आवर्त : एक प्रेमकथा अशीही — भाग आठ

[वाचनकाल : ४ मिनिटे] 
 
ओरोबोरस, स्वत:ची शेपटी तोंडात धरलेला साप, oroborous
आता परत जाऊन पाय धरणार आहेस का त्या नटीचे? की, बाई माझी भूक मला आवरत नाही. मला लाथाडू नको. पलंगावरची माझी खादाडी मला करू दे.

एकाएकी चंद्रहासने प्राचीला झटकून टाकलं. तिच्या पुस्तकावर शब्दांकन म्हणून आपलं नाव येऊ नये पासून ते अगदी प्राचीच्या ओळखीवर मुंबईत नोकरीही नको इतपत तो जाऊन पोहोचला. त्वेषात चंदू असं वागून गेला मात्र नंतर दिवसरात्र वासना भेडसावू लागली! या बाबतीत मानसची मदत घेता येणं शक्य नव्हतं, प्राचीकडे माघारी जाण्यात कमीपणा होता आणि वासना क्षणाक्षणाला विळखा घट्ट करत नेत होती . . .
 
जाळ्यात गुरफटलेल्या माशाला बाहेर पडून मुक्तपणे पोहताना वाटेल तेच आता चंदूला वाटत होतं. त्याने मानसला सगळं सांगून टाकलं. ऐकताना मानसच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. पुन्हा अशा चुका करू नकोसअसं तो कळकळीने म्हणाला, तेव्हा बाईमाणूस आस्थेने बोललं असं चंदूला वाटलं.
मानस फार सुरेख नृत्य करायचा; पण पोरांनी कुचेष्टा करून, रॅगिंग करून त्याला त्या बाबतीत नाउमेद करून टाकलं होतं. त्याच्या कविता तर मानधन देऊन छापून येत होत्या.
संपादक गोडकर तर म्हणाले, “काव्यसंग्रहासाठी मी प्रकाशक सुचवतो. वेळ लागेल, पण ते काढतील संग्रह त्यांच्या खर्चाने. बापूसाहेबांची प्रस्तावना घेऊ.
बापू तांबे कोकणातले एक उत्तम कवी होते. अनेक नवोदित त्यांची प्रस्तावना मागत असत, पण कविता आवडल्या तरच ते प्रस्तावना देत. मुंबईतल्या कवींप्रमाणे वाट्टेल त्याला प्रोत्साहन आणि आशीर्वाद देत नसत. तांबे म्हणत, ‘सुमार दर्जाचं काव्य रचणारा कवी असेल तर प्रस्तावनेमुळे तो शेफारतो. खोटंनाटं प्रास्ताविक लिहू नये. त्या नवोदिताचं नुकसान होतं. प्रस्तावना कुणी लिहिली आहे तेच तो सांगायला लागतो.
मानसच्या वृत्तपत्रातल्या कविता वाचून मात्र बापूंनी त्याला स्वत:ला प्रशंसा करणारं पत्र लिहिलं होतं. लिंगलंबककविता प्रसिद्ध झाल्यावर तर बापू पत्रात म्हणाले, ‘मी तुझ्यावर कसलाही आरोप करत नाही. पण मराठीत अशा गे साहित्याचं स्वतंत्र दालन असायला हरकत नाही.
एखाद्या व्यसनाच्या विळख्यातून सुटावं आणि तरी अचानक, ध्यानीमनी तेच व्यसन डुलू लागावं तशी प्राचीच्या मनमोहक देहाची, त्या उत्कट कामक्रीडांची याद येऊन रात्री चंदू अस्वस्थ व्हायचा. आपण प्राचीला ठोकर मारली खरी, पण या अफाट संसारात कुणाचा तसा आधार, मदत नसताना आपण किनारा कसा गाठणार? मुंबईत आपल्याला कोण विचारणार? पर्मनंट नोकरी कधी लागणार? महागड्या शहरात पगारातलं काय उरणारदहा-बारा हजाराची नोकरी आहे, तरी आपलाच गाववाला महेश कर्जबाजारी झाला. व्यसनही वाढलं. प्राचीशी थोडं वाकडं घेऊन आपलं चुकलं का? अशांत मनाने चंद्रहास विचार करत राहिला. त्याने मानसलाच फोन लावला.
मला खूप अस्वस्थ वाटतंय. तू ये गप्पा मारायला. आत्ताच ये. वस्ती कर माझ्याकडे . . . प्लीज‌. फोनवर नाही सांगता येणार सगळं. रात्रभर जागू आपण. हळू आवाजात बोलू. म्हणजे घरच्यांना त्रास नाही.
आज्ञाधारक पत्नी माहेर सोडून परत सासरी ये, असा सांगावा आला की आजच, आत्ताच निघतेम्हणते तसा मानस आला. ज्याचा आपण अपमान करायचो, त्याच मित्राचा आपल्याला दिलासा, आधार का वाटतोय ते चंदूला कळेना. पुरूषच पुरूषाला समजून घेऊ शकतो का? समलैंगिक असला, तरी मानस शेवटी पुरूषच आहे.
तो आल्यावर चंद्रहास म्हणाला, “मानू, मी एका झटक्यात प्राचीला तोडलं-सोडलं, पण आता मला व्यसनी माणसाला अशांत, अस्वस्थ वाटतं तसं वाटतंय. काल प्राची स्वप्नातही आली होती. हे फक्त तुला म्हणून सांगतो.
मानसने प्रथमच चंद्रहासच्या कुरळ्या केसांवरून हळुवारपणे हात फिरवला. त्यानेही तो फिरवू दिला. त्यात त्याला वासनेचा अंश जाणवला नाही. अतूट अशी माया मात्र होती. कदाचित सहानुभूतीही मिसळलेली असेल. “मानू, मी काय करू? मुंबईच्या स्पर्धेत माझं काय होईल? आधीच आपल्यावर कोणाचा वरदहस्त नाही आणि उनाड बाईने जी चटक लावली, त्याचं काय? लग्न करावं तर अजून कशात काही नाही. बाहेर कुठे फ्लेश मार्केटला जावं तर धास्ती वाटते. तू सांगशील तसं करेन मी. बोल ना मानू?”
मानसला हा मित्र आता अगदीच पोरकट शाळकरी वाटू लागला. जणू एक बछडा, एक बच्चा. वाट चुकलेलं कोकरू. वाया जाऊ पाहणारं लेकरू.
त्याने चंदूच्या पाठीवर हलकेच थोपटत म्हटलं, “तू शहाणा आहेस की वेडा? बी अ गुड बॉय! धीर धरायला शिक. त्या प्राचीकडे आता पुन्हा अजिबात जायचं नाही. माझी कसम आहे तुला. हाच क्षण असतो मोहाचा, धोक्याचा . . . आता परत जाऊन पाय धरणार आहेस का त्या नटीचे? की, बाई माझी भूक मला आवरत नाही. मला लाथाडू नको. पलंगावरची माझी खादाडी मला करू दे. तुला हे शोभत नाही चंद्रा.
मानस आपल्यापेक्षा खूप मोठा आहे आणि आपल्याला कड्याच्या टोकावरून मागे खेचतोय, खऱ्या मित्राचा, आईपणाचा, मायाळू गुरूजीपणाचाही हा अंश ना? हेच देवत्व असेल का? देवपण म्हणजे तरी काय? चांगुलपणाच ना? माझा हा मित्र चांगलाच आहे. किती प्रेम आहे त्याचं माझ्यावर आणि ते वासनेच्या अंगाने जाता कामा नये हे या गे पोराला समजावल्यावर, बजावल्यावर त्याने त्याची तहान आवरली हे सुद्धा कौतुकास्पदच आहे. मानूला माझ्याबद्दल प्रचंड आकर्षण होतं, पण त्याच्या मनातल्या बाईपेक्षा आईपणाची भावना आता आकाश भरून यावं तशी भरून राहिलीय! रात्रभर अगदी जवळ निजूनसुद्धा मानसच्या वासनेने फणा काढला नाही. चांदणं झिरपावं, शीतल चंद्रप्रकाशात निर्धास्त व्हावं तसे ते दोघे रात्रभर एकमेकांचं हितगुज ऐकत, सांगत राहिले. रात्रभर संचार करणारं गूढ पाखरू तेवढं वाऱ्यावर अधूनमधून कुजबुज करत होतं. बाकी अवघा शुकशुकाट होता. या दोघांचे मैत्रीत चिंब झालेले शब्द उठत होते, मिटत होते. पहाटे चंद्रहासला झोप लागली. मानस न सांगताच निघून गेला स्वप्नात आलेलं आपलं माणूस अदृश्य व्हावं तसा!
खूप उशिरा चंदू जागा झाला. त्याच्या उघड्या अंगावर मऊ पांघरूण घालून आणि उशीपाशी पिवळ्या गुलाबाचं फूल ठेवून मानस निघून गेला. येताना असं काही फूल वगैरे तो कधी आणत नसे. त्यामुळे हे जरा वेगळं अजब वाटलं चंदूला.

क्रमशः

✒ लेखन - जान्हवी
 मेल
 

संदर्भ :
१) छायाचित्र - टाकबोरू

 

वाचत रहा :


आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال