स्त्री स्वास्थ्य भाग – ५ (स्तनांचा कर्करोग – २)

[वाचनकाल : ४ मिनिटे] 
स्तनांच्रा कर्करोगाघे निदान करणाऱ्या डाॅक्टरांचे प्रतिकात्मक चित्र, doctor who cure breast cancer,

शहरी भागात तसेच ग्रामीण भागात वाढत चाललेल्या स्तनांच्या कर्करोगाची मूळ माहिती जसे की स्तनांचा कर्करोग का होतो, कधी होतो ठाऊक असेल तर निदान व उपचार सोपे होऊ शकतात. सोबतच जर स्तनांचा कर्करोग आढळला तर कोणती उपचारपद्धती वापरतात हेही जाणून घेणे आवश्यक . ‌. .

मासिक पाळीदरम्यान होणार्‍या हाॅर्मोनल बदलांमुळे स्तनांना जडत्व येणे हे सामान्य आहे, परंतु स्तनामधे गाठ आल्यासारखे वाटणे किंवा गाठ असणे हे सामान्य नाही. गाठ ही कर्करोगाचीच असेल (Malignant) असे जरूरी नाही, ती साधीही असू शकते (Benign) गाठ नेमकी कशाची आहे हे चाचणी करून माहिती केले जाते व त्यानुसार उपचार दिले जातात. 
कर्करोगाची गाठ असल्यास खालील लक्षणांकडे बारकाईने लक्ष द्यावे.

लक्षणे

स्तनामध्ये गाठ असणे हे स्तनाच्या कर्करोगाचे पहिले प्रमुख लक्षण आहे, कितीही लहान गाठ असली तरी ती स्तनाचा कर्करोग असू शकते. दुसरे प्रमुख लक्षण म्हणजे स्तनाग्रामधुन (निप्पल/Nipple) रक्तस्त्राव होणे, काळसर पाणी किंवा साधे पाणी येणे. याशिवाय निप्पल मागे ओढले जाणे, निप्पलच्या कडेला जखमा होणे ज्या भरत नाहीयेत किंवा दोन्ही स्तनांमध्ये लहान-मोठेपणा येणे, स्तनावर जी त्वचा आहे ती जाड होणे किंवा काखेत गाठ जाणवत असेल तर ही सर्व स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत.स्तनाच्या कर्करोगाची काही करणे अशीही आहेत जी आपण बदलू शकतो, जसे की, पाळी बंद झाल्यावर आलेला लठ्ठपणा (हे प्रमुख कारण आहे) तसेच व्यायामाचा अभाव, बाळाचे स्तन्यपान न करणे, काही स्त्रियांमध्ये गर्भधारणा न होणे हेही एक कारण आहे. शहरातील स्त्रियांमध्ये मद्यपान करण्याचे प्रमाण वाढले आहे, हेदेखील स्तनाचा कर्करोग होण्याचे कारण आहे. तसेच पाळी बंद झाल्यानंतरची लक्षणे कमी होण्यासाठी ज्या गोळ्या घेतल्या जातात, त्यामुळेसुद्धा स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.

परीक्षण

प्रत्येक स्त्रीने वयाच्या २१व्या वर्षानंतर जर स्व-स्तनाचे परीक्षण केले तर आपल्याला सुरूवातीच्या पातळीवरच कर्करोगाचे निदान होऊ शकते. पाळीनंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी स्व-स्तनाचे परीक्षण आणि हातांनी तपासणी करताना स्तनातील गाठ, स्तनाग्रांमध्ये झालेले बदल किंवा त्वचेमध्ये झालेले बदल जर आढळले तर कर्करोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपण लवकर कर्करोगाची माहिती मिळवू शकतो व नंतर उपचार करू शकतो. शिवाय प्रत्येक स्त्रीने वयाच्या चाळीशीनंतर ‘मॅमोग्राफी’ (Mammography) करणे गरजेचे आहे. 

मॅमोग्राफी म्हणजे काय

मॅमोग्राफी म्हणजे साध्या शब्दात स्तनांचा एक्स रे काढणे. त्यास मॅमोग्राम असे म्हणतात. स्तनाचा कर्करोग शोधण्यासाठी आणि निदानासाठी वापरले जाणारे हे स्क्रीनिंगचे साधन आहे. 
स्क्रीनिंग’(screening/शोध घेणे ) आणि डायग्नॉस्टिक’ (diagnostic /निदान करणे) अशा दोन प्रकारच्या मॅमोग्राफी असतात. स्क्रीनिंग मॅमोग्राफीमध्ये केवळ एक्स रे काढून चाचणी केली जाते. ही चाचणी प्रामुख्याने चाळिशीपुढील महिलांना सुचवली जाते, ज्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं दिसत नाहीत. मात्र ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं आढळणार्‍या महिलांना डायग्नॉस्टिक मॅमोग्राफी सुचवली जाते. ही सुद्धा एक्स रे स्वरूपातील चाचणी असते.
मॅमोग्राममध्ये काही अनियमितता आढळली तर त्याचे योग्य निदान करण्यासाठी अधिक तपासण्या केल्या जातात. अनेक वेळा सोनोग्राफीने शंकानिरसन होते, तर कधी टोमॉसिन्थेसिस, किंवा ब्रेस्ट MRI या विशेष इमेजिंग (imaging) साधनांचा वापर केला जातो. कर्करोगाची किंवा त्याच्या प्राथमिक अवस्थेची थोडी जरी शक्यता असेल, तर सुईची तपासणी म्हणजे बायोप्सी (Biopsy) केली जाते. गाठ हाताला लागत नसेल तर बायोप्सीसाठी स्टिरिओटॅक्सी (Stereotaxy) चा वापर केला जातो.

कशी करतात मॅमोग्राफी

तंत्रज्ञ छाती मशीन प्लेटवर ठेवतो. छातीचा एक्स रे निघत असताना प्लास्टिकची टॉप प्लेट काही सेकंदांसाठी छातीवर दाब देण्यासाठी खाली येते. संपूर्ण प्रक्रियेस सुमारे २० मिनिटे लागतात. वास्तविक छातीचा दाब फक्त काही सेकंद टिकतो. जेव्हा स्तन संकुचित होतात, तेव्हा काही अस्वस्थता जाणवू शकते. काही स्त्रियांसाठी हे वेदनादायक असू शकते. मॅमोग्राम तपासण्यासाठी, प्रत्येक स्तनाची दोन तरी दृश्ये घेतली जातात.
बरेचदा हाताला गाठ लागते; पण मॅमोग्राफीमध्ये दिसत नाही. त्यासाठी स्तनाची काही जरी तक्रार असेल तर मॅमोग्राफी करण्याआधी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. त्यांनी सुचवली तरच करावी. गाठ मॅमोग्रॅम मध्ये न दिसण्याची अनेक करणे असू शकतात. तपासणी करताना नीट पोझिशनदिली गेली नाही, तर स्तनाचा पूर्ण भाग चित्रामध्ये येत नाही आणि रिपोर्टिंगमध्ये चूक होऊ शकते. काही महिलांमध्ये स्तनाची ठेवण घनिष्ट असेल (Dense breast/डेन्स ब्रेस्ट) असतील तर एक्स रेची तपासणी पुरेशी होत नाही आणि सोनोग्राफी किंवा इतर साधनांची मदत घेतली जाते.मॅमोग्रॅममध्ये कॅल्सिफिकेशन (calcification/कॅल्शियमचे थर) दिसलं तर त्याचा अर्थ शरीरात कॅल्शियम जास्त आहे असा होत नाही, मॅमोग्राममध्ये दिसणाऱ्या कॅल्सिफिकेशनचा शरीरातल्या कॅल्शियमच्या पातळीशी संबंध नसतो.
कॅल्सिफिकेशन पॅटर्न’ (Distribution Shape)वरून त्याचं काय कारण आहे हे अनुमान लावलं जातं. काही विशेष प्रकारचे कॅल्शिफिकेशन हे कॅन्सरची शक्यता दर्शवतात म्हणून ही तपासणी अनुभवी ब्रेस्ट रेडिओलॉजिस्टकिंवा ब्रेस्ट सर्जननी पारखून पाहणं आवश्यक आहे. अशा कॅल्सिफिकेशनसाठी बायोप्सी (Stereotactic Vaccum Assisted Biopsy) करावी लागते.

बायोप्सी (Biopsy) 

स्तनांच्या कर्करोगाची संभाव्य लक्षणे आढळल्यास बायोप्सी (Biopsy) करणे गरजेचे असते. यात स्तनाच्या गाठीतून काही पेशी व गाठीचा काही भाग काढून तो तपासणीसाठी पाठवला जातो. त्या भागाचे व पेशींचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करून कर्करोगाचे निदान करतात. यानंतर आजाराची स्टेज कोणती आहे यासाठी काही तपासण्या करणे आवश्यक असते. सुरूवातीची लहान गाठ असेल तर जास्त तपासणी करण्याची गरज नसते. पोटाची सोनोग्राफीलिव्हर फंक्शन टेस्ट आणि छातीचा एक्सरे करून आपण त्याचे निदान करु शकतो, पण जर गाठ मोठी असेल आणि काखेतही गाठी आल्या असतील  तर सीटी स्कॅनकिंवा पेट स्कॅन’ (CT scan/ PET scan) करावे लागते.
स्तन कर्करोगाच्या अवस्था, उपचार व इतर माहिती पुढील लेखात.
सजग रहा, स्वस्थ रहा.

 
संदर्भ :

१) छायाचित्राचा गुगलस्त्रोत

 
वाचत रहा :


आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال