आवर्त : एक प्रेमकथा अशीही — भाग सात

[वाचनकाल : ४ मिनिटे] 
ओरोबोरस, ouroborus

कितीही खेळीमेळीत घेतले तरी प्राचीचा विळखा आता आपल्या भोवती करकचून आवळला जात आहे हे चंद्रहासला अमान्य नव्हते. त्या दोघांत प्रस्थापित संबंध ‘पुरकता’ होते कि ‘परावलंबन’? मानस मात्र सर्वकाही जाणत होता; पण या विषयात ढवळाढवळ करण्याचे त्याचे अधिकार चंदूने हिसकावून घेतलेले. पण जे घडतेय त्याला मानसचा विरोध का होता? त्या दिवशी शेवटी हो नाही करता-करता मानसने ‘श्यामची आई’ चंदूच्या हातात कोंबलेच . . .

चंदू रात्री उशिरा प्राचीच्या पुस्तकाचं काम करत पडवीत जागायचा. दूर कोल्हेकुई ऐकू यायची. एकदा पडवीतल्या दिव्याच्या प्रकाशाच्या दिशेने एक जहरी घोणसही सरपटत आला होता. रात्रीचं जगच वेगळं होतं. पुस्तकाचं काम आज करायचं नाही असं ठरवून चंद्या ‘श्यामची आई’ वाचू लागला. एक अदृश्य वत्सल हात आपल्या पाठीवरून फिरतोय असा अनुभव आला. काही वेगळंच हळवं, ओलं रसायन त्या पुस्तकात होतं. कोकणमातीचा, संस्कृतीचा अस्सल गंध होता. धडपडणाऱ्या हट्टी मुलाची ती अस्वस्थ करणारी सत्यकथा होती. गुरुजींनी तुरुंगात असताना रात्री जागून हे अमृत निर्माण केलं हे चंदूला ठाऊक होतं.
     खरं तर कॉलेजातली मुलं गुरुजींबद्दल फार बरं बोलत नसत. त्या पोरांनीही ‘श्यामची आई’ हे पुस्तक वाचलं नसावं. रात्रभर जागून चंद्रहासने ‘श्यामची आई’ पुस्तक वाचलं. आपल्याला गहिवरून का आलं? आपण असे कसे जुन्या पुस्तकात गुंतत गेलो? गुरुजींच्या मनात जो उचंबळणारा दर्या होता, त्या लाटा आपल्या मनात शिरल्या का? त्याला काही कळेचना! त्याने पहाटे पहाटे मानसला मेसेज पाठवला.
साने गुरुजी खरंच महान आहेत. इतकं सुंदर पुस्तक वाचायला दिलंस, धन्यवाद.
प्रेमळपणाचा जो पदर ‘श्यामची आई’ला लाभलाय तो विशुद्ध ममतेचा आहे. वासनेचा नाही.  प्राची मॅम मनाने आई होऊ शकल्या नाहीत, म्हणून अशा भरकटल्या का? मानसलाही कोणताही यार, दोस्त, परिपूर्ण पुरुष मूल देऊ शकणार नाही. स्त्रीशी समरस होणंही मानसला आवडणार नाही, त्यामुळे तो असा अधुरा, अस्वस्थ वाटतो का? मी मॅमना त्यांचं आईपण मिळवून दिलं तर? पण एकदा कॅन्सर होऊन गेल्यावर आता ती नवी जबाबदारी त्या घेणारही नाहीत आणि कदाचित आई होण्यात त्यांच्या आणखीही अडचणी, समस्या असतील. बाई आपल्याला आवडते; पण ती समग्र अशी समजते कुठे? 
     ‘श्यामची आई’ची जादू काही उतरेना! जागरणाने थकल्यागत वाटलं तरी नवं, अनोखं काही प्राप्त झालं असं चंद्रहासला वाटलं. समुद्राच्या पाण्यातलं प्रदूषण कमी होऊन तो निळा जांभळा, लखलखीत वाटू लागावा तसं आज चंद्रहासला स्वच्छ, प्रकाशित वाटत होतं.
     प्राचीच्या गढूळ जीवनाचा सगळा चित्रपट शब्दबद्ध झाला होता. पुस्तकाचं काम आता संपणार होतं. ‘ते अश्लील पुस्तक आता मिटायला हवं, फार झाल्या उनाडक्या’ हे मनातून कोण बोललं तेच चंदूला कळेना मात्र कुणीतरी बोललं खरं! ती कुणाची आई मनातून असं बोलत होती? की, पूर्ण पुरुषाच्या काळजातही अस्तित्वात असलेला तो स्त्रीत्वाचा अंश होता?

मॅममुळे माझं नाही म्हटलं तरी अध:पतनच झालं. पण ही अधोगती थांबवण्याची शक्तीही स्त्रीमध्येच असते ना? ‘श्यामची आई’ ज्या ताकदीने परिस्थितीच्या भोवऱ्यात उभी राहिली. तोच तिचा असाधारण गुण ना? हळूहळू गुरुजीच ‘माऊली’ बनत गेले! मग मी मानसमधला जरा अधिक असलेला स्त्रीगुण नाही म्हटलं तरी तुच्छ का मानतो? मी त्याला कमी लेखतो. तो नसताना ‘आज बायल्या आला नाही!’ असं म्हणतो. स्त्री हीच आम्हा पुरुषांना कमीपणाची, केवळ वापरायची गोष्ट वाटते की काय? प्राची मॅडमने वर्चस्व निर्माण करत मला वापरलं, आमिष दाखवलं म्हणजे त्या पुरुष ठरल्या आणि मी देखणी बाई! स्त्री म्हणजे काय? पुरुष म्हणजे कोण? केवळ शुक्रजंतूंची नळी आहे आणि देशाची लोकसंख्या वाढवतोय तो पुरुष?

डायरीत शब्दांचा इतका गुंता होऊ लागला की, मॅमचा फोन वाजतोय तिकडेही लक्ष गेलं नाही. त्यांच्याकडून एसएमएससुद्धा आला. ‘व्हेअर, आर यू मॅन? काय करतोयस?’ त्याने उत्तर दिलं नाही. फोनही केला नाही. आपण प्राचीवर नाराज आहोत की, स्वत:वर? तेही त्याला नीट कळत नव्हतं. ‘श्यामची आई’ने त्याचं लहान मूल करून सोडलं होतं. प्राचीकडे पुस्तकाचा अखेरचा भाग सोपवण्यासाठी त्याला जावं लागलं; पण त्या भगभगीत दुपारी त्याने प्रणयाला साफ नकार दिला. 
     “झालंय काय तुला?” प्राचीने विचारलं. “सगळं मानधन मिळालं. आता गरज संपली, असंच ना?” चंद्रहास काहीच बोलला नाही. शिक्षा केलेल्या मुलासारखा गप्पच राहिला. “तुला मुंबईला जायचंय ना राजा? मी आहे तुझ्याबरोबर.” प्राचीने पुन्हा गळ टाकला. 
     “मला कुठेही जायचं नाहीये आणि खरं सांगू, मला आता आपल्या या खेळाचाही कंटाळा आलाय. मला आता एखादी चांगली मैत्रीण बघून लग्न करायचंय. मला माझ्या बायकोला आई बनवायचंय. एक खूप सज्जन, प्रेमळ आई. माऊली.” हे आपण काय आणि कसं बोलून गेलो तेही चंदूला समजेना.
     प्राची बघतच राहिली. कुचेष्टेने हसलीसुद्धा. 
     “प्राची, यानंतर आपण भेटायचं नाही. माझं नावही नको पुस्तकावर. तूच स्वत: लिहिलंस असं दाखवू आपण. मला ‘घोस्ट रायटर’ राहू दे. शब्दांकन कुणाचे ते कळता कामा नये.” अशी अटच चंदूने घातली.
     “समजा, तुझ्या मैत्रिणीला आपली ही दोस्ती मी सांगितली तर?” प्राचीने पवित्रा बदलला.
     “परी आहेस तर सुंदर परीसारखं वाग. चेटकीण होऊ नकोस. तुझ्या आधी मीच सांगून टाकणार आहे जी मुलगी आवडेल तिला. तू माझं लग्न थांबवू शकणार नाहीस.”
     चंदूने प्राचीला झटकून टाकलं. संबंध सुरू झाल्यापासून तो तिला प्राची अशीच एकेरी हाक मारत असे. 
     “तुझ्यासारखा दुसरा कुणीही मिळेल मला. तुझ्यावाचून माझं अडेल असं वाटलं की काय?” ती आता भांडणाच्या पवित्र्यात होती. ड्रिंक तर ती रोज घ्यायचीच. 
     “गुडबाय मॅम, पुन्हा आता संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही मला चांगला मोबदला दिलात; पण हे इथेच थांबलं पाहिजे. काही खेळी करायला जाऊ नका. प्रॉब्लेम होईल तुम्हालाच! माझ्यावाचून तुमचं अडेल असं मी कधीच म्हटलेलं नाही, पण इतके जवान पोरगे तुम्ही खेळवलेत तरी मनाने आई होऊ शकला नाहीत. मनाने आई झाला असतात, तर कदाचित नीट वागला असतात – आईने वागायला हवं तसं!”

हे ऐकल्यावर मात्र प्राची मनातून थोडी ओशाळली. ढासळलीच. त्याने वर्मावरच घाव घातला. आपण ‘निम्फोमॅनिया’च्या पेशन्ट आहोत, अतिरेकी कामांधतेची शिकार आहोत, अपसामान्य अतृप्तीचा बळी आहोत हे त्यांना माहीत होतं. डॉक्टरांनी त्या असमाधानीपणाचं कारण सांगितलं होतं. निदान केलं होतं.


— क्रमशः


• संदर्भ :
१) छायाचित्राचा गुगलस्त्रोत

• वाचत रहा :


 

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال