मधुबाला : बाॅलिवूडचे रूपेरी स्वप्न

[वाचनकाल ; १४ मिनिटे] 
madhubala

आज १४ फेब्रुवारी – प्रेमाचा दिवस. आणि हाच दिवस जिने बाॅलिवूडमध्ये सौंदर्य आणि अभिनय या दोहोंचा अभिनव मेळ घालत कैक मनांवर अधिराज्य गाजवले त्या ‘मधुबाला’चा जन्मदिन. आजच्या पिढीलाही आपल्या लाडिक अभिनयाने मुग्ध करणाऱ्या मधुबालेवर व्हॅलेंटाईनला न लिहावे तर कधी?

शीशमहालाच्या प्रवेशद्वाराचे पडदे उघडतात . . . अनारकली पदन्यास करत प्रवेश करते . . . तबला आणि घुंगरांचा एक सुरेख मिलाप . . . मग समोर येतात लतादीदींचे शब्द . . . 

इन्सान किसी से दुनिया में,
एक बार मोहब्बत करता है . . . 
इस दर्द को लेकर जीता है,
इस दर्द को लेकर मरता है।

गाण्याच्या सुरूवातीला नृत्यावर सारा दरबार खुश होतो. पण त्यानंतर येणारे लतादीदींचे स्वर आणि त्यातील भावार्थ समजल्यावर मात्र वातावरणाचा नूर पालटून जातो. 

प्यार किया तो डरना क्या? 
जब प्यार किया तो डरना क्या? 
प्यार किया कोई चोरी नहीं की, 
छुप छुप आहें भरना क्या?
जब प्यार किया तो डरना क्या?

उदासलेल्या सलीमचा चेहरा क्षणांत प्रसन्न होतो. बहारने आपल्या मनात जे शंकेचं पिल्लू सोडलं ती शंका साफ खोटी ठरलीय. ‘अनारकली बेवफा नाहीये’ हे तो नजरेनेच बहारला दाखवून देतो . . .
     इथे अनारकली झालेली मधुबाला प्रत्येकवेळी ‘प्यार किया’ म्हणताना सलीमकडे हात करते व ‘तो डरना क्या?’ म्हणताना अकबरला धिटाईने प्रश्न विचारतेय. प्रेमाच्या मोहजालात फसलो आहोत, तर भीती कशाची? आणि कोणाची? आपल्या प्रेमाचं गुपित सर्वांसमोर उघड करण्याचं अनारकलीने ठरवलेलंच आहे. त्यासाठी कोणतीही शिक्षा भोगण्याची तिची तयारी आहे. 

आज कहेंगे दिल का फ़साना, 
जान भी ले ले चाहे ज़माना। 
मौत वो ही जो दुनिया देखें
घुट घुट कर यूँ मरना क्या?

पहिल्या दोन ओळी म्हणताना अनारकली अकबरला खुणावते, तुम्ही आता, इथे – माझ्या गळ्यावरून तलवार फिरवलीत – तरी मी गप्प बसणार नाही. एकवेळ ते मरण परवडेल, पण प्रेम लपवून, हे असं क्षणाक्षणाचं मरण नको . . . 

उनकी तमन्ना दिल में रहेगी, 
शम्मा इसी महफ़िल में रहेगी।
इश्क़ में जीना इश्क़ में मरना
और हमें अब करना क्या?

‘माझं अबोल प्रेम माझ्या मनातच राहिल, माझा आत्मा या जगाच्या मैफलीत तसाच प्रज्वलित राहिल’, असं म्हणत अनारकली सलीमच्या पायाशी बसते. त्याच्या कमरेची कट्यार खेचून काढून ती अकबरच्या पायाशी ठेवते आणि म्हणते, ‘आता आम्ही जगू प्रेमासाठी आणि मरू ही प्रेमासाठीच. जीवन मरणातील हे अंतर केवळ प्रेमासाठीच आहे ना?’
     ‘सलीमवर आपलं कधीही प्रेम नव्हतं, हिंदुस्तानची मलिका बनता यावं म्हणून आपण त्याचा वापर करत होतो, हे भर दरबारात कबूल कर.’ असं सांगितल्यावरही अनारकली मात्र खुलेआम तिचं प्रेम जाहीर करतेय हे पाहून तिच्या उद्दामपणाचा अतिशय राग आलेला अकबर रागाने डोळे लाल करून तिच्याकडे पाहतोय, पण तिच्यावर मात्र त्या नजरेचा काहीएक परिणाम होत नाहीये. ती आता मागे हटायला तयार नाहीये. 

छुप न सकेगा इश्क़ हमारा, 
चारों तरफ़ है उनका नज़ारा।

असं म्हणून अनारकली सलीमकडे पाहते, सलीम शीशमहालाच्या आरशांत पाहतो . . . सर्व आरसे अनारकलीमय झालेले असतात! जणू काही त्या आरशांमधूनही त्याच ओळी परावर्तीत होतायत असा भास होऊ लागतो! आमच्या प्रेमाचा हा गंध लपून राहणार नाही, तो असाच सगळीकडे दरवळत राहिल . . . 

परदा नहीं जब कोई ख़ुदा से, 
बंदों से परदा करना क्या?

ख़ुदा . . . जो ‘शहंशाहों का शहंशाह’ आहे . . . त्याच्यापासून आमचं प्रेम लपून राहिलेलं नाहीये मग इतरांपासून ते का लपवायचं?
     हे गाणं आज आठवण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. त्यापैकी पहिलं – आज १४ फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन्स डे! ‘प्रेम’ या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे. त्याचा हेतू ही फार उदात्त. हे सांगणारं हे गीत. शकील बदायुनी यांची शब्दरचना, अनारकलीचं आरस्पानी सौंदर्य, तिची महत्त्वाकांक्षा, जिद्द आणि प्रेमासाठी काहीही करण्यासाठी आत्मनिष्ठता . . . सारं काही अप्रतिम! नौशाद यांचं संगीत केवळ श्रवणीय! हे गीत लताजींनी बऱ्याच मेहनतीनं गायलंय.
     नौशादजी म्हणतात, ‘या गीताचं रेकॉर्डिंग १८ ते १९ तास सुरू होतं, तेव्हा कुठं अशी कलाकृती निर्माण झाली. मधुबालावर हे गीत चित्रित केलं गेलं आणि तिच्या अभिनयानं या गीताचं अक्षरशः सोनं झालंय.’ याच मधुबालाचा आज जन्मदिन, हे दुसरं प्रमुख कारण.  

१४ फेब्रुवारी १९३३. चिंतेने ग्रस्त झालेला अताउल्लाखान झोपडीच्या बाहेरच्या बाजूला उतावीळपणे फेऱ्या मारत होता. त्याच्या बेगमला प्रसूतिपूर्व वेदना सुरू झाल्या होत्या. शेजारच्या खोपटात राहत असलेली म्हातारी आया म्हणून तिच्याकडे केव्हाच येऊन पोहोचली होती. बेगमच्या कळा वाढतच होत्या आणि तिचे बेभान चित्कार अताउल्लाच्या कानावर येत होते. वेदना वाढल्या व अताउल्लाच्या बेगमला त्या अनावर होऊ लागल्या. तिचा वाढत चाललेला आवाज पाहून आया तिला धीर देत होती. एवढ्यात तिने जोराची किंकाळी फोडली आणि तिचा आवाज काही काळ बंद झाला. अताउल्ला ही जागच्या जागीच थांबला. त्याने कानोसा घेतला.
‌     थोड्या वेळाने आया पांढऱ्याशुभ्र दुपट्यात गुंडाळलेला एक गुबगुबीत गोरापान गोळा घेऊन बाहेर आली. तो पाहतो तर काय! नजर ठहरणार नाही इतका लालेलाल आणि गोरापान गोळा होता तो! त्याचे इवले इवले डोळे बंद होते आणि किरकिऱ्या आवाजात त्याला फुटणारे रडू फक्त आयालाच ऐकू येऊ शकत होते.
     ती हर्षभरीत सुरात म्हणाली, ‘खानसाब, देखो, देखो तो जरा. कैसा चाँदका टुकडा आपके घरमें पैदा हुआ है! कही आपने हाजी मलंग के कब्र पर चादर चढाने का इरादा तो जताया नही था? या अल्लाह्! मैंने आजतक हजारो बच्चे देखे हैं, लेकिन ऐसी लड़की 
पहले कभी देखी नही . . .’
     अताउल्लाला पुढचे शब्द ऐकूच आले नाहीत. ‘लड़की’ हा शब्द ऐकताच अताउल्लानं कपाळावर हात मारून घेतला. बेगम पाचदा प्रसूत झाली. दोन मुलं जन्मतः गेली. दोन मुली जिवंत आहेत. आताही परत एक पोरगीच. त्या चिमुकलीचं नाव ठेवण्यात आलं ‘मुमताज’.
     अताउल्लानं अनेक नोकऱ्या केल्या आणि सोडल्या. अखेरीस तो दिल्लीतल्या इंडियन टोबॅको कंपनीत स्थिरावला. इंडियन टोबॅको कंपनी म्हणजे सिगारेट बनवणारी कंपनी होती. तिथला तंबाखूचा उग्र वास अताउल्लाला मुळीच सहन व्हायचा नाही. तो दर्प नाकात शिरला की त्याचं डोकं चढत असे. त्यातून पगार अपुरा, कुटुंब मोठं आणि खाण्यापिण्याचा शौक. महिना अखेरीस तो कफल्लकच असायचा. त्यामुळं दादापुता करून लवकरात लवकर परत फेडीच्या बोलीवर तो कंपनीतून आगाऊ रकमेची उचल करायचा. पैसे परत द्यायची वेळ आली की काहीतरी भांडण तंटा उकरून काढायचा आणि देणी देणं लांबणीवर टाकायचा. एकदा अताउल्लानं मनधरणी करून पाचशे रुपये ॲडव्हान्स घेतले होते. सहा महिने होऊन गेले तरी त्यानं एक पैसाही परत केला नव्हता. वास्तविक पगारातून शंभर रुपये कापून घ्यावेत असं त्यानंच कबूल केलं होतं; पण पगाराचा दिवस आला की तो नाना कारणं सांगत असे. आताही अताउल्लानं असंच काही तरी कारण सांगताच दिवाणजीनं त्याला तशी साहेबांची चिठ्ठी आणायला सांगितलं. अताउल्ला सरळ साहेबांकडं गेला. त्यानं तेच कारण सांगून चिठ्ठी मागितली पण साहेबांनी चिठ्ठी देण्यास नकार दिला. अताउल्ला तणतणत भावनेच्या भरात नोकरीवर लाथ मारून बाहेर पडला; पण पुढं काय करायचं, हा प्रश्न राक्षसासारखा त्याच्यासमोर उभा ठाकला.
     अशातच एका दुपारी बाहेर मुली खेळत होत्या. थोरली कनीझा व मधली अल्ताफ या दोघी दासी झालेल्या होत्या. आठ वर्षांची मुमताज डोक्याला दुपट्टा बांधून ऐटीत उभी होती. मुघल सम्राट जहांगीरची भूमिका ती अदा करत होती. नुकताच मुलींनी सोहराब मोदींचा ‘पुकार’ हा चित्रपट पाहिला होता आणि त्यातला प्रसंग त्या रंगवण्याचा प्रयत्न करत होत्या. मुमताजची ऐट, तिचे ऊर्दू बोलणे याचे अताउल्लाला खूप कौतुक वाटले. त्याच्या विचारांना दिशा दिसली. आता दिल्ली तर सोडायलाच हवी. मग कुठेतरी न जाता आपण मुंबईलाच गेलो तर? छोट्या मुमताजचा हात धरून, अताउल्ला कामाच्या आशेने मुंबईत आला. मालाडमध्ये असलेल्या ‘बॉम्बे फिल्म स्टुडिओ’मध्ये बालकलाकारांची गरज आहे, असे त्याला कोणीतरी सांगितले. त्यावेळी ‘बॉम्बे फिल्म स्टुडिओ’मध्ये बसंत या चित्रपटाचे शूटिंग चालू होते. 
     मुमताजला अमिया चक्रवर्तीच्या ‘बसंत’ चित्रपटात भूमिका मिळायला वेळ लागला नाही. १९४२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तिने दोन गाणी देखील गायली आणि त्यातील एक ‘मेरे छोटे से मन में छोटी सी दुनिया रे . . .’ प्रचंड लोकप्रिय झालं. बसंत चित्रपटाचे निर्माते रायबहाद्दूर चुनीलाल यांना गोबरे गाल, पांढरा स्वच्छ झगा, गोरापान रंग आणि ओठांवर लोभसवाणं हसू असलेली मुमताज पहिल्या नजरेत आवडली असावी. त्यांनी दिग्दर्शक अमिया चक्रवतींना बोलावून घेतलं. ‘बसंत’ साठी कशी वाटते ते बघा, असं सांगून ते निघून गेले. अमिया चक्रवर्तींनी मुमताजला काही प्रश्न विचारले. ती हिंदीतून धीटपणे उत्तरं देत होती. मधूनच खुदकन हसत होती. तिचे लालचुटूक ओठ विलग होताच मोत्यासारखे दात विलोभनीय वाटत होते. अमियांनी मुमताजला दुसऱ्या दिवशी स्क्रीन टेस्टसाठी बोलावलं. त्यात ती सहजपणे पास झाली. लागलीच करार करण्यात आला. नऊ वर्षांच्या मुमताजला ‘बसंत’ या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेसाठी निवडण्यात आलं. 
     स्टुडिओत काम करणारा एक तंत्रज्ञ रामदास मुमताजकडं पाहून कुचेष्टेनं म्हणाला, ‘रस्त्यावरून आत शिरलेली ही चिमुरडी पोरगी, ना हिला अभिनयाची जाण, ना पूर्वीचा अनुभव. कशासाठी यांनी या पोरीला निवडलं असेल?’ रस्त्यावरून या झगमगीत दुनियेत शिरलेली ही चिमुरडी आणखी काही वर्षांत लाखो हृदयांची धडकन बनेल असं कुणाच्या स्वप्नातही आलं नसेल. खुद्द अताउल्लादेखील फारसा आशावादी नव्हता. मात्र त्याक्षणी भाजी भाकरीचा प्रश्न काही दिवसांसाठी का होईना, सुटला होता, याचं समाधान मोठं होतं. 
      नवा फ्रॉक, नवे बूट आणि मोजे, डोक्याला रीबन अशा अवतारात बेबी मुमताज मेकअप करायला बसली. सारा जामानिमा जमल्यावर अमीया चक्रवतींनी तिला संवाद बोलून दाखवायला सांगितले. त्यानंतर सेटवर गेल्यावर तिला उल्हास तिची वाट पहात असलेला दिसला. त्याला अमीयाबाबूंनी जमिनीवर घोडा घोडा करायला सांगितले आणि बेबी मुमताजला त्याच्या पाठीवर बसून संवाद बोलायला सांगितले. बेबीने न अडखळता आपला पहिला वहिला संवाद बोलून दाखवला. अमीया एकदम खुश झाले.
     मग सगळीकडे लाईट लागले. प्रखर प्रकाशामुळे चिमुकली मुमताज मुळीच बुजली नाही. ती नुसतीच त्यांच्याकडे पाहत राहिली.
     मग अमीयाबाबूंनी तिला सांगितले, ‘बेबी मघाशी आपण तू संवाद कसा बोलतेस हे पाहण्यासाठी तालीम केली. ते खोटं खोटं होतं. आता मात्र खरा शॉट घ्यायचा. घाबरू नकोस. मघाचंच वाक्य पुन्ह एकदा म्हणायचं, चालेलना?’
     बेबी खुदकन हसली. पुन्हा उल्हासच्या पाठीवर बसून घोडा घोडा करू लागली. उल्हास घोडा घोडा करत पुढं जात असतांना तिने संवाद म्हटला,
     “कैसा घोड़ा है ये! अरे चलता क्यों नहीं?”
     “हट जाओ, हट जाओ हमारी सवारी आ रही है.”
     बेबी मुमताजने आपल्या पहिल्याच टेक मध्ये ‘ओके’ मिळवून सेटवर असलेल्या सर्वांच्या टाळ्या घेतल्या. ती बिचकली नाही की बावरली नाही. अमियाजींनी आधी करून घेतलेल्या तालमीनुसार तिनं माफक अभिनय केला आणि दोन तीन वाक्यंही योग्य स्वरात म्हणून टाकली. मी मी म्हणणाऱ्यांना सुद्धा अनेकदा रिटेक द्यावे लागतात. बेबीनं मात्र एका टेकमध्ये सारं काही छान करून टाकलं. अमियाजी चकित झाले आणि बेहद्द खुशही झाले. अशा प्रकारे आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी वयाच्या नवव्या वर्षीच मधुबालाने ‘बसंत’ या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. वयाच्या १४ व्या वर्षी १९४७ साली तिने राज कपूरच्या ‘नील कमल’ सिनेमातून मुख्य अभिनेत्री म्हणून नाव मिळवलं.
      ‘बसंत’ नंतर अमिया चक्रवर्तींनी मुमताज व युसूफ खान या बालकलाकारांना घेऊन ‘ज्वारभाटा’ हा चित्रपट करण्याचे ठरवले होती. त्यावेळी ‘बॉम्बे फिल्म स्टुडिओ’च्या सर्वोच्च स्थानी असलेल्या देविकाराणी यांनी युसूफ खानला पडद्यावर ‘दिलीपकुमार’ व मुमताजला ‘मधुबाला’ हे नाव धारण करण्यास सुचवले. परंतु पुढे जाऊन ‘ज्वारभाटा’मध्ये मधुबाला जो रोल साकारणार होती, तो कट केला गेला. 
     १९४५ मध्ये ‘धन्ना भगत’, ‘फूलवारी’, ‘पुजारी’ आणि ‘राजपुतानी’ हे आणखी चार चित्रपट केल्यानंतर १९४७ मध्ये तिने केदार शर्माच्या ‘नील कमल’मध्ये नायिका म्हणून काम केले. ज्यामध्ये तिने तिच्या प्रतिभेने केदार शर्मांना प्रभावित केले.
     आयुष्याच्या खूप नंतरच्या काळात ते म्हणाले, ‘मधु मला भेटली त्यावेळी ती जेमतेम दहा वर्षांची असेल. त्यावेळी मी रणजीत फिल्म कंपनीमध्ये नोकरीला होतो. लहानपणी ती इतकी बालिश आणि गोंडस दिसायची की बघताक्षणीच तिचे पापे घ्यावेसे वाटत असे! बोलायचीही तितकीच मधाळ. तिची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे शिकण्याची अमर्याद उत्सुकता, कर्तव्याप्रती तिची निष्ठा, सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची तिची इच्छा आणि तिची जिद्द आणि चिकाटी. तिनं माझ्याबरोबर आणखीही काही चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिका केल्या. ती स्वभावानं धीट होती आणि अगदी लहान असल्यानं कॅमेऱ्यासमोर उभी राहून आपण खोटंखोटं काहीतरी करतोय, असं तिला वाटायचं नाही. त्यामुळे तिची भूमिका अगदी नैसर्गिक व्हायची.’
     ‘नीलकमल’मध्ये एक प्रसंग होता. मूर्तिकार मूर्ती बनवायचं काम करण्यात मग्न आहे आणि तोच त्याची प्रेयसी त्याच्याकडे येते व म्हणते,

     “इन सारी मूर्तियोंमे तुम्हारी शकल क्यों नजर आती है?”
     “क्योंकि उन्हें मैंने बनाया है। बनानेवालेकी कला का प्रतिबिंब उसकी बनावटमें नजर आता है।”
     “तो फिर तुझमें और भगवानमें क्या फर्क है ?”
     “भगवानने बनायी हुयी प्रतिमाके आगे लोग अपने लोभ के लिये झुक जाते हैं। चोरी करते हैं, अपने भाईयोंको फसाते हैं, और भी बुरे काम करते है और ऊस पाप क्षालनके लिये भगवानके सामने झुक जाते है। मेरे बनाये हुए बूत ना तो ऐसे करतूतों के सामने झुक जाते है, ना चोरी करवाते है। मैं तो सिर्फ मेरी कला लोगों के सामने रखता हूँ मगर वें लोग अपनी सिर्फ बुराईयाँही भगवानके सामने रखते है।”

अशा प्रकारच्या तात्त्विक संवादांची भेंडोळीच्या भेंडोळी नीलकमलच्या नायक-नायिकेमध्ये होती. दोघांमध्ये प्रेमप्रसंगही अशाच तऱ्हेने चित्रित केले होते. त्यावेळी राजकपूर विशीत असावा, तर त्याची प्रेयसी मुमताज चौदा-पंधरा वर्षांची. त्यामुळे तत्त्वज्ञानाने भरलेले संवाद त्या दोघांच्याही डोक्यावरून गेले नसतील तरच नवल! 
     चित्रपटाचा नायक मूर्तिकार असतो, पण तो नास्तिक असल्यामुळे देव मानत नसतो. पण देवदेवतांच्या मूर्ती स्वतः तयार करून, त्या विकून तो आपली गुजराण करत असतो. त्याची प्रेयसी परमेश्वर भक्त असते. ती देवाला साकडे घालून आपल्या प्रेमाच्या जोरावर प्रियकराचे मन जिंकते आणि सरते शेवटी नायकाचे रूपांतर आस्तिकात होते. तोही परमेश्वर मानू लागतो. थोडासा तात्त्विक, थोडासा अध्यात्मिक कथाविषय शर्माजींनी निवडला होता. पण तो पडद्यावर साकार करणारे कलावंत अगदी नवखे व पोरसवदा होते. त्यांना तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांचा लवलेशाही माहित नव्हता. शर्माजींनी दिलेले संवाद बोलायचे व ते सांगतील त्याप्रमाणे अभिनय करायचा, एवढेच काम ते करीत असत. अगदी यंत्रवत. त्याचप्रमाणे शारीरिक, वैषयिक आणि उदात्त हे प्रेमाचे पैलूही त्यांना अवगत नव्हते. 
     ‘नीलकमल’ तयार झाल्यानंतर श्रेयनामावली देण्याचा प्रसंग आला. आतापर्यंत अताउल्लाची मुलगी ‘बेबी मुमताज’ या नावाने अगदी सुरूवातीच्या काळात ओळखली जायची. पण नंतरच्या काळात अताउल्लाच तिच्या नावाचा उल्लेख करताना बेबी हे नाव टाळून नुसतेच मुमताज म्हणायला लागला. त्यामुळे ‘नीलकमल’ च्या वेळी मात्र ती फक्त मुमताज याच नावाने ओळखली जाऊ लागली. पण केदार शर्मांच्या कानावर मुमताज बाँबे टॉकीजमधे असताना त्या स्टुडिओच्या सर्वोच्च स्थानावर असलेल्या देविकाराणी यांनी तिचे नाव बदललेले होते ही गोष्ट केव्हाच येऊन पोहोचली होती. अताउल्लाखानने हट्टाला पेटून तिचे मधुबाला हे बदललेले नाव स्वीकारले नव्हते, हेही त्यांना माहित होते. पण आपल्याच व्यवसायातील एका ज्येष्ठ व्यक्तीचा अपमान होऊ नये, अशा विचाराने त्यांनी अताऊल्लाची समजूत घालून देविकाराणी मॅडमनी दिलेले नाव मुमताजला अत्यंत समर्पक होईल, असे सांगितले. ही गोष्ट थोड्या विचारानंतर खुद्द अताउल्लालाही पटली. त्याने मुमताजचे नामकरण ‘मधुबाला’ करायला संमती दिली. अखेर 'नीलकमल' च्या श्रेयनामावळीत 'मधुबाला' हे नाव पहिल्यांदा झळकले. हा तोच काळ होता जेव्हा मधुबालाची तुलना मार्लिन मन्रो या अमेरिकन अभिनेत्रीशी केली जात होती. 
     यानंतर दिग्दर्शक मोहन सिन्हाने मधुबालाला घेऊन ‘चितोड़ विजय’, ‘दिलकी राणी’, ‘खुबसुरत दुनिया’ व ‘मेरे भगवान’ हे चार चित्रपट दिग्दर्शित केले. हे सारेच्या सारे १९४७ साली प्रकाशितही झाले. सातत्याने पडद्यावर दिसल्यामुळे मधुबालाला त्याचा एक फायदा झाला. या आधीच्या काळात तिच्या बालकलाकाराच्या भूमिका सोडल्या, तर नायिका म्हणून तिच्याकडे कुठल्याही मातब्बर संस्थेने पाहिले नव्हते. पण यानंतरच्या काळात तिला प्रभात फिल्म कंपनी, करदार फिल्मस्, ऑल इंडीया पिक्चर्स वगैरे महत्त्वाच्या चित्रसंस्थांनी पाचारण केले. एवढेच नव्हे, तर तिला गीताबाली, सुरेंद्र, सुरैया, याकूब, कामिनी कौशल वगैरे सारख्या सर्वमान्य कलाकारांबरोबर अदाकारी करण्याची संधी मिळाली.
     प्रभातचा ‘अपराधी’, करदारचा ‘दुलारी’, जे. के. नंदा यांचा ‘सिंगार’, ऑल इंडीया पिक्चर्सचा ‘पारस’ हे महत्त्वाचे चित्रपट पुढच्या वर्षी प्रकाशित झाले आणि मधुबाला उत्तम दर्जाची नायिका म्हणून ओळखली जाऊ लागली. ‘मिनर्व्हा मुव्हीटोन’चा ‘दौलत’ हा चित्रपटही रेंगाळत रेंगाळत याच वर्षी प्रकाशित झाला. १९४८ सालात तिच्या चित्रजीवनात सर्वाधिक चित्रपट रजतपटावर आले. त्यांची एकूण संख्या होती नऊ. 
     दरम्यानच्या काळात ऊर्दू भाषेतील जानेमाने लेखक व गीतकार कमाल अमरोही यांनी एक सुंदर कथा लिहिली होती. त्यामधून पुनर्जन्माचा आभास निर्माण होत होता. पण या प्रेमकहाणीला कमाल साहेबांनी रहस्यमयतेचा मुलामा अगदी कौशल्यपूर्ण रितीने दिलेला होता. चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद कमाल अमरोही यांचे होते, दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही आपले पहिले पाऊल पडावे म्हणून ते प्रयत्नशील होते. म्हणून या चित्रपटाचे दिग्दर्शन आपणच करावं असं त्यांनी ठरवलं. त्यांना नायिकेच्या भूमिकेसाठी अतिशय चांगली कलाकार हवी होती. तिच्या चेहऱ्यावर नाजूकपणा हवा, ताजेपणा हवा असे त्यांना वाटत होते. ते त्या प्रमाणे नव्या हिरोईनच्या शोधात लागले.
     यावेळी बाबूराव पटेल ‘फिल्मइंडीया’ या सिनेमासिकाचे संपादन करत असत. त्यांची व अताउल्लाची दोस्ती होती. त्यामुळे मधुबालाच्या चित्रपटाचे परीक्षण करताना बाबूराव आपल्या मासिकातून नेहमीच तिची स्तुती करत असत. 'फिल्मइंडीया' त्या काळातले अव्वल दर्जाचे सिनेमॅगेझिन असल्यामुळे सिनेवर्तुळातील लोकांच्या त्यावर उड्या पडत. कमाल अमरोही त्याचे वाचक होते. त्यामुळे नव्या नायिकेच्या शोधार्थ ते जेव्हा विचार करू लागले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम मधुबालाच आली. जेव्हा ते पहिल्यांदाच मधुबालाला भेटले तेव्हा तिच्या साध्यासुध्या पोशाखातूनही उठून दिसणारे सौंदर्य पाहून ते चकित झाले.
     त्यानंतर त्यांनी, ‘फिल्म बनेगी तो मधुबाला के साथ, वरना नही बनेगी।’ असं डिक्लेअर करून टाकलं. 
     ‘महल’ चित्रपटातल्या 'आयेगा आनेवाला' या गाण्याने तर बहारच उडवून दिली. प्रेक्षकांना मोहिनी घालणारी स्वररचना आणि त्यांना आकार देणारा लतादीदींचा आवाज यामुळे मधुबालावर चित्रित केलेली तीनही गाणी एकदम उचलली गेली. विशेषतः ‘आयेगा आनेवाला’ या गाण्याने तर रेकॉर्डस् च्या विक्रीचे उच्चांक गाठले. अर्थात 'आयेगा आनेवाला' हे गाणे लोकप्रिय होण्यासाठी कमाल अमरोहींनी केलेले दिग्दर्शनही तेवढेच महत्त्वाचे होते. त्याच्या चित्रीकरणासाठी त्यांनी प्रतिभा पणाला लावलेली दिसून येते.

नायक शंकर (अशोककुमार) नुकताच भयाण असलेल्या ‘संगम भवन’मध्ये आलेला असतो. आल्या आल्याच तिथला माळी त्याला या महालाचा इतिहास सांगतो व निघून जातो. एवढ्यात वादळ सुरू होऊन शंकरसमोर तसबीर येऊन पडते. तो तिच्याकडे निरखून पहातो, ती तसबीर त्याचीच असल्याचे त्याला कळून चुकते. घाबरलेल्या स्थितीत असतांना रात्रीचे दोनचे ठोके त्या महालातल्या घड्याळात पडतात व त्याचबरोबर त्याच्या कानावर स्वर्गीय सूर येऊ लागतात,

खामोश है ज़माना, 
चुपचाप है सितारे। 
आराम से है दुनिया, 
बेक़ल हैं दिल के मारे . . .

तो खिडकी लावतो. त्याच्या चेहऱ्यावर कसलीशी सावली पडते. तो वळतो व दिवाणखान्यातून फिरू लागतो. वाटेत जिना लागतो. त्याच्या पायऱ्या चढून वर जातो. वर काहीच दिसत नाही.

ऐसे में कोई आहट,
इस तरह आ रही है 
जैसे की चल रहा हो, 
मन में कोई हमारे . . .

वरून पुन्हा खाली डोकावतो. त्याला दिवाणखान्यातले झुंबर हालताना दिसते. तो पुन्हा खाली येण्यासाठी जिन्याच्या पायऱ्या उतरू लागतो.

या दिल धड़क रहा है, 
एक आस के सहारे

तोच त्याच्या कानावर पुढील सूर येतात. मग पुन्हा तो आवाजाच्या दिशेने वळतो.

आयेगा, आयेगा, आयेगा, आयेगा, 
आयेगा आनेवाला . . . 

काळ्या वेशात हातात मेणबत्ती घेतलेली एक तरुणी भयानक अंधारातून वाट शोधत पायऱ्या उतरताना दिसते. शंकर पुन्हा थबकतो. दरवाजा उघडून पुन्हा एकदा आवाजाचा कानोसा घेतो. तो महल सोडून बाहेर येतो. तोच त्याच्या कानावर   शब्द येतात,

दीपक बगैर कैसे परवाने जल रहे हैं, 
कोई नहीं चलाता और तीर चल रहे हैं

वास्तविक त्याची अवस्था तीच झालेली असते, तो समोर पाहतो, तर ती तरुणी झोके घेत असताना दिसते.

तड़पेगा कोई कब तक बेआस बेसहारे? 
लेकिन ये कह रहे हैं दिल के मेरे इशारे
आयेगा, आयेगा, आयेगा, 
आयेगा आनेवाला . . .

तो आणखी पुढे जायला निघतो. पण झोपाळा व तो यांच्यामधे कसलातरी आडोसा येतो. तोपर्यंत झोपाळा मागच्या बाजूस जातो. शंकर पुढे येऊन पहातो तर झोपाळा रिकामाच! बागेत असलेले कारंजेही आपोआपच बंद होतात. मग जवळ असलेले सूर खूप दूरवरून ऐकू येतात.

भटकी हुई जवानी मंज़िल को ढूँढती है, 
माँझी बगैर नैया साहिल को ढूँढती है

तो मागे वळून पाहतो, तर मघाची ती तरुणी नावेत बसून नाव वल्हवत जाताना त्याला दिसते . . .

क्या जाने दिल की कश्ती कब तक लगे किनारे, 
लेकिन ये कह रहे हैं दिल के मेरे इशारे
आयेगा, आयेगा, आयेगा 
आयेगा आनेवाला . . .

तो हातातल्या सिगरेटचा झुरका मारतो. सिगरेटची राख झटकतो आणि आपल्या हाताला चटका लावून पाहतो, आपण स्वप्नात तर नाही ना! तेवढ्यात त्याच्या हातातली सिगरेटही खाली पडते. बाहेरूनच तो खिडकीतून आत डोकावतो. आतल्या बाजूस खुर्चीवर तरुणी पांढऱ्या शुभ्र वेषात बसलेली दिसते. तो ताबडतोब दरवाज्यातून आत जातो. तोपर्यंत ती तरुणी गायब झालेली असते. तो दरवाजा उघडतो, पण तेवढ्यात त्याला ‘करकर’ वाजणारे बुटांचे आवाज ऐकू येतात. तो हातात पिस्तुल घेऊन आवाजाच्या दिशेने उभा राहतो व विचारतो, ‘कौन है?’
     ‘आयेगा आनेवाला’ हे प्रदीर्घ गाणे चालू असताना केवळ अशोककुमारच्या अभिनयावरच कॅमेरा खिळलेला असतो. बाकी सर्व दृश्ये केवळ त्याच्या अभिनयाला उद्युक्त करत असतात. पण एकही शब्द न बोलता केवळ अभिनयाच्या जोरावर सारा प्रेक्षकवर्ग तो सहजरित्या खुर्चीत खिळवून ठेवतो. गाण्याच्या यशाचे गमक जसे खेमचंद प्रकाश यांच्या सुरावटीला आणि लता मंगेशकरच्या आवाजाला द्यायला हवे, जसे कमाल अमरोहीच्या दिग्दर्शनाला आणि दृश्य भागांच्या तुकड्यांना व संकलनाला द्यायला हवे, तसेच ते अशोककुमारच्या मूकाभिनयालाही द्यायला हवे.

‘महल’मुळे अनेक गोष्टी उदयाला आल्या. रहस्यमय आणि गूढ चित्रपटाचे एक नवे दालन भारतीय चित्रपट सृष्टीत उघडले गेले. बाँबे टॉकीजची सांपत्तिक स्थित एकदम सुधारली. कमाल अमरोही हा नवा दिग्दर्शक चित्रपटसृष्टीस लाभला आणि सर्वात मुख्य म्हणजे मधुबाला लोकप्रियतेच्या अगदी शिखरावर जाऊन पोहोचली.


[ बाॅलिवूडच्या चंदेरी दुनियेतील रूपेरी स्वप्नवत असणाऱ्या अभिनेत्री मधुबालावरील लेखाचा हा पूर्वार्ध – खास तिच्या जन्मदिनानिमित्त. या लेखाचा उत्तरार्ध याच महिन्यात २३ तारखेला हे स्वप्न आपल्यातून विरले त्या दिवशी प्रसिद्ध होईल. ]
— क्रमशः


आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال