं सनातनी जुनाट
परंपरांत गुंताळलेल्या बाईला
अनैच्छिक कैदाशीण होताना
आपल्याला आपला म्हणू नये
परक्याला परका तिने फक्त
पाहत रहावं स्वप्नातलं घर
वास्तवात दररोज उजाडताना
नव्याने सजताना शय्येगणिक
विधवेचं तुळतुळीत डोकं
वाटे जन्माचं वरदान अशा
जडावलेल्या केसांतला भरघोस
उफाडा विकत तिच्या अंगप्रत्यंगाने
अनुभवली मानवतेची नीच पातळी
सोसले घाव रीतींचे अन् मग
पाहिलं स्वतःलाच देव होताना
अशी उगाच ती देवदासी झाली नाही
अक्षांश रेखांश कर्कवृत्त अक्षवृत्त
पृथ्वीचा सगळा आस तिने
पाहिला गरागरा फिरताना
• संदर्भ :
• वाचत रहा :