आदर्शवादी राजा शिवाजी आणि आपण

[वाचनकाल : ३ मिनिटे] 
शिवाजी महाराज, shivaji maharaj
 
नक्की शिवरायांची जयंती तारखेनुसार कि तिथीनुसार हा वाद फार अलीकडचा – आदर्शवादी राजा शिवाजीचे दैवतीकरण होऊ लागले तेव्हापासूनचा. कोणत्याही मानवी महापुरुषाचे दैवतीकरण केले की दोन गोष्टी साध्य होतात एकतर ‘देवासारखे आपण वागू शकत नाही’ हे सांगून आचरणातून अनुकरण संपवता येते आणि दुसरे म्हणजे त्या व्यक्तीचे विचार समजून घेण्याची गरज उरत नाही. असेच सध्या महाराजांच्या बाबतीत होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आजही आपल्यासाठी आदरणीय आहे. शेकडो वर्षानंतरही आपण त्यांची जयंती साजरी करतोय. आजही कोणी शिवाजी महाराजांबद्दल काही अपशब्द उच्चारले किंवा त्यांचा अगदी एकेरी उल्लेख केला तरी आपणास राग येतो, परंतु शिवाजी महाराज नेमके होते काय, त्यांची शिकवण काय होती, त्यांना साध्य काय करायचे होते, हे जाणून घेण्याचापण नीट प्रयत्न करत नाही. शिवरायांचा ‘महाराष्ट्र धर्म’ म्हणजे नेमका काय हे जाणून घेण्याचा विचारसुद्धा होताना दिसत नाही.
     पाहायला गेले तर आपण सर्व शिवरायांना विसरलोच होतो. पेशवाई व त्यानंतरच्या इंग्रजांच्या कालखंडात शिवरायांचा नामोल्लेख झाला नव्हता. मात्र महात्मा जोतीराव फुले यांनी शिवाजी राजांची रायगडावरील समाधी शोधून काढली व मराठी जनांस सांगितले की, आपले आदर्श जपणारा, अस्मिता जपणारा असा एक राजा होऊन गेला आहे. 
     शिवाजी महाराजांबद्दल आपण फक्त अफजलखानाचा वध केला, शाहिस्तेखानाची बोटे कापली आणि मुघलांविरुद्ध लढले एवढ्या माहितीपुरते सीमित आहोत. शिवाजी महाराजांच्या दृष्टीने न्याय काय होता, त्यांनी इतरांचा आदर कशाप्रकारे केला, फक्त लढाया नाही केल्या तर जनतेचे हित लक्षात घेऊन, तह सुद्धा केले; व्यक्तिगत जीवनात अहंकाराला स्थान नाही दिले, या सर्व गोष्टी आपण कधी शिकणार आहोत?
     कोणत्याही गोष्टीसाठी क्रोधाला मनात स्थान देणारा हा राजा नव्हता. शिवाजीराजाला एक उत्तम समाजव्यवस्था निर्माण करायची होती. आज शिवरायांना आपण 'हिंदूधर्मरक्षक' ही उपाधी देतो; मात्र शिवरायांच्या साम्राज्यात सर्व धर्मांना समान स्थान होते. अफजलखानाच्या भेटीच्या प्रसंगापूर्वी त्याच्या चालीची गुप्त बातमी आणणारा हेर मुस्लिम होता. आज आपण इतिहास आपल्या सोयीनुसार रंगवतो. अफजलखानाच्या भेटीवेळी शिवरायांवर हल्ला करणारा कृष्णा भास्कर हा ब्राह्मण असल्याने त्याचे नाव कृष्णाजी भास्कर असे लिहिले जाते. मात्र शिवरायांचे प्राण वाचवणारा जिवाजी महाला हा खालच्या जातीचा असल्याने त्याचे नाव जिवा महाला असेच लिहिले जाते. आपल्या सर्व सैनिकांना भेदभाव न करता मायेने जपणारे शिवाजी महाराज, आपण खरंच समजून घेतले आहेत का?
     या प्रकारच्या विचारशैलीस फक्त आजची पिढी कारणीभूत नाही, तर त्या पिढीला घडवणारे काही विचारही कारणीभूत ठरतात. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जेव्हा शिवाजी महाराजांच्या सैनिकाने उचलून आणले तेव्हा, शिवाजी महाराजांनी तिचा आदरसत्कार करून तिला परत पाठवले व त्या सैनिकाला शिक्षा दिली. परंतु यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असे लिहिले की, ही शिवाजी राजाची चूक होती, शत्रुगटातील स्त्रियांचा अपमान करणे हा त्याकाळी शत्रूवर जरब बसवण्याचा एक प्रकार मानला जात असे. त्यामुळे शिवरायांनी असे करायला नको होते, असे सावरकर म्हणाले (संदर्भ: भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने).
     या प्रकारची नीतिमत्ता ठेवणारा हा राजा नव्हता. शिवाजी राजाला सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे होते. अगदी शत्रूवर लुटीच्या प्रसंगीसुद्धा त्यांच्या धर्मग्रंथांना, पवित्र स्थळांना किंवा स्त्रियांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सैन्याला फर्मावलेले असायचे. 
     माणसाच्या जन्मावरून नाही तर कर्तुत्वावरून त्याचे स्थान ठरते ही शिकवण देणारा हा राजा. आपण मात्र त्याच्या जन्माचाच विवाद उपस्थित केला. जिजामातांचं सिसोदिया कुळ हे क्षत्रिय कुळ असल्याने आपण नेहमी त्याचाच उल्लेख करत राहिलो. शहाजीराजे मात्र मागास जमातीतील असल्याने त्यांच्या कुळाचा कोणी उल्लेख केला नाही. शिवरायांचा राज्याभिषेकसुद्धा याच कारणाने अडवला गेला. आजही आपली विचारसरणी तितकीच मागास राहिली आहे. ज्या रामदासांना आपण शिवाजी महाराजांचा गुरू म्हणतो, ते रामदास किंवा त्यांचा कोणी शिष्य किंवा महाराष्ट्रातले कोणीही ब्राह्मण शिवरायांच्या राज्याभिषेकास पाठिंबा देत नव्हते. आज मात्र शिवरायांची घोषणा करताना 'गोब्राह्मणप्रतिपालक' हे बेंबीच्या देठापासून ओरडले जाते. उत्तर प्रदेशातील गागाभट्टाला राज्याभिषेकास आणले जाते, ते का, हा प्रश्न आपल्याला का नाही पडत?

आज फक्त ‘शिवाजी’ बोलले तर लोकांना राग येतो. ‘महाराज’ हा शब्द वापरायलाच हवा हा त्यांचा अट्टाहास असतो. आपली महाराजांबद्दलची भावना आज शब्दावरून ठरवली जाते, काय हीच शिकवण शिवाजी महाराजांकडून आपण शिकलो?
     आज शिवजयंती फक्त फेटे बांधणं व मिरवणुका काढणं यापुरतीच सीमित आहे. हे सर्व करण्यापेक्षा शिवाजी महाराजांची नेमकी शिकवण काय होती हे जर महाराष्ट्राने समजून घेतलं तर एक आदर्श महाराष्ट्र घडण्यास ती गोष्ट नक्कीच महत्त्वाची ठरेल.

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال